सुलतान (२०१६): भाईच्या एक्सप्रेशनिस्ट स्ट्रोकचे फटकारे
नवाजुद्दीन सिद्दीकी एक बुद्धिमान नट तर आहेच, पण एक चांगला निरीक्षकपण आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये एक अतिशय चांगलं निरीक्षण मांडलं होत. तो असं म्हणाला, की जगात तीन प्रकारचे नट आहेत. चांगले अभिनेते, वाईट अभिनेते आणि सलमान खान. 'सलमान खान फेनॉमेना'चं इतकं चांगलं वर्णन यापूर्वी कुणी केलं नसेल. म्हणजे - एक पन्नाशीमधला नट, ज्याचा अभिनय सुमार ते बरा या दोन श्रेणींमध्ये घरंगळत असतो आणि हरणाच्या शिकारीपासून ते सदोष मनुष्यवधापर्यंत सर्व गुन्हे डोक्यावर असूनही, एरवी 'बहिष्कारोत्सुक' असणारा समाज त्याचे चित्रपट डोक्यावर घेतो. दस्तुरखुद्द पंतप्रधानपदाचा उमेदवार असणारा नेता सलमानसोबत पतंग उडवायला उत्सुक असतो. याचं स्पष्टीकरण एरवी कसं देता येणार?
मला सलमान खानच्या लोकप्रियतेचं नेहमीच कोडं पडत आलं आहे. माझं लहानपण गेलं ते परभणीमध्ये. चित्रपटाच्या वितरणाच्या दृष्टीने चित्रपट वितरकांनी या खंडप्राय देशाचे अकरा भाग केले आहेत. बॉंम्बे सर्किट, दिल्ली सर्किट, इस्टर्न सर्किट, इस्टर्न पंजाब सर्किट, निजाम सर्किट, सी. पी. बेरार सर्किट, सेन्ट्रल इंडिया सर्किट, राजस्थान सर्किट, मायसोर सर्किट, तामिळनाडू सर्किट आणि आंध्र सर्किट असे ते अकरा भाग. पूर्वीच्या निजाम राजवटीचा भाग निज़ाम सर्किटमध्ये येतो. आमचं परभणीपण त्यातच येत. हे निजाम सर्किट म्हणजे सलमान खानचा बालेकिल्ला. म्हणजे देओल घराण्यासाठी जे महत्त्व पंजाब सर्किटला आहे, तेच सलमानसाठी निज़ाम सर्किटचं महत्त्व आहे. या निजाम सर्किटमधल्या प्रेक्षकांमध्ये सलमान खानचे जे वेड आहे , ते शब्दात बसण्यासारखे नाही. काही भाग वगळता अजूनही या सर्किटमध्ये मल्टिप्लेक्सचं प्रस्थ एवढं नाहीये. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या तिकीटखिडक्यांवर अजूनही त्यांच्या लाडक्या 'भाईच्या' नावाने ‘हाऊसफुल’चा बोर्ड लागतो. ‘चित्रपट बनवणे हे एक टीमवर्क आहे’, ‘चित्रपट हे समाजाभिमुख हवेत’, वगैरे नियम निजाम सर्किटच्या हद्दीबाहेरच मान टाकून पडले आहेत. "भाई की फिल्लम है. देखनी है. बस!".
सलमान खानच्या कारकिर्दीचा जो सगळ्यात वाईट काळ समजला जातो, (पार्टनर आणि वॉण्टेड या दोन चित्रपटांच्या दरम्यानचा काळ) त्या काळातपण भाईच्या चित्रपटाला या सर्किटने चांगला हात दिला होता. हे आठवायचं कारण म्हणजे, कालच माझ्या परभणीच्या मित्राचा फोन आला होता. "अमल्या, सुल्तानची तिकीट काढली गर्दीत घुसून. सालं पब्लिकच्या आवाजामुळे पहिला अर्धा घंटा काही ऐकूच येईना पडद्यावरच. काय दिसतो सलमान राव!" आनंदाने फ़सफ़सलेल्या आवाजात त्याने अर्धा तास भाईपुराण ऐकवलं. हा मित्र उच्चं मध्यमवर्गीय, उजव्या विचारसरणीच्या परिवारातून आलेला. तरी सलमानचा क्रेझी फॅन. जात, धर्म, राजकीय विचारसरणी, आर्थिक वर्ग वगैरे गोष्टी पार करूनपण हा भाई फेनॉमेना दशांगुळे उरतोच. पहिल्या आठ दिवसांतच दोनशे करोडची मजल मारून 'सुल्तान'ने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं.
ज्यांनी हॉलिवूडचे क्रीडापट पाहिले आहेत, त्यांना 'सुल्तान' बघितल्यावर हॉलिवूडच्या अनेक क्रीडापटांमधले संदर्भ आठवू शकतात. एका अंडरडॉग कुस्तीवीराचा 'रॅगज टू रिचेस' असा प्रवास, मग त्याची तिथून झालेली उतरण आणि पुन्हा राखेतून उठून शिखरापर्यंतचा प्रवास अशी 'सुल्तान'ची कथा सांगता येईल. 'सुल्तान'मध्ये सलमानपटात असणारी नाचगाणी, दे-मार हाणामार्या, हॉलिवूड चित्रपटांचे संदर्भ, फाट्यावर मारलं गेलेलं लॉजिक वगैरे नेहमीच्या गोष्टी आहेतच. पण आश्चर्यकरीत्या काही अशा गोष्टीपण आहेत, ज्या एरवी सलमानच्या सिनेमात अनुपस्थित असतात. एरवी सलमानच्या सिनेमात नायिका फक्त शोभेची बाहुली असते. मात्र या सिनेमात कथानकात एक महत्त्वाची भूमिका बजावणारं आरफा (अनुष्का शर्मा) हे एक कणखर पात्र आहे. पण पटकथेमधल्या गोंधळामुळे या पात्राचा बराच लॉजिकल लोचा झाला आहे. एकदम करियर ओरियंटेड, फायरब्रॅण्ड असलेली आरफा, लग्न झाल्यावर ’मुलं होणार’ ही बातमी ऐकून सुल्तानला झालेला आनंद पाहते आणि आपलं ऑलम्पिक पदकाचं स्वप्न 'कुर्बान' वगैरे करते हे बघून काही लोकांना 'बाहुबली' मधल्या अवंतिकाच्या पात्राच्या अशाच अतार्किक वागण्याची आठवण येऊ शकते. सलमानच्या सिनेमात नसणारी अजून एक गोष्ट इथे दिसते. ती म्हणजे थोडा वेळ का होईना, सुल्तानच्या पात्राला असणार्या 'ग्रे शेड्स'. नकारात्मक छटा असणाऱ्या भूमिकांपासून सलमान आतापर्यंत जाणीवपूर्वक दूर राहिला होता. इथे काही वेळ का होईना, यश डोक्यात गेलेला अहंमन्य सुल्तान सलमानने साकारला आहे, ही एक दुर्मीळ गोष्ट. भूमिकेला नकारात्मक छटा आहेत, म्हणून सलमानने 'बाझीगर' नाकारला होता, म्हणजे बघा. अजून एक दुर्मीळ गोष्ट म्हणजे चाळिशीमधला पोट सुटलेला सलमान काही वेळ पडद्यावर दिसतो. यापूर्वी कधीही न केलेले प्रयोग सलमानने या भूमिकेमध्ये केले आहेत.
पण यापूर्वी न दिसलेल्या काही गोष्टी आहेत, याचा अर्थ चित्रपट फारसा सुसह्य आहे असा नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध तर अतिशय कंटाळवाणा, ताणलेला आणि अविश्वसनीय गोष्टींनी भरलेला आहे. एका महिन्याच्या तयारीच्या जोरावर नामांकित मल्लांना हरवून 'सुल्तान' राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा जिंकतो. इतकंच नाही, तर अल्प कालावधीत एशियन स्पर्धांमधलं सुवर्ण पदक आणि ऑलम्पिक सुवर्ण पदकपण मिळवतो. अशा अनेक अविश्वसनीय घटना चित्रपटात घडताना दिसतात. तुलनेने उत्तरार्ध थोडा सुसह्य आहे. पण थोडाच. चित्रपटाची लांबी जवळपास पावणेतीन तास आहे. त्यातला बहुतेक वेळ हातातल्या घड्याळाचे काटे हाताने पुढे फिरवून वेळ पुढे नेता येण्याचा शोध कधी लागेल असे विचार सतत आपल्या डोक्यात येत राहतात. 'मासेस'ना खूश करण्याच्या नादात दिग्दर्शक अली अब्बास जफरने सिनेमात अनेक गोष्टी घुसडलेल्या आहेत. भातातल्या खड्यासारखी दाताखाली लागणारी गाणी, सलमानला चित्रपटात का घेतलं याचं स्पष्टीकरण देण्यासाठी पटकथेत वापरलेली नायकाच्या वयाची फसलेली टाइमलाईन (उदाहरणार्थ, कुस्ती खेळायला सुरुवात करतो, तेव्हा सुल्तानने तिशी ओलांडली आहे असं दाखवलं आहे), अशा अनेक अतार्किक घटना पटकथेत आहेत. भाईच्या करिष्म्यावर अलीचा भरवसा असल्याने या गोष्टींकडे प्रेक्षक दुर्लक्ष करतील अशी त्याची अपेक्षा असावी. त्याची अपेक्षा किती सार्थ आहे हे प्रेक्षकांनी पहिल्या आठ दिवसांतच सिद्ध केलं!
'सुल्तान'मध्ये एक जमेची बाजू आहे, ती म्हणजे सहकलाकारांचा उत्तम अभिनय. 'सुल्तान'ला पुन्हा आखाड्यात उतरण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आकाश ओबेरॉयच्या भूमिकेमधला अमित साध आणि सुल्तानच्या आयुष्यातल्या चढउतारात त्याच्या मागे भक्कमपणे उभा राहणाऱ्या मित्राच्या भूमिकेमध्ये अनंत विधात शर्मा या कलाकारांनी चांगले रंग भरले आहेत. पण पडद्यावर, थोडा वेळ का होईना, मजा आणतो तो सुल्तानच्या प्रशिक्षकाच्या - फतेह सिंगच्या भूमिकेत असणारा - रणदीप हुडा. जीवनातल्या वाईट अनुभवांनी कोरडा झालेला आणि उग्र स्वभावाचा फतेह सिंग, रणदीप ज्या नजाकतीने साकारतो तिला तोड नाही. रणदीप हुडा या इसमाचे नेमके करायचे काय, हे ज्या दिवशी बॉलिवूडला आणि बॉलिवूडच्या प्रेक्षकांना कळेल तो एक सुदिन असेल.
'ओम शांती ओम' हा शाहरुख खान आणि फराह खान जोडगोळीचा एक बॉक्स ऑफिस पॉटबॉयलर (प्रेक्षकांची आवडनिवड डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला चित्रपट) होता. पण तो भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल काही बुद्धिमान विधान करणारा एक चांगला चित्रपटही होता. त्यात एक मार्मिक प्रसंग होता. एका प्रायोगिक दिग्दर्शकाच्या (सतीश शाहशाह) चित्रपटाच्या सेटवर चित्रपटाचा निर्माता (अर्जुन रामपाल) येतो. रुबाबदार आणि यशस्वी निर्मात्याच्या मागे दिग्दर्शक धावपळ करत असतो. दिग्दर्शक सांगत असतो, "मैने सीन के शूट में एक ऋत्विक घटक अँगल लगाया है और एक सत्यजित रे अँगल." निर्माता एकदम झटकन मागे वळतो आणि दिग्दर्शकाला आज्ञावजा सूचना करतो ,"एक मनमोहन देसाई अँगल भी लगाना दादा. आखिरमें वोही काम आयेगा."
'सुल्तान' हा असाच 'भाई अँगल'मधला चित्रपट आहे. फक्त भाईच्या हार्डकोअर चाहत्यांसाठी. बाकी लोक चित्रपटगृहात नाही गेले तरी चालेल.
सुलतान (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
