अपरात्रीचे चित्रपट: द बॅण्ड्स विझिट (२००७)

संध्याकाळची सात-साडेसातची वेळ. निघताना एकदा घरी फोन करावा काय असा विचार डोक्यात असताना मोबाइल वाजतो. अनोळखी नंबर. एकदा फोन टाळण्याची इच्छा होते, पण सवयीच्या नाइलाजाने फोन घेतो. समोरचा आवाज ओळखीचा नाही, पण निरोप घणघणत डोक्यात जातो. कुणीतरी अचानक गेलं आहे. बर्‍याच वर्षात संपर्कही नाही. पण आयुष्याच्या मैलोगणती विणलेल्या पटात उभे-आडवे धागे गेलेल्या माणसानी विणले आहेत. घरी फोन करतो. "उशीर होईल. झोपा. वाट बघू नका."

सगळी निरवानिरव होऊन घरी पोहचेपर्यंत रात्रीचे दोन-सव्वादोन. बाथरूममध्ये गीझर चालू करून बादली भरेस्तो अवघडून सोफ्यावर बसतो. अजून मन सुन्न आहे. बधिर आहे. स्मशानातली धुरकट हवा मनावर राखेसारखी पसरली आहे. अनैच्छिक प्रतिक्रियेत टीव्ही चालू करतो. म्यूट करतो. चॅनेल्स बदलत जातात. चित्रपट सुरू असतो. मधला कुठलातरी सीन चालू असतो. बाथरूममधल्या वाहणार्‍या पाण्याचा सरगळ आवाज. बाकी सगळं शांत. नकळत त्या सीनमध्ये मन गुंतत जातं. नंतर गुंतूनच राहतं. बेडरूमचा दरवाजा उघडून बायको बाहेर येते. नळ बंद करते. प्रश्नार्थक चेहेरा करते, पण बोलायची इच्छाच होत नाही. तीपण बाजूला बसते. चित्रपट उलगडतच जातो. मरण, स्मशान, आंघोळ, थकवा सगळं विसरून दोघंही चित्रपट बघत राहतो.

असे अनेक चित्रपट अपरात्री बघितले आहेत. काहींची नावं लक्षात राहिली, तर काही "कोल्हटकर गेले त्या दिवशी रात्री बघितलेला" अशीच आठवण राहिली.

त्यातलेच हे काही चित्रपट.   

२००७ साली प्रदर्शित झालेला हा एक इस्राएली चित्रपट.चित्रपटाला कथा म्हणावी अशी कथा नाही. ’जागते रहो’मध्ये जशी एका रात्रीची गोष्ट आहे तशीच ही गोष्ट. (’जागते रहो’ आणि हा चित्रपट यांत यापलीकडे काही साधर्म्य नाही.) इजिप्सियन पोलिसांच्या बँडची आठ जणांची टीम अनोळखी गावात पोहचते. परंतु आपल्याला ज्या गावात जायचे होते ते हे गाव नाही हे लक्षात येईपर्यंत रात्र झालेली असते. परतीच्या प्रवासासाठी उजाडेपर्यंत व्यवस्था होणार नसते. एका छोट्याशा हॉटेलात जेवणाची सोय होते, पण रात्र काढण्यासाठी लॉज वगैरे काहीच नसते. हॉटेलची मालकीण दिना त्यांची राहण्याची व्यवस्था तिच्या हॉटेलमध्ये आणि इतर परिचितांच्या घरी करते. आणि इथे सिनेमाला सुरुवात होते. 

तौफीक म्हणजे बँडचा कॅप्टन. दिना म्हणजे हॉटेलची मालकीण. बँडमधला वयाने अगदी धाकटा हालेद आणि इतर पात्रं यांच्या एका रात्रीच्या सहवासाची ही कथा आहे. धक्का देणारे किंवा टचकन डोळ्यात पाणी आणणारे प्रवेश नाहीत. पण अपरिचित माणसं एका रात्रीच्या काही तासांत जवळ येता येता दूर जातात - अवघडलेल्या संभाषणातून एकमेकांच्या आयुष्याचा पोत तपासतात - सकाळ होताच दूर जातात आणि  उरतो फक्त एकटेपणाचा अनुभव. इजिप्त असो किंवा इस्राएल, माणसांचे वागण्याचे नमुने वरकरणी वेगवेगळे असले तरी शेवटी मनाचे पापुद्रे उलगडायला जावेत, तर काहीच फरक नाही ह्याची जाणीव करून देणारा पडद्यावर साकारलेला अनुभव म्हणजे हा सिनेमा. 

हा सिनेमा बघावा तो तौफीकची भूमिका करणार्‍या ससून गबाई या नटाच्या अभिनयासाठी! तौफीक सिनीअर आहे. त्याच्यावर बँडच्या इतरांची जबाबदारी आहे आणि परदेशातल्या अनोळखी लोकांसोबत रात्र काढायची आहे हा ताण त्याच्या (केवळ) चेहेर्‍यावरच्या अभिनयातूनही कळतो.दिना एकटी आहे. संवादासाठी, सहवासासाठी आतुर आहे. पण हे समजूनही तो हालेदला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न सतत करत असतो. काही प्रवेश लांबलचक आहेत. असे प्रवेश म्हणजे कोणत्याही नटाच्या अभिनयाची कसोटी असते. यूट्युबवर हे प्रवेश बघितले, तरी ससून गबाईच्या अभिनयाची खोली कळेल. 

या सिनेमाला नायक नाही. पण बँडच्या कॅप्टनच्या आसपास फिरत राहणारा हा सिनेमा बघावा तो केव़ळ अभिनयासाठी.

चित्रपटाचा शेवट एका गाण्याने होतो. आपल्याला अनोळखी अशा स्वररचनेतले हे गाणे त्या गाण्याच्या क्लॅपिंगसाठी बघावे-ऐकावे असे आहे.  मानवी जीवनातील एकटेपणाचे चित्रण अंगावरच कोसळते.  (इंग्रजी सबटायटल्समुळे जरा जास्तच.) 

चित्रपटाबद्द्ल इतर माहिती अर्थातच गुगलल्यावर कळेल. पण कसदार पटकथेचा नमुना म्हणुन एक नमुना देत आहे. 
"You know, maybe this is how your concerto ends."

"I mean, not a big end with trumpets and violin."

"Maybe this is the finish, just like that suddenly."

"Not sad, not happy,"

"Just a small room with a lamp, a bed, a child sleeps, and tons of loneliness."

द बॅण्ड्स विझिट - चित्रपटाची /नाटकाची माहिती

द बॅण्ड्स विझिट
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: एरन कोलिरीन
  • कलाकार: एहुद् ब्लायबर्ग, कोबी गाल-रेडय्, गाय जॅकोइल
  • चित्रपटाचा वेळ: ८७ मिनिटे
  • भाषा: अरेबिक, इंग्रजी, हिब्रु
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २००७
  • निर्माता देश: इज्रायल