पिकू - 'बोळा' काढून वाहतं करणारा 'मोशन' पिक्चर!

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला 'हर्बर्ट हूवर' नावाचे अमेरिकन राष्ट्रपती होते. त्यांचे एक वाक्य असंय की, 'Older men declare war. But it is youth that must fight and die'. हूवर यांनी हे उद्गार ज्या पार्श्वभूमीवर काढले होते ती इथे अजिबात लागू नाही. पण हे वाक्य आठवायचे कारण म्हणजे 'शुजीत सिरकार' यांचा ताजा 'पिकू - मोशन से ही इमोशन' हा चित्रपट. गेल्या दोन वर्षात 'विकी डोनर' आणि 'मद्रास कॅफे' हे खणखणीत चित्रपट घेऊन आलेले शुजीत सिरकार यावेळी एका वेगळ्या जातकुळीचा विनोद घेऊन समोर येतात, तो ही आपल्या सर्व वैशिष्ट्यांसह. त्यात दीपिका-अमिताभ-इरफान हे त्रिकूट चांगल्या अभिनयाच्या जोरावर तो विनोद - आणि त्यामागे असलेले गंभीर म्हणणे - आपल्यापर्यंत पोचवण्यातही यशस्वी होते. त्यात समकालीन पार्श्वभूमीवरच्या वापरामुळे ह्या चित्रपटाशी प्रेक्षक लगेच समरस होतो.

'खवचट' आणि 'खवट' व्यक्तींमध्ये यात एक धूसर सीमारेषा असते. समोरच्याला प्रसंगी लागेल असे तिरके बोलणे दोघेही बोलतात; पण खवचट माणसे सहसा कोरडी नसतात त्यामुळे त्यांचा खवचटपणा दुखरा नसतोच - प्रसंगी हवाहवासा वाटू शकतो - तर खवट व्यक्ती इतक्या शुष्क झाल्या असतात की त्यांच्या विनोदाला दाद देण्यापेक्षा त्यांचा रागच अधिक येतो. तेच 'खवचट' आणि 'खवट' विनोदांबाबतही म्हणता यावे. 'पिकू' हा अशा 'खवचट' विनोदाने भरलेला चित्रपट आहे - पण तरीही तो 'विनोदी' चित्रपट नाही! आधुनिक भारतीय समाजातील वेगवेगळ्या द्वंद्वांना आपल्यात सामावलेला हा आधुनिकपट एका - खरंतर अनेक गंभीर विषयांच्या डोलार्‍यावर उभा राहतो आणि वाहत राहतो, तरीही लोकांना मनमुराद हसवतो. विनोद हा गंभीर गोष्ट मांडणार्‍यासाठी सर्वात महत्त्वाचे - नि अचूक वापरले तर अतिशय परिणामकारक- माध्यम आहे खरेच! अर्थात ते दुधारी शस्त्र आहे, आणि त्यात प्रेक्षकांवर किंवा एकूणच सामाजिक विसंगतीवर किंवा प्रश्नांवर बोट ठेवताना या माध्यमावरची मांड अधिकच पक्की असावी लागते. 'पिकू' ती कसरत करत या कथेला विनोदी ढंगात मांडण्यात यशस्वी होतो.

सूचना: यापुढिल लेखना कथाभाग संभवतो.

भास्कर बॅनर्जी (अमिताभ) आणि पिकू बॅनर्जी (दीपिका) हे बापलेक दिल्लीत राहत असतात. त्यांच्या घरी त्यांचा एक नोकरही असतो. भास्कर आणि पिकू हे दोघेही आपापल्या परीने 'विचित्र' आहेत. भास्कर हा सत्तरीच्या घरातील एक बर्‍यापैकी फिट म्हातारा. आपल्या बद्धकोष्ठाच्या विकाराबद्दल त्याला प्रचंड घालमेल आहे हे चित्रपटाच्या सुरुवातीलाच समजते. हळूहळू त्याची ती घालमेल फक्त बद्धकोष्ठापुरतीच मर्यादित नसून एकूणच शारीरिक विकारांबद्दल अतिशय सजग असलेला तो म्हातारा आहे आणि त्याचा पूर्ण रिकामा वेळ आपल्याच स्वास्थ्याकडे लक्ष देणे हा उद्योग तो करत असतो. आपल्या मुलीने (पिकूने) लग्न करू नये असे त्याचे मत असते. सुरवातीला टोकाच्या भूमिकांनी बहार उडवून देणार्‍या भास्कराचे विचार, स्वभाव आणि भिती सगळेच हळूहळू उलगडत जाते.

पिकू ही साधारण लग्नाचे वय केव्हाच उलटून गेलेली अविवाहित तरुणी. ऑफिसात नोकरी करण्यासोबतच, घरी आपल्या वडिलांना सांभाळणारी, काहीशी तापट, स्पष्टवक्ती, धारदार बोलणारी, बहुतांश वेळा कावलेली अशी एक आधुनिक स्त्री! दीपिका सुरुवातीला काहीशी कर्कश वाटू शकते पण तोच तिचा स्वभाव आहे हे समजते व लवकरच प्रेक्षक त्याला सरावतो. ही अविवाहित असली तरी ती 'व्हर्जिन' नाही हे भास्कर अनेकांना सांगत असतो. तेव्हा ती आर्थिकदृष्ट्या, लैंगिकदृष्ट्या, सामाजिक स्तरावर एक स्वतंत्र व स्वायत्त स्त्री आहे.

या सगळ्यात एक तिसरे पात्र आहे राणा चौधरी (इरफान). पिकूला रोज घ्यायला जी टॅक्सी येते, त्या टॅक्सी पुरवणार्‍या संस्थेचा हा मालक आहे. पिकूच्या तुसड्या व रागीट स्वभावाने वैतागलेल्या ड्रायव्हर्समुळे याची बर्‍याचदा पंचाईत होत असते. याचीही पार्श्वभूमी म्हटली तर जरा वेगळी आहे. याला 'गल्फ'मधील नोकरीवरून काढल्यामुळे भारतात येऊन वडिलांना व्यवसाय सांभाळतो आहे. त्याला नोकरीवरून 'काढल्या'बद्दल आईकडून सतत ऐकून घ्यावे लागतेय. त्याची आई, नवर्‍याचे घर सोडून आलेली बहीण आणि तिचं मूल अशी माणसं घरी आहेत. आई व बहीण ही सुद्धा सरळ नाहीत. बहिणीने तिच्या सासूची अंगठी चोरून आईला दिल्याने तिचा घटस्फोट समोर ठाकला आहे वगैरे माहितीही समोर येते. तेव्हा तोही वेगळ्या कारणांनी कावलेला व अडकलेला आहे.

दरम्यान भास्करला आपल्या कोलकात्याच्या घरी जावेसे वाटू लागते, आणि एकूणच आयुष्याला कावलेल्या पिकूलाही तो एक चेंज असेल असे वाटते. भास्करला कोलकात्याला जाताना विमान वा रेल्वेपेक्षा, रस्त्यावरून जाणे योग्य ठरेल असे भास्करच ठरवतो. त्यांच्यासोबत यायला अर्थातच टॅक्सी ड्रायव्हर तयार न झाल्याने आपल्या घरगुती कुरबुरींना कंटाळलेला राणा त्यांना नाईलाजाने घेऊन जायला तयार होतो. अशा प्रकारे ही तीन वेगवेगळ्या प्रकारची माणसे दिल्ली ते कलकत्ता रोड ट्रीप करतात त्या प्रवासाची व त्यायोगे मानवी परस्परसंबंधांची व त्यात होणार्‍या बदलांची चित्तवेधक कहाणी म्हणजे पिकू!

इथे ही तीनही पात्र म्हटली तर स्वतंत्र आहे. आधी म्हटल्याप्रमाणे पिकू आर्थिकदृष्ट्या, लैंगिकदृष्ट्या, सामाजिक स्तरावर एक स्वायत्त स्त्री आहे - मात्र तिच्या भोवती आपल्या वृद्धा वडिलांची काळजीमुळे आलेले बंधन आहे आणि त्या बंधनाचा काही वेळा वाटणारा जाच आहे आणि तसे वाटण्याने येणारा अपराधीपणाही आहे. हे सगळे असतानाही तिचे असे स्वतंत्र अस्तित्त्वाशी व त्याच्या एकटेपणाशी ती झगडते आहे. भास्करही बर्‍यापैकी तब्येतीसह आरोग्याने स्वयंपूर्ण आहे, आर्थिकदृष्ट्या सुस्थिर आहे- मात्र त्याच्याभोवती पत्नीच्या मृत्यूनंतर आलेल्या एकटेपणाची चौकट आहे. त्याच एकटेपणाची परिणिती आपल्याला परावलंबी व्हावे लागेल या भितीत झाली आहे. राणाही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे, काही लोकांना पोसतो आहे मात्र एकूणच आयुष्यात आलेले प्रसंग, तर्‍हेवाईक कुटुंबीय यांची मर्यादा त्याला आहेत आणि त्यांतून आलेले एकटेपणही. तीनही पात्र स्वतंत्र आहेत पण त्या स्वतंत्रतेबरोबर, वेगवेगळ्या कारणाने आलेल्या एकटेपणाशी आपापल्या पद्धतीने ते झगडत आहेत.

या चित्रपटाच्या तांत्रिक अंगांबाबत बोलायचं तर याची पटकथा व संवाद ही सर्वात जमेची बाजू. चित्रीकरणासाठी वापरलेले घर हे पसारा, गडबड, 'वापरातले' फर्निचर, ऐसपैस पसरलेली नि घरातल्या कपड्यात वावरणारी माणसे, विस्कटलेल्या घड्या नि मोलकरणींच्या तक्रारीसह आल्याने 'जिवंत' आणि खरे वाटते. वेशभूषा करायची म्हणजे हिरॉईनला "सुंदरच" कपडे द्यायचे, आणि प्रत्येक पात्राला एखादा विवक्षित "प्रॉप" द्यायचा वगैरे कंटाळवाणा - हल्ली सर्वत्र दिसणारा - प्रकारही टाळल्याने तिघेही कलाकार मूळ पात्रांशी अधिकच समरस वाटतात. अभिनयाच्या बाबतीत अमिताभने चांगले काम केले आहेच, पण दीपिका आणि इरफान यांच्यातील 'गिव्ह अँड टेक' - जे विनोदाला अतिशय आवश्यक असते - अफाट जमले आहे. या चित्रपटातील विनोद "चला आता बघा हं मी विनोद करतोय" अशी पूर्वसूचना घेऊन येत नाही, आणि दरवेळी प्रेक्षकाने खो खो हसलेच पाहिजे असा बालिश हट्टही करत नाही. आल्हाददायक शाब्दिक विनोद, तिरकस कोटी, खवचट टोमणे, परिस्थितिजन्य विनोद, कायिक विनोद, काळा विनोद वगैरे सर्व प्रकारांची पखरण नेमक्या जागी होत असल्याने चित्रपटाचाच विनोद न होता, आपले म्हणणे चित्रपट योग्य तेव्हा, योग्य तेवढे व योग्य तितका जोर देत पोचवतो. एकुणात कहाणी पडद्यावर मोठी सुरेख उतरते. 'विकी डोनर'च्या वेळी दारू पिणार्‍या पंजाबी बायका वगैरे यथार्थचित्रण करणारा सिरकार, याही चित्रपटात एकूणच चित्रपट हल्लीच्या जगात घडवतो. दरम्यान यथार्थचित्रण म्हणजे दारू पिणार्‍या म्हातार्‍या बायका या प्रतिमेचा इतका अतिरेक झाला की या चित्रपटात सिरकारने उभी केलेली पात्रे मात्र त्या प्रकारचा 'तोचतोचपणा' टाळतात, तरीही (त्यामुळेच) खरी वाटतात. अर्थात असे वास्तववादी चित्रण सिरकार यांची खासियत होत चालली आहे.

थोडक्यात सांगायचं तर हा चित्रपट एकटेपण आणि म्हातारपण किंवा 'एजिंग' वर जे भाष्य सहज विनोदात म्हणून करतो ते केवळ शारीर आरोग्यापुरतं करून थांबत नाही. हे म्हातारपण केवळ व्यक्तीच नाही तर भावना, इमारती, नाती या सगळ्यांनाच लागू पडत जाते. शरीराच्या आरोग्यासाठी आपण करतो तशा बाह्यउपचारांप्रमाणेच नाती व भावनांमध्ये येणारे शिळेपण, साचलेपण, म्हातारपण घालवायला बोळा काढून "मोकळे होणे" किती आवश्यक असते - त्यावर थेट न बोलताही, हा चित्रपट विचारात पाडणारे भाष्य करून जातो!

पिकू - मोशन से ही इमोशन - चित्रपटाची /नाटकाची माहिती

पिकू - मोशन से ही इमोशन
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: शुजीत सिरकार
  • कलाकार: इरफान खान, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: -
  • निर्माता देश: -