अमेरिकन गॉडस (२०१७ - सीझन१): डोकं आणि डोळ्यांसाठी अनोखी मेजवानी

तुमच्याकडे मोठ्ठ्या स्क्रीनचा (स्मार्ट किंवा नॉट सो स्मार्ट) टीव्ही आहे का? असला तरी गेम ऑफ थ्रोन्स' संपल्यामुळे त्यावर हिंदी मराठी ( अर्थात रद्दड) सीरिअल्स व्यतिरिक्त काही बघायला न मिळाल्याने तुम्ही वैतागलेले आहात का? तर मग 'अमेरिकन गॉडस' मिळवा नि बघा. काही सिनेमे जसे मोठ्या पडद्यासाठीच बनले असतात तशा आता काही टीव्ही मालिकाही बनू लागल्या आहेत. आपल्याकडे मालिका या मुख्यतः श्रुतिकांसारख्या ऐकायच्या वगैरे समजल्या असतीलही पण निव्वळ बघत राहावी अशी ही मालिका बघायची असेल तर शक्य तितकी मोठी स्क्रीन निवडा इतकं मात्र नक्की.

'नील गायमन' यांच्या 'अमेरिकन गॉडस' याच नावाच्या पुस्तकावर आधारीत ही सिरीज आहे. मी हे पुस्तक वाचलेले नाही त्यामुळे पुस्तकाच्या तुलनेत मालिका कशी आहे याबद्दल मी काही लिहू शकत नाही. मात्र माझ्या परिचितांपैकी ज्यांनी हे पुस्तक वाचलेले आहे त्यांनाही ही मालिका आवडते आहे. ही मालिका एकरेषीय, एक प्रतलातील नाही. मालिकेला एक मुख्य कथानक आहे, पण मालिका फक्त त्याच कथानकापुरती मर्यादित नाही. मालिकेत काही प्रमुख पात्रे आहेत पण त्यांच्या व्यतिरिक्त कितीतरी पात्रे व प्रसंग; तसेच मालिकेतील काही संकीर्ण भाग,यांचेदेखील विशेष महत्त्व आहे. मालिका एका काळात, एका दिशेने वाहत नाही तस वेगवेगळ्या बाजूने पसरत राहते. थोडक्यात सांगायचं तर प्रेक्षकाला सुबुद्ध समजत त्याच्यापुढे बऱ्यापैकी गुंतागुंतीचं कथानक आपल्याच मदमस्त वेगात उलगडवून दाखवत पुढे सरकणारी ही मालिका आहे.

<यापुढे पहिल्या सीझनच्या कथेचा थोडा सारांश उघड केला आहे त्यामुळे माफक रसभंग होऊ शकतो>

कथेचं मुख्य कथानक शॅडो मून नावाच्या एका व्यक्तीभोवती फिरतं. मालिकेच्या सुरुवातीलाच त्याला पडलेल्या काही विचित्र स्वप्नांनंतरत्याला जेलमधून लवकर घरी सोडलं जातं. कारण त्याच्या बायकोचा मृत्यू झाला असतो. तो घरी परतत असताना त्याला एक निनावी व्यक्ती विमानात भेटते. त्या दिवशी बुधवार असल्याने तिला मिस्टर वेनस्डे बोलावं असं ठरतं. आणि तिथून सुरू होतो विचित्र घटनांचा प्रवास. कोण असतो हा वेनस्डे? शॅडोची बायको खरोखर मेली असते का? तिचा नि शॅडोच्या मित्राचा काही संबंध असतो का?शॅडोला भेटणाऱ्या वेगवेगळ्या विचित्र व्यक्ती कोण असतात? शॅडोवर एक खुनी हल्ला होतो तो कोण करतं? या सगळ्यांत तंत्रज्ञानाचा काय संबंध? अश्या अनेक प्रश्नांना कवेत घेणारं हे कथानक अधिकाधिक नव्या प्रश्नांना जन्म देत पुढे सरकत राहतं.

या कथेसोबतच आपण बघतो इतिहासात अमेरिकेत पोचलेल्या वेगवेगळ्या जमातींची गोष्ट. अमेरिकेत जगभरातून वेगवेगळ्या प्रजातींची लोकं तर आलीच येताना त्यांनी त्यांच्यासोबत आपापले देव आणले आणि ते देव अमेरिकेतच वसले. मात्र, कालांतराने आता (कथेतील वर्तमानात) लोकांवर तंत्रज्ञानाने पुर्णपणे पगडा जमवला आहे आणि या तंत्रज्ञान आणि मिडीयावर श्रद्धा ठेवून त्यांनाच नवे देवत्व दिले आहे. लवकरच हे जुने देवे विस्मरणात जातील का अशी स्थिती येऊ पाहते आहे. ही मालिका आहे या आधुनिक आणि पुरातन देवांच्या लढाईची आणि त्यांच्यामध्ये सापडलेल्या माणसांचीही!

ही कथा आहे देवांची. ही कथा आहे स्थलांतरांची. ही कथा आहे अमेरिकन समाजाची. ही कथा आहे श्रद्धेची. त्याच बरोबर ही कथा आहे आधुनिकतेकडे होणाऱ्या प्रवासाची. ही कथा आहे विज्ञान व तंत्रज्ञानाने आपल्यावर मिळवलेल्या पकडीची. ही कथा आहे धर्म, श्रद्धा, तंत्रज्ञान यांच्या परस्परावलंबनाची. या कथेत एक मनोरंजक कथा होण्याचे सारे गुणधर्म आहेत. यात जादू आहे, अद्भुतरसाने भरलेल्या नि भारलेल्या घटना आहेत, अकल्पनीय विचित्रपणा आहे, थरार आहे, खून आहेत, किळसवाणी रक्ताची कारंजीही आहेत, प्रेतात्मे-स्वर्ग-'दुसरं जग' आहे, वेगवेगळ्या पातळीचे व प्रकारचे सेक्स आहेत, नागवेपण आहे, भक्ती आहे, देवाची आळवणी आहे, प्रेम आहे तर दुसरीकडे अगदी झोंबीसुद्धा आहेत. मात्र या सगळ्यासोबत प्रत्येकवेळी विचार करायला लावणारं काही हि मालिका तुम्हाला जवळजवळ हरेक भागात देते. काही अत्यंत विचित्र भागांचे (उदा. ३रा एपिसोड) संवाद व एकूणच टेक अनपेक्शितरित्या विनोदी ढंगाने येतो तर काही अतिशय सरळ गोष्टींना प्रतिकात्मक नि गुढ दाखवत त्या घटनेचे वेगवेगळे रंग आपल्यासमोर उलगडले जातात. त्याशिवाय रिकी व्हिटल (शॅडो मून) आणि इयान मॅकशेन (मि. वेनस्डे) यांच्या अभिनयाची जुगलबंदीही प्रेक्षणीय आहे. प्रत्येक एपिसोडचे दिग्दर्शक वेगळा असण्याची नवीन परंपरा इथेही असल्याने त्याबद्दल लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणेच इष्ट ठरावे.

थोडक्यात काय तर ही मालिका बघाच अशी शिफारस. फक्त एकच सांगणे की पेशन्स ठेवून बघा. पहिले काही एपिसोडस नक्की काय चाललंय हे कळायला मुष्कील जाईल पण पुढे अर्थ लागेल. शिवाय टोकाची हिंसा, सेक्स वगैरे यात असल्याने कानकोंडे करणारे प्रश्न टाळण्यासाठी आपल्या सभोवती लहान मुले असताना ही मालिका बघणं टाळा असे सुचवेन. त्याहून मुख्य व्हिज्युअली एकदम वेगळ्याच प्रतीची हि मालिका वेगवेगळ्या 'दृश्य' प्रयोगांसाठी लक्षपूर्वक बघा. सहज प्रवास करताना मोबाईलवर वगैरे बघून त्यातली कितीतरी प्रसंगांची मजा घालवू नका.

भारतात अमेझॉन प्राइमवर याचा फक्त पहिला सिझन आला आहे. त्याच्याशेवटी मूळ पुस्तकाचा १/३ भागही आलेला नाही. मात्र ही सुरुवातच इतकी रंजक आहे की पुढील सीझन्स बघावेच लागतील अशी परिस्थिती आहे. तेव्हा पुढला सीझन यायच्या आत हा सीझन शक्य तितक्या मोठ्या स्क्रीनवर बघायला विसरू नका. पुढले सीझन आल्यावर आणखी काही वेगळे प्रयोग दिसले तर या मालिकेतील दृश्य प्रयोगांबद्दल एकत्रितपणे नक्की लिहेन.

अमेरिकन गॉडस - सीझन १ - चित्रपटाची /नाटकाची माहिती

अमेरिकन गॉडस - सीझन १
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: प्रत्येक एपिसोडचा स्वतंत्र
  • कलाकार: इयान मॅकशेन, रिकी व्हिटल
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१७
  • निर्माता देश: अमेरिका