तलवार(२०१५): रंजक मात्र भेदक अजिबात नाही!

मी आरुषी खून प्रकरणाबद्दल काही म्हणजे काही वाचलेलं नव्हतं, नाही. आईबापांनी मुलीचा खून केला असा आरोप असलेला खटला यापलीकडे मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळेच ’तलवार’ बघायला जाताना माझी पाटी पुरेशी स्वच्छ होती, असं मला वाटलं. पण सिनेमा बघताना माझ्या डोक्यात विजय नंबियारचा ’शैतान’ (२०११) आणि अनुराग कश्यपचा ’अग्ली’ (२०१३) उमटत राहिले आणि कोरी पाटी नामक काही अस्तित्वात असत नाही याचा उलट्या टोकाकडून साक्षात्कार झाला.

’शैतान’, ’अग्ली’ आणि ’तलवार’ या तिन्ही चित्रपटांच्या गोष्टी निरनिराळ्या आहेत. पण ते एकेका गुन्ह्याभोवती फिरणारे चित्रपट आहेत. तिन्हीत मुख्य कथानकाला समांतर चालणारं असं एक उपकथानक आहे. हे उपकथानक एकेका जोडप्याची गोष्ट सांगतं - रूढ व्यवस्थेत यशस्वी होऊ पाहणारं जोडपं. तडजोडी करणारं, धावणारं, दमणारं. आणि त्या तणावांचे परिणाम नात्यावर होताना झेपवणारं. आणि सर्वांत महत्त्वाचं साम्य म्हणजे, हे तिन्ही चित्रपट सडत गेलेल्या व्यवस्थेवर भाष्य करतात - करू पाहतात. या चित्रपटांची अशी चौकट डोळ्यांसमोर असताना ’तलवार’ सुटा पाहणं शक्यच नव्हतं. त्याची या चित्रपटांशी तुलना झालीच. पण या तुलनेतून आलेला निष्कर्ष सांगण्यापूर्वी तलवारबद्दल इतर तपशील सांगितले पाहिजेत.

इरफान खानच्या अदाकारीबद्दल (या शब्दाबद्दल मला माफ करा. हा घिसापिटा शब्द आहे. पण इथे याहून बरा शब्द सुचत नाही. अदाकारी-च.) काय बोलावं? बेडूक-डोळ्याचा म्हटला जाणारा हा काहीसा कुरूप, आता फारसा तरुणही नसलेला इसम, ज्या प्रकारे आपली देहबोली, डोळ्यांच्या हालचाली, चाल, शब्दोच्चार आणि संवादफेक वापरतो; त्याला तोड नाही. बाकी सगळा सिनेमा एका बाजूला आणि या इसमाचं काम एका बाजूला असा मामला असता, तरीही सिनेमा पाहणं वसूल ठरावं असं त्याचं काम आहे. त्या मानानं कोंकणा सेनशर्माचं काम काहीसं एकसुरी आहे. पण त्यात तिची चूक नाही. तिची भूमिकाच तशी प्रेडिक्टेबल म्हणावी अशी आहे. नीरज कबी या नटाचं काम मात्र अनपेक्षित आणि संयत आहे.

सिनेमा चोख रंगतदार आहे. पूर्वार्ध तर अंगावर यावी इतकी घट्ट पकड प्रेक्षकांवर ठेवून चालतो. या भागात आपल्याला कामात झोकून देणारा, त्यापायी संसाराकडे दुर्लक्ष करणारा, बायकोसोबत (तब्बो! काय एखाद-दीड दृश्यात काम करावं बाईंनी! आणि ही बाई ’दृश्यम’सारख्या तद्दन हिशेबी, ढापू सिनेमात काम करते. काय टॅलेण्टची नासाडी आहे राव. श्या! असो. असो.) कोरडा संसार कसाबसा ढकलणारा, यशस्वी बेदरकार इन्स्पेक्टर अश्विन कुमार (इरफान खान) भेटतो. मग टंडन केस फ्लॅशबॅकमधे उलगडते. सुरुवातीच्या भागात स्थानिक पोलीसांनी केसचा केलेला चिखल, काढलेले मनमानी निष्कर्ष, कामचुकारपणाची हद्द आणि त्यातून न्याय नामक गोष्टीची होत गेलेली विटंबना... असं सगळं रीतसर रंगवून त्या चित्रात अश्विन कुमारला आणलं जातं. तो त्याच्या धडाकेबाज, एककल्ली पद्धतीनं सगळं कोडं सोडवत आणतो आणि न्यायाची आशा निर्माण होते. पण केस सुटण्याच्या अंतिम टप्प्यात असताना त्याचे वरिष्ठ निवृत्त होतात आणि मग कुरघोडीची राजकारणं, काही पायओढू गद्दार्‍या, काही निव्वळ नशिबाचा भाग असं करत करत, चिखलाकडून चिखलाकडे असा टंडन दाम्पत्याच्या नशिबाचा प्रवास होतो. उत्तरार्धात सिनेमाचा वेग काहीसा मंदावतो. पण त्यातला विनोद अधिक काळा, धारदार, तिरका आहे. पूर्वार्धात दिसत राहणारं टंडन कुटुंबाचं आणि गुन्ह्याचं तपशीलवार, क्लोजपमधून केलं जाणारं चित्रण; उत्तरार्धात आपल्याला लांबून दिसत राहतं. त्याच्या पार्श्वभूमीला असलेलं मिडिया, न्यायव्यवस्था, राजकारणी आणि मुख्यत्वे पोलीस यंत्रणा यांचं एक व्यापक चित्र दाखवण्यावर उत्तरार्धाचा भर आहे. या दृष्टीकोनाच्या बदलातून तो विनोद जन्माला येतो. बोचतोही. निराश करणारा शेवट बघताना आपण सुन्न होतो. 

मात्र प्रेक्षकाच्या दृष्टीनं दोन भागांमध्ये जाणवण्याइतपत, रसभंग करणारा ठरू शकेल, इतका मोठा हाताळणीचा फरक आहे. पूर्वार्धात एखाद्या रहस्यपटाचा पकड घेणारा सूर आणि उत्तरार्धात व्यवस्थेतल्या असंगतीवर भाष्य करणारा काळाशार विनोद (इथे ’कोर्ट’ची आठवण येणं अपरिहार्य आहे!) हे काहीसं अनइव्हन रसायन तयार होत जातं.

याच टप्प्यावर मला ’अग्ली’ आणि ’शैतान’ची आठवण झाली. हे सिनेमे व्यवस्थेवर भाष्य करतातच. त्यांतही पोलीस यंत्रणेवर अतिशय धारदार, नेमकी आणि वास्तववादी टिप्पणी आहे. किंबहुना ही टिप्पणी हा त्यांचा अविभाज्य असा भागच आहे. तिच्यासह त्या चित्रपटांच्या मूलभूत कथानकाची वीण कुठेही सैल होत नाही. शैलीतला एकसंधपणा उणावत नाही.

’तलवार’चं मात्र तसं नाही. गोष्ट पुरेशी रंगतदार करावी की या असंगतीवर कोरडे ओढणार्‍या विनोदाच्या मोहाला शरण जावे या पेचात तो अडकल्याचं स्वच्छ जाणवतं. उदाहरणार्थ अश्विन कुमारचा असिस्टंट गाणं म्हणतो तो प्रसंग. या पेचामुळे तलवारीची धार बोथटल्यासारखी होते. एरवी खरा म्हणजे ’तलवार’मधला निष्कर्ष पुरेसा स्वच्छ-सोपा-सुटसुटीत आहे. तिथे कोणतीही गुंतागुंत, नैतिकतेचे पेच, प्रेक्षकासमोर ठेवलेले अन्वयार्थाचे रस्ते नाहीत. या गोष्टीच्या माध्यमातून दिग्दर्शिकेला भाष्य करायचं आहे ते पोलीस नामक व्यवस्थेवर. सिनेमात एका ठिकाणी काहीसा अस्थानी - शब्दबंबाळ वाटेल असा, न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा यांबद्दलचा संवाद पेरण्याचं धाडस करत, ते अधोरेखित केलं जातं.

पण हे भाष्य पुरेसं भेदक मात्र होत नाही. रंजक होण्याच्या टप्प्यावरच थांबतं, हे आपलं दुर्दैव. 

तलवार (२०१५) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

तलवार (२०१५)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: मेघना गुलजार
  • कलाकार: इरफान खान, नीरज कबी, कोंकणा सेनशर्मा
  • चित्रपटाचा वेळ: १३२ मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१५
  • निर्माता देश: -