कंजुरिंग २ (२०१६): खेळ तोच ,थरार नवा

मानसशास्त्रात 'स्टॉकहोम सिंड्रोम' नावाची एक संकल्पना आहे. अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडेच आकर्षित होणे किंवा एखाद्या दुष्कृत्याला बळी पडलेली व्यक्ती त्या कृत्याच्या कर्त्याकडेच आकर्षित होणे याला मानसशास्त्रात 'स्टॉकहोम सिंड्रोम' असं म्हणतात. भयपट आणि प्रेक्षक यांच्या नात्यात कायम 'स्टॉकहोम सिंड्रोम'च्या छटा आढळतात. म्हणजे असं, की चांगले भयपट (यात रामसे बंधू आणि भट्ट कंपनी यांचे चित्रपट अपेक्षित नाहीत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलच!) प्रेक्षकाला घाबरवतात, चित्रपट संपल्यानंतरही झोपेतून दचकवून उठवतात आणि अनेक प्रकारे प्रेक्षकाचा मानसिक छळ करतात. पण चित्रपटगृहात चांगला भयपट लागला आहे हे कळताच पुन्हा तोच भीतिदायक अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांची पावलं तिकडे हमखास वळतात. प्रेक्षकांना भयपट का आवडतात त्याचं हे मानसशास्त्रीय विश्लेषण.

मध्ये मी रामसे बंधूंच्या सिनेमावर एक लेख लिहिला होता. त्या पोस्टवर चर्चा करताना निखिलेश चित्रे याने रामसे बंधूंच्या सिनेमाबद्दल काही रोचक मुद्दे मांडले होते. एका आख्ख्या पिढीच्या भीतीला आणि लैंगिकतेला आवाहन करणारा दिग्दर्शक विरळा असतो. रामसेंचा सिनेमा हे विशिष्ट काळाचं अपत्य होतं. त्या काळाच्या सामाजिक - आर्थिक अक्षांनी या सिनेमाला अर्थ दिला. चर्चेत निखिलेशने मांडलेला एक मुद्दा मला पटला. रामसेंच्या सिनेमातल्या भयामागे किंवा क्रौयामागे एक सुप्त निरागसता होती. तिला एक लोभस अपील होतं. लहानपणी वाटणार्‍या माजघरातल्या अंधाराच्या उबदार भीतीचं आणि रामसेंच्या सिनेमाचं आकर्षण एकाच जातकुळीचं असावं. रामसेंचे सिनेमे हे या एका नियमाला धरून आकर्षक वाटत असतील, तर त्या नियमाचा व्यत्यास म्हणजे लेखक -दिग्दर्शक -निर्माता असणाऱ्या जेम्स वॅनचे सिनेमे आहेत. जेम्स वॅनने वर्षानुवर्षे तिकीटखिडकीवर चालणारे चित्रपट दिल्यामुळे, समीक्षकांनी त्याच्यावर ’प्रेक्षकानुनय करणारा दिग्दर्शक’ असा ठप्पा मारून ठेवला आहे. मला व्यक्तिशः त्याचे सिनेमे जाम आवडतात. मागच्या वर्षी येऊन गेलेल्या फास्ट अँड फ्युरियस ७ सकट. भयपटांबद्दल बोलायचं, तर रामसेंचे सिनेमे बालीश, पोरकट, काही लोकांना चक्क हसवणारे वाटत असतील. त्या तुलनेत जेम्स वॅनचे भयपट दचकवणारे, घाबरवणारे आणि काहीतरी अभद्र-गिळगिळीत दाखवणारे असतात. काहीसे आपल्या नारायण धारपांच्या कथांसारखे. 'डेड सायलेन्स', 'इनसीडियस' चित्रपटमालिका, 'ऍनाबेल', 'कंजुरींग' हे चित्रपट एका मोठ्या प्रेक्षकवर्गाला घाबरवून गेले होते.

सध्या आपल्याकडच्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक खेचणारा 'कंजुरिंग २' हा ’कंजुरिंग’ चित्रपटमालिकेतला असाच एक घाबरवणारा चित्रपट आहे.  

एक झपाटलेलं घर आणि तिथे राहणाऱ्या परिवाराला तिथे वास करून असणाऱ्या अतींद्रिय शक्तींमुळे होणारा त्रास हे 'कंजुरींग १'मधलं कथासूत्र. ते घेऊनच 'कंजुरींग २'चा प्रवास पुढे सुरू होतो. पहिल्या भागातले लॉरीन वॉरेन (वेरा फर्मीगा) आणि एड वॉरेन (पॅट्रीक विल्सन) हे भूत-भुताटकीशी लढणारं दाम्पत्य इथेपण कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. अतींद्रिय शक्तींशी लढताना वैयक्तिक आयुष्यातपण ते काही प्रश्नांना तोंड देत आहेत. त्यातच चर्च त्यांना लंडनमधल्या एका भुताळी घराची केस सोडवण्याची विनंती करतं. ते दोघे ही केस हाताळायला फारसे उत्सुक नसतात. पण चर्चच्या आग्रहामुळे काही अटींवर लंडनला पेगी हॉजसनच्या घराला भेट द्यायला ते तयार होतात. पेगीच्या लहान मुलीला भुताने झपाटले आहे. त्या घरात राहणारी अमंगळ शक्ती त्या परिवाराच्या जिवावरच उठली आहे. लॉरीन आणि एड त्या घरात राहायला येतात आणि सुरू होतो एक भयानक झगडा. ही अमंगळ शक्ती इतकी ताकदवान आहे, की वॉरेन दाम्पत्यपण तिच्यासमोर हतबल दिसू लागतं.

कुठलाही भयपट प्रेक्षकाला दीड-दोन तास सलग घाबरवत नाही. ते शक्यदेखील नाही. चांगल्या भयपटाचा डोलारा हा पाच ते सहा प्रसंगांवर अवलंबून असतो. हे प्रसंग प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी झाले, तर चित्रपट यशस्वी होतो. 'कंजुरिंग २'मध्ये प्रेक्षकांना घाबवरून, सीटच्या कडेवर येऊन बसायला लावणारे, अनेक प्रसंग आहेत. 'सरप्राईज एलीमेण्ट्स'चा सढळ वापर चित्रपटात केला आहे. विशेषतः चित्रपटाच्या पूर्वार्धात. जेव्हा हॉजसन परिवाराला आपल्या घरात कोणतीतरी अमानवी शक्ती राहत असल्याची जाणीव हळूहळू व्हायला लागते, तेव्हाचे प्रसंग वेगवान आणि विचार करायला वेळ न देणारे आहेत. चित्रपटात पडद्यावर दीर्घ शांततेचा अतिशय प्रभावी वापर केला आहे. कुठलाही मोठा धक्का देण्यापूर्वी या नीरव शांततेचा वापर दिग्दर्शकाने प्रभावीपणे केला आहे. 'कंजुरिंग २'साठी आणखी एक चांगली बातमी म्हणजे तुम्ही हा चित्रपट एक स्वतंत्र चित्रपट म्हणून पाहू शकता. हा चित्रपट पाहण्यासाठी किंवा तो कळण्यासाठी या चित्रपटमालिकेमधला पहिला भाग पाहिला असणं आवश्यक नाहीये. पण एक वाईट बातमीपण आहे. ज्यांनी चित्रपटमालिकेमधला पहिला चित्रपट पाहिला आहे, त्यांना दुसऱ्या भागात थोडा अपेक्षाभंग झाल्यासारखं वाटू शकतं. हॉरर कोशंट या निकषावर पहिला भाग या दुसऱ्या भागापेक्षा बराच सरस आहे असं म्हटलं तरी चालेल. पहिल्या भागाशी तुलना न करता हा चित्रपट पाहाल, तर हा दुसरा चित्रपट तुम्हांला आवडू शकतो.

चित्रपटाची पटकथा बांधेसूद आहे. जेम्स वॅनच्या चित्रपटांनी स्वतःचे असे काही 'क्लिशेज' तयार केले आहेत. या चित्रपटात पण 'क्लिशेज'ची भरमार आहे. उदाहरणार्थ रात्रीच्या वेळी अतिशय मोठ्या आवाजात वाजणारा दरवाजा , एरवी बघताक्षणी प्रेमात पाडणारी पण इथे कथानकात भीती निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावणारी लहान मुलांची खेळणी , घरातल्या बायकांना झपाटणार बाईचं भुत असे वॅनच्या चित्रपटात दिसणारे काही 'क्लिशेज' इथे पण दिसतात . चित्रपटाच्या ताकदीचंच ते लक्षण आहे. पण नेहमीच्या प्रेक्षकासाठी त्यांची पुनरावृत्ती काहीशी कंटाळवाणी होऊ शकते, हाही तोटा आहे. सुदैवानं, या चित्रपटाच्या हाताळणीतल्या दिग्दर्शकाच्या कौशल्यामुळे ते क्लिशेज इथे असूनही कंटाळवाणे होत नाहीत. कुठल्याही भयपटात ध्वनीसंयोजन हा महत्त्वाचा घटक असतो. इथेपण दिग्दर्शकाने त्याचा परिणामकारक वापर केला आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध थोडा रेंगाळल्यासारखा वाटतो. विशेषतः चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या आधीच्या भागात .

भयपट ह्या 'जॉनर'चे चाहते असाल, तर हा चित्रपट आवर्जून बघाच. 'कंजुरिंग २' तुम्हांला निराश करणार नाही.

जाता जाता -  चित्रपट बघायला येणाऱ्या प्रेक्षकांचीपण एक वर्गवारी असते . त्यावरून त्यांचा समाजगट ताडता येतो .सलमान खानच्या चित्रपटात टाळ्याशिट्ट्यांचा गजर चालू असतो. त्यावरून त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग कुठल्या वयोगटातला आहे, कुठल्या सामाजिक वर्गातून आला आहे याचा अंदाज बांधता येतो. हॉलीवूड चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग म्हणजे पांढरपेशा , बहुदा उच्च आर्थिक वर्गातून आलेला असा एक 'स्टिरियोटाईप' आहे. मला चित्रपटगृहात हजर असलेल्या प्रेक्षकांच्या सामाजिक वर्गवारीचे निरीक्षण करायची आवड आहे. म्हणजे कुठल्या चित्रपटाला कुठल्या वयोगटातला, कुठल्या आर्थिक वर्गातला प्रेक्षक आला आहे याचे आडाखे बांधायला मला आवडतं. मी हा चित्रपट बघायला चित्रपटगृहात शिरलो, तेव्हा प्रेक्षागृह पूर्ण भरलं होतं. पण त्यात भरणा होता तो तरुण जोडप्यांचा. 'Horror movies are ultimate date movies.' असं विधान एकदा एकता कपूरने केलं होतं. निर्माती म्हणून ती कितीही वाईट चित्रपट बनवत असली आणि बुद्ध्यांक पंचवीस असणाऱ्या प्रेक्षकांसाठी मालिका बनवत असली; तरी तिच्या 'मार्केट'च्या आडाख्याला मी मनातल्या मनात सलाम केला. Give the devil it's due!  

कंजुरिंग २ (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

कंजुरिंग २ (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: जेम्स वेन
  • कलाकार: पॅट्रीक विल्सन, वेरा फर्मीगा
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: अमेरिका