एक माधवबाग – सकारात्मक संदेश देणारा एक उत्तम एकपात्री प्रयोग.

समलैंगिकत्वाविषयी मूलभूत शंका आणि गैरसमज असणं किंवा जवळची व्यक्ती समलैंगिक आहे हे कळाल्यानं खूप धक्के बसणं हे काही एकूणातच नवीन नाही. याबद्दल जितकं प्रबोधन करणं गरजेचं आहे तितकंच ते प्रबोधन संवेदनशीलपणे लोकांच्या गळी नीट उतरवणंही महत्त्वाचं आहे. चेतन दातार लिखित आणि मोना आंबेगांवकर अभिनित “एक माधवबाग” हा एकपात्री नाट्यप्रयोग या दोन्ही निकषांवर सरस ठरतो.

तीन मुलांच्या आईला आपलं मूल ’गे’ आहे हे कळणं, त्यानंतर आई-मुलाचा संवाद आणि आई या प्रकाराला कशी सामोरी जाते हे या नाटकाचं कथासूत्र.

 

 

 

समलैंगिकतेचं दृश्य माध्यमांतलं चित्रण खूप कमी आहे आणि जे आहे तेही काही फारसं आशादायी नाही. कित्येकदा समलैंगिक पात्रं ही विनोदनिर्मिती किंवा त्यांचं सरसकटीकरण म्हणा वा एकसाचीकरण (म्हणजे शुद्ध मराठीत जनरलायझेशन आणि स्ट्रिरिओटाईप करणं) यासाठीच पेरलेली असतात. त्यापलीकडं जाऊन त्यांच्या समस्याच मांडणं होत नाही, मग काही उत्तरं सुचवणं तर मग दूरच राहातं. नाही म्हणायला तेंडुलकरांच्या ’मित्राची गोष्ट’ सारखे काही त्या काळच्या सामाजिकतेनुसार म्हणायचं तर काळाच्या पुढचे प्रयोग होतात. त्यातून समस्येचं आकलन होतं परंतु शेवटाकडे नकारात्मक चित्र उभं राहतं असं माझं वैयक्तिक मत आहे. ते चित्र अधिक वास्तववादी असेलही, परंतु सर्वसामान्यांना जे कळत नाही किंवा कळतं पण वळत नाही असं जे काही असतं ते समजावून सांगण्याचं आणि परिणामी समाजाला दिशा देण्याचं काम निश्चित अशा कलाकृतींनी करायला हवं.

“एक माधवबाग” हा सत्तर मिनिटांचा एकपात्री प्रयोग. खरंतर नाटकात घडणारं नाटक. एका अभिनेत्रीला वाचायला दिलेलं स्क्रिप्ट ती प्रेक्षकांसमोर करून दाखवते. प्रत्यक्षात ती अभिनेत्री अगदी हसरी, खेळकर, आनंदी असणारी अशी. कोणत्याही कलाकृतीच्या आधी असणार्‍या ’या नाटकाच्या माझ्या आयुष्याशी काहीही संबंध नाही’ अशा सावध पवित्र्याने सुरुवात करणारी. क्षणात भूमिकेत शिरणारी तर दुसर्‍याच क्षणी प्रेक्षकांशी, विंगेतल्या प्रॉम्प्टर्सशी आणि समोरच्या पार्श्वसंगीत वाजवणार्‍या मॉनिटरवाल्याशी संवाद साधणारी. ती स्वत: आणि तिचा मुलगा या दोन्ही भूमिका ती एकटीच वठवणारी आणि सारा रंगमंच लीलया एकटीच भारून टाकणारी. मुंबईतल्या शिवाजी पार्कातल्या “एक माधवबाग” या पत्त्यावर राहणारी आणि मुंबईच्या गर्दीला, पावसाला तितकीच सरावलेली आणि वैतागलेलीही. पावसाळ्यातल्या एके दिवशी तिच्या आयुष्यात वादळ येतं आणि त्याची परिणिती कशात होते या प्रसंगांची मालिका म्हणजे “एक माधवबाग”.

प्रबोधनपर नाटक-सिनेमा-मालिकांना रुक्षपणाचा शाप असतो तर विनोदी कलाकृतीला उथळपणाचा. सामाजिक विषयावरची नाटकं ही सहसा प्रचारकी थाटाची, एक पात्र मला कसं सगळं माहीत आहे छापात इतर पात्रांना आणि प्रेक्षकांना ज्ञानामृत पाजणारी किंवा गेला बाजार मुलाखतछाप संवाद असणारी असतात. यात नाटककार आणि दिग्दर्शकांना काय म्हणायचंय हे कळतं पण ते तितक्या परिणामकारकतेने प्रेक्षकांपर्यंत पोचतंच असं नाही. प्रेक्षक हा वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक गटातला आहे हे मान्य करणं , त्याचा विचार करून प्रेक्षकाला रुचेल आणि त्याच्यापर्यंत पोचेल असं नाटक लिहिणं आणि सादर करणं हे सार्‍याच नाटकांच्या बाबतीत होतं असं नाही. “एक माधवबाग” या कसोट्यांवरती सर्वच बाबतीत खूप उच्च दर्जाचं ठरतं.

नाटकामधलं नाटक या फॉर्ममुळं हेतू आणि परिणामकारकता या दोन्ही गोष्टी उत्तम साधल्या गेल्या आहेत. काही प्रसंग अतिसंवेदनशील, हेलावून टाकणारे. तर कधी अंतर्मुख करणारे.  वातावरण गंभीर होतं आणि पुढच्याच क्षणी त्यातलं गांभीर्य बिलकूल कमी न होता ताण निवळतो आणि प्रेक्षक पुढच्या गोष्टीसाठी सज्ज होतो. हे जर नसतं तर नाटक प्रचंड अंगावर आलं असतं आणि मेंदू बधीर होऊन त्याची परिणामकारकता उपदेशांमध्ये वाहून गेली असती.  

नाटकाच्या सुरुवातीस नायिका घरात येते ती पाऊस, ट्रॅफिक जाम, बॉटलनेक्स, तुंबलेलं पाणी आणि टॅक्सी ड्रायव्हर या सर्वांवर चिडून. तिच्याकडचं स्क्रिप्ट लिहिणारा रंभा-मेनकेच्या सहवासात केव्हाच गेलेला. म्हणजे एका अर्थानं नाटकाचं विधिलिखित तयार आहे. अर्थातच दिग्दर्शकाला काही बदल करायचे नसतील तर. अगदीच घिशापिट्या शब्दांत सांगायचं तर ’हम रंगमंच की कठपुतलियॉं  है’ असं म्हणून कलाकाराने त्याला किंवा तिला दिलेली भूमिका बरहुकूम वठवावी हे अध्याहृत असलेलं.  नायिकेला सोलो परफॉर्मन्स करण्याची हुक्की येते आणि तिला ही भूमिका मिळते. पण ती सगळंच तिला सांगितलेलं असतं तसंच करते असं नाही. प्रसंगी प्रॉम्प्टरला दुर्लक्षून, कधी न राहावून तिला हवं तसं ती वागते-बोलते. प्रत्यक्ष आयुष्यात आपणही जनांचं कितीही ऐकलं तरी कधी ना कधी आपल्या मनाचंच खरं करतो, काहीसं तसंच. LGBTQ या शब्दांच्या व्याख्याही काही जणांना माहीत नसतात, गैरसमज तर नेहमीचेच. नायिकेचा मुलगा तो ’गे’ असल्याचं मान्य करून तिला आपली डायरी देतो आणि त्या अनुषंगानं आपल्या मनात पहिल्यांदा उद्भवणारे सगळे प्रश्न आणि त्यांची पटतीलशी उत्तरंही नाटकात येतात. कधी कधी “छे:, हा कसला बावळट प्रश्न पडला होता आपल्याला, एवढे शहाणे असूनही असं कसं काय आपण कुणाला स्टिरिओटाईप केलं?” किंवा “नैसर्गिक काय अन् अनैसर्गिक काय याची आपण माणसांनीच व्याख्या केली, खरोखरी तो भेदाभेद करणारे आपण कोण?”  असंही वाटून जातं. थेट उपदेश न करता लहान लहान प्रसंगांतून नाटक प्रतीकात्मक संदेश देत राहातं आणि त्यांचं अपचनही होत नाही. उदाहरणार्थ मुलगा गे आहे म्हटल्यावर नायिकेचं घाबरून टेलिफोनची तार काढून टाकणं आणि त्याद्वारे समाजापासून संबंध तोडतानाच तिच्या मुलाकडून येणारा संवादही तिच्यापर्यंत पोचत नाही. वादळ शमल्यावर मळभ दूर होतं, टेलिफोनची तार जोडली जाते आणि पुन्हा सगळं  पहिल्यासारखं होऊन जातं.  नाटकाच्या शेवटाकडे नायिका नाटकाच्या संहितेलाच आव्हान देते आणि आधीच्या डिनायल मोडमधून निघून वास्तव ठामपणे स्वीकारण्याइतकी सकारात्मक होते. ट्रॅफिक जाम, बॉटलनेक्स, तुंबलेलं पाणी या सगळ्याचा निचरा होऊन आयुष्यातला बोळा निघतो आणि पाणी वाहतं होतं.

१९९३-९४ च्या काळातल्या झी टिव्हीवरच्या ’सॉंप सीेढी’ कार्यक्रमातून पुढे आलेल्या आणि  मोहन कपूरच्या बांदेकरछाप विनोदाचं लक्ष्य असलेल्या आयकँडी मोना आंबेगांवकरचं  “एक माधवबाग” हे दुसरं टोक आहे. सत्तर मिनिटांचा एकपात्री प्रयोग करायचा, त्यातही भावनाप्रधान प्रसंगातून क्षणात बाहेर येऊन विनोदाद्वारे वातावरणातला ताण हलका करायचा आणि पुन्हा त्या भयंकर इंटेन्स प्रसंगात शिरायचं म्हणजे खायची गोष्ट नाही. अचूक टायमिंग, त्या नायिकेचं हसतंखेळतं व्यक्तीमत्व, नाटकातल्या नाटकातली तिची भूमिका हे सगळं ती लीलया करते. या सर्वांसाठी प्रचंड उर्जा लागते आणि ती मोना आंबेगांवकरने यात अक्षरश: भरभरून ओतलीय. तिच्या अकृत्रिम अभिनयाबद्दल बोलायचं तर जवळजवळ सगळेच प्रसंग वर्णावे लागतील. उदाहरण द्यायचंच तर खिडकी बंद करताना ओलावलेला हात झटकून साडीला अभावितपणे पुसणं, वाचताना चष्मा मग तो दोन टेबलं आणि एक बेंच असा कुठेही ठेवलेला असला तरीही कधीच न विसरणं,  फोन आल्यानंतर स्वयंपाकघरातून धावत येताना हातातला कपडा आणि ताट/प्लेट ज्या पद्धतीनं धरलेलं असणं, रंगमंच हे आपलं खरोखरीचं घर असल्यासारखा सहज वावर. असो, यादी खूपच वाढेल.

काहीशा वेगळ्या विषयावर बेतलेल्या या नाटकाचं संगीतदेखील अंगावर येत नाही. किंबहुना त्याचं स्वतंत्र वेगळं अस्तित्व न जाणवता ते बेमालूमपणे नाट्यात मिसळून गेलं आहे. नाटकाचं नेपथ्यदेखील इतर गोष्टींना साजेसं साधं आणि तरीही परिणामकारक आहे. दोन टेबलं, एक बेड, तिच्या आईबाबांचा फोटो आणि लॅपटॉपसारख्या काही मोजक्या वस्तू आणि राहिलेलं खिडकी, खोल्या, कपाटं, कॉफी असं बरंचसं काही काल्पनिक.  पण त्यातही अभावामुळे एकंदरीत परिणामकारकतेत काही फरक पडत नाही.

समलैंगिकता या तथाकथित त्याज्य विषयावर भाष्य करणारा हा प्रयोग प्रेक्षकाला ओढूनताणून न आणलेला आणि व्यवस्थित पटणारा, त्या दृष्टीने विचार करायला लावणारा एक सकारात्मक शेवट देतो. अशा प्रकारची नाटकं ही उच्चभ्रूंची मक्तेदारी किंवा दांभिकपणे मिरवण्याची नाटकं असा एक सर्वसाधारण मतप्रवाह असतो. त्याला व्यवस्थित छेद देणारा आणि तरीही जडबंबाळ उपदेश न करणारा हा एकपात्री नाट्यप्रयोग स्वत: पाहण्याचा, आपल्या परिवाराला पाहण्याचा आग्रह करण्याचा आणि त्यातली मते अंगीकारण्याचा आहे. ज्या सुहृदामुळे मी हे नाटक पाहिलं, त्याचे मनापासून आभार.

टीप:- मी मूळ मराठी नाटकाचं हिंदी रूपांतरण पाहिलं. सध्या याचे प्रयोग हमसफर ट्रस्टतर्फे  केले जातात. ३१ जानेवारी २०१५ ला होणार्‍या मुंबई प्राईड मार्चच्या निमित्ताने आयोजित केल्या गेलेल्या प्री-प्राईड कार्यक्रमांतर्गत २१ जानेवारीला या नाटकाचा प्रयोग माटुंगा येथे करण्यात आला.

 

एक माधवबाग - चित्रपटाची /नाटकाची माहिती

एक माधवबाग
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: विजय केंकरे
  • कलाकार: मोना आंबेगांवकर
  • चित्रपटाचा वेळ: ७० मिनिटे
  • भाषा: इंग्रजी, हिंदी, मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 1998
  • निर्माता देश: भारत