ऑस्कर नॉमिनेशन २०१५: द इमिटेशन गेम - अॅलन ट्युरिंगच्या कार्याला न्याय देणारा सिनेमा
अॅलन ट्युरिंग हा संगणक शास्त्रातला बापमाणूस. त्याच्या संगणकशास्त्राच्या पायाभरणीच्या योगदानाचं जेवढं कौतुक झालं तितकंच त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात त्याच्या वेगळ्या लैंगिकतेमुळे सामाजिक हनन देखील झालं. ट्युरिंग टेप, ट्युरिंग मशीन, ट्युरिंग टेस्ट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रांतलं काम तर सगळ्यांना ठाऊक होतंच, परंतु दुसर्या महायुद्धाच्या काळात त्यानं जर्मनांच्या 'इनिग्मा' या कोडिंग मशीनवर केलेलं काम पुढे पन्नास वर्षे गोपनीयतेच्या कारणांमुळे गुलदस्त्यात राहिलं. या घटनेवर अँड्र्यू हॉजेस यांनी लिहिलेल्या अॅलन ट्युरिंगः द इनिग्मा' या चरित्रात्मक पुस्तकावर 'द इमिटेशन गेम' हा या वर्षीचा ऑस्करला नामांकन मिळालेला चित्रपट बेतला आहे.
सर्वसाधारण चरित्रात्मक चित्रपटात असतं तसं ट्युरिंगच्या आयुष्यात घडलेलं सगळंच न दाखवता त्याची शाळा आणि शाळासोबती, इनिग्मा मशीनवरती काम केलेला कालखंड आणि त्याच्या मृत्यूपूर्वीची काही वर्षं अशा काही घटना इथं दिसतात. त्यातही अधिक भर इनिग्माच्या सांकेतिक संदेश बनवण्याच्या पद्धतीची उकल करण्यावरती आहे. अर्थात सिनेमा काही १००% सत्य घटनांवर आधारित नाही आणि सुरवातीस येणार्या खुलाशानुसार बरीचशी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली गेली आहे. त्याचं लहानपण तसं एकलकोंडं आणि अधिक मित्र नसलेलं होतं. त्यातल्या त्यात ख्रिस्तोफर हा त्याचा शाळासोबती ट्युरिंगला समजून घेई. मुळात रहस्य आणि रहस्यकथा यांचं मनुष्य स्वभावाला वेड असतं आणि क्रिप्टोग्राफी ही इनिग्माच्या उल्लेखाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. या यंत्राने भल्याभल्यांना तेव्हा आणि नंतरही वेड लावलं होतं. या विषयावरती लिहिलेल्या पुस्तकांची यादी भलीमोठी आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात इनिग्माची कार्यपद्धती काही पोलीश शास्त्रज्ञांच्या लक्षात आली होती, परंतु दुसर्या महायुद्धाच्या काळात इनिग्मा आणखीच गुंतागुंतीचं झाल्यानं त्या पहिल्या कार्यपद्धतीच्या माहितीचा काही उपयोग होऊ शकला नाही. साध्या भाषेतून सांकेतिक भाषेत रूपांतर झालेले संदेश इनिग्माने फोडून ती माहिती मिळवणं हे दोस्त राष्ट्रांसमोर एक मोठं काम होऊन बसलं होतं. त्यात असंख्य काँबिनेशन्स, रोटेशन्स होती. त्यामुळे त्या यंत्राद्वारे सांकेतिक भाषेत बदललेल्या संदेशाचं नक्की रूपांतरण कसं झालं हे माहीत नसल्यास तो संदेश पुन्हा साध्या भाषेत आणणं अवघड होतं. एकूण १५९,०००,०००,०००,०००,०००,००० इतकी काँबिनेशन्स. त्यातही त्यांची रचना (पॅटर्न) दर रात्री बदलण्यात येत असे. ही कार्यपद्धती (ढोबळ अल्गोरिदम) लक्षात आल्यावर हे मानवी मर्यादेपलीकडचे काम असल्याचं कळून आलं. आणि म्हणूनच हे सांकेतिक संदेश फोडून त्या दिवशीची इनिग्माची रचना ( शास्त्रोक्त भाषेत-की पॅटर्न) काय असेल हे शोधून काढणारं मशीन बनवण्याच्या उद्योगाला अॅलनची टीम लागली आणि यशस्वीही झाली. हे यश सहज न येता त्यांना बर्याच तांत्रिक आणि कार्यालयीन अडचणी आल्या. अॅलनचा त्याच्या मशीनवर आणि मुख्यतः मशीनच्या मागच्या संकल्पनेवर विश्वास होता आणि त्यामुळे खचून न जाता त्याने योग्य निष्कर्षांची वाट पाहिली, हे चित्रपटाचं साधारण कथासूत्र.
पौगंडावस्थेतला ट्युरिंग, इनिग्मावरती काम करतानाचा ट्युरिंग, तिथल्या सहकार्यांसोबतचा ट्युरिंग, काही काळासाठी असलेल्या सहकारिणीसोबतचा ट्युरिंग आणि त्यानंतरच्या काही वर्षांनंतरचा समलैंगिकत्वामुळे शिक्षा झालेला ट्युरिंग असे त्याच्या आयुष्यातले काही कालखंड सिनेमात चित्रित झालेले दिसतात. तो त्याच्या आयुष्यात तसा विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध होता. काहीसा माणूसघाणा, शिष्ट वाटेलसा. चित्रपटात हा विक्षिप्तपणा स्वमग्नतेकडे अधिक झुकलेला वाटतो. पण त्याचसोबत त्याचं कामाचं नीट पृथ:करण करणं आणि उत्तर नक्की कशात दडलेलं आहे हे ओळखून ते नीट सोडवणं हा सगळा प्रकार चित्रपटात उत्तमरीत्या दाखवण्यात आला आहे. १९४०च्या दरम्यानच्या ब्रिटनचंही सुरेख दर्शन चित्रपटात घडतं. ब्लेचली लॅब, ट्युरिंगने तयार केलेलं यंत्र- ख्रिस्तोफर (खरं नांव - बाँब) या सगळ्या गोष्टी अस्सल वाटतात. मध्यवर्ती भूमिका ट्युरिंगची असूनही त्यालाच सबकुछ न दाखवणं हीसुद्धा एक जमेची बाजू. म्हणजे मुळात तर तसं होतंच, परंतु कथानकाची गरज म्हणून समावेश केलेल्या नाट्यपूर्ण प्रसंगांचा उपयोगही ट्युरिंगचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी न वापरता त्याच्या टीममधले इतरेजन काही प्रसंगी त्याच्याहून सरस होते हेच दाखवायला केलाय हेही सिनेमाचं वेगळेपण म्हणायला हरकत नाही. तसंच अॅलनचा शाळासोबती ख्रिस्तोफर आणि ऍलन यांचं नातं सुंदरपणे चितारण्यात आलंय.
ट्युरिंग-ख्रिस्तोफर मैत्री काळात त्याला त्याच्या वेगळ्या लैंगिकतेची जाणीव झाली होती की नाही याबद्दल काही थेट उल्लेख किंवा संदर्भ नाहीत. १५९.०००,०००,०००,०००,०००,०००० इतक्या काँबिनेशन्सची एका दिवसात चाचणी घेणं शक्य नव्हतं आणि खरोखरी इनिग्माच्या रचनेची उकल त्यांच्या दिवसाच्या सुरवातीच्या विशिष्ट संदेशामुळं झाली. फक्त ज्या प्रकारे ट्युरिंगला याचा साक्षात्कार होतो तो प्रसंग थोडाफार बॉलिवूडमध्ये शोभण्यासारखा झालाय. तसेच तो एके ठिकाणी डिजिटल संगणक बनवायचा असं म्हणतो आणि त्या काळात डिजिटल ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.
बेनेडिक्ट कंबरबॅच हा कसलेला अभिनेता आहे यात वादच नाही. अॅलन ट्युरिंग हे कॅरेक्टर त्याने ज्या ताकदीने उभं केलंय त्याला तोड नाही. बेनेडिक्टला अॅलन ट्युरिंग म्हणून पाहिल्यानंतर आता आणखी कुणाला ट्युरिंगच्या रूपात पाहणं थोडं जड जाईल. थोडासा बुजरा, लोकांसोबत वावरताना अवघडलेला, मितभाषी, काहीसा स्वमग्न, चेहर्यावरून मनातला विचारांचा कल्लोळ जाणवत नाही असं व्यवस्थितपणे दाखवून देणारा, धावताना अत्यंत कॉन्फिडन्ट-ध्येयासक्ती असलेला आणि जोन क्लार्कवरती प्रेम करणारा अशी सगळी रूपं तो चपखलपणे दाखवतो. त्याला ट्युरिंग म्हणून पाहताना त्याच्या शेरलॉकपणाची जराही छाया या भूमिकेवर दिसून येत नाही. चार्लस डान्सला पाहताना मात्र टायविन लॅनिस्टरची आठवण येते. कदाचित दोन्हीकडे त्याची हुकूमशाही भूमिका असल्यानेही तसं वाटत असण्याची शक्यता आहे. जोन क्लार्कची भूमिका करणार्या कियारा नाईटली हिनेदेखील मित्राला गुणदोषांसह व्यवस्थित ओळखलेलं असणं आणि तसं स्वीकारलेलंही असणं हे तिच्या बोलक्या नजरेतून दाखवून दिलंय.
चित्रपट शास्त्रज्ञाच्या आयुष्यावर आधारित असला तरी त्यात वैज्ञानिक संज्ञा घुसडण्यात आलेल्या नाहीत. त्याच्या काही व्याख्या मध्ये मध्ये सोप्या शब्दांत येतात, पण ’ही व्याख्या म्हणजे हे’ असं स्पूनफीडिंग कुठेच येत नाही. त्यामुळे ट्युरिंगबद्दल किंवा एकूणातच विज्ञानाबद्दल काही माहिती असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्ती चित्रपटाचा आनंद तितक्याच निखळतेने घेऊ शकतात.
इमिटेशन गेम - मुळातून नसलेलं काहीतरी अस्तित्वात असण्याचा खेळ - म्हणजे खरंतर तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलतो. सध्या मनुष्यप्राणी करू शकणारं एखादं काम माणसारखंच एखाद्या यंत्राने करावं या संकल्पनेतून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जन्म झाला आणि नंतर माणसासारखं वागू शकणारं किंवा माणसारखं विचार करू शकणारं यंत्र अशा दोन स्वतंत्र विचारधारा आल्या (नंतर यात आणखी दोन विचारधारा समाविष्ट झाल्या हा भाग इथे गैरलागू). अॅलन हा माणसारखं वागणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विचारधारेचा होता. त्याच्या घरातल्या चोरीचा तपास करणार्या डिटेक्टिव्हला तो एखादं यंत्र माणसासारखं वागतं आहे की नाही हे कसं ओळखायचं त्याची कसोटी सिनेमात सांगतो. लिहिलेली प्रश्नावली देऊन त्याची आलेली उत्तरं वाचताना ती मनुष्यप्राण्यानं दिली आहेत की यंत्राने हे ओळखता नाही आलं तर त्या ते यंत्र माणसासारखं वागलं असं समजून यंत्र ट्युरिंग टेस्ट पास झालं असं समजलं जातं. यासाठी ते उत्तर बरोबरच असायला हवं अशी काही अट नाही. उदा. ’सचिन तेंडूलकर कोण आहे?’ अशा प्रश्नाला कधी ’तू गुगल का करत नाहीस’ किंवा तिरसट पुणेरीछापाचं उत्तर आलं तरी ते बरोबर ठरतं कारण नाही एखादा नीट उत्तर देत किंवा सगळ्यांनाच सगळं माहित नसतं. अशी ही ट्युरिंग टेस्ट आपल्या चॅटबॉटने उत्तीर्ण व्हावी हे सगळ्या प्रोग्रॅमर्सचं स्वप्न असतं. याखेरीज त्याच्या काही संशोधनात्मक पेपर्सचे उल्लेखही आले आहेत. अॅलन ट्युरिंगचं संपूर्ण चरित्र जरी हा चित्रपत दाखवत नसला तरी एक व्यक्ती म्हणून त्याची सर्वांगीण ओळख करून देण्यात नक्कीच यशस्वी ठरतो.
द इमिटेशन गेम - चित्रपटाची /नाटकाची माहिती
