प्राइड अँड प्रीज्युडिस: (१९९५ मिनी BBC सिरिज) एक दीर्घ रसग्रहण - भाग २

भाग १ | भाग २ | भाग ३

या ’सिरीज’चा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे संगीत आणि नृत्य. कादंबरीत या गोष्टींचा उल्लेख भरपूर वेळा असल्याने वाचकाला जसे त्यात आपल्या कल्पनाशक्तीचे वारू उधळता येतात, तसेच इथे संगीत दिग्दर्शकाला किंवा नृत्य दिग्दर्शकालाही! या कथेत मुबलक 'बॉल पार्टीज' आहेत नि कादंबरीवरील इतर चित्रपटांतही त्याचा पुरेपूर समावेश आहे. सदर मालिकाही त्याला अपवाद नाहीच. इथे प्रत्येक बॉल पार्टी एका नावीन्यासह समोर येते. आधी म्हटल्याप्रमाणे पार्टी देणार्‍या व्यक्तीनुसार स्थळ, येणार्‍या व्यक्ती, व्यक्तींचे पेहराव, केशभूषा वगैरेंमधील फरक तर दाखवला आहेच; पण हरेक पार्टीत वाजणारे संगीत त्याचा दर्जा, वाद्यांची प्रत आणि संगीताचा प्रकार यांतही फरक आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला गावातील एका पार्टीत वाजणारे संगीत आणि नंतर बिंग्लेने दिलेल्या पार्टीतले महालात वाजणारे संगीत यांतील तफावत नुसता दर्जाच लक्षात आणून देते असे नाही, तर दोघांच्या एकूण सामाजिक स्थानातील फरकही लक्षात आणून देते. आणि नाचांबद्दल काय बोलावे!. बॉलरूम डान्स म्हणजे एकमेकांना कवेत घेऊन नाचणार्‍या स्त्री-पुरुषांच्या जोड्या हा प्रचलित गैरसमज इथे अगदी खोडून काढला आहे. इथेही जोड्याच आहेत. मात्र त्या कधी चारच्या गटांत असतात, तर कधी खोखोच्या खांबांप्रमाणे बाकी नृत्यवीरांसाठी आळीपाळीने खांब होतात. त्यांचे स्थान, फिरायची पद्धत सगळ्यांना अवगत असते आणि त्यातही धांदरट नाचापासून खास 'हुच्च' खानदानी व अचूक नाचणे यांच्यातील तफावत त्या नाचाबद्दल जराही माहिती नसणार्‍यालाही सहज जाणवते.


अख्ख्या ’सिरीज’मध्ये एकूण ११ नाच आहेत. मात्र त्यातील एक नाच ’ग्रँड बॉलरूम डान्स’ या नावाने इतका प्रसिद्ध झाला की त्यानंतर अजूनही लंडनमधील कोणत्याही मोठ्या समारंभासाठी या प्रकारच्या नाचाची मागणी होत असते. हा नाच ’मिस्टर बेवेरीज मॅगॉट’ नावाचा एक लोकनृत्याचा प्रकार आहे. या ’सिरीज’मुळे हा जवळजवळ २०० वर्षे जुना नाचाचा प्रकार नुसता पुनरुज्जीवित झाला नाही, तर त्यानिमित्ताने इंग्लिश लोकनृत्याच्या सौंदर्याकडे लोकांचे पुन्हा एकदा लक्ष गेले. अनेक इंग्लीश लोकनृत्यांच्या वेळी पहिली ओळ दोनदा आणि दुसरी ओळही दोनदा वाजवली जात असे. मात्र २०० वर्षांपूर्वी तसे नव्हते, हे लक्षात घेऊन या चित्रपटात पहिला सीक्वेन्स दोनदा वाजतो आणि दुसरा मात्र एकदाच. नि त्या दीड सुरावटीत एक आवर्तन बसवले आहे. यामुळे नाच अधिक गुंतागुंतीचा झाला तरी पसरट न झाल्याने अधिक सुंदर दिसतो. या नाचाचे आणखी एक महत्त्व असे की या समूह लोकनृत्यात डार्सी व लिझी यांच्यात कथेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा वाद होतो. नाचता नाचता इतकी सखोल चर्चा कोणी करूच कसे शकते असे पुस्तक वाचताना वाटते (किंवा मग लिझी कवेत असताना डार्सी भांडेलच कसा वगैरे गोग्गोड पण प्रॅक्टिकल प्रश्नही पडतात). मात्र हा नाच आपल्या पार्टनरला कवेत घेऊन केला जात नाही हे एक. दुसरे म्हणजे यातील तुकड्या-तुकड्यात झालेला संवाद इतका छान दाखवला आहे, की ’असे बोलणे खरेच शक्य असेल का?’ हा प्रश्न प्रेक्षक गिळून टाकतात. याव्यतिरिक्त सुरवातीला दिसणारे (मिसेस फिलिप्स यांच्या घरातील पार्टीतले) एक अवखळ असे ’बार्ली मू’ पद्धतीचे लोकनृत्य, तसेच नंतर येणारे ’श्रुबेरी लासेस’ नावाचे नृत्य आपल्याही मनात नाचायची इच्छा उत्पन्न करणारे आहे. खरेतर कित्येक प्रकारची नृत्ये मुळात माहितीच नसल्यामुळे पुस्तक वाचताना बर्‍याच गोष्टी भारतीय वाचकाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे राहून जातात. मात्र ती दरी या ’सिरीज’मध्ये भरून निघते.

यानंतर आपण बघणार आहोत अभिनयाकडे. इथे मात्र तुमच्यासमोर ’मिक्स्ड बॅग’ असणार आहे. खरेतर या ’सिरीज’मध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ’एलिझाबेथ’ची आहे. तिने संपूर्ण कथानकाला आपल्या पंखांखाली घेणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात डार्सी - अर्थात 'कॉलिन फर्थ' - सर्वाधिक भाव खाऊन जातो. त्याचा प्रत्येक फ्रेममधील वावर असायला हवा तितकाच आहे. त्याची संवादफेक, आवश्यक तितके (आणि तितकेच) हावभाव, हालचाली, वागणे, चालणे, वैतागणे, दु:ख व्यक्त करणे, हताश होणे या सगळ्यांतून ’सिरीज’मधल्या डार्सीचे व्यक्तिमत्त्व पुस्तकातल्या डार्सीहून प्रभावी पद्धतीनेउभे राहते. अर्थात लिझीच्या भूमिकेत जेनिफर एले काही वाईट नाही. तिचे दिसणे, वावर, चेहर्‍यावरील हावभाव, शारीर हालचाली सगळे डार्सीच्या तोडीस तोड आहे. पण व्यक्तिश: मला तिची संवादफेक काहीशी एकसुरी वाटते. निव्वळ तेवढ्या कारणासाठी २००५ च्या चित्रपटातील किरा नाईट्लीने रंगवलेले लिझीचे पात्र मला अधिक उजवे वाटते. डार्सी आणि लिझी या दोघांव्यतिरिक्त या कथेचा तिसरा 'पोल' ’व्हिकम’ने असणे अपेक्षित आहे. पण व्हिकमचे काम करणारा एड्रीयन ल्युकस काही प्रसंगांच्या तुकड्यात अतिशय प्रभावी असला तरी तो ती जागा घेऊ शकत नाही. त्याचे वागणे खरे म्हणजे महिलांना 'घायाळ' करण्याइतके ’सेक्सी’ हवेच, शिवाय खेळकर, अदबशीर आणि काहीसे 'सूचक' हावभाव असणारे हवे. मात्र प्रत्यक्षात व्हिकम उभा राहतो तो "हा बघा व्हिलन आला" अशी दवंडी देतच. त्याचा भूतकाळ समजल्यावर लिझीला किंवा पुढे जेनला (लिझीची मोठी बहीण) बसणारा धक्का प्रेक्षकाला बसत नाही. व्हिकमच्या प्रवेशापासूनच त्याचे वागणे, संवादफेक ही 'मी व्हिलन आहे, मला घाबरून असा' असे भाव घेऊनच केलेली आहे.

इतर पात्रांमध्ये ’कॅथरीन-डा-बर्ग’ची भूमिका करणार्‍या बार्बरा ली-हंट यांचे नाव घेणे आवश्यक आहे. तिचा राग यावा अशी तजवीज कथानकात आहेच. या कलाकाराला फक्त संवादफेक तेवढी करायची आहे. पण तिची संवादफेक करण्याची ढब तिच्या पात्राला वेगळ्याच उंचीवर नेते. तिने वापरलेले हावभाव काहीसे भडक आहेत असा आरोपही तिच्यावर होत असला, तरी तिने अश्या ’लँडलेडीज’मध्ये असणारा अंगभूत माज, एकटेपणाची जाणीव, अगदीच बुळ्या मुलीच्या लग्नाची असणारी काळजी, नि ती न दाखवण्याचा आटापिटा करणारी वृथा बडबड हे मिश्रण सहज पेलले आहे.  जेव्हा तिची लिझीच्या नजाकतभर्‍या, पण धारदार संवादांशी जुगलबंदी सुरू होते (जेनिफरचा काहीसा एकसुरी संवाद नजर-अंदाज करायला भाग पाडत) तेव्हा मला खूपच मजा येते. अजून एक पात्रही काहीशा भडक स्वरूपात पण ताकदीने, उभे राहते ते लिझीच्या आईचे. प्रसिद्ध नाट्यअभिनेत्री अ‍ॅलिसन स्टडमन यांनी ते काम केले आहे. मुळात हे पात्रच अतिशय रोचक आहे. पाच मुलींची आई, त्यात सगळ्याच लग्नाळलेल्या, मात्र तिचा स्वतःचा काहीसा अधीर, बराचसा हावरट / स्वार्थी स्वभाव. त्यामुळे मुलींचीलग्ने चांगल्या श्रीमंत घरात े- आणि तीही लवकरात लवकर - करून देणे हीच तिच्या जीवनाची इतिकर्तव्यता. अ‍ॅलिसनने या पात्रात जान ओतली आहे. तिचा राग येत नाही मात्र त्रास होतो. तिच्याबद्दल एकीकडे करुणा वाटत असते, तर दुसरीकडे तिच्या फटकळपणामुळे मुलींवर होणार्‍या परिणामाबद्दल वाईटही वाटत असते. साध्या साध्या प्रसंगात तिने रंग भरले आहेत. एका प्रसंगात बिंग्ले न आल्याने दु:खी जेन परसात फुले तोडत असते. आपल्या स्वभावाप्रमाणे हळुवारपणे नि दु:खात असल्याने संथपणे तिचे काम चाललेले असते. तेव्हा तिची आई तिथे येते नि त्या बिंग्लेला शिव्याशाप देताना कात्रीने कचाकचा फुले कापते. हे ती ज्या टेचात करते, त्यामुळे तिचा वैताग प्रेक्षकांपर्यंत थेट पोचतो. स्वतः नाणावलेली नाट्यअभिनेत्री असल्याने असा कायिक अभिनय  करणे तिला जड नाही.  त्यामुळे तिचे पात्र कमालीचे खुलते हे निश्चित.


या कथेत पाच बहिणी आणि त्यांचे पाच स्वभाव दाखवण्यासाठी मात्र फारच ढोबळ साचेबद्ध क्लृप्त्या वापरल्या आहेत. मेरीचे पात्र हे भरपूर वाचन करणार्‍या नि वयाहून पोक्त असलेल्या मुलीचे असले तरी लगेच तिला 'चष्मिष्ट', ’सपाट’ व अबोल दाखवायची काहीच गरज नव्हती. तिचा कॉलिन्सकडे असणारा कलही या चित्रपटात तितकासा उठून दिसतनाही. ज्यांनी पुस्तक वाचले आहे त्यांना तसे काही सूचक सीन्स मिळतात, पण कथानक माहीत नसणार्‍यासाठी मेरी म्हणजे एक अदखलपात्र व्यक्तिरेखा होऊन जाते, यात दिग्दर्शन व संकलनासोबत स्वतः मेरीचे पात्र रंगवलेल्या नटीच्या प्रभावहीन अभिनयाचाही वाटा आहे. त्याउलट लिडीयाचे पात्र असे काही रंगते की ती लिझीखालोखाल महत्त्वाची बहीण होऊन जाते. अजूनही कितीतरी पात्रांच्या चांगल्या व ठीक अभिनयाबद्दल लिहिता येईल. पण मुळात स्टेजवरील कलाकार बहुसंख्येने असल्यामुळे अभिनयाची जातकुळी पडद्यासाठी काहीशी भडक ठरते हा दोष मान्य केला तरी एकुणात सगळ्यांनीच एका विशिष्ट दर्जाहून चांगला अभिनय केल्याने केली तेवढी चिकित्सा पुरे करतो आहे. पुढील भागात एकूण दिग्दर्शन, फिल्मिंग व सेट्सबद्दल लिहिणार आहे आणि या ’सीरियल’ला प्रेक्षकांनी कसे स्वीकारले, त्या स्वीकारामुळे काय बदल घडले, काही अतिशय गाजलेले सीन्स वगैरेंचे तपशील देऊन हा दीर्घ समीक्षात्मक लेख संपवणार आहे.

(क्रमशः)

भाग १ | भाग २ | भाग ३

 

प्राईड अ‍ॅण्ड प्रेज्युडिस (१९९५ टिव्ही सिरीज) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

प्राईड अ‍ॅण्ड प्रेज्युडिस (१९९५ टिव्ही सिरीज)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: सायमन लँग्टन
  • कलाकार: जेनिफर एले, कॉलिन फर्थ
  • चित्रपटाचा वेळ: ३२७ मिनिटे
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: १९९५
  • निर्माता देश: युनायटेड किंगडम