बाबाचा ताबा आणि मराठी उरफुगवे मन!

-पंकज भोसले

गेल्या काही आठवड्यांत प्रियांका चोप्रा हिचे मराठी गीत ‘बाबा’ यू ट्युब आणि इतर सामाजिक माध्यमांतून जोमाने पसरत आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीने मराठीत गीत गायल्यामुळे मराठी चित्रपट लोकप्रिय होण्यात किंवा आशयघन चित्रपटांसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक लोटण्यात मराठी पाऊल पुढे पडणार आहे का, याबाबत काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न...

----------------------------------------------

थोडे गाण्याविषयी..

आधीच इंग्रजी गाण्यांचा अल्बम लोकप्रिय वगैरे करून प्रियांकाने संगीत क्षेत्रातही उडी मारली आहे. यापूर्वी तिने तमीळ गाणे गायल्याचेही अल्पसंशोधनात कळते. आता प्रियांकाचे मराठी गीत तिच्या ‘कळले’, ‘अर्थ खरेच’, ‘समजेना’ ,‘खर्च’, ‘पांग’ या शब्दांच्या तिच्या हिंदीसदृश उच्चारांमुळे किंचितसे वेगळे वाटते. तरीही ते कानांना सुखावणारे नक्कीच आहे. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये मराठी टीव्ही मालिकांपासून ते चित्रपटांमध्ये बॉलीवूडमधून आयात गायकांची गाणीच लोकप्रिय झाल्याची अनेक उदाहरणे सध्या आहेत. (पूर्वी हेमंत कुमार, किशोर, रफी, अमित कुमार, महेंद्र कपूर यांनी गायलेले मर्हाटी चित्रसंगीतही कानसेनांच्या मुखकोषात असेल.) त्यामुळे त्यांच्याकडून मर्हाटी सु-उच्चारांची अपेक्षाच नाही. मराठी घरांमध्येही आपण शब्दांचे किती अचूक उच्चार करतो, हा प्रश्नही आहे. या गाण्यात प्रियांकाचा सुरुवातीपासून जाड पोत असणारा आवाज सुश्राव्य बनला आहे. रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे मनोज यादव यांच्या शब्दांतला मूड अचूकरीत्या टिपते. गीतभर मध्यसप्तक आणि अंताला तार सप्तकात वापरली जाणारी बासरी, गिटार आणि व्हायोलिनचा वापर यांच्या जोडीला प्रियांकाने ओतलेला जीव यांनी गाणे परिपूर्ण झाले आहे. प्रियांका चोप्रा हिची भारतीय चित्रसृष्टीत अष्टपैलू अशी ख्याती आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अमेरिकी टीव्ही मालिकेमुळे - ‘क्वाण्टिको’मुळे - ती पुरती वैश्विाक झाली आहे. तिची तेथली भारतीय उच्चारशैली तिकडे टीकेचा विषय असली, तरी आपल्याला गर्वसंपृक्त करणारी वाटते. आपल्याकडच्या गुळगु़ळीत पुरवण्यांमध्ये प्रियांकाचे तिच्या वडिलांशी असलेले नाते बर्यापैकी चर्चिले गेले आहे. त्यामुळे केवळ प्रसिद्धितंत्राचा भाग म्हणूनच याकडे पाहता येणे कठीण आहे.

प्रसिद्धी आणि अर्थकारण

मराठी सृष्टीत बॉलीवूड तारांगण लोटणे हे अर्थकारणाशी संबंधित आहे. सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ गब्बर कंपन्यांच्या लक्ष्यात आली, तेव्हा ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’ किताब पटकविण्यासाठी भारतीय ललना पुढे आल्या; त्याच प्रकारे मराठीतील अल्प गुंतवणुकीतून दीर्घ लाभाचा विचार बॉलीवूड कंपन्यांकडून होत आहे. सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्सने वळू चित्रपटात किंवा अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने विहीर चित्रपटामध्ये गुंतवणूक करणे यांपासून सुरू झालेली परंपरा आता पसरत चालली आहे. सध्या हिंदी चित्रपटाचे बजेट १०० कोटींच्या आसपास जाते. याउलट मराठी चित्रपट जास्तीत जास्त तीन ते चार कोटींच्या बजेटमध्ये आटोपते घेतो. या चित्रपटांमध्ये हिंदी चित्रकर्त्यांची गुंतवणूक म्हणूनच कुटीरोद्योगासारखी भासते. त्यामुळे बॉलीवूडकडून मराठी चित्रपटात गुंतवणूक झाली, की आधी येथील माध्यमांत त्याची पोटतिडकीने बातमी केली जाते. त्यानंतर तडस लागेस्तोवर गुंतवणुकीची स्तुती केली जाते. मग भावनोत्कट झालेल्या मराठी मनांमध्ये चित्रपटाची एक प्रतिमा निर्मिती होते. परिणामी चित्रपट चालला तर उत्तमच. नाही चालला तरी तोट्याची मात्रा कमी होते. हिंदी चित्रपटासाठी तिकीटबारीवरचे यशगणित हा आतबट्ट्याचा व्यवहार असतो. पायरसीने आधीच तिकीटबारी संकुचित केलेली असताना प्रेक्षकांना चित्रगृहाकडे आकर्षित करण्यासाठी म्हणूनच छोट्या पडद्याच्या जनप्रिय कार्यक्रमांना प्रसिद्धीसाठी वापरण्याची टूम अलीकडे वाढली आहे. याबाबत आपली भारतीय सिनेसृष्टी पूर्णपणे अमेरिकी झाली आहे. मराठी प्रेमाचा पुळका भासवत कुणी आपल्या कार्यक्रमांत ‘मर्हाटी बोलू-नाचू-गाऊ’ लागला की त्यातला हेतू स्पष्ट होतो.
 

अमेरिकी रेकॉर्डिंगचा बडेजाव

काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे लोकप्रिय चित्रपटातील एक गीत अमेरिकी स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केल्याचा बराच गवगवा करण्यात आला. गीत इतके सुंदर होते की ते भारतात किंवा आफ्रिकेतल्या कुठल्याही स्टुडिओत तसेच ध्वनिमुद्रित झाले असते आणि तितकेच चालले असते. अमेरिकेतील रेकॉर्डिंग यंत्रणेइतकीच सुसज्ज यंत्रणा भारतातील मुंबई-पुणे आणि ठाण्यांतल्या कित्येक स्टुडिओजमध्ये निर्माण झाली आहे. वैयक्तिक खासगी स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झालेली गाणी ट्युबवर पाहिली-ऐकली असल्यास हे सहज लक्ष्यात येईल. तेव्हा ’बाबा’ हे गाणे अमेरिकेत रेकॉर्डिंग केले असल्याची प्रसिद्धीसाठी वापरली गेलेली माहिती फुकाची आहे. जगातील सर्वोत्तम संगीत रेकॉर्डिंग (यात हॉलीवूडच्या जेम्स कॅमेरॉनपासून सर्वच दिग्गज दिग्दर्शक येतात) न्यूझीलंडच्या वेटा स्टुडिओत होते. आपल्याकडचे न्यूझीलंडमध्ये ध्वनीमुद्रण ऐकायचे असल्यास लकी अलीचे सुरुवातीचे अल्बम आवर्जून ऐकावेत. त्यातील ध्वनिगुणाची कल्पना येईल.

 

गीत प्रसिद्धितंत्राचा अल्पइतिहास

चित्रपट यशस्वी करण्यासाठी गाणी किती महत्त्वाची असतात, याची १९४०च्या दशकापासूनची प्राचीन उदाहरणे बरीच आहेत. अर्वाचीन उदाहरणांत जुना ’आशिकी’ चित्रपट प्रथम असेल. गाणी गाताना तोंड कायच्या काय मोठे करणारा राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या दोहोंची अभिनयकुपोषितता मारून चित्रपट हिट ठरला. महेश भट्ट यांच्या परकल्पनाप्रधान चित्रपटांमधली सगळीच गाणी त्या काळात ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ या प्रकारातली होती. १९९६नंतर पॉप अल्बम्सची क्रांती आली आणि लकी अली याच्या तत्कालीन प्रसिद्धीचा वापर ’कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांत करण्यात आला. त्याच काळात दलेर मेहंदी याच्या ‘ना ना रे नारे’ गाण्याचा वापर अमिताभ बच्चन अभिनित ’मृत्युदाता’ चित्रपटात करण्यात आला. एमटीव्ही आणि व्ही चॅनलचा जोर या काळात इतका होता की प्रसिद्धीचा सर्वात मोठा मार्ग म्हणून या वाहिन्यांकडे पाहिले जाई. दोन हजारोत्तर काळातील चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी यू-ट्यूब हे माध्यम सर्वश्रेष्ठ बनले. सामाजिक माध्यमे फोफावल्यानंतर आज यू-ट्युबची सद्दी थोडी थंडावली असली, तरी शाबूत आहे.

मराठीपणा आणि चित्रपटाचे यश 

मनोरंजनक्षेत्राच्या कृपेने मराठी माणूस आणि मराठी अभिमान यांना गेल्या काही दिवसांत अभूतपूर्व महत्त्व आले आहे. कोणे एके काळी छोट्या पडद्याला हिणवणारी आणि संसर्गभयाने त्याच्यापासून लांब राहणारी बॉलीवूड नगरीतील यच्चयावत तारांगणावळ ‘मराठी प्रेमा’पोटी छोट्या पडद्यावरच्या विनोदी कार्यक्रमात ’धम्माल’ वगैरे उडवून देत आहे. तमाम मराठी जनतेचा ऊर आणि डोळे यांना त्याद्वारे घाऊक भरतीचा आनंद मिळत आहे. म्हणजे ‘मराठीच्या पताका’, ‘मर्हाटीचे झेंडे’ फडकवण्याच्या अल्पविशेषणी शब्दप्रयोगांनी बाता मारण्याचे, त्यावर गीते रचण्याचे आणि त्यात परमसुखानुभूती घेण्याचे दिवस आता संपलेत म्हणे.

तर जागतिकीकरणाच्या प्रवाहात स्वतःला चिंब भिजवून आम्ही सगळ्याच क्षेत्रांतल्या देशीवादाच्या फुकाच्या गप्पा मारतो. सणा-समारंभांना सांस्कृतिक पेहराव करून कॉन्टिनेण्टल फूड हादडतो, आपल्या साहित्यातल्या नव्या प्रवाहांना कवेत घेण्याऐवजी सात दशकांपूर्वीच्या लेखनविचारांना कवटाळत साहित्याची ‘अमूप सेवा’ करतो. ‘अवीट गोडी’ची जुनी गाणी सभा-संमेलनांत पुन्हा-पुन्हा ऐकून आणि नको असताना लोकांना ऐकवून त्यांच्या मनात त्या गाण्यांविषयी तिटकारा निर्माण करतो. चवली-पावलीच्या हुल्लड हिंदी गाण्यावर नाचणारे मर्हाटी कलाकारांचे ‘गौरव सोहळे’ वर्षभर वाटेल तितक्या वेळा आम्ही कौतुकाने पाहतो. आमच्या मायभाषिक टीव्ही मालिकांमधील वैवाहिक ताणतणाव, सासू-सुनांचे तर्कटी विचार आणि असंबद्ध ‘संथा’ळ रडकथा आमचे पुरेपूर रसपरिपोषण करतात. एकीकडे घटत चाललेले वाचन, वैचारिक  कुपोषण, आक्रसत चाललेली नियतकालिकांची अवस्था या समस्या उग्र रूप धारण करीत असताना एकटे मनोरंजन क्षेत्रच अफूच्या गोळीसारखे मराठी मनाला ‘जगण्याचे बळ’ की काय ते देत आहे.

तर  वैश्विक अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यामुळे या आठवड्यात असे मराठी मनांना हुरळून जाण्याचे, हरखून जाण्याचे आणि ऊर-डोळे गच्च करण्याचे निमित्त मिळाले. तिची निर्मिती असलेल्या ‘व्हेण्टिलेटर’ या ताज्या चित्रपटातील ‘बाबा’ या गीताचे समाज माध्यमांद्वारे ‘प्रसारण’ झाले. त्याच्या वृत्तांची चळतचर्चा अद्याप माध्यमांमधून फोफावत आहे. यू-ट्युब, व्हॉट्स अॅप, फेसबुक आदींद्वारा ते गाणे लोकांपर्यंत पोहोचून घाऊकरीत्या ऐकले जात आहे. दोन-चार दिवसांत गाण्याला यू ट्युबवर नऊ लाखांहून अधिक दर्शक-श्रोते लाभले आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत ‘प्रियांकाचे मर्हाटी प्रेम’ अशा आशयाचे वृत्त वा वृत्तलेख आल्यास, दचकायला होणार नाही. गाण्याचा चित्रपटाच्या यशावर परिणाम होतो. त्यात प्रसिद्धितंत्राचा भाग म्हणून प्रियांकाचे ‘बाबा’गीत या गुणी चित्रपटात असणे मराठी माणसांच्या तिकीटबारीच्या वारीवर किती परिणाम करते हे पाहणे या निमित्ताने कुतूहलाचे ठरेल.

फेसबुक या समाजमाध्यमातील पुण्याच्याच कालच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे - ई-स्क्वेअर-कोणार्क येथील सकाळच्या ११.३०च्या खेळासाठी आम्ही तिघे गेल्यानंतर तेथे ‘व्हेण्टिलेटर’वर असलेल्या सहा-सात जणांचा जीव भांड्यात पडला. कारण चित्रपट सुरू करण्यासाठी किमान प्रेक्षकसंख्या तयार झाली होती. 

राज्यभरामध्ये या चित्रपटाचा बोलबाला आणि जाहिरात योग्यरीत्या पोहोचली असली, तरी चांगल्या चित्रपटांसाठी मोठ्या संख्येने चित्रगृहे भरून दाखविण्याची परंपराच मराठी मानसिकतेत अद्याप रुजलेली नाही. येथे बाष्कळ विनोदाला जवळ करणारे आणि तद्दन सुमार हिडीसतेचे प्रदर्शन करणारे चित्रपट लोकप्रिय होऊ शकतात आणि उमेश - गिरीश कुलकर्णी यांचे सिनेमे आर्टफिल्म म्हणून बाजूला ढकलले जातात. मर्हाटी लोकांना सतत वेगात घडणारं, वाक्यावाक्याला हसवणारे आणि उडत्या चालीवर थिरकवणाऱ्या गीतांचे मनोरंजन हवे आहे. वैचारिक विनोद किंवा आशयघन चित्रपटांना तातडीने नाकारण्यात मराठी पाऊल कायम पुढे आहे. हिंदीमध्ये असे प्रसिद्धीफंडे दहा-पंधरा वर्षांपूर्वीच लोकप्रिय झाले होर्ते. हिंदी पॉपची चळवळ लकी अली, दलेर मेहंदी यांच्यामुळे जोमात असताना, त्यांची चित्रपटातल्या फक्त गाण्यात वर्णी लागू लागली. जसपिंदर नरुला आणि रेमो फर्नांडिस यांचे ‘प्यार तो होना ही था’ नामक गाणे लक्षात असल्यास त्या गाण्याची लोकप्रियताही आठवू शकेल. पण गेल्या पंधरा-वीस वर्षांत प्रसिद्धितंत्राबाबत डोक्यावरून बरेच पाणी गेले आहे. कानांना इतके ग्लोबल संगीत चहूबाजूंनी ऐकायला येतेय की संगीतचवीबाबत आपण पुरते धेडगुजरी झालो आहोत. एम पी थ्री फॉरमेटमध्ये संगीत साठविण्याची क्लृप्ती आल्यानंतर आपल्याकडे गाण्यांचा जीबी आणि टीबी फॉरमॅटमध्ये भूषणावह स्टॉक आहे. ते संगीत निवांतपणे आस्वादायला वेळ मात्र ‘एमबी’च्या मात्रेतही उपलब्ध नाही. तरी चिमूटभर वाळू उचलून या क्षेत्रात तज्ज्ञ विश्लेषकांची कमतरताही नाही...

यू ट्युबवर प्रियांका चोप्राच्या या मराठी गीताला प्रतिक्रिया देणारा जगभरातील वर्ग आहे. या भाषेचा गंध नसलेल्यांच्या या गाण्यावरील प्रतिक्रिया वाचणे उद्बोधक आहे. सेकंदाला आणि मिनिटाला वाढत जाणारी हिट्सची आकडेवारी ‘उसेन बोल्टी’ वेगाने सरकतेय. मराठी प्रतिक्रियांचे सुलट आणि उलट नमुनेही बक्कळ आहेत. पण मराठीत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीचे गाणे असणे मर्हाटी मनांना चित्रगृहात ओढण्यात किती फायदेशीर ठरते, त्यावरून पुढील आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींचा मराठी चित्रपटांमध्ये गीतवावर ठरणार आहे. गेल्या आठवड्यातल्या आकडेवारीवरून ते लक्ष्यात येणार आहे.

हा लेख लिहायला घेतला तेव्हा (४ मिनिटे १२ सेकंदाचे व्हर्शन) दीड तासांपूर्वी या गाण्यावरील हिट्सची संख्या ९ लाख ६१ हजार ४२६ होती. लेख संपवताना ती ९ लाख ७४ हजार ३२४ आहे. लेख छापून वाचून होईस्तोवर गंमत म्हणून पडताळल्यास हिट्सची आकडेवारी अचंबित करणारी असेल. तिकीटबारीवरील आकडेवारी वाढविण्यात त्यातील मराठी उरफुगवी मने कधी आणि किती सक्रिय होतील हा संशोधनाचा विषय असेल.

-पंकज भोसले

व्हेंटिलेटर (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

व्हेंटिलेटर (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: राजेश मापुसकर
  • कलाकार: आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सतीश आळेकर, सुकन्या मोने, सुलभा आर्या
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: -
  • निर्माता देश: भारत