ऑस्कर नॉमिनेशन्स २०१५: व्हिपलॅशः खिळवून ठेवणारी नाट्यपूर्ण सांगितीक जुगलबंदी

जॅझ संगीताच्या रसिकांना हँक लेव्ही हे नाव कदाचित माहिती असेल. त्याची 'व्हिपलॅश' नावाची एक धून कित्येक दशकांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी त्या सुरावटीने किती जादू केली होती याची कल्पना नसली तरी यंदाच्या ऑस्कर नामांकन मिळालेल्या चित्रपटांपैकी याच नावाच्या चित्रपटाने - अर्थात 'व्हिपलॅश' या चित्रपटाने - मात्र आपले काम चोख बजावले आहे. तसा संगीतावर आधारीत चित्रपट किंवा एखाद्या व्यक्तीचा व बॅण्डचा स्वतःशी व परिस्थितीशी असलेला झगडा व असामान्य जिद्दीने त्यावर केलेली मात हा काही नवखा विषय नाही. ‘व्हिपलॅश’ सुरू झाल्यावर तसेच काहीसे वाटू लागते. मात्र शेवटच्या टप्प्यात चित्रपटात असे काही नाट्य घडू लागते की चित्रपटाचा नूरच पालटतो.
 
साधारणतः जॅझवर आधात चित्रपट म्हटले की सिगारेट्सचा धूर, मद्य, ड्रग्ज आणि सेक्स यांची रेलचेल असे समीकरण जमवले जाते. त्यात जॅझ संगीतातील "ड्रमर" हा महत्त्वाचा म्हणून दाखवला जात असला तरी 'ऍकॅडेमिक' अभ्यासपूर्ण कलाप्रकार म्हणून दाखवला जात नाही.  पण लेखक-दिग्दर्शक डेमिअन शझेल यांच्या या काहीशा नवख्या/वेगळ्या नाट्यपूर्ण चित्रपटात या कलाप्रकाराला वेगळाच पोत दिला आहे. एखाद्या थिएटर किंवा क्लब/पबपेक्षा, या चित्रपटातील नाट्य, एका मोठ्या व नामांकित म्युझिक स्कूलच्या तळघरातील सराव खोलीत घडते. शझेल यांचे यश इथेच आहे की, असे असूनही हे एखाद्या लहान खोलीत सीमित असणारे नाट्य किंवा अतिशय कोंदट फिलिंग देणारा चित्रपट न भासता, प्रेक्षकाचे सारे लक्ष  एकीकडे संगीताची जादू आणि दुसरीकडे प्रशिक्षकाची काहीशी आदरयुक्त -पण असामान्य- भीती व शिकवण्याच्या पद्धतीकडे व शिष्याच्या जिद्दीकडे लागून राहते.
 
माइल्स टेलर याने १९ वर्षीय 'अँड्र्यू'ची भूमिका साकारली आहे. अँड्र्यू हा शाफर नावाच्या एका प्रसिद्ध म्युझिक स्कूलमध्ये एक ध्येयवादी तरुण विद्यार्थी असतो. टेरेन्स फ्लेचर (जे. के‌. सिमन्स) हा त्या विद्यालयातील एक अतिशय संवेदनाशून्य आणि कलासक्त शिक्षक असतो. त्याची पत,  त्याच्याभोवती असलेले वलय, आभा आणि त्याचा धाक प्रेक्षकाच्या पहिल्या काही मिनिटांतच लक्षात येतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच कळते की, या शिक्षकाच्या सर्वोत्तम विद्यार्थ्याने नुकतीच आत्महत्या केलेली आहे.  त्याचे टेरेन्सला दुःख असले तरी खेद नसतो. त्याचा आवडता सॅक्सोफोनिस्ट चार्ली पार्करसुद्धा ३४व्या वर्षी गेल्याची आठवण तो करून देतो आणि वर्ग पुढे चालू  करतो. अँड्र्युचे टॅलेंट हेरून टेरेन्सने  त्याला आपल्या बँडसाठी उचलले असते. आणि मग सुरू होतो, कधीही समाधानी न होणारा गुरू आणि त्याच्या प्रत्येक आव्हानाला जिद्दीने तोंड देणाऱ्य शिष्याची अनोखी जुगलबंदी. आपल्या संवेदनाहीन स्वभावाला अनुसरून, धाकात ठेवू शकणाऱ्या टेरेन्सची पद्धत प्रसंगी क्रूर वाटावी अशी असते. मात्र त्या बदल्यात शिष्यांना जे ज्ञान मिळत असते ते ही असामान्य दर्जाचेच असते. कलेतील कोणतेही ज्ञान मिळवायचे तर प्रचंड मेहनत, सराव यांच्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी कोणत्याही पातळीचा त्रास भोगावा लागला तरी बेहत्तर असे त्याचे तत्त्वज्ञान असते. मग प्रचंड शिवीगाळ किंवा प्रसंगी वस्तू फेकून मारणे किंवा थोबडवणे वगैरे मार्ग अवलंबूनही तो विद्यार्थ्यांकडून हवा तो रिझल्ट मिळवत असतो. दिग्दर्शक व स्वतः सिम्सनचे कौतुक असे की असे सगळे असूनही प्रेक्षकाला अँड्र्यूबद्दल वाईट वाटत असले, या प्रकारच्या शिकवण्याबद्दल आश्चर्य वाटत असले तरी टेरेन्सबद्दल राग, घृणा किंवा अनादर मात्र वाटत नाही. आपल्याकडील संगीतातील गुरू-शिष्य परंपरेतही काही विक्षिप्त परंतु त्यांच्या कलेत अत्युच्च दर्जाला पोचलेल्या गुरूंच्या कथाही काही कमी नाहीत म्हणा. तर ते असो.
 
पुढे आता अँड्र्यू छान वाजवू लागणार आणि हे स्पर्धा जिंकणार वगैरे कयास प्रेक्षक लावू लागतो आणि प्लॉट बदलतो. एका स्पर्धेच्या वेळी, काही अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडी अशा काही घडतात की आतापर्यंत गुरू शिष्य असलेले हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकतात. मग प्रेक्षक अनुभवू लागतो एकाच वेळी भावना आणि संगीत यांचा अजोड मिलाफ असलेली  जुगलबंदी. शेवटच्या अर्ध्या तासात घटनाक्रम इतक्यावेळा व अश्याप्रकारे बदलतो, की "जिद्दपटांत” काय होणार हे बघायला सरावलेल्या प्रेक्षकाला चित्रपट चकीत करतो, नि तो अशा एका वेगळ्या दिशेने जातो की आपण खुर्चीत रुतून बसतो. एखाद्या "म्युझिकल नाट्य"पूर्ण चित्रपटात मिळणारे उच्च संगीत, एखाद्या थरारपटातली उत्कंठा आणि थरार असे दोन्ही अनुभवायला देऊन एका उंचीवर जात -व सोबत प्रेक्षकालाही नेऊन- हा चित्रपट संपतो.
 
नाट्यपूर्ण चित्रपटांत पटकथा, संवाद हे महत्त्वाचे असतातच; परंतु अशा व्यक्तीकेंद्रित स्वभावांवर आधारित चित्रपटांत 'कास्टिंग'सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. माइल्स टेलर आणि जे. के‌. सिमन्स आपापल्या भूमिका ज्या नजाकतीने आणि ताकदीने उभ्या करतात त्याला तोड नाही. खरंतर सिंप्सन हे एक नावाजलेले 'विनोदी' अभिनेते. अशा वेळी एक अतिशय करड्या रंगातील भूमिका - जी त्याच्या करडेपणाला अभिमानाने दाखवत फुलते आहे - ते ज्या प्रकारे उभारतात त्यात बरेच काही अनुभवण्यासारखे आहे.
 
जर एखाद्या बंद खोलीत घडणाऱ्या कथानकातून तुम्हांला एकाच वेळी असामान्य संगीत, जिद्द, नाट्य, थरार यांच्या अनोख्या मिश्रणाने आपल्या हृदयाच्या ठोक्यामध्ये झालेली वाढ अनुभवायची असेल तर यंदा ऑस्करसाठी नॉमिनेट झालेल्या 'व्हिपलॅश'ला पर्याय नाही!

व्हिपलॅश - चित्रपटाची /नाटकाची माहिती

व्हिपलॅश
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: डेमिअन शझेल
  • कलाकार: माइल्स टेलर, जे.के.सिमन्स
  • चित्रपटाचा वेळ: १०६ मिनिटे
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: $8.5 Million
  • प्रदर्शन वर्ष: 2014
  • निर्माता देश: United States of America