Y : कट्टरतेवर थेट भाष्य करणारा प्रयोग

नुकतंच श्रीरंग गोडबोले नि विभावरी देशपांडे लिखित-दिग्दर्शित "Y" हे नाटक पाहिलं. प्रायोगिक नाटकं म्हटली की त्यात फार्फार दुर्बोधता आणल्याशिवाय त्याला थोर्थोर म्हणायचंच नाही अशी मध्यंतरीच्या एका टप्प्यावर आलेली पठडी मोडून रंजक तरीही महत्त्वाचे असे काही मांडणारी नाटके पुन्हा येऊ लागली आहेत. हे त्याच पंक्तीतलं एक महत्त्वाचे नाटक ठरावे. समकालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे हे केवळ (विकल्या गेलेल्या किंवा न गेलेल्या) मिडियाचं(च) काम आहे, असा आविर्भाव बाळगत 'एक नागरिक' ही भूमिका टाकून 'एक ग्राहक' किंवा ''एक प्रेक्षक' किंबहुना 'समष्टीचा केवळ उपभोग घेणारा/री' म्हणून व्यक्ती/संस्थांची भूमिका बदललेली दिसते. अशा काळात 'असं' नाटक उभं करणं हे नुसतं कौतुकास्पदच नाही तर नाट्यचळवळीचं सामाजिक महत्त्व टिकवणारं आहे. 

हे नाटक धाडसी आहे. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत हे नाटक करणं धाडसी आहे. एरवी धाडसी म्हणावं असं खरंतर या नाटकात काही नाही. सामान्य घरातील एका तरुणाचा कट्टरतेकडे होणारा प्रवास या नाटकात मांडला आहे. फक्त तो तरुण सोयीच्या काश्मिरातील किंवा अल्पसंख्य समूहातील किंवा निम्नवर्गातील नाही ; किंवा तो पिचलेल्या वर्गातील नाही किंवा नक्षलवादी वगैरेही दाखवलेला नाही. सर्वसामान्य पार्श्वभुमीचा, आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गातला, सामाजिक उतरंडीवर  उच्च वर्गातला आणि सुशिक्षित असणाऱ्या एका तरुणाचा प्रवास हे नाटक दाखवते. एका अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा खून एका अतिरेकी/तालिबानी वृत्तीच्या लोकांनी केलाय असं हे नाटक थेट म्हणतं. आता यात धाडसी म्हणावं असं काय आहे असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती असती तर या नाटकाची गरजच भासली नसती. मात्र सद्य सामाजिक परिस्थितीत या नाटकातील अनेक प्रसंग/मांडणी/संवाद धाडसी वाटावेत हे नाटकाचं यश की आपलं समाज म्हणून असलेलं अपयश म्हणायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं

तर नाटकाकडे वळूया. याची कथावस्तू आधी म्हटलं तशी एका मध्यमवर्गातील तरुणाभोवती फिरते. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला तो आहे, आई गृहिणी, वडील व्हीआरेस घेऊन निवृत्त झालेले नोकरदार अशी पार्श्वभूमी. त्याला एक प्रेयसी आहे ती एका विख्यात न्यूज अँकरची आणि शिल्पकार आईची मुलगी आहे. तिची आर्थिक स्थिती तरुणापेक्षा चांगली आहे नि तिच्या घरचं वातावरण उदारमतवादी आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर पुरेपूर विश्वास ठेवणारं आहे. यात एक तिसरी व्यक्ती आहे 'गुरू'. हा  'एस.एस.एस.' या संस्थेचा स्थानिक नेता. मूळचा गरीब, अर्धशिक्षित पण गेल्या काही वर्षांत त्याने जमवलेला भरपूर पैसा अनेकांच्या कुतूहलाचा/असूयेचा नि प्रसंगी कौतुकाचा विषय. या सगळ्याला पार्श्वभूमी आहे महाराष्ट्रात एका अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या व्यक्तीचा खून झाल्याची. त्या खुन्याला अद्यापही अटक झालेली नाही असे सुरुवातीलाच कळते आणि नायिकेचा पत्रकार बाप त्याची माहिती गोळा करतोय. एके दिवशी हा 'गुरू' नायकाच्या घरात शिरतो आणि तिथून सगळ्याच पातळ्यांवर सुरू होतो थरारक प्रवास. यातून आपला नायक कट्टरतेकडे वळतो का? मूळ खुनाचा तपास लागतो का? नाटकातील पात्रांचा प्रवास कसा होतो? वगैरे अनेक गोष्टी मोठ्या रंजकतेने रंगवल्या आहेत त्या नाटकातच बघण्यासारख्या आहेत.

या नाटकातील सर्वच अभिनेत्यांचा अभिनय कमालीचा सहज आणि कसदार आहे. यात कोणाही एकाचं नाव घेता यावं असं कोणाही एकाने नाटक 'खाल्लेलं' नाही ही आणखी एक जमेची बाजू. हरेक घटक, हरेक पात्र कमालीचं समरस होत एक पूर्णं कलाकृती डोळ्यापुढे येते. नाटकाचं लेखन ही आणखी एक जमेची बाजू. अंजनेयाचं पात्र असो वा तीनही स्त्री व्यक्तिरेखा - या चारही पात्रांची गुंतागुंतीची उभारणी तपशीलवार आणि रंगतदार झाली आहे. तुलनेने गुरुचं पात्र, त्याचे कंगोरे नीट उभे राहत नाहीत. या पात्राला पूर्णपणे काळाकुट्ट रंग फासला गेलाय. त्याची स्वत:ची म्हणून (किमान त्याने स्वत:ला पटवलेली) काही भूमिका अशी येतच नाही. अर्थात सशक्त अभिनयामुळे या बाबींचा तितकासा त्रास होत नाही पण तरी इतर पात्र ज्या ताकदीने उभी राहतात त्यापुढे मला हे पात्र एका रंगात रंगवून् 'व्हिलन' न करता इतर पात्रांसारखं "माणूस" केलं असतं तर अधिक आवडलं असतं. गुरू सोबत असलेले त्याचे दोन सहायक यांचं सुरुवातीला थोडं तरी प्रयोजन असलं तरी पुढे त्यांची अंतर्गत भाजणी व व्यवस्था गंडत कशी नाही याचं आश्चर्य वाटत राहते. अशा लहानसहान कारणाने एकूणच गुरु हे पात्र 'टेलरमेड' अर्थात मागणीनुसार रचलेलं समजत राहतं. 

इतर तांत्रिक अंगांकडे पाहायचं तर बोट ठेवायला जागा नाही. स्टेजवरील स्क्रीनचा वापर, रॅप बाजातील गाण्यांनी किंवा बातमीपत्रांनी किंवा मध्येच येणाऱ्या माहितीपत्रांनी, किंवा शेवटी 'वाय' चिन्हाचं महत्त्व सांगणारा शेवटानी एकूणच नाटकाला वेगळा आयाम लाभला आहे. एखादा लेख वाचताना एखाद्या जागी लिंक यावी आणि त्यावर क्लिक करताच त्या गोष्टीला अधिक स्पष्ट करणारं काही पॉप-अप व्हावं असा फील त्या स्क्रीनवरील गोष्टींनी येत राहतो. एकूणच नाटकाचा सुरुवातीचा मिश्किल अंडरटोन नेमक्या ध्वनी-पार्श्वसंगीत नि प्रकाशयोजनेमुळे कैच्याकै उठावदार झालाय त्याबद्दल एकूणच तांत्रिक चमूला हॅट्स ऑफ! (वेषभूषा मात्र अधिक 'खरी' वाटायला लावणारी चालली असती विशेषतः गुरु आणि एसेसेस च्या कार्यकर्त्यांची. पण ती क्षुल्लक बाब म्हणता यावी)

काही बाबी थेट नजरेला नजर भिडवून सांगितल्यावर जितक्या भिडतात तितक्या त्या क्लिष्ट प्रतीकं वापरून भिडतीलच असे नाही. जो मुद्दा मांडायचाय तो असा थेट नी आडवळणे न घेता -अनलंकृतपणे- मांडत हे नाटक जिंकतं. पण थेट म्हणजे भडक नव्हे, साटल्य न हरवता पुरेसं तुमच्या डोळ्यात बघून तुम्हाला सरळपणे ते महत्त्वाचं काही सांगतं. प्रेक्षकांपैकी ज्या 'टार्गेट'वर्गाला चार गोष्टी ऐकवायच्यात त्यांना समोरासमोर "बघा तुम्ही कसे वागताय" असे सांगणं अशावेळी एकीकडे धडकी आणि दुसरीकडे कौतुक वाटायला लावतं खरं. अशी नाटकं व्यवसाय किती करू शकतील माहीत नाही पण एकदा हे नाटक व्यावसायिक मंचावर किमान २०-२५ प्रयोगांसाठी तरी करून बघा असं निर्मात्यांना सांगावंस मात्र नक्की वाटतं. 

बाकी, या नाटकाचा प्रयोग आहे असं तुम्हाला  समजलंच तर मात्र संधी दवडू नका हे  सांगायला नकोच! 

छायाचित्र श्रेय: 
पोस्टर: अमेय सवडकर. 
छायाचित्रे: हर्षवर्धन पाठक.

Y - चित्रपटाची /नाटकाची माहिती

Y
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: श्रीरंग गोडबोले, विभावरी देशपांडे
  • कलाकार: क्षितीश दाते, राधिका इंगळे, विभावरी देशपांडे, श्रुती आठवले
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१७
  • निर्माता देश: भारत