जंबा बंबा बू (२०१८) - बेहद्द कल्पक नि मनोरंजक नाटक
काही आठवड्यांपूर्वी झालेल्या 'ज्योत्स्ना भोळे सभागृहा'मध्ये भरलेल्या बालरंगोत्सवात माझ्या मुलीसोबत मी 'जंबा बंबा बू' हे 'ग्रिप्स'चं नवं नाटक पाहिलं. एखादी संस्था/गट अनेकदा चांगली निर्मिती करते पण दीर्घकाळ तसं करत राहणं शक्य होतच असं नाही. पण 'ग्रिप्स' हे बालरंगभूमीवर सातत्याने नवनवी नाटकं घेऊन येत आलंय. बालरंगभुमी म्हणजे फक्त लहानांनी केलेली नाटकं अशी चौकट भेदून, मोठ्यांनी लहान प्रेक्षकांसाठी सादर केलेली नाटकं अश्या फॉर्ममध्ये ही नाटक येतात आणि कायच्या काय धमाल उडवून देतात. या पार्श्वभूमीमुळे 'जंबा बंबा बू' या नाटकाबद्दल भयंकर उत्सुकता आणि अपेक्षा होती - आणि उंचावलेल्या अपेक्षांना पेलतील का अशी भिती/शंकाही. पण या भितीला फोल ठरवत पुन्हा एकदा कमालीच्या ऊर्जेने हे नवं नाटक - एक नवी कोरी संहिता- सादर झाली. त्याबद्दल 'ग्रिप्स'चे कौतुक करावे तितके थोडे आहे.
या नाटकाची कथा कमालीची लोभस गोष्टी सोबत घेऊन येते. यात मोगली, बल्लू, बघीरा आहेत, त्याच बरोबर आताच्या काळात शाळेत जाणारी मुलं आहेत, त्यांचे बुरेभले पालक आहेत, मुलामोठ्यांवर येणारी आपत्ती आहे, फोफावलेले शहर आहे, शहरी मुलांची भाषा आहे आणि या सगळ्यांच्या सोबत नांदणारी धार्मिक टोकदारपणाची बोच पूर्णं नाटकभर व्यापून आहे.
श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे यांच्या लेखनाबद्दल नव्याने काही लिहायला नको. लहानांसाठी नाटक म्हणजे बाळबोध किंवा एकरेषीय हवं हा समज त्यांच्या इतर नाटकांप्रमाणे याही नाटकात सहज झुगारून लावला आहे. शहरी मुलांची भाषा, घराघरात आढळणारा - एकाचवेळी आधुनिकता आणि पारंपरिकात यांचा खास- भारतीय मिलाफ आणि विरोधाभास, धार्मिक सलोखा आणि तेढ यांची रस्सीखेच, शहरी मुलांचे खास प्रश्न या सगळ्या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर मोगली, बघीरा आणि बल्लू जंगलातून शहरात येतात आणि या सगळ्या परिस्थितीमुळे धर्म आणि समांतर इतर विषयांवर घडणाऱ्या चर्चेद्वारे नकळतपणे मुलं(प्रेक्षक) बरंच काही महत्त्वाचं शिकतात - घेऊन जातात. पात्र उभारणी, रंजकता, थरार, भाषा सगळ्याच अंगाने मुलं नाटकात पूर्णं बुडून जातात. (मला वैयक्तिक रित्या काही वाक्ये अनावश्यक इंग्रजी शब्दांनी व्यापलेली वाटली. मात्र लेखकांच्या भोवतालच्या मुलांची सध्याची भाषाच तशी असू शकते असा बेनिफिट लेखकांना द्यायला हवा :) )
'राधिका इंगळे' यांच्यासारख्या गुणी दिग्दर्शिकेने या नाटकात कमाल केली आहे. ॲनिमेशनचा, स्टेजवरील स्क्रीनचा इतका कल्पक वापर मराठी नाटकात याआधी झाल्याचे माझ्या ऐकिवात/पाहण्यात नाही. त्या व्यतिरिक्त इतर अनेक बाबी जसे रंगमंचाचा वापर, पात्रांची मांडणी, प्रकाश योजनेचा वा ध्वनींचा प्रसंगांत केला गेलेला उपयोग वगैरेद्वारे त्या नेहमीप्रमाणे स्वत:चा असा खास टच नाटकाला देतात आणि आधीच छान लिहिलेले नाटक कुठल्या कुठे जाऊन पोचते. त्याशिवाय पात्रांनी स्वत:च नेपथ्याचे ठोकळे आवश्यकतेनुसार रचणे/हालवणे वगैरे कृती लहानग्या (आणि काही मोठ्याही) प्रेक्षकांना नाट्यकलेतील अश्या महत्त्वाच्या तपशिलांचे शिक्षण देणाऱ्या ठरतात.
अभिनय हा 'ग्रिप्स'चा हुकमी एक्का इथेही भाव खाऊन जातो. विशेषत: 'सक्षम कुलकर्णी'ने साकारलेल्या मोगलीला बच्चे कंपनी पार डोक्यावर घेते. कमालीच्या ऊर्जेचा वापर करतानाही अनेक गोष्टींचे अवधान बाळगत हा कसदार अभिनेता स्टेज दणाणून सोडतो. अर्थात इतर सगळीच पात्रे आपापल्या भूमिका चोख पार पाडतात. संगीत आणि गाणी हा या नाटकाचा विशेष भाग आहे. ती गाणी छान आहे इतकंच म्हणणं 'अंडर स्टेटमेंट' ठरेल. ती प्रत्यक्ष अनुभवाच!
खरंतर हे परीक्षण सुट्टीत आलं असतं तर प्रयोगांना जाता आलं असतं हे कबूल, पण याचे प्रयोग येत्या काळातही होत राहतील. जेव्हा ते होतील तेव्हा मात्र हे नाटक अजिबात चुकवू नका!
चित्र स्रोत: कलाकारांनी फेसबुकवर "public" मान्यतेने शेअर केलेली छायाचित्रे.जंबा बंबा बू (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

Official Sites:
- दिग्दर्शक: राधिका इंगळे
- कलाकार: नेहमीचे यशस्वी :)
- चित्रपटाचा वेळ: -
- भाषा: मराठी
- बॉक्स ऑफिसचे आकडे: -
- प्रदर्शन वर्ष: २०१८
- निर्माता देश: -