इस्मत आपा के नाम

इस्मत चुगताई यांच्या कथा हे वेगळंच प्रकरण. त्यांच्याच (अनुवादित)शब्दांत म्हणायचं तर आपल्याला जे म्हणायचंय ते किस्से-कहाण्यांमधून सांगितलं तर ते अधिक लोकांपर्यंत पोचतं आणि मिळणार्‍या शिव्याशापांची गणती कमी होते. त्यांच्या या किस्से-कहाण्यांमध्ये गल्लीतल्या भिकारिणीपासून ते उतरत्या वैभवातले नवाब-उमराव, वेगवेगळ्या नात्यांतल्या घरगुती स्त्रिया , भांडखोर शेजारी असे सगळेच येतात. त्यांची स्त्रीपात्रं थेट, टोकदार तर होतीच, पण ज्या काळांत त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं त्या काळाच्या मानाने ती पात्रं बंडखोर आणि धाडसी होती. असं असूनही इतक्या विविध लेखनातही त्यांच्या पात्रांची कुठे पुनरावृत्ती झालेली दिसत नाही हेही विशेष.

एखादी भाषा किंवा लिपी माहित नसेल, तर त्या भाषेतल्या साहित्याला वाचक वंचित राहातो. अनुवाद अशा वेळेस कामी येतात. पण मग चपखल शब्दयोजना झाली नाही, तर नेमकी शब्दच्छटा हरवते, तर कधी अनुवादाच्या भाषेत प्रतिशब्दही नसू शकतो. हे ध्यानात घेऊन आणि नव्या पिढीसमोर आपल्या मातीतल्या थोर लेखकांच्या कलाकृती मांडाव्यात या दोन उद्देशांनी नसिरूद्दिन शाह 'मोटली प्रॉडक्शन'तर्फे 'इस्मत आपा के नाम'चे प्रयोग करत आहेत. 'इस्मत आपा के नाम' हे इस्मत आपांच्या कथांचं एका शब्दाचाही बदल न करता मूळ स्वरूपात सादरीकरण. फक्त ते कंटाळवाण्या एकसुरी प्रकारात न वाचता त्यांनी एकपात्री प्रयोगाच्या स्वरूपात थोड्याशा नाटयमयतेनं पेश केलंय. याप्रयोगांतर्गत 'छुई मुई', 'मुगल बच्चा' आणि 'घरवाली' या तीन कथा अनुक्रमे हीबा शाह , रत्ना पाठक-शाह आणि नसीरूद्दिन शाह यांचं सादर करतात. मूळ कथा सुंदर आहेत यात वाद नाहीच परंतु या नाट्यमयतेनं या कथांची खुमारी आणखीच वाढते.

 

'छुई मुई' म्हणजे लाजाळू, स्पर्श होताच मिटून जाणारी लाजाळू. मुस्लीमच नव्हे तर कोणत्याही घरातल्या स्त्रीचं अस्तित्व आणि महत्व तिच्या जननक्षमतेवर ठरतं. त्यात मुलगा असेल तर आणखी उत्तम. अशा वेळेस वारंवार होणार्‍या आपसूक गर्भपातांनी हैराण व हवालदिल झालेली दुल्हन बेगम, तिची नोकरानी बी-मुघलानी अन् अचानक डब्यात येऊन अनौरस मुलाला जन्म देणारी युवती यांची ही कथा आहे. इस्मत आपांच्या कथांमध्ये बरेचदा प्रथमपुरूषी निवेदन असतं. इथं त्या लहान मुलीच्या स्वरूपात त्याच डब्यात असतात. हीबा कधी डोक्यावर मध्यमवयीन प्रौढेसारखी ओढणी घेऊन मधमवयीन बी-मुघलानी बनते, कधी लहानगी इस्मत बनते तर कधी तीच ओढणी नजाकतीनं पांघरून दुल्हन बेगम होते. त्याच ओढणीचं प्रसंगी छातीशी असोशीनं धरलेलं बाळ बनतं तर कधी ट्रेनचा डबा झाडायला वापरलेलं तिच्या अंगावरचं जुनेर. अगदी कमीत कमी गोष्टी वापरून ही सगळी पात्रं प्रेक्षकांसमोर अत्यंत सुंदरपणे सादर होतात.

'मुघली बच्चा' ही पोकळ डामडौलारा अजूनही मिरवणार्‍यांची आणि त्याच विश्वात जगणार्‍यांची गोष्ट. त्या राहणीतला दांभिकपणा अधोरेखित करत रत्ना पाठक ही कथा माजघरात गॉसिप्स सांगावीत अशा थाटात इतक्या सहजपणे सांगतात की हे एखाद्या कथेचं पाठांतर आहे यावर विश्वास बसणं कठीण व्हावं. बरं,प्रत्यक्षात असं काही कुणी कुणाला सांगत असेल, तर उगीच एके ठिकाणी बसून नाटकी अविर्भाव करत नाही. इथं हे अगदी नेमकं साधलंय. त्या आपल्याशी बोलता बोलता पानपुडा उघडून अगदी नजाकतीनं (नसलेलं) पान बनवतात, खातात, थोड्या वेळानं तोंडावर हात धरून दातांत अडकलेली सुपारी काढतात, सुरईतलं पाणी घेऊन 'वझू' करतात आणि नमाजही पढतात. पानाचा तोबरा धरून बोलताना त्यांच्या तोंडात पान नाहीय हेही केवळ आपण स्वतः पाहिलं असल्यानंच पटावं.

'तिसरी कथा' आहे घरवाली. अनाथ आणि विचारांनी मोकळी ढाकळी आणि तितकीच रोखठोक लाजो आणि तिच्या मालकाची-मिर्झांची ही कहाणी. मिर्झांचं स्वतःच्या घरीच चोरासारखं वागणं, लाजोकडे आकर्षित होणं, तिचा उघडा पाय पाहून त्यांची होणारी उलघाल हे कमी की काय म्हणून त्यांनी ज्याप्रकारे लाजो त्यांना स्वयंपाकघरात ओढून नेते हे दाखवतात ते तर एकदम लाजवाब. या कथेत खूपशा सूक्ष्म जागा आहेत आणि त्या जागा नसिरूद्दिन शाहांनी अक्षरशः खाल्ल्या आहेत. बेरकीपणे एक डोळा बारीक करणं, हळूच मिर्झांची घालमेल आणि पापभीरूता दोन्हीही दाखवणं, लाजोची घुसमट, गल्लीतले संधीसाधू लोक, एक ना दोन!! सगळी कथाच जिवंत होऊन रंगमंचावर बागडायला लागते.

मोजकं आणि अगदी व्यवस्थित योजनाबद्ध नेपथ्य ही 'इस्मत आपा के नाम'ची आणखी एक जमेची बाजू. आहे तेच नेपथ्य थोड्ंसं अदलून बदलून तिन्ही कथांमध्ये वेगळं वातावरण तयार करतात. विशेष म्हणजे ही सगळी सामानाची आतबाहेर ने-आण, मांडामांड आणि आवराआवर 'घरचंच कार्य' असल्यासारखी नसिर-रत्ना-हीबाच करतात. एक पलंग, त्यावर तिन्ही कथांसाठी एकानंतर एक काढून टाकत वापरलेले तीन वेगवेगळे पलंगपोस, दोन-चार लोड , एक आरामखुर्ची, एक दिवा, पानपुडा आणि एक-दोन पाण्याच्या सुरया इतक्याच प्रॉपर्टीवर हा सगळा डोलारा उभा राहातो. आणि एका कथेतून दुसर्‍या कथेकडे प्रेक्षकाला नेतो. नेपथ्याप्रमाणेच वेशभूषाही तितकीच नेटकी आहे. विशेषतः रत्ना पाठक शाह आणि नसिरूद्दिन शाह यांचे खास लखनवी थाटाचे कपडे वातावरण आणखी गहिरं करतात.

कार्यक्रम संपता संपता आपसूक तिन्ही कथांची तुलना होते. साहजिकच रत्ना आणि नसिर यांच्या तुलनेत हीबाच्या अभिनयाला मर्यादा आहेत. त्यातही तिच्या कथेतले शब्द जरासे 'जड' किंवा संदर्भानेही अर्थ पटकन लक्षात न येण्यासारखे आहेत. मी पाहिलेल्या प्रयोगात तिच्या कुर्त्याला लावलेला कॉलरमाईक कधी ओढणीमुळे घासला जाऊन तर कधी झाकला जाऊन तिचा आवाज सुस्पष्ट ऐकू येत नव्हता. ज्या लेव्हलवर प्रेक्षक 'मुघल बच्चा' आणि 'घरवाली'मध्ये समरस झाले होते, ती अनुभूती काही कारणाने पहिल्या कथेत साधली गेली नाही. किंबहुना काही प्रेक्षकांना या कथेचं प्रयोजन पटलं नाही. उलट जिथे 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी"सारखं लैंगिकतेवरचं नाटक चालतं, तिथं 'लिहाफ़' (रजई) सुद्धा लोकांना चालेलच असा थोडाफार चर्चेचा सूर होता. नसिरूद्दिन शाह यांना प्रेक्षक अधिक चांगल्या प्रकारे माहित असावेत, त्यांनी त्यांच्या'घरवाली' कथेत अशा शब्दांचा जाता जाता अर्थ सांगितला आणि माईक कपड्यांच्या आत लपवला असला तरी त्यांच्या वाणीच्या सुस्पष्टतेत त्यामुळे काहीच अडथळे आले नाहीत.

 

हा तीन कथांचा एक तास वीस मिनिटांचा प्रयोग. एकेक कथा तब्बल चाळीसेक मिनिटे चालतेच. इतका वेळ एक पूर्ण कथा तोंडपाठ साभिनय सादर करणं आणि तीही अस्खलित उर्दूत हे खायचं काम नाही. मी पाहिलेल्या प्रयोगाच्या अखेरीस सार्‍या प्रेक्षकांनी पूर्ण चमूला उभे राहून मानवंदना दिली. तेव्हा यात 'त्यांच्या परफॉर्मन्सपेक्षा लोकांच्या मनातल्या फॅन्सनी अधिक दाद दिलीय' असं म्हणणंही नसिरूद्दिन यांचा विनय. भाषा हे प्रभावशाली माध्यम आहे. प्रत्येक लिखित आणि बोलीभाषेची स्वतःची बलःस्थानं आहेत. मूळ लेखनास धक्का न लावता ज्या भाषेत ते लिहिलं गेलं, त्याच भाषेतून सहजपणे आणि वेगळ्याप्रकारे केलेलं अशा प्रकारचं सादरीकरण हा एक स्तुत्य आणि सुंदर पायंडा आहे. या धर्तीवर काही मराठी कथांचंही एकपात्री नाट्यीकरण झालेलं पाहावयास खरंच आवडेल.

इस्मत आपा के नाम - चित्रपटाची /नाटकाची माहिती

इस्मत आपा के नाम
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: नसिरूद्दिन शाह
  • कलाकार: नसिरूद्दिन शाह, रत्ना पाठक-शाह, हीबा शाह
  • चित्रपटाचा वेळ: १ तास वीस मिनिटे
  • भाषा: -
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: -
  • निर्माता देश: भारत