‘वायझेड’ जगण्याची ‘वायझेड’ गोष्ट!

आपल्याकडे संस्थांच्या नावांची लघुरुपं असतात. उदाहरणार्थ एमआयटी, आयआयटी वगैरे.. याच नावांनी संस्थाही ओळखल्या जातात. चारचौघांत शिव्यां देणं प्रशस्त (योग्य) वाटत नाही म्हणून कोणीतरी अस्सल शिव्यांची इंग्रजी लघुरुपं करण्याची शक्कल लढवली आणि ती भलतीच लोकप्रियही झाली. त्यातूनच जन्म झाला वायझेडचा.. वायझेडचं पूर्ण रूप सांगण्याची ही जागा नाही आणि ते सांगणं योग्यही नाही (सर्वांना माहीत असतंच, पण उत्सुकांपर्यंत ते योग्य वेळी पोहोचतंच).  मात्र, या शिवीच्या लघुरुपाकडे एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहण्याचा कधी कोणी विचार केला असेल का.. तर शक्य नाही. एखाद्याला वायझेडपणा करू नकोस म्हणताना, त्यात हेतू शिवीचा असला, तरी उगाचच काहीतरी वेगळं वागू नकोस असं म्हणण्याचाही हेतू आहेच. थोडक्यात, या लघुरुपात असलेली वेगळ्या वागणुकीची, अटिट्यूडची शक्यता पडताळून पहाणं हीच गंमतीदार गोष्ट आहे. क्षितीज पटवर्धन आणि समीर विद्वांस या द्वयीला त्यातली गंमत नेमकेपणानं साधली आहे, म्हणून ‘वायझेड’ हा चित्रपट आकाराला आला आहे. हा संवेदनशीलतेनं, हुशारीनं केलेला चित्रपट आहे.

ही गोष्ट आहे, अबब उर्फ गजाननची. मुक्काम वाई. वय वर्षं 33. हा इतिहासाचा प्राध्यापक आहे. त्याचं लग्न म्हणजे अख्ख्या वाई गावासमोरची समस्या झाल्यासारखं वातावरण आहे. अनेक स्थळं पाहून झालेली आहेत. त्यातील कोणीच त्याला पसंत केलेलं नाही. त्याची आठ महिन्यांसाठी वाईवरून पुण्याच्या कॉलेजमध्ये बदली होते. पुण्यात तो त्याच्या मावशीकडे राहू लागतो. पुण्यात गेल्यावर त्याच्या आयुष्यात येतात बत्तीस उर्फ श्यामकुमार पारिजातक हा ‘वायझेड’ विद्यार्थी, स्थळ म्हणून आलेली पर्णरेखा, विद्यार्थीनी अंतरा आणि बालमैत्रीण सायली ही सगळी मंडळी. या सगळ्यांमुळे आत्मविश्वास हरवलेल्या गजाननच्या आयुष्यात कशा उलथापालथी होतात, भोळसट अबब वायझेड गजा कसा होतो, हे सगळं मनोरंजक पद्धतीनं मांडण्यात आला आहे. कथानक साधंसोपं, पण मल्टिलेअर्ड आहे. त्यात आहे आपली संस्कृती आणि ग्लोबलायझेशननंतर झालेले बदलाचं चित्र. मोबाईलपूर्व काळ ते फोर जी काळ. जगण्याचे, नात्यांचे अनेक पदर हळुवारपणे, तरलतेनं उलगडतात. लग्नाचे हवा, खवा आणि धुव्वा हे प्रकार फारच मजेशीर आहेत.

वरकरणी, गोष्टीचा पोत ‘40 इयर ओल्ड व्हर्जिन’सारखा वाटू शकतो. पण ही गोष्ट ‘व्हर्जिन’ असण्याची नाही. ही आहे जगण्याविषयीच्या अटिट्यूडची गोष्ट. पुण्यात आल्यावर गजानन कॉलेजमध्ये शिकवायला जातो, पण त्याच्या वर्गात मुलं फोनवर वगैरे बोलतात. त्याच्या नसलेल्या आत्मविश्वासाला आणखी हादरे बसतात. पण, 33 वर्षांच्या गजाननला 19-20 वर्षांचा बत्तीस भेटल्यानंतर त्याची अवस्था अजि म्या ब्रह्म पाहिले अशीच होते.’एका वर्षांत तुम्ही वायझेड झाला नाहीत, तर मी पुढचं वर्षभर फोर जी वापरणार नाही’ असं बत्तीस सांगतो. कृष्णानं गीता सांगावी, तशी बत्तीस गजाननला जगण्याची मर्मस्थानं सांगत जातो. अचानक मिळू लागलेल्या या बोधामृतामुळे वाईच्या भोळसट अबबचा ‘गजा’ कधी होतो, त्यालाही कळत नाही. पण, हा बत्तीस अजिबात ओव्हर द टॉप वागत नाही. माणूस म्हणून आणि त्यातही पुणेरी माणूस या पातळीवर राहून तो क्रेझी जगण्याचा बर्ड आय व्ह्यू दाखवतो. हा सिनेमा फक्त क्रेझी जगण्याविषयी आणि अॅटिट्यूविषयी बोलत नाही. तर आजची शिक्षणव्यवस्था,समाज, लग्नव्यवस्था, इतिहास, संस्कृती, भाषा मार्मिकपणे बोलतो. थोडं सविस्तर सांगायचं, तर वर्गात शिकवताना गजानन मोबाईलवर टवाळकी करणाऱ्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतो, की मी जे सांगतोय ते कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही. गजानन अंतराशी संस्कृतबद्दल बोलताना तुम्ही काय बोललात असं गजाननची बहिण, आरती विचारते. त्यावर ‘तुला नाही कळणार, तुझ्यासाठी ही फॉरेन लँग्वेज आहे,’ असं गजानन तिला सांगतो. रात्री पर्णरेखाला घरी सोडायला गेलेला गजानन तिच्याशी जवळीक करू इच्छितो. त्यावेळी पर्णरेखा म्हणते, ‘आपण कुठे आहोत, याचं काही भान? हल्ली सगळीकडे सीसीटीव्ही असतात, उगाच आपली क्लिप व्हायरल व्हायची...’ या दोन उदाहरणांतून पुरेसं स्पष्ट होईल, की हा खऱ्या अर्थानं आजची भाषा बोलणारा चित्रपट आहे. हा सिनेमा सेन्सिबल कॉमेडी आहे. जी मराठीत क्वचित पहायला मिळते.

या चित्रपटाचं वेगळेपण त्याच्या जाहिरातीतूनही व्यक्त होत होतं. कारण, जाहिरातींवर लेखक क्षितीज पटवर्धन हे नाव ठसठशीतपणे लिहिण्यात आलं होतं. सिनेमा हे जसं दिग्दर्शकाचं माध्यम आहे, तसंच ते ‘चांगल्या’ लेखकाचंही माध्यम आहे. कारण, लेखकानं चांगली कल्पना समोर आणणंही तितकंच महत्त्वाचं असतं आणि दिग्दर्शकानं त्या चांगल्या कल्पनेचं सोनं करणं. वाय झेड या सगळ्या पातळ्यांवर बाजी मारतो. क्षितीज पटवर्धनचं लेखन (कथा, पटकथा, संवाद) उत्तम आहे. प्रेक्षकाला पहिल्या वाक्यापासून तो चित्रपटात ओढून घेतो. खटकेबाज वाक्यांना हशा वसूल करताना हळूच डोळे ओलेही करतो. विशेषतः लहानपणाचा आरसा त्यानं अशा पद्धतीनं धरलाय, की प्रत्येकाचं प्रतिबिंब त्यात निरखता येईल. तो जितकं कुरकुरीत लिहितो, तितकं भावनिकही. एखाद्या लेखकात हे दोन्ही गुण तितकेच चांगले असणं जरा दुर्मिळच. या चांगल्या संहितेची नस दिग्दर्शक समीर विद्वांसनं नेमकी ओळखली आहे. त्याचं कारण, त्या दोघांमध्ये असलेली इतक्या वर्षांची केमिस्ट्री. या दोघांनी या पूर्वी टाइमप्लीज, डबलसीट हे चित्रपट आणि नवा गडी नवा राज्य, सगळे उभे आहेत ही नाटकं केली आहेत. संहितेतील छोटे छोटे प्रसंग समीरनं फार कमालीनं खुलवले आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखा समजूतीनं उभी केलेली आहे. क्रेझी जगण्याविषयी बोलताना लेखक अजिबात डोस देत नाही, की हे करा, हे करू नका वगैरे.. तुम्हाला कसं जगायचंय ते तुमचं तुम्ही ठरवा असं सांगतो ही जास्त मजेशीर गोष्ट आहे.

उत्तम लेखन आणि प्रगल्भ अभिनय ही चित्रपटाची खरी बलस्थान आहेत. अक्षय टांकसाळे (बत्तीस) गजानन (सागर देशमुख) अंतरा (पर्ण पेठे) पर्णरेखा (सई ताम्हणकर) सायली (मुक्ता बर्वे), आरती (कौमुदी वलोकर) या सगळ्यांनीच उत्तम कामं केलीयत. मात्र, सागर देशमुख आणि सई ताम्हणकर मला विशेष महत्त्वाचे वाटतात. आपण या चित्रपटाचे हिरो, तरीही हिरो नाही हे सागरला नेमकं कळलंय. प्रत्येक प्रसंग त्यानं आपलेपणानं केला आहे. माझ्यामते, सई ताम्हणकरची आतापर्यंतची सर्वांत संवेदनशील भूमिका म्हणता येईल. गजाननपेक्षा बोअर असलेली अंतरा ते बदललेली अंतरा हा तिचा प्रवास तिनं फार बारकाईनं दाखवलाय. नटानं अक्ट करण्यापेक्षा रिअक्ट करणं जास्त महत्त्वाचं असतं. या सिनेमात ते ठायी ठायी पहायला मिळतं. ‘अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना’ हे शाहीर साबळेंचं गीत, मीचि मज व्यालो ही संत तुकारामांची रचना आणि प्रियकरा हे संस्कृत गीत वापरण्याची कल्पना अप्रतिम. आताच्या व्यामिश्र काळाला सुसंगत असं संगीत ऋषिकेश जसराज आणि सौरभ यांनी केलं आहे. त्यामुळे त्यात पारंपरिक रचनांपासून रॉकपर्यंतची विविधता आहे. कॅमेरा वर्क, एडिटिंग या तांत्रिक बाजूंवरही चित्रपट उत्तम जमलाय. निर्माता अनीश जोग आणि संजय छाब्रिया यांचं विशेष कौतुक. अशा वायझेड गोष्टीमागे ते खंबीरपणाने उभे राहिले यासाठी.

चित्रपटाचा दुसरा भाग थोडा लांबलाय असं म्हणता येईल. कारण, कथेत गजाननची बालमैत्रीण सायलीचं येणं. पण, त्यानं कथेला येणारा पदर, कलाटणी फार वेगळी आहे. त्यामुळे काय होतं, ते सिनेमातच पहायला हवं. एक दोष, म्हणजे शहरी आणि आजच्या काळाचं भान असलेला प्रेक्षकच या चित्रपटाला कनेक्ट होऊ शकतो. ग्रामीण प्रेक्षक होणारच नाही, असं नाही, पण चित्रपटाची कथा आणि वातावरण शहरी आहे. हे दोन मुद्दे सोडल्यास चित्रपट अजिबात बोअर करत नाही.

खरंतर आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रत्येकजण गजाननच असतो. आता त्याला जगण्याचं सार सांगायला, कोणी बत्तीस मिळेलच असं नाही. ज्याला मिळतो, त्याचा गजानन होतो, ज्याला मिळत नाही तो त्याच्या पद्धतीनं जगत रहातो. महाभारतात अर्जुन रुपी गजाननाला श्रीकृष्ण रुपी बत्तीस मिळाला होता. पण त्या बत्तीसचं आपल्या आयुष्यात येण्याची वाट न पहाता परिस्थितीलाच बत्तीस मानून जगणं सेलिब्रेट करायला हवं.हा आपला शोध आहे आणि आपणच तो एंजॉय करायला हवा. थोडं वायझेड जगायला हवं....

वायझेड (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

वायझेड (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: समीर विध्वंस
  • कलाकार: अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे, सई ताम्हणकर, सागर देशमुख
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत