बिंज वॉचिंग - डाऊनटन ऍबी

एका भल्या मोठ्या वाड्यात एक अतिश्रीमंत कुटुंब राहतेय, कुटुंबप्रमुख आपल्याला वारसाहक्काने मिळालेल्या वतनावर राज्य करत आहे. घरात नोकर-चाकरांचा राबता आहे. कुटुंबप्रमुखाला तीन मुली आहेत आणि त्यामुळेच त्याच्या पूर्ण संपत्तीचा वारसा त्याचा दुरच्या एका नातेवाईकाकडे गेला आहे. संपत्तीवर ताबा ठेवण्यासाठी त्याला आपल्या मोठ्या मुलीचा विवाह या वारसाशी करायचा आहे. असे काही कथानक वाचून वाटतोय ना एखाद्या चोप्रा-जोहर टाईप सिनेमाचा प्लॉट?  जर मी सांगीतले अशा प्लॉटची एक मालिका आहे आणि अगदी बघण्यालायक आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? अरे,  मुरडलीत ना नाके? असे नका करू, कारण ह्या मालिकेची गंमत वेगळीच आहे.  हे कथानक घडते इंग्लडमधल्या यॉर्क परगण्यातल्या डाऊनटन नावाच्या गावात. कथा घडतीये विसाव्या शतकाच्या पहिल्या-दुसर्‍या दशकात आणि कदाचित याचमुळे ही मालिका सोप -ऑपेरा टाईपच्या नाट्याच्या पलीकडे  जाते.

 

रॉबर्ट क्रॉली हा “अर्ल ऑफ ग्रॅंथम” म्हणजेच लोर्ड ग्रॅंथम हा आपल्या अतिश्रीमंत कुटुंबाचा प्रमुख. अर्ल म्हणजे तिथला जहागिरदारच म्हणा ना! तर त्याची पत्नी कोरा ही “लेडी ग्रॅंथम” आणि त्याच्या तीन मुली मेरी, सिबिल आणि एडिथ यांच्यासह  डाऊनटन नावाच्या गावात आपल्या मोठ्या वाड्यात राहात असतो. वर सांगितल्याप्रमाणे त्याची मोठी मुलगी मेरी हिचे लग्न वारसाहक्क असलेल्या जेम्स क्रॉली याच्याशी ठरवलेला असतो. पहिल्याच भागात टायटानिक या जहाजाच्या बुडण्याची बातमी डाऊनटनमध्ये पोहचते आणि त्यात जेम्सचा मृत्यू झाल्यामुळे सर्वांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण  होते. मॅथ्यू क्रॉली हा दूरचा नातेवाइक या संपूर्ण संपत्तीचा वारस होतो. पहिला सिझन हा मॅथ्यू आणि मेरी यांच्या संबंधावर आणि मॅथ्यूची राजेशाही जीवनपद्धती स्वीकारण्यास असलेल्या विरोधाच्या अवतीभवती फिरते.  या सोबतच कथानकाचा महत्वाचा भाग हा घरात खालच्या भागात राहणार्‍या नोकरचाकरांच्या जीवनाकडे फ़िरतो. कार्लसन हा पारंपारीक विचारसरणीचा म्हातारा या सगळ्यांचा प्रमुख म्हणजेच बटलर असतो. त्या सोबत सर्व लॉर्ड लोकांना त्यांचा स्वत:चा असा एका खास सेवक म्हणजे वॅले असतो. तर प्रत्येक लेडी असणारीला लेडीज मेड. त्यानंतर घरकामाला असणार्‍या हाउस मेडस. तसेच घरातील इतर कामे करण्यासाठीच आणि जेवण वाढायला, कारचे दार उघडायला असणारे वेगळे नोकर म्हणजेच फ़ुटमन(त्यातही फर्स्ट फूटमन, सेकंड फूटमन हे आहेच). स्वयंपाक करण्यासाठी असणार्‍या कुक, असिस्टंट कुकस, किचन मेडस. तर अशी ही खालच्या मजल्यावरची उतरंड आणि त्यांचे एकमेकांसोबत व वरच्यामजल्यावरच्या लोकांसोबत  असणारे संबध हाही कथानकाचा मुख्य भाग आहे.   बेट्स नावाचा वॅले, बॅरो नावाचा फ़ुटमन, ग्वेन, ऍना नावाच्या हाउसमेडस, मिसेस ह्यूज ह्या हाउसकीपर, मिसेस पॅटमोर या कुक ही सारी या कथानकातली काही मुख्य पात्रे. जंत्री भलीमोठी आहे खरी!!

टायटॅनिकचं  बुडणं म्हणजे १९१२ सालापासून सुरु झालेले कथानक पुढच्या सहा सीझन मध्ये अनेक ऐतिहासिक घटनांच्या समांतर घडत जाते. यातल्या बर्‍याच घटनांचा थेट परिणाम डाऊनटनमधल्या व्यक्तिरेखांवर होतो. पहिले बाल्कन युद्ध, स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी चालू असलेली चळवळ, लेबर पार्टीची निवडणूकीत होत असलेली सरशी अशा अनेक घटना चालू असतानाच, ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ़र्डिनांड याचा झालेला मृत्यू आणि त्या नंतर सुरु झालेले पहिले महायुद्ध हे या मालिकेच्या कथानका मध्ये एका महत्वाचा टप्पा ठरते. पहिलं महायुद्ध अगदी वरच्या उतरंडीपासून तळागाळात पोचतं आणि त्यात लॉर्ड ग्रँथम,  मॅथ्यू आणि ऍबी मध्ये कामावर असेलेले फूटमन्स-  थॉमस बॅरो आणि मेसन यांसह अनेक लोक इंग्लंडच्या बाजूने युद्धात भाग घेतात. युद्धात जायबंदी झालेल्यांसाठी डाऊनटनमधलं हॉस्पिटल अपुरं पडतं आणि अधिकार्‍यांसाठी म्हणून पहिल्यांदा ऍबीमध्ये इतर लोकांचा प्रवेश होतो. ही अर्थातच त्या लोकांसाठी मोठी घटना ठरते. पूर्वीपासूनच व्यापक विचारसरणी असलेली सिबिल आणि आधी अनिच्छेने पण नंतर समरसतेने मोठ्या दोघीही लोकांच्या शुश्रूषेत सामील होतात. हे सर्व संपल्यानंतर मात्र वरच्या मजल्यावर राहणार्‍या लोकांना पहिल्यांदाच आयुष्यात रिकामेपण जाणवायला लागते आणि  सिबिल आपल्या जुन्या थाटाचा जीवन पद्धतीचा त्याग करु इच्छिते.

 

मुळात डाऊनटन चा गाभा हा यातल्या व्यक्तिरेखा आणि बदलणार्‍या काळासोबत बदलत जाणार्‍या   जीवनमानाचा स्वीकारकरण्याबद्दल आहे. हे घर जगात घडणार्‍या तांत्रिक बदलांना पण सामावून घेतं. घरात टेलिफोन येणं, राजघराण्यातील लोक रेडीओवर भाषण देणार म्हणुन घरात रेडीओ लावला जाणं, फ्रीज, मिक्सर, टोस्टर, ब्लेंडर या सगळ्या प्रकरणांचा प्रवेश आणि पहिल्यांदा ते हाताळताना लोकांची उडालेली धांदल पाहताना जाम मजा येते. या सर्व गोष्टी आपल्यासोबत आणखी मोठ्या बदलांची सुरूवात घेऊन येतात. उदाहरणार्थ जेव्हा फोन  कंपनीचा लोक घरात फोन बसवायला येतात तेव्हा लेडी सिबिल घरातल्या ग्वेन नावाच्या हाउसमेडला ’फोन कंपनी’ या नव्याने निर्माण झालेल्या नोकरीप्रकारात  सेक्रेटरीची नोकरी मिळवून देते. यामुळे तीच ग्वेन पुढे सहाव्या सीझनमध्ये  नोबलवुमन म्हणून ऍबीमधल्या मुख्य दिवाणखान्यात या सर्वांसोबत जेवण करू शकते हे फक्त तिच्याच आयुष्यातलं नाही तर डाऊनटन ऍबीमध्ये घडणारं मोठं स्थित्यंतर आहे. १९२० च्या आधुनिक  काळात देखील या गोष्टींचा स्वीकार करणे ही खूप मोठी बाब आहे असे एकदा लॉर्ड ग्रॅंथम म्हणतात सुद्धा.  मुळात आजूबाजूच्या अनेक इस्टेटी दिवाळखोरीत निघून लोक लंडन मधल्या छोट्या घरात स्थलांतरीत होत असताना आपली इस्टेट टिकवून ठेवणे, त्यासोबत होणार्‍या सामाजिक बदलांना स्वीकारताना असणारे-(आपसूक आणि नाईलाजाने)बदलत जाणारे असे दोन्ही विचारप्रवाह आणि चर्चा पाहताना जाम मजा येते. भल्यामोठ्या इस्टेटी आणि शेतावरची कुळं, घरच्या नोकरांचा लवाजमा हे कालांतराने डोईजड होत जातात. हळूहळू त्यात कसे बदल होतात हे तर आहेच, पण जे या बदलाला पटकन अनुकूल होऊ शकले नाहीत त्यांची विपन्नावस्थाही इथे तपशीलात येते. इस्टेटीच्या वारसांचे गोंधळ फक्त ऍबीमध्येच नाहीत, तर इथे जसं मॅथ्यूला अचानक धनलाभ झाला तसा इतर इस्टेटींमध्येही काही लोकांना होतो. मूळ मालक मरण पावला म्हणून शोक करावा की आपली जवळची व्यक्ती अचानक धनिक झाली म्हणून आनंद व्यक्त करावा याचं कोडंही काहीवेळा या लोकांना पडतं.

या मालिकेत नक्की एक बलस्थान सांगता येणं अवघड आहे. ऐतिहासिक घटना आणि त्यांची कथानकासोबतची सांगड, व्यक्तिरेखा आणि त्यांचा पसारा, तत्कालिन ब्रिटिश जीवनपद्धती आणि घडणारी स्थित्यंतरे , दिग्दर्शन, अभिनय, एक ना दोन. सगळ्याच आघाड्यांवर ही मालिका सरस ठरते. आंतरजालावर काही लोकांनी मालिकेतल्या घटना आणि तेव्हाच्या अर्ल्स-डच इत्यादी लोकांच्या खानदानांत घडलेल्या तत्सम घटनांच्या संबंधाचे लेखही लिहिले आहेत. या सर्व गोष्टी मालिकेच्या निर्मितीमागची मेहनत दाखवतात. या मालिकेत व्यक्तिरेखा आणि त्यांची उत्तरोत्तर उभारणी ही खूप छानप्रकारे दर्शवण्यात आलीय. एकतर खूप सारा फाफटपसारा न करता त्यांच्यामध्ये विविधता आहे – शेजारच्या इस्टेट्स आणि तिथले लॉर्ड्स-त्यांचा लवाजमा,  गावातले लोक, शेतावरची कुळं, काही आयरिश, अमेरिकन्स, काही काळे लोक.. या सर्वांमुळे तयार झालेल्या उपकथानकांमुळे मुख्य विषयवस्तूकडे दुर्लक्ष होत नाही, उलट त्याला बळकटी येते. विवाहपूर्व संबंध किंवा अविवाहित माता असणं, समलैंगिकता, पोलिस-कोर्ट-खटले, लग्नाआधी ट्रायल म्हणून परपुरूषासोबत एखादा आठवडा व्यतित करणे या त्या काळच्या मानाने थोड्या धाडसी गोष्टीही हे कुटुंबिय पचवतात. काही ठिकाणी हे थोडे अती केल्यासारखे होते पण ज्या खोलात जाऊन मालिकेची मांडणी केली आहे ती पाहता अशा गोष्टींकडे कानाडोळा केला जाऊ शकतो. एक मात्र आहे -काहीही अडचण आली आणि इंग्लंडमध्ये राहाणं अवघड आहे असं जरासं देखील वाटलं , की ते पात्र भारतात जाऊन राहण्याबद्दल बोलायला लागतं.

 

ब्रिटिश आणि तीही पिरियड मालिका म्हटल्यावर ब्रिटिश शिष्टाचारांचा उल्लेख येणार नाही असं होणारच नाही. तरूण मुलींचे बॉलरूम सीझन्स, राजघराण्यात करण्यात येणारी त्यांची प्रेझेंटेशन्स, राजघराण्यातल्या व्यक्तीबद्दलचा आदर म्हणून रेडिओवरचं भाषणसुद्धा उभं राहून  ऐकणं, बटलर्सनी फक्त खानदानी लॉर्ड लोकांनाच मान देणं, नोकरांचाही अपमान केला न जाण्याची दक्षता घेणं हे तर येतंच पण रोजचे जेवणाचे टेबल लावण्यासाठी फुटपट्टी वापरून काट्याचमच्यांमधली अतंर मोजली जातात हे पाहून हसू ही येते. अमेरिकन लोकांची उडवली जाणारी खिल्ली तर आहेच. एका प्रंसगात लॉर्ड ग्रॅंथम यांची आई  (डाउजर ऑफ कौंटी) ही तिच्या अमेरिकन विहिणीला “अमेरिकन लोक मला ब्रिटिश शिष्टाचारांची आठवण करून देतात” असं खोचकपणे ऐकवताना दिसते. ही बाई एक वेगळंच रसायन आहे. बहुतेक सार्‍या प्रेक्षकांची आवडती व्यक्तीरेखा असलेली ही बाई कमालीची खोचक, फटकळ, स्वार्थी , जशास तशी, महाबिलंदर आणि सर्वांना पुरून उरणारी आहे. “हो,  तुला तुझं मत असण्याचा अधिकार आहे, पण अर्थातच तो काही निर्णय असू शकणार नाही” वगैरेंसारखे आणि इतर शालजोडीतले  तिचे संवाद हा एक मोठाच विषय आहे.

 

बटलर क्लार्कसन हे प्रेक्षकांचं आवडतं आणखी एक पात्र. जुन्या मतांशी चिकटून राहणारा क्लार्कसन हा ऍबीचा पिढीजात नोकर. त्याच्यासाठी मालकांचं काम आणि हित हेच त्याचं सर्वस्व आहे. क्रॉली कुटुंब एकवेळ आधुनिक विचाराने काही कृती करू पाहतील त्यालाही हा कुटुंबाची मानहानी होईल या धास्तीने हा सर्वतोपरी विरोध करतो. बटलर असूनही लेडी मेरी , इडिथ या सर्वांना त्याने अंगाखांद्यावर खेळवलं असल्याने या मुलींचा आणि त्याचा एकमेकांवर खूप लोभ आहे.

 

स्त्रियांचं सक्षमीकरण हे ही या मालिकेतलं एक सूत्र आहे. ग्वेन नावाच्या मोलकरणीला वेगळी नोकरी मिळणं , एडिथची एक  सदर लिहिण्यास सुरूवात ते मासिकाची संपादिका बनणं, मेरीचं इस्टेट एजंट बनणं हे सगळं तपशीलात येतं. मालिकेच्या शेवटाकडे मिसेस पॅटमोर या स्वयंपाकीणबाई म्हातारपणाची तजवीज म्हणून एक घर विकत घेऊन तिथे बेड-ऍंड-ब्रेकफास्टची सोय देण्यास सुरूवात करतात हेही आधुनिक जगाकडे टाकलेलं एक पाऊल आहे. या सर्वांना असलेला ऍबीवासियांचा विरोध ते नंतर पाठिंब्यामध्ये बदलेली भूमिका हे ही ठीकच.

 

कथानकात घातलेली इतिहासाची सांगड, खालच्या मजल्यावरचे आणि वरच्या मजल्यावरचे यांना दिलेले समसमान महत्व,  सामाजिक आणि आर्थिक बदलाचा पहिल्या महायुद्धाशी लावलेला संबंध या डाऊनटन ऍबी मला आवडण्यासाथी असलेली काही कारणे आहेत. या ब्रिटिश सिरियलने सहा सलग वर्ष चालून प्रसिद्धीचे अनेक रेकोर्ड तोडले आहेत. तशी मालिका याच महिन्यात संपलीय, फक्त एक शेवटचा नाताळ स्पेशल भाग आता बाकी राह्यला आहे. जरी सुरवातील संथ वाटली तरी हळूहळू लय पकडत जाणारी ही मालिका नक्कीच पाहण्यासारखी आहे.  

डाऊनटन ऍबी - चित्रपटाची /नाटकाची माहिती

डाऊनटन ऍबी
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: ज्युलियन फोलोस (क्रिएटर)
  • कलाकार: जीम कार्टर, मीशेल डॊकरी, ह्यु बोनविले
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: -
  • निर्माता देश: England