राजवाडे अॅण्ड सन्स (२०१५): कुटुंबपटाचा देखणा पसारा
काल 'राजवाडे अॅण्ड सन्स' बघून आलो. येताना गाडी चालू केली आणि आमच्या गाडीतल्या डेकने रॅंडम सिलेक्शन करून एक गाणं वाजवायला सुरुवात केली - "आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा". म्हटलं वा! आमच्या डेकला गाणी निवडायला गूगलनेच शिकवलं असावं. गूगलमध्ये आपण एखादी वस्तू, स्थळ इत्यादीबद्दल काही शोधलं/वाचलं की नै का, कोणत्याही संस्थळांवर आपल्याला त्याच वस्तूशी संबंधीत जाहिराती दिसू लागतात, तसं! खरंतर, "राजवाडे अॅण्ड सन्स" बघितल्यावर याइतकं चपखल गाणं वाजवणं गूगललाही कदाचित सुचलं नसतं.
कुंडलकर आणि कुटुंबकेंद्रित विषय यात नावीन्य अजिबात नव्हतं. कुटुंब नावाचा अजस्त्र (आणि बर्यापैकी माजलेला - फोफावलेला) प्राणी त्यांनी आजवर इतक्या कोनांतून चितारला आहे, त्यावर काही प्रयोग केलेत, तर कधी कधी त्याचा एकच अंग अतिशय जवळून हाताळलं आहे की या प्राण्याबद्दल त्यांचा चित्रपट एका लेव्हलहून वाईट असणारच नाही याची खातरी होती. मात्र त्याचबरोबर आजवर कमी पात्रे घेऊन, या कुटुंबसंस्थेचा एकेक पैलू किंवा नात्यांत होणारे बदल त्यांनी टिपले असताना, एकावेळी ८-१० पात्रांचा पट - तो अख्खाच्या अख्खा कुटुंब नावाचा प्राणी - ते कसा चितारतात, याची कमालीची उत्सुकता होती. सुदैवाने एक बरा 'व्यावसायिक चित्रपट' त्यांनी दिला खरा, पण दुर्दैवाने कुंडलकर स्वतःच्या फूटपट्टीवर कमी पडले असे म्हणायला हवे. मी आता चित्रपटाची पूर्ण कथा सांगणार आहे कारण त्यात नवं किंवा लपवून ठेवावं किंवा स्वतःच अनुभवावं असं काहीच वाटलं नाही.
तुम्ही 'कोबाल्ट ब्लु' वाचलीये का? किंवा तुम्ही 'बावर्ची' किंवा 'खूबसूरत' वगैरे चित्रपट पाहिले असतीलच. तर तसे असल्यास, चित्रपटाच्या कथासूत्रात तुम्हाला फार वेगळं काही जाणवणार नाही. एका कुटुंबाला नवख्या असलेल्या व्यक्तीने घरात शिरून अख्खं परिमाण बदलायचं ते हे सुत्र! खरंतर हे सुत्र या चित्रपटाचे केवळ एक अंग आहे, पण ते इतकं मोठं होऊन बसतं की शेवटी तितकच उरतं. एक भलंमोठं नव्वदीच्या दशकात शोभावं तसं एकत्र बांधलेलं कुटुंब. राजवाडे नावाचे प्रस्थ व त्यांची बायको, त्यांना तीन मुलं - दोन भाऊ, एक बहीण - आणि त्यांची मुलं असे एकूण १० जण त्या कुटुंबात राहत असतात. चित्रपटाला सुरुवात होते - ती मूळ जागी नवी इमारत होणार असल्याने- मूळ वाडा पाडून विस्तारीत पुण्यातल्या एका पॉश इमारतीत हे कुटुंब राहायला गेलं आहे तिथपासून. कुटुंबाचा प्रमुख, एक मोठं सराफी प्रस्थ, एकदम कडक! त्याची तिन्ही मुलं, बायका, नातवंड वगैरे या महाशयांनी आपल्या धाकाच्या जोरावर करकचून बांधलेली - कुटुंब या नावाखाली. खूप पूर्वी त्यांचा एक घर सोडून गेलेला मुलगा आहे याचा - दिग्दर्शकाला सहज/क्वचित वाटत असला तरी- सतत प्रकर्षाने होणारा उल्लेख. (तो उल्लेख इतक्यांदा होतो की बाबा रे! आण एकदाचा त्या घर सोडलेल्या आनंदी मुलाला. किती फुटेज खाणारेस! असे ओरडावेसे वाटले. त्याच्या आठवणीने खंतावलेली आई, 'तो परत येईल तेव्हा वाडा नसेल' असे म्हणते तेव्हाच मला (मनातल्या मनात) हेलिकॉप्टरचे आवाज ऐकू येऊ लागले.. बरोब्बर सीन ओळखलात! जेव्हा हे अख्खे कुटुंब 'देव हालवायचे', 'वाड्याला शेवटची भेट' वगैरे बोलून तिथे जाते, तेव्हा 'कभी खुशी कभी गम' मधील शाहरुख-हेलिकॉप्टर-परतणे छाप शीन येऊ घातलाय अशी कुशंका अज्जिबात खोटी ठरली नाही. ) तर अर्थातच परतलेला त्याचा मुलगा फारच प्रागतिक विचारांचा असतो हे आधीच ठसवून ठेवलेले असते. (फक्त तो इतका गोजिरवाणा तरूण असेलसा अंदाज नव्हता ;) ). आता दहावी-अकरावीत म्हणजे -सोळा सतरा वर्षांचा असतानाच - घर सोडलेल्या मुलाच्या बॅगेत बीट्ल्स, टायलिश गॉगल नी मफलर वगैरेसोबत एका पँटमध्ये राहून गेलेले कंडोम जर मिळत असेल तर तो प्रागतिकच म्हणायला नको का! - (कोण रे तो इतक्या वर्षांपूर्वी कंडोमचा तो ब्रँडच अस्तित्वात नव्हता म्हण्णारा! वा! जाहिरात ए ती समजून घ्यायचं!) ती बॅग आधीच उघडून प्रेक्षकांच्या मनात त्याची अशी प्रतिमा तयार करून ठेवलेली असतेच. (फक्त तो इतका गोड गोजिरवाणा बाळा दिसणारा असेल असे मात्र वाटले नव्हते) तर "तो" गोजिरा येतो आणि सारे बदलते. पालक मुलांच्या खोल्यांत नॉक करून जायला लागतात, आजीला "मनुष्यबळ मिळावं म्हणून पोरं जन्माला घातली यांनी" म्हणायचं बळ येतं, आपल्या मुलीच्या पाठीशी आई उभी राहायला तयार होते वगैरे अत्यंत नेहमीचा खेळ - बरं बाबा नाट्य म्हणतो खूश? - तर नेहमीचे नाट्य घडते. अन्, या गोजिर्याच्या पंखांखाली आल्यावर, कुटुंबियांच्या पंखातले बळ वाढते आणि शेवटी वैट्ट वैट्ट दूष्ष्ष्ट्ट्ट्ट् कुटुंबप्रमुखाने निर्माण केलेला सोन्याचा पिंजरा भेदून सगळी पाखरे त्यांच्या त्यांच्या आकाशात झेप घेतात! हुश्श करत प्रेक्षक बाहेर पडतो.
कुंडलकरांकडून याहून बरीच अधिक अपेक्षा होती. कुटुंबाचं चित्रण करताना प्रत्येक तपशील दाखवायचा त्यांचा अट्टहास अनेकदा हास्यास्पद होऊन बसतोच, शिवाय एकूण पात्रउभारणी नीट न झाल्याने उलट 'एक ना धड भाराभार चिंध्या' तयार होतात. मुळात एखादे पात्र हिटलरछाप वैट्ट दाखवायचा जमाना गेला, हे कुंडलकरांसारख्यांनी विसरावं याचं वैषम्य वाटतं. शिवाय चित्रपटात फेसबुक, ट्विटर, स्काइप वगैरेला सरावलेली मंडळी दाखवली की झालं समकालीन, असा काहीसा बाळबोध विचार वाटला. आधुनिक जगातील वेगवेगळ्या गोष्टींनी, तुपट्ट आयुष्यातही कसा शिरकाव केला आहे हे दाखवणं स्तुत्य असलं, तरी त्यातील तपशिलातील चुका अभ्यासातील कमतरताच अधोरेखीत करतात. आहे त्या पैशात जग हिंडायची - ती ही एकटीने - आस बाळगणार्या मुलीला मदत म्हणून तिने सतत (अगदी ६-७वेळा) आणि फक्त 'थॉमस कुक' बघत असावे? जाहिरातींना ना नाही पण ती अशी?! (अरे किमान अश्या मनस्वी प्रजातीच्या देशोदेशी फिरणार्या लोकांना उपयुक्त ठरलेल्या काउचसर्फिंग किंवा गेलाबाजार एअर बीएन्बी सारख्या - आता कुंडलकरांच्या पिढीलाही माहिती व्हायला हरकत नाही इतपत जुन्या ;) - साईट्स तरी दाखवायच्या. त्यांनीही दिली असती स्पॉन्सरशीप :P ). पुणं पुणं जपताना डेक्कन आणि परिसर वगळता चित्रपटात काहीही फारसं दिसत नाही. असो. पुणं वगैरे प्रतिकात्मक आहे, कुंडलकरांना कुटुंबसंस्थेवर, व्यक्तीच्या आयामांवर याहूनही व्यापक भाष्य करायचं आहे, वगैरे शंका कुठेतरी डोकावते खरी, पण पुढे पुढे आपणच मांडलेला पसारा आवरताना कुंडलकर इतके दमून (की रंगून?) जातात की तो आशय निमूटपणे कोपर्यात बसून राहतो - पुढे येतच नही!
मग या चित्रपटात काहीच आवडलं नाही का? तर तसंही नाही. मला सर्वाधिक आवडला तो खवचटपणा आणि चित्रपटातील मिष्किली! अनेक लहानमोठ्या प्रसंगांतून, संवादांतून, परिस्थितीतून आधुनिक समाजाला मारलेले टोमणे बरोब्बर वर्मी बसतात! मग ते हिटलरछाप कुटुंबप्रमुखाला पुलं आवडणे असो किंवा ट्विटर अकाउंटचे नाव सांगताच यच्चयावत सदस्यांनी एका झोकात मोबाईल सरसावणे असो. कुंडलकर अश्या अनेक लहान दृश्यात चुम्मा घ्यावा असं वाटायला लावतात. शिवाय चित्रपटाच्या सुरुवातीला, वर्षानुवर्ष गच्च बांधलेल्या कुटुंबाला आता थोडेसे सैलावू लागताच त्याचा त्यांना जाणवलेला फायदाही लहान प्रसंगांतून छान दाखवला आहे (उदा. मोठ्या मुलाला कित्येक वर्षांनी घरात शांतपणे बियर पिता येणे! किंवा नातवांना आपापल्या खोल्यांत दिसू लागलेले स्वत्व). मात्र पुढील 'हीरो (होय हो गोजिराच!) आया रे! उसने सब(को) बदला रे' च्या बाळबोध खेळात- कोलाहलात- सुरूवातीच्या अर्ध्यावगैरे तासात जमून आलेली लय पुढे कोमेजून कमी होत होत निघूनच जाते.
याच बरोबर नेहमीप्रमाणे कुंडलकरांच्या चकचकीत तरीही एका वेगळ्या प्रतीचे दृश्यभान दाखवणार्या फ्रेश रंगांनी युक्त चौकटी या चित्रपटातही दिसून येतात, दिल खूश करतात. हवेत उडणारे धुळीचे कण गंजलेला पंखा वगैरेपासून जी सुरवात होते, ते चित्रपटातील अनेक दृश्ये व त्याचा कोन मनाचा ठाव घेतात - आपले वेगळेपण दाखवतात. तगमगीवर उतारा म्हणून केलेला मनःपूर्वक व रसरशीत संभोग आणि मनाला भावते त्या प्रकारचे, पोताचे व डोळ्यांना सुखावणारी मांडणी करत स्वाहा केलेले अन्न यांची एकत्रित जुगलबंदी निव्वळ टाळ्या वाजवावी अशीच! एकूणच संभोगदृश्यांतील वापरलेल्या प्रतीकांतील फ्रेशनेस (आठवा अय्या मधील पेट्रोल भरणे वा गाडी बोगद्यात शिरणे) इथे आणखीनच वेगळ्या ढंगात दिसून येतो. या व्यतिरिक्त सर्वच अभिनेत्यांचा चोख अभिनय, काही संवाद आणि काही दृश्य चौकटी उत्तरार्धात चित्रपटाची धुरा पेलतात.
थोडक्यात सांगायचं तर, ओळखीच्या वाटेवरच घुटमळणारा पण फ्रेश 'दिसणारा' आणि छान अभिनय व गाणी असणारा चित्रपट दोन घटका करमणूक बघायचा असेल तर चित्रपट जरूर बघा, मात्र कुंडलकरांचा चित्रपट म्हणून 'नवे काही' बघायला जाणार असाल तर मात्र निराश व्हाल!
राजवाडे अॅण्ड सन्स (२०१५) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
