जाऊ द्या ना बाळासाहेब (२०१६): ब्रिंग इट ऑन!

’जाऊ द्या ना बाळासाहेब’ सगळ्यांना आवडणारा सिनेमा नाहीच. अजय-अतुलची छप्परतोड गाणी असली तरी. गिरीश कुलकर्णीचा डोळे दिपवून टाकणारा अभिनय असला तरी. विनोदाची ’जाने भी दो यारों’सारखी तिरपागडी आणि ’मटरू की बिजली का मन्डोला’सारखी एक्लेक्टिक जातकुळी असली तरी. गुलजारांच्या ’हुतुतू’ची आठवण करून देणारी काव्यात्मकता असली तरी. त्यांतल्या अनेक गोष्टी स्वतंत्रपणे चमकून, धक्का देऊन, हसवून, चमकवून जातात. अनेक प्रयोगांचं कौतुक वाटतं. आशयाबद्दल कमालीची जवळीक वाटते. नि तरी सगळं मिळून जमून आलेलं रसायन आहे का हे? तर सॉरी, नाहीच.

गोष्ट ऐकायची नसेल, तर पुढे वाचताना जपून.

गोष्टीत विशेष काही नवीन नाही. तोच तो बाप-बेटा - सुष्ट-दुष्ट - गरीब-श्रीमंत झगडा. आबासाहेब (मोहन जोशी) गावातले मुरलेले राजकारणी. बायको (रीमा) आणि तिचं शेंडेफळ, बापाच्या जिवावर मजा करणारा बाळासाहेब (गिरीश कुलकर्णी). रंगेल-उधळखोर बाळासाहेब संगीतबारीत जातो, डस्टर उडवतो, बापाच्या सभेला गर्दी जमवतो, गावात एकूण रोख जमवून असतो. पण त्याच्या जिवाला काहीतरी सलतं आहे. दलित लेखक दोस्त आणि एक गरीब-चड्डी दोस्त यांच्यासोबत पुण्यातल्या प्रायोगिक नाटकाच्या कार्यशाळेला गेलेला असताना बाळासाहेबाचा हा सल ट्रिगर होतो आणि तिथल्या लेखक-दिग्दर्शक बयेला (मनवा नाईक) आपली संवेदनशीलता सिद्ध करून दाखवण्याच्या प्रयत्नात तो नाटक बसवायचं ठरवतो.

इथून त्याचा प्रवास सुरू होतो.

हा सिनेमा म्हणजे बाळासाहेबाच्या ’कमिंग ऑफ एज’चीच गोष्ट आहे. आणि ती कमालीच्या अपारंपरिक पद्धतीनं सांगितलेली आहे. त्यात पुण्यातल्या सुदर्शन रंगमंचाबद्दलचा दिग्दर्शकाचा नॉस्टाल्जिया; माधुरी पुरंदरे-सतीश आळेकर-अतुल पेठे या मंडळींबद्दलचा प्रेमादर; फेसबुक-व्हॉट्सॅप-सेल्फी-स्मार्ट फोन्स-टीव्ही या प्रकारांनी उभ्या-आडव्या गिळलेल्या तुमच्या-आमच्या आयुष्याचा उभा छेद; मराठीतल्या साहित्यिकांची विचार करायला लावणारी उद्धृतं   … हे सगळं येतं. अनेक कमालीच्या विसंगत गोष्टींच्या सहज मिश्रणातून अनेक दर्जेदार विनोद फुटत राहतात.

पात्रांच्या तोंडची भाषा - हा या विसंगतीतून जन्माला येणार्‍या विनोदाचा सर्वात भारी नमुना आहे. ग्रामीण मराठी म्हटल्यावर लोक लगेच सूर्यकांत-चंद्रकांत-जयश्री गडकर काळात जाऊन मिशांना ताव भरून काहीतरी भलतंच कृत्रिम ऐकायच्या तयारीनं सरसावून बसतात. पण कुलकर्णी द्वयाच्या पूर्वीच्या सिनेमांतूनही या आचरट समजुतीला छेद देणारी भाषा वापरलेली होती. (’काय एशीझ्येड ए का?’ हा ’देऊळ’मधला संवाद आठवतो का? कमीत कमी शब्दांत वास्तवाची बेरकी जाण टिपणारा हा संवाद ऐकून कान गारेगार झाले होते!) गिरीश कुलकर्णी या चित्रपटातही हे वैशिष्ट्य सराईतपणे परजतो. इंग्लिशचा सहज नेमका अंगीकार करणारी भाषा काहीच्या काही जिवंत मार्मिक विनोद घडवत राहते. पंजाबट सिनेमाच्या प्रभावातून आबासाहेबांनी बायकोला ’पेहेलवान’ अशी हाक मारणं काय, किंवा ’ब्याड फीलिंग कंटिनूमदे र्‍हातं ना...!’ ही बाळासाहेबांची करुण तक्रार काय. ’फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी, नो थॅंक्यू!’ ही येताजाताची मुक्ताफळं, किंवा मग ’एक शेल्फी टाक ना मम्मी!’ हे मातापुत्रांमधले संवाद. यादरम्यान खास पुणेरी प्रायोगिक वर्तुळातले ’संवेदनशील’, ’विच्छेदन’, ’समग्र परिशीलन’ यांसारख्या टोकदार समीक्षकी संज्ञा येतात. आपण आधी निव्वळ विसंगतीला हसतो आणि मग त्यातल्या सहज मार्मिकतेमुळे एकदम गंभीर होऊन विचारात पडतो.

दुसरा कमाल थोर भाग म्हणजे तंत्रज्ञानानं कवेत घेतलेलं जगणं दाखवत राहणं. बापबेट्यांमधला तणावपूर्ण संवाद सुरू असतानाही सतत व्हॉटसॅपच्या इनकमिंग मेसेजेसची नोटिफिकेशन्स पार्श्वभूमीला सुरू असतात. ’लिहून काय घेतो! फोटो टाक ना!’ अशी स्मार्ट कानपिचकी एक वाचनशून्य पात्र दुसर्‍या लेखक पात्राला देतं. बाळासाहेब दवाखान्यात तपासणी करत असताना ’व्हॉट्सॅप चालेल ना?’ असं विचारून निवांत फोटो पाहत लोळतो. बाळासाहेबाचा गरीब मित्र बीएसएनेलच्या टॉवरच्या खटपटीत असतो आणि बायकोला ’टाप-टाप-टाप रीचार्ज’ मारायला सांगतो. म्हातार्‍या बाया टीव्हीवरच्या मालिकांमध्ये कमाल बुडालेल्या दिसतात. ’गॅंग्स ऑफ वास्सेपूर’मध्ये टीव्ही आणि सिनेमा हे एक महत्त्वाचं पात्र होतं. तसं या सिनेमात सर्वव्यापी मोबाईल हे एक अतिमहत्त्वाचं पात्र आहे.

अभिनय या गोष्टीबद्दल मुद्दाम काही निराळं बोलायला नको. मराठी सिनेमात ते तसंही गृहीत धरलेलं असतं. अनेक कच्च्या बाजू एकेकदा कलाकार निव्वळ अभिनयाच्या जोरावर झाकून नि पेलून जातात, ही मराठी सिनेमाचं बलस्थानच आहे. हा सिनेमा त्याला अपवाद नाही.

या डोळे दिपवून टाकणार्‍या अभिनयामुळेच या सिनेमात एक बाब खटकते. ते म्हणजे गिरीश कुलकर्णीनं रंगवलेलं बाळासाहेबाचं पात्र. गिरीश कुलकर्णी अत्यंत भारी, सहज, भाषेचा सर्वांगीण वापर करणारा नट आहे, यात शंका नाही. पण वाईट भाग असा की सिनेमाचा बराचसा भाग एकट्या बाळासाहेबाच्या पात्राच्या खांद्यावर उभा आहे. लेखनातून त्या पात्राची संवेदनशीलता, त्याचा भोळसटपणा, त्याचा प्रामाणिकपणा, त्याचं कारुण्य दिसत राहतं; आणि अभिनयातून त्याचा सहजस्फूर्त-अस्खलित भाषेतला वावर दिसतो राहतो. त्या कामगिरीमध्ये बाकीचे नट आणि पात्रं निष्प्रभ होतात. अगदी कमल-हसनीय म्हणावा असा हा असमतोल आहे. गिरीश कुलकर्णीमधल्या नटाला तो भूषणास्पद असेलही. पण त्याच्यातल्या दिग्दर्शकाचं मात्र हे निश्चित अपयश आहे.

तेच अजय-अतुलच्या गाण्यांबद्दलही म्हणायची वेळ यावी हे आणि एक दुर्दैव. गाण्यांचे शब्द आणि संगीत दोन्ही चपखल, श्रवणीय असूनही निव्वळ कथेच्या बाबतीत दाताखाली येऊन अनेक गाणी रसभंग करतात. नाकापेक्षा मोती जड होता नये. अजय-अतुल निर्मात्यांपैकी एक असले म्हणून काय झालं? आधीच काहीशा लांबलचक असलेल्या सिनेमाची लांबी त्यामुळे अजूनच वाढते. विशेषकरून पूर्वार्धात सिनेमा कुरकुरीत न राहता, काहीसा रटाळ-खेचलेला वाटायला लागतो.

अनेक दोष आहेत. पण त्याबरोबरीनं अनेक धाडसी प्रयोग आहेत आणि चुकवू नयेत अशा अतरंगी गोष्टीही सिनेमात आहेत. ब्रिंग इट ऑन. नो डाउट.

जाऊ द्या ना बाळासाहेब (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

जाऊ द्या ना बाळासाहेब (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: गिरीश पांडुरंग कुलकर्णी
  • कलाकार: गिरीश कुलकर्णी, भालचंद्र कदम, मोहन जोशी, रीमा, सई ताम्हणकर
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत