सीता सिंग्ज द ब्ल्यूज (२००८): सीतेचा दृष्टिकोन नि नाविन्यपुर्ण ऍनिमेशन
रामायण हा भारतातील प्रत्येकाचा परिचित विषय. त्यातील एका भागावर बेतलेले रॅप अंगाने जाणारे एक गाणे आणि त्यावरचे अफाट मजेशीर अॅनिमेशन बघण्यात आले. सीतेला बंदिवासात ठेवले असता ती रामाच्या आठवणींचे कढ काढून रडते आहे आणि तिथे तिला हनुमान भेटायला येतो, अंगठी देतो आणि लंकेला आग लावून परत जातो हा तो भाग. त्या गाण्यात सीतेला एक दैवी स्त्री किंवा देवाची पत्नी वगैरे न दाखवता, 'चांदोबा' स्टाइल दाखवली आहेच, शिवाय त्या गाण्यात बेफाम नाचणारा मारुती नि इतरही पात्रे धमाल आणताना दिसतात. शिवाय त्या गाण्यात मूळ गोष्टीला बाधा न आणता, कोणत्याही कॅरेक्टरचा अपमान झाला आहे असे वाटणार नाही याची दक्षता घेण्याची कसरतही छान साधली आहे असे वाटले.
सध्या एकूणच भारतीय पौराणिक कथांवर ऍनिमेशनमालिकांद्वारे लहान मुलांची कार्टून्स बनवण्याचे दिवस आहेत. पण या एका गाण्यावरून इतके नक्की झाले की, हे पाणी वेगळे आहे. माझ्या डोक्यात गाणे पक्के रुतले. त्या गाण्याच्या स्रोताचा शोध घेतल्यावर शेवटी ते गाणे ज्या चित्रपटात आहे त्या एका अख्ख्या चित्रपटाचा शोध लागला. त्या चित्रपटाचे नाव आहे 'सीता सिंग्ज द ब्ल्यूज'.
रूढार्थाने हा व्यावसायिक चित्रपट नाही. जालावर हा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. अमेरिकास्थित नीना पॅले (उच्चारी चुभेदेघे) हिने या चित्रपटाची निर्मिती, लेखन, अॅनिमेशन सगळेच केले आहे. हा चित्रपट त्यांच्या संस्थळावरून अधिकृतरीत्या मोफत बघता येतो, डाऊनलोड करता येतो, इतकेच काय त्याचे प्रदर्शनही करता येते - खेळ ठेवता येतो. चित्रपट प्रकाशनाच्या रूढ कल्पनांहून वेगळा प्रयोग इथे आहेच. या पद्धतीतली मिळकत ही डोनेशन, संबंधित वस्तूंची विक्री, डीव्हीडीज, स्पॉन्सरशीप्स याद्वारे भरून काढली जात आहे.
तर ते असो. हा चित्रपट आहे रामायणावर. रामायण आणि उत्तररामायण या दोन्ही कथा इंटर्वलच्या आधी व नंतर होतात. चित्रपट हा संवादप्रधान नसून यास एक 'म्युझिकल' म्हणता येईल. यात अगदी नव्या पठडीतली छान गाणी आहेत, नाच आहेत. दोन गाण्यांच्या, प्रसंगांच्या मध्ये शॅडो अॅनिमेशनच्या वापरातून रामायण, रामाचे वागणे, सीतेचे वागणे, हनुमान व एकूणच सामाजिक चालीरीतींची चिकित्सा आणि प्रभावी भाष्य केले आहे. सीतेला 'कंटॅमिनेटेड' दाखवणे, सारखं तिला अग्नी नैतर जलपरिक्षा द्यायला लावणे, तिचे प्रेग्नंट असणे, तिच्यासाठी लढल्यावरही रामाने अनासक्त असणे, हनुमानाची भूमिका, रावणाची भूमिका इथे इतक्या रोचकपणे मांडली आहे. यातील प्रत्येक गाणं व संवाद चांगले आहेतच. त्यातील मला शॅडो अॅनिमेशनद्वारे मूर्ती बोलत असतानाचे संवाद अधिक मार्मिक वाटले. रामायणाकडे पाहण्याचा अगदी फ्रेश आणि मजेशीर दृष्टिकोन आहे.
या सिनेमाचे ऍनिमेशन हा स्वतंत्रपणे लक्ष देण्याचा विषय आहे. यातील पात्रांचे रेखाटन, त्यांचे खास भारतीय शैलींतील टप्पोरे डोळे वापरून घडवलेली आणि घाटलेली शैली तर वेधक आहेच त्याच बरोबर केवळ सांधे ३६० अंशात हलतील अश्या 'कटपुठली' पद्धतीचा आभास करवणारे ऍनिमेशन या पात्रांना पुरेपुर पारंपारिक आणि भारतीय करतेच पण त्याचे 'कार्टून' होऊ देत नाही. त्याच बरोबर यातील निवेदन हे थेट अजंटा-वेरूळ काळातील लेण्यांच्या मुर्ती बोलताहेत असा आभास करणारे 'शॅडो ऍनिमेशन' वापरले आहे त्यामुळे एकुणच निवेदनाला 'मै काल हू!' म्हणणाऱ्या महाभारत सिरीयलची आठवण करून देणाऱ्या त्रयस्थ नि बिनचेहऱ्याच्या निवेदकाची आठवण होते.
याचबरोबर एक समांतर अशी 'नीना' या अमेरिकन पात्राची गोष्टही सिनेमांत काही अंतरावर घडत असते. तिचा नवरा भारतात येतो व त्याचा तिच्यातील इंटरेस्ट संपू लागतो वगैरे. पुढे निर्मितीसंबंधी खोदकाम केल्यावर कळले की ही प्रस्तुत लेखिका-निर्मातीची प्रत्यक्ष कथा आहे. किंबहुना स्वतःच्या पतीने सोडून जाण्यानंतर ती भारतीय सीतेला अधिकच रिलेट करू लागली, त्यावर अधिकच चिंतन करू लागली. त्या वेदनेतूनच ही अॅनिमेशन फिल्म तयार झाली आहे.
मला यात आवडलं ते प्रतिमा आणि प्रतिकांत अडकून न पडणं. राम आणि रामायण हे केवळ धार्मिक अंगाने वाचणा-बघणाऱ्या नाजूक भावनाशील हृदयांच्या भाविकांनी हा सिनेमा बघू नये. मात्र त्याशिवाय रामायण व त्यातील शेवटी ही पात्रे यांना एक सामाजिक व प्रतिकात्मक संदर्भही आहे हे लक्षात येणाऱ्यांनी ही फिल्म चुकवू नये. रामायणातील पात्रे ही तत्कालीन परिस्थितीला सुटेबल अशी लिहिलेली असली तरी त्यांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यातील कोणतेही एकच चित्रीकरण बरोबर किंवा चुक आहे असे म्हणणे घाईचे ठरेल. एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून आधुनिक काळातील ही चिकित्सा याच माळेतील पुढील पाऊल दमदार टाकते.
सीता सिंग्ज द ब्ल्यूज (२००८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
