पिफ २०१५: हॅना आरेण्ट: सत्य असत्यासी मन केले ग्वाही

दरेक काळाची आणि समाजांची काही प्रस्थापित मूल्यं असतात. प्रतिष्ठित असतात, सर्वमान्य असतात. हां, पण सत्यही सदासर्वदा त्या मूल्यांसोबतच वावरत असतं असं मात्र नव्हे. नाहीतर कधी काळी यहुदी धर्मलंडांच्या अन्यायाविरोधात बंड करणार्‍या येशूचं चर्च पुढे गॅलिलिओचा बळी घेतं ना. हे कधी येशूच्या, तर कधी गॅलिलिओच्या बाजूनं उभं ठाकणारं सत्य ज्याचं त्यानं आपलं आपण हुडकायचं. त्याच्यासाठी जिवाशिवासह सारं पणाला लावायचं. मग ते संघर्षाच्या कसोटीवर घासून निघतं. बावनकशी उजळून निघतं. आपल्यासह सर्वसामान्य मर्त्य माणसांनाही कालातीत उजळून टाकतं. हॅना आरेण्ट अशीच उजळून निघाली.

यंदाच्या 'पिफ'मध्ये तिच्यावरचा सिनेमा बघायला मिळाला.

मला या बाईबद्दल काही म्हणजे काही माहीत नव्हतं. त्यामुळे सिनेमाचं नाव वाचून काहीच अर्थबोध झाला नाही. सिनॉप्सिसमध्ये ज्यू हत्याकांड ही संज्ञा वाचली मात्र, माझं डोकं एकदम फाटकन बंद झालं. तेच ते छळ, अंगावर येणारं क्रौर्य, माणुसकीला काळिमा लावणारी हत्याकांडं... 'नको-नको' झालं एकदम. 'द पियानिस्ट' (२००२), 'कातिन' (२००७), 'शिंडलर्स लिस्ट' (१९९३) सारखे सिनेमे आठवले. सिनेमे थोरच. पण विषयाचं आणि आशयाचं अजीर्ण झाल्यामुळे वेगळ्या प्रकारे अंगावर येणारे. 'टू हाफ टाईम्स इन हेल' (मरणाच्या छायेत खेळला गेलेला एक फुटबॉलचा सामना) आणि 'टेकिंग साइड्स' (नीतिअनीतीच्या प्रश्नांतून कलाकाराची सुटका असते की नसते हा चिरंतन प्रश्न) या सिनेमांचा तेवढा सुखद अपवाद. (दोन्ही सिनेमे हंगेरियन, हा योगायोग म्हणावा का?) पण आसमंतात कुण्या जाणकार रसिकानं काढलेले उद्गार ऐकले ('अच्छा! फिलॉसॉफर बाईवर सिनेमा बनवलाय? पाहिला पाहिजे!') नि त्यावर भरवसा टाकून सिनेमा पाहिला.

चीज झालं.

(पुढे कथानकाचे तपशील आहेत. ते वाचायचे नसतील, तर पुढे वाचू नका.)

हॅना ही एक ज्यू बाई. छळछावणीत काही दिवस काढून तिथून अमेरिकेत पलायन केलेली. पुढे प्राध्यापिका - लेखिका - तत्त्वज्ञ म्हणून मान्यता पावलेली. अ‍ॅडॉल्फ आइशमन हा नाझी क्रूरकर्मा पकडला गेला नि त्यावर खटला चालवला जाणार असल्याचं तिनं ऐकलं. तेव्हा 'न्यू यॉर्कर'तर्फे त्या खटल्याचं वार्तांकन करण्याची इच्छा तिनं दर्शवली. त्या खटल्यादरम्यान आइशमनला न्याहाळताना तिला इतरांहून निराळं काही जाणवलं. ती इतरांसारखी त्याच्या क्रौर्यानं स्तंभित झाली नाही. त्याच्याबद्दलच्या सूडाच्या भावनेनं पेटून उठली नाही. यातनांच्या आठवणींनी खचून गेली नाही. तिला जाणवलं ते त्याचं क्षुद्र पशुवत अस्तित्व. व्यवस्था नामक पोकळीला शरण जाऊन वाट्टेल ते करायला तयार होणारं. स्वतंत्र विचार करणं हे माणूसपणाचं लक्षणच जर माणसानं सोडून दिलं, तर किती पराकोटीचा सैतानीपणा अस्तित्वात येऊ शकतो, त्याच्या साक्षात्कारानं ती चरकली.

पण ती तेवढ्यावर थांबली नाही. ज्यू नेत्यांनी घेतलेली बोटचेपी भूमिका आणि माणसांनी विचार करायला दिलेला नकार या भांडवलावर हे भयानक हत्याकांड होऊ शकलं. एखाद्या माणसाच्या सैतानी मेंदूवर त्याची जबाबदारी ढकलून आपण निर्दोष ठरू शकणार नाही, हे तिनं ठामपणे आणि जाहीरपणे लिहिलं - मांडलं. लोकांच्या संतापाचे स्फोट झेलूनही.

इथे अमेरिकेतल्या ताकदवान ज्यू लॉबीची पार्श्वभूमी लक्षात घेतली, ज्यूंवर झालेल्या अत्याचाराचा अपराधभाव जर्मनी आजही वागवते आहे हे ध्यानात घेतलं (गेल्याच वर्षीच्या 'पिफ'मध्ये पाहिलेला 'दास वॉखनेंडं' ('द वीकेंड') किंवा काही वर्षांपूर्वी हॉलिवुडमध्ये गाजलेला 'द रीडर' ('डेर फोरलेझर') हे दोन्ही चित्रपट जर्मन अपराधभावाबद्दल बोलणारे. बेर्नहार्ट श्लिंक या जर्मन लेखकाच्या कादंबर्‍यांवर आधारित.) तर तिच्या या लढ्याची धार जवळून दिसू लागते.

बार्बरा सुकोवा या नटीनं हॅनाचं काम केलं आहे. लोकांनी हॅनाला नात्झीधार्जिणी ठरवल्यावर तिनं एका जाहीर भाषणातून आपली भूमिका पुन्हा मांडली. त्या भाषणात या बाईनं कमाल केली आहे. भाषणाच्या सुरुवातीला तिच्या डोक्यात थोडी चलबिचल सुरू असलेली. "आज सुरुवातीलाच सिगारेट शिलगावतेय, समजून घ्या," असं ती म्हणते त्यातून तिची चलबिचल दिसते. पण मुद्द्यागणिक तिचा हळूहळू तापत गेलेला आवाज, ठाम निर्धार व्यक्त करणारी जिवणी आणि तिनं सभागृहाचा ताबा घेतल्याचं दर्शवणारा - क्लोजपमधून अधिकाधिक प्रभावी होत गेलेला - उत्तरोत्तर फुलून आलेला तिचा चेहरा. काय चढती भाजणी आहे, वा!

आधीच बाई. त्यात समाजमान्य-लोकप्रिय सत्याहून निराळं काही बोलणारी. त्यात लोकसंतापाला न जुमानणारी. 'उद्धट', 'भावनाशून्य', 'उलट्या काळजाची', 'बेईमान' अशा अनेक शेलक्या विशेषणांनी तिची संभावना झाली नसती, तरच नवल. अगदी जवळचे मित्र, गुरुस्थानी असलेले सुहृद, विद्यार्थी - चाहते - वाचक, अशा अनेक बाजूंनी तिच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यांमुळे हॅना जराही विचलित झाली नसती, तर ती अमानवी वाटली असती. पण बार्बरानं रंगवलेली हॅना अमानवी नाही. तिचं आपल्या पतीवर, मित्रांवर, गुरूवर विलक्षण प्रेम आहे. "चुंबनाशिवाय कसं बुवा काम करायचं?" अशी मिश्कील विचारणा करण्याइतकी ती जिवंत आहे! ती या हल्ल्यांनी घायाळ होते. दुखावली जाते. पण विचाराची कास मात्र सोडत नाही. "विचार करणं हेच जिवंत असण्याचं, माणूस असण्याचं सर्वांत मोठं लक्षण आहे." हे बजावून सांगते.

'ज्यू हत्याकांड' या क्लिशेला बिचकून हॅनावरचा सिनेमा पाहिला नसता, तर मोठंच नुकसान झालं असतं. 'पिफ'मधल्या त्या अज्ञात जाणकाराचे मनापासून आभार!

- कलमवाली बाई (kalamwali.baai@gmail.com)

हॅना आरेण्ट - चित्रपटाची /नाटकाची माहिती

हॅना आरेण्ट
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: मार्गारेटं फॉन ट्रोटा
  • कलाकार: बार्बरा सुकोवा, जेनेट मॅकटीअर, क्लाउस पोल, निकोलस वूडंसन, ऍक्सेल मिल्बर्ग
  • चित्रपटाचा वेळ: १ तास ५३ मिनिटे / ११३ मिनिटे
  • भाषा: जर्मन
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: http://www.boxofficemojo.com/movies/?id=hannaharendt.htm
  • प्रदर्शन वर्ष: २०१३
  • निर्माता देश: जर्मनी-फ्रान्स-लक्झेंबर्ग