एक था अर्रर्रर्रबेला
भगवान आबाजी पालव. भगवानदादा. सर्वसामान्य चित्ररसिकांना माहित आहे ती त्यांची नाचण्याची खास लकब. तीदेखील एखाद्या गाण्यातल्या एखाद्या प्रसंगात पाहिलेली. कुणी सुषमा शिरोमणीचे फॅन्स असतील तर तिच्या सिनेमात दादा किमान एकदा दिसणार याबद्दल खात्री नक्की असेल. फारच झालं तर मग त्यांचा एकच सिनेमा आठवतो, 'अलबेला. आणि त्यातली गाणी. त्यापलिकडे भगवानदादांबद्दल कुणाला अधिक माहिती काही नसते. या आठवड्यात रिलीज झालेल्या 'एक अलबेला'च्या निमित्तानं त्यांची माहित नसलेली बाजूही काही प्रमाणात समोर आली आणि काही आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. दादांचा 'अलबेला' खूपच गाजला होता. त्याच नावाने दादांच्या चरित्रावर सिनेमा निघाला यात नवल नाही. 'एक अलबेला' हा चित्रपट म्हणजे भगवानदादांचा एक हिरो म्हणून प्रवास आणि मूळ अलबेला सिनेमाचं मेकिंग असं ढोबळमानानं म्हणता येईल.
सिनेमाची बलस्थानं-
मंगेश देसाईने घेतलेलं भगवानदादांचं बेअरिंग! ही भूमिका मंगेशच्या दृष्टीने मोठी खरीच आणि मंगेशनेही त्याचं सोनं केलंय. त्यांच्या नाचाच्या स्टेप्स, लकबी हे सारं हुबेहूब वठवण्यात तो कमालीचा यशस्वी झालाय. विद्या बालनची गीता बाली देखील सुंदर. तिच्या भूमिकेचा बराचसा भाग हा जुन्या अलबेलामधल्या प्रसंगांचं पुन:चित्रिकरण असल्यानं तिची तुलना गीता बालीशी अधिकच होणार हे तर आलंच. या भूमिकेला विद्यानेही योग्य न्याय दिलाय असं म्हणायला हरकत नाही.
'भोली सूरत दिल के खोटे' काय किंवा 'शोला जो भडके'ही गाणी अजूनही तितकीच ओठांवर रेंगाळतात. ही गाणी ब्लॅक अँड व्हाईटमधून एकदम रंगीत स्वरूपात छानपैकी समोर येतात. त्याकाळी कारमध्ये हिरो-हिरॉईन बसले असतानाची दृश्ये कशी चित्रित व्हायची याची चुणूक-खरंतर स्मरणरंजनही, एकदम मजेशीर वाटतं.
चित्रपट कुठे फसलाय?
या प्रश्नाची उत्तरं अनेक आहेत. दिग्दर्शकाला सिनेमात नक्की काय दाखवायचंय याचा गोंधळ उडालेला दिसतो. ट्रेलर पाहूनही हा सिनेमा भगवानदादांचा जीवनपट असेल असं वाटतं पण प्रत्यक्षात मात्र 'अलबेला' बनवून दादा सामाजिक सिनेमांतसुद्धा यशस्वी होतात आणि सिनेमा संपतो. खरंतर तो अर्ध्यातच संपल्यासारखा वाटतो. मग त्यांचा 'अलबेला'नंतरचा संघर्ष, विपन्नावस्था आणि शेवट या सार्या गोष्टी हरवूनच जातात. सिनेमाची लांबी १ तास ३९ मिनिटांची. पूर्वाध तर भगवानदादांबद्दलच्या माहित असल्या-नसल्या किश्शांवर बेतला आहे. त्यात मग शिवडीच्या मिठागरावरून मीठ पळवून आणणार्या दादांपासून ते यशस्वी हिरो कसे बनतात याचा एक स्लाईडशोच आपल्यासमोर सादर होतो. पण हा स्लाईडशो सुद्धा सगळ्या गोष्टी दाखवत नाही. म्हणजे दादांच्या बी ग्रेड सिनेमांची यादी दिसते पण आशा स्टुडिओची स्थापना, त्यांचा समुद्रकिनार्यावरचा बंगला आणि सात दिवसांसाठी वापरल्या जाणार्या सात शेव्हर्ले गाड्याही दिसत नाहीत. म्हणजे खरंतर त्यांच्या उदयाची कहाणीही अशी चटावरच उरकली जाते. मग 'एक अलबेला' ना धड 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' होतो, ना धड'बालगंधर्व'!!
१९३०साली 'मांडवली'शब्दाचा जन्मही झालेला नसताना भगवानदादा हिंदु-मुस्लिम भांडण खेळणारांना मांडवली करायला सांगतात, चाळीतल्या गणेशोत्सवात लोक शिस्तीत कवायत डान्स करतात आणि चाळीतल्या बायका सिंथेटिक पाचवारी साड्या नेसून वावरतात! हे कमी की काय म्हणून गिरणीकामगाराच्या चाळीतल्या दहा बाय दहाच्या खोलीतसुद्धा कलोनिअल स्टाईल शिसवी पलंग दिसतो. सिनेमाच्या सुरवातीला 'रिसर्च बाय' अशी पाटी दिसते, त्या दोन लोकांनी नक्की काय केलं हा मोठा प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी सिनेमात सेट वापरला गेलाय हे कळायचं आणि लोक मोठ्या मनानं तो मान्यही करत. आताशा बदलत्या तंत्रज्ञानामुळे नेपथ्यातही खूप सफाई आलीय. 'एक अलबेला'मधले चाळीतले, त्या शाहीनच्या घराजवळचे हे सगळे सेट्स डोळ्यात खुपेपर्यंत नकली वाटतात. इतकंच काय, पण सिनेमात मंगेशला दिलेला विग आणि थापलेले मेकअपचे थरही चांगलेच दिसून येतात.
सिनेमात भगवानदादांचं पात्र इतक्या कमी वेळात इतक्या टोकाचं चिडतं की सांगता सोय नाही. बरं त्यांचा स्वभाव शीघ्रकोपी असेल तर तसंही काही दिसत नाही. दोन सेकंद रागाचा पारा दाखवून झाल्यावर लगेच ते कमरेवर हात ठेवून पुन्हा एकदा तोंडभरून टिपिकल भगवानस्टाईल स्माईल देतात. हे म्हणजे आपल्या लग्नाच्या रिसेप्शनला नवरा-नवरींना कसं सतत हसत राहावं लागतं, अगदी तसंच वाटतं. कमी वेळात जास्त गोष्टी दाखवण्याच्या अट्टहासात त्या रागाचं समर्थन होत नाही आणि हा माणूस कशाच्या बळावर लगेच 'बदला' घेण्याच्या बाता मारायला लागतो ते ही कळत नाही. मुळात जडणघडणीलाच वाव नसल्यामुळे बरेचसे प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरं मिळत नाहीत. त्यामुळे होतं असं, की कधी मंगेश देसाईला मोठा ब्रेक मिळाल्याचं कौतुक वाटतं तर कधी त्याला वाया घालवल्याचं दु:खही. इतर पात्रांबद्दल बोलायचं तर विद्याधर जोशींना 'गोसालिया बिल्डर'नंतर एकदम 'गुजराती माणस' करून टाकलाय आणि त्यांनी तो चपखल रंगवला देखील आहे. राज कपूरचं पात्र मात्र खूपच हास्यास्पद होतं. राहिलेल्या भूमिका म्हणजे भगवानदादांचा भाऊ-शंकर, मित्र-बाबूराव, सी. रामचंद्र, बायको-आशा यातल्या कुणाचीच व्यक्तीरेखा सिनेमात नीट तयार होत नाही.
सिनेमा संपून बाहेर पडताना प्रेक्षकाच्या मनात चित्रपटाचं गारूड न राहता 'न चालणारा 'अलबेला' सिनेमा दोन आठवड्यांनंतर नक्की कोणत्या कारणाने चालेल याची अगदी सर्वस्व लिहून देण्याइतपतची खात्री दादांना असते' हा प्रश्न ओझं बनून राहातो.
एक अलबेला - चित्रपटाची /नाटकाची माहिती
