पिफ २०१७ उद्घाटनपट: थँक यु फॉर बॉम्बिंग (२०१५): एक सोपा तरीही लक्षवेधी नि परिणामकारक सिनेमा!
आज १२ जानेवारीला पिफ २०१७ची सुरुवात झाली. उद्घाटनाचा सिनेमा म्हणून 'थँक यु फॉर बॉम्बिन्ग' हा सिनेमा दाखवला गेला. या सिनेमासोबत यंदाचा 'पिफ-2017' एका 'सोप्या' परंतू चांगल्या प्रकारे सुरू झाला म्हणायला हरकत नाही. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी उद्घाटनाचा सिनेमा, सिनेमाची किमान समज असणार्या सामान्य प्रेक्षकापर्यंत पोचायला कठीण जाऊ नये - मात्र अगदीच हॉलिवूडपटाइतका सोपा, ढोबळही नसावा - अशा बेताने तोल साधून निवडला गेला आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र त्यामुळे२०१४ च्या उद्घाटनाचा 'अॅना अरेबिया' किंवा २०१५चा 'टिम्बकटु' असे चोखंदळ सिनेमे यापुढे उद्घाटनाला दिसणार नाहीत असा ट्रेन्ड स्थापित होतोय की काय असे वाटू लागले आहे. तर ते असो. आपण सिनेमाकडे वळूया
सिनेमाची सुरुवात 'अॅलिस इन वंडरलँड'मधील प्रसिद्ध चेशर कॅटच्या "All this talk of blood and slaying spoils my tea" या वाक्याने होते. आताच्या जमान्यातील 'जडवादी' समाज आणि त्यांच्यात खोल रुतलेले निर्ढावलेपण एका वाक्यात व्यक्त करायला या वाक्याची निवड अचूक आहे. या वाक्याचा - किंवा त्यापेक्षा या निर्ढावलेपणाचा -निबरपणाचा - या सिनेमाशी मोठाच संबंध आहे.
हा सिनेमा तीन 'वॉर करसपॉन्डन्ट'ची तीन कथानके विशद करतो. पहिल्या कथानकात एडवर्ड (Erwin Steinhauer) नावाच्या एका अनुभवी युद्ध-पत्रकाराची कथा आहे. हा एकेकाळचा युद्धपत्रकारीतेतील मातब्बर अनुभवी पत्रकार आहे. त्याला त्याच्या न्युजकंपनीने अफगाणिस्तानात धाडायचं ठरवलं आहे. काबूलला जाण्यासाठी तो विमानतळावर पोहोचतो . विमानाची वाट बघत असताना त्याला एका व्यक्तीचा आवाज येतो आणि तो ऐकून त्याला दरदरून घाम फुटतो. तो आवाज बोस्निया युद्धात त्याच्या सहकाऱ्याला (कॅमेरामनला) मारणाऱ्या व्यक्तीचा असतो असे तो सांगतो. त्याच्या मते ती व्यक्ती एक युद्ध-गुन्हेगार असते. स्वतःच्या युद्ध अनुभवांमुळे एडवर्डवर काय परिणाम झाला असतो? तो त्या व्यक्तीबद्दल काय विचार करतो, काय माहिती काढतो, त्या व्यक्तीने विमानतळ सोडू नये म्हणून काय काय करतो हे सगळे दाखवत सिनेमा पुढे जातो.
दुसरी कथा आहे, लाना (Manon Kahle) नावाच्या तरुण, 'सुबक' पत्रकाराची. ती अफगाणिस्तानात भरलेल्या युद्धपत्रकारांच्या जत्रेतली एक वारकरी असते. युद्ध तर सुरू झालेलं नसतं. मात्र तिचं स्त्री असण्यापासून ते तिने अमेरिकन सैनिकांना विचारलेल्या काही गैरसोयीच्या प्रश्नांमुळे तिला म्हणावं तसं यश येत नसतं. त्यासुमारास दोन अमेरिकन सैनिकांनी कुराणाची प्रत जाळल्याने जनक्षोभ उसळलेला असतो. अशावेळी तिच्या हातात अशी माहिती लागते ज्यामुळे तिला ते "दोन सैनिक" मिळण्याची शक्यता निर्माण होते. अशावेळी ती त्या दोन सैनिकांची मुलाखत घेते का? त्याची किंमत तिला काय चुकवावी लागते? इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने हे कथानक पुढे जाते.
तिसरी कथा आहे कॅल (Raphael von Bargen) या अतिउत्साही, अतिशय ध्येयवादी मात्र युद्ध सुरू न झाल्याने (आपल्याला कर्तृत्व दाखवता येत नसल्याने) भयंकर हळवा झालेल्या पत्रकाराची कथा आहे. एके दिवशी वैतागून तो "तालीबानला भेटायचंय" म्हणून एकटाच आपल्या ड्रायव्हरसोबत बाहेर पडतो. त्या प्रवासात नक्की काय होतं? ड्रायव्हर त्याला कुठवर साथ देतो? तो त्याला कुठे घेऊन जातो? तिथे तालिबान्यांशी त्याची भेट होते का? वगैरे उत्तर या तिसऱ्या कथानकातून मिळतात.
ही तिनंही कथानके अतिशय जोरकसपणे चित्रित केलेली आहेत. सिनेमाची दृश्यभाषा अनेकदा कमाल आहे. भल्या मोठ्या विमानतळावर रांग नसतानाही आखलेल्या मार्गिकेतूनच जाणारा एडवर्ड असो किंवा कोण्या गायिकेने अफगाणिस्तानच्या सैनिकांसाठी कार्यक्रम केला याचंच खोटं हास्य आणत कौतुक सांगणारे रांगेतले 'युद्ध-पत्रकार' असोत किंवा अफगाणी जनतेकडून पढवून घेतलेले 'निवेदन' रेकॉर्ड करणारे पत्रकार असोत किंवा स्क्रीनभर लांब, ताऱ्यांच्या वेटोळ्यांनी सज्ज, पोपडे उडालेल्या भिंतीच्या पार्श्वभूमीवर कंटाळून एका बिघडलेल्या (थंड) फ्रीजवर बसलेला कॅल असो. हे व असे कित्येक प्रसंग काहीही न बोलता बरंच काही बोलून गेले आहेत आणि या सिनेमाला श्रीमंत करून गेले आहेत.
हा सिनेमा युद्ध, पत्रकारीता, युद्धभूमीवर असणारे पत्रकार, त्यांची जीवनशैली, त्यांचा स्थानिकांवर आणि तेथील परिस्थितीचा पत्रकारांवर होणारा परस्पर-परिणाम, तेथील विविध अनुभव, अफगाणिस्तानची परिस्थिती, तेथील विदारक चित्र, तेथील माणसे, त्यांचा आणि परकीयांच्या दीर्घकाळ सहवास्तव्याने निर्माण झालेली व्यवस्था, त्यातील ताणलेले - एकमेकांना ओढु पाहणारे - त्याच वेळ परस्परावलंबी हितसंबंध इत्यादी गोष्टींना व्यापूनही बरंच काही सांगू पाहतो.
या सगळ्या बरोबरच काही गोष्टी जमून आल्यात. एक म्हणजे यात दाखवलेलं निर्ढावलेपण आणि विसंगती. अशा परिस्थितीत एकूणच समाजात येणारी निबरता इथे अंगावर यावी इतकी अधोरेखीत होते. येथील प्रत्येक जण समोर कोणतीतरी काळी छटा घेऊनच वावरत असतो. आता पत्रकारांसाठी कोणती बातमी महत्त्वाची आहे यापेक्षा कोणती बातमी "सध्या चालते आहे " यावर प्राथमिकता ठरणे, "बोस्निया वगैरे आता जुनाट युद्धे नको उगाळूस, त्यात कोणालाही इंटरेस्ट नाही. आता ऍक्शन अफगाणिस्तानात आहे. तेव्हा तू(ही) तिथेच गेलं पाहिजेस" अशी वाक्ये काय, मोठ्या लोकशाही देशांतील सैन्य हे शेवटी सैन्य असल्याने त्यांनी केलेला प्रपोगांडा काय किंवा प्रेक्षकालाही क्षणभर पटेल अशा पद्धतीने सैनिकांची मांडलेली बाजू काय , अशा अनेक गोष्टी तुम्हाला विचारात पाडतात. त्याच बरोबर स्त्री - त्यातही मुक्त स्त्रीला वेश्या म्हटलं जाणं, तिला केवळ स्त्री असल्याने मिळणारी वेगळी वागणूकही तितकीच बोचरी आहे.
मला यातील पहिली आणि तिसरी कथा अधिक आवडल्या. दुसरी कथा मात्र गरजेपेक्षा अधिक लांबली असल्याचं मला वाटलं. त्या उलट तिसऱ्या कथेत अजून काही वेळ घेऊन कॅलसोबतच्या ड्रायव्हरचं पात्र आणि त्या दोघांतील नातं अधिक चांगल्या प्रकारे फुलवता आलं असतं तर ती कथा अधिकच परिणामकारक झाली असती. या सिनेमात वापरलेला कॅमेरा, ध्वनी आणि प्रकाशाचा वापर, संकलन, संगीत अशा तांत्रिक गोष्टींवर लिहायचं तर आणखी एक लेख लिहावा लागेल इतक्या त्या गोष्टी छान जमल्या आहेत.
या सिनेमात प्रतिकात्मकता वगैरे फार नाही. बहुतांश गोष्टी नीट उलगडून सांगितल्या व/वा दाखवल्या आहेत. मात्र तरीही सिनेमा डोक्यात घुमत राहतो. कॅलचं "या शांततेतही तिथे कितीतरी युद्ध चालू आहेत, मात्र ती बघण्याची दृष्टी तुम्हाला हवी" हे एक वाक्य मात्र माझ्यासाठी सर्वात कळीचं ठरलं. ते डोक्यातून कधी सहज जाईल असं वाटतही नाही! युद्धपूर्व शांततेच्या काळातच असे नाही तर कोणत्याही श्तांततेच्या काळात भोवताली माणूस अनेकदा इतका कोरडा, स्वार्थी, दुटप्पी, निबर झाल्यासारखा वाटत असतो - आणि त्या व्यवस्थेचा भाग आपणही आहोत ही जाणीवच इतकी त्रासदायक ठरू लागते की त्यापेक्षा हे घोषित, स्पष्ट बॉंब वगैरे टाकून केलेलं युद्ध किमान असे बारीक - सहनही न होणारे आणि सांगताही न येणारे - वार करत नाही असे वाटून जाते. आणि तिथेच हा सिनेमा जिंकतो!
या फेस्टिव्हलमध्ये अजून एक शो आहे तो शक्य झाल्यास जरूर बघा. नपेक्षा इतरवेळी कुठेही संधी मिळाली तर हा सिनेमा चुकवू नका इतकं नक्की!
===
यावेळी उद्धाटन सोहळा वेळेत संपलाच, मात्र सिनेमा घोषित केला होता त्यापेक्षा अर्धा तास आधीच सुरू झाला त्यामुळे काही प्रेक्षकांचा पहिला अर्धा तास गेला असणार. उशीर करू नये पण असा सिनेमा लवकरही सुरू करू नये असे वाटते.
थँक यु फॉर बॉम्बिंग (२०१५) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
