फोबिया (२०१६): राधिका आपटेचा थरार!

"ब्बाब्बो! राधिका आपटेचा 'फोबिया' पाहिलास का?"

"नाही यार! का गं? मस्तंय?"

"नुसता मस्तं नाही.. झकास ए झकास!"

"हॉरर आहे ना?"

"'हॉरर'पेक्षा मी त्याला 'सायकॉलॉजिकल थ्रिलर'म्हणेन. पण हो जाम भिती वाटते. हा तर इतका घाबरला होता की एकदा ऑलमोस्ट किंचाळला!"

"हा हा हा! हो रे?"

"जसं काय ही घाबरलीच नव्हती. पण जाम धमाल आली किती दिवसांत असा छान भयपट नव्हता बघितला"

"बापरे, मग जाऊ दे तुम्ही दोघे घाबरलात म्हणजे बघायला नको. कुणी सांगितलंय विकतची दुखणी"

"अरे असं नको करूस बघ! म्हणजे मला हॉरर सिनेमे आवडतातच पण हा घाबरट येत नाही कधी, यावेळी थ्रिलर आहे असे सांगून रिव्ह्यूज यायच्या आत फर्स्ट डेला नेला म्हणून आला"

"हो ना यार, पण बरं झालं गेलो. इतकी फाटूनही शेवटापर्यंत उठलो नाही!"

"इतकं काय आहे? जरा थोडी स्टोरी फोडा त्याशिवाय मला धीर यायचा नाही"

"हे बघ मी सांगते! फोबिया अनेक बाबतीत वेगळा सिनेमा आहे. तो कसा वगैरे बोलू पण मुख्य म्हणजे यात राधिका आपटेने 'मेहेक' नावाच्या मुलीचा रोल केलाय. ती एक चित्रकार असते. तिच्या चित्रांच्या प्रदर्शनापासून सिनेमा सुरू होतो. त्यानंतर ती आपल्या मैत्रांसोबत गप्पा मारत बसली असता तिला काही भास होऊ लागतात. सिनेमा सुरू होण्याच्या पहिल्या दोनेक मिनिटांत एक अनामिक भिती आपला ताबा घेऊ लागते. त्यात ती आणि तिचा मित्र घरी जात असतात , मित्र मध्ये उतरल्यावर पुढे मेहेक एकटीच टॅक्सीत असते. तिचा डोळा लागतो आणि ते बघून टॅक्सीवाला आडवाटेला टॅक्सी नेतो आणि तिथे मेहेकवर अतिप्रसंग करतो."

"हॅ! यात काय हॉरर आहे?"

"तीच तर गंमत आहे, असं ऐकताना त्यात फार हॉरर काही वाटणार नाही कदाचित पण हे सगळं ज्या वेगात आणि पद्धतीने चित्रित झालंय ते अंगावर येतं. पण होय इथवर भिती अ‍ॅज सच वाटत नसते"

"ओके, सांग पुढे"

"पुढे या प्रसंगामुळे मेहेकवर मोठा मानसिक आघात होतो आणि तिला 'ऍगोराफोबिया' डिटेक्ट होतो."

"अ‍ॅगोराफोबिया म्हणजे?"

"म्हणजे सुरक्षिततेची भिती. या लोकांना आपल्या सुरक्षिततेबद्दल प्रचंड भिती वाटू लागते मग काहींना उंचीची वाटते, तर काहींना नव्या जागांची. 'आपल्याला इथे धोका आहे' असं त्यांचा मेंदू त्यांना सतत सिग्नल्स देत असतो. अशा लोकांना या काल्पनिक संभाव्य भीतीचे पॅनिकअटॅक्स वेळोवेळी येत असतात. या सिनेमात मेहेकला नव्या माणसांची, घराबाहेर पडण्याचीच भिती वाटू लागते. इतकी की ती दार उघडायलाही भीत असते. अर्थातच याचा त्रास तिच्या बहिणीला होऊ लागतो, तिचा भाचा तिला घाबरू लागतो कारण मेहेक त्यांच्यासोबत राहत असते. डॉक्टर्स तिला ट्रीटमेंट सेंटरला हालवायला सांगतात पण मेहेकच्या मित्राला तसे व्हायला नको असते म्हणून तो तिला त्याच्या मित्राच्या रिकाम्या असलेल्या फ्लॅटवर हलवतो."

"लेट मी गेस! या फ्लॅटमध्ये भुताटकी असते! अगं मग यात काय वेगळं आहे?"

"अरे यात बर्‍याच गोष्टी वेगळ्या आहेत. पण मुख्य म्हणजे होय या फ्लॅटमध्ये आल्यावर तिला तिथे कोणीतरी असल्याचे नि आपण तिथेअसुरक्षित असल्याचे भास होऊ लागतात, मात्र त्याच वेळी ती तिचा फोबिया कमी करायचाही प्रयत्न करत असते. हे भास ऍगोराफ़ोबिया मुळेअसण्याची शक्यता असतेच. तेव्हाच तिला समजते की तिच्या जागी आधी जी रिया नावाची मुलगी राहत होती ती गायब झाली होती. आणि तिचा एक शेजारी रियाच्या प्रेमात आंधळा असतो व वेड लागल्यासारखा मोठ्याने हसत असतो. तिचे हे भास हळूहळू अधिक गहिरे होत जातात आणि एकदा तिला थेट रियाच दिसते."

"ओह वॉव, मग?"

"मग काय ते तूच बघ! अजून नकोस गं सांगू"

"नाही, नाही सांगत.  पण अजून बरंच काही आहे, अभी तो स्टोरी शुरू हुई है! पण यानंतर त्या रियाची स्टोरी काय असते? शेजारच्याचा रियाच्या गायब होण्यात काही हात असतो का? याचा शोध मेहेक घेते का? तिला या अ‍ॅक्रोफोबियातून मुक्ती मिळते का तिला होणारे भास हे खरंच भूत असतात अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं या फिल्ममध्ये आहेत"

"हा प्लॉट इंटरेस्टिंग आहे पण यात वेगळं काय आहे"

"सगळ्यात वेगळं काही असेल तर राधिका आपटे! काय आहे यार ती! कमाल! अख्खा सिनेमा तिने एकटीने खाल्लाय. ती दिसतेही भारी! आणि तिची..."

"हॅलो! तुझ्या फेटिशेस राहूदेत. पण हो हा म्हणतो ते खरंय. राधिका आणि तिचा अभिनय या सिनेमाचा हायलाइट आहे. तिने मेहेकला ज्या प्रकारे उभं केलंय त्याला तोड नाही. मेहकचा हरेक मूड, एका मूड मधून दुसर्‍यात शिरणं, तिचा अ‍ॅक्रोफोबिया, तिला होणारे भास, तिची त्यावर प्रतिक्रिया सगळंच लाजवाब! तिने एक बारीकशी चूकही नाही केलीये. एकहाती पेललाय सिनेमा!"

"अरे यार आणि ती दिसतेही छान"

"याची सुई तिथेच अडकलीये. होय ती आहेच छान अभिनेत्री. या सिनेमानंतर अजून बिग बॅनर्स तिला उचलतील हे नक्की. हा सिनेमा मात्र तिने नेमका निवडलाय. यात ती आणि फक्त ती आहे.  मला शेजारच्या निक्की नावाच्या मुलीचं काम केलेली 'यशस्वीनी दायमा' सुद्धा आवडली.  शिवाय व्यतिरिक्त मला कथा नि पटकथाही आवडली. हॉरर फिल्म आणि सायकॉलॉजिकल थ्रिलर फिल्म यांची सीमारेषा हा सिनेमा पाळतो."

"म्हणजे?"

"म्हणजे साधारणतः भूत, प्रेत वगैरे गोष्टी आल्या की लगेच मांत्रिक, तांत्रिक येतात, किंवा मंतरलेले तावीत येतात नाहीतर जादूच्या रिंग्ज नैतर जादुई पाणी किंवा प्रकाश येतो. इथे तसं काहीच होत नाही. शेवटापर्यंत - अगदी भूत दिसूनही - हा भास आहे की खरंय याच्या सीमारेषेवर प्रेक्षकांना झुलवत, घाबरवत प्रवास चालू राहतो."

"पण भितीही छान पेरलीये. एका सीनला तर मी इतका दचकलो की तोंडातून बारीकशी किंचाळी फुटायची बाकी होती. कित्येकांची फुटलीही!"

"हा हा माहितीये मला. एका बाजूला तू आणि दुसर्‍या बाजूला बसलेला शेजारी दोघे इतके दचकलात की तुमच्या दचकण्याने मी अधिक दचकले!"

"आणि याचा शेवटही खूप वेगळाय. आणि तो या कथेला व्यवस्थित संपवतो, अधांतरी सोडत नाही हे मी मला फार आवडलं!"

"हो मलाही!"

"ओक्के तुम्ही म्हणताय तर सिनेमा नक्की बघेन!"

"बघ बघा आवर्जून थेटरात बघ! रात्रीचा शो बघ हा! :प"

 

फोबिया (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

फोबिया (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: पवन कृपलानी
  • कलाकार: राधिका आपटे
  • चित्रपटाचा वेळ: ९९ मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत