फँटास्टिक बीस्ट्स..(२०१६): पॉटर-दुनियेच्या फॅन्ससाठी आहेही आणि नाहीही!

-पाहुणा लेखकः अनुप ढेरे-

 

फंटास्टीक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाइंड देम' हा हॅरी पॉटरचा सिनेमा आहे का?
हो आणि नाही!

'फंटास्टीक बीस्ट्स..'ची लेखिका जे के रोलिंग आहे का?
हो आणि नाही!

फंटास्टीक बीस्ट्स.. हा त्याच नावाच्या पुस्तकावरचा सिनेमा आहे का?
हो आणि नाही!

गोंधळलात? तुम्ही एकटे नाही. हॅरी पॉटरच्या विश्वापासून दूर असलेल्याला मी "या सिनेमाला चल" म्हटल्यावर आलेल्या प्रश्नांची ही उत्तरं आहेत. हॅरीच्या दुनियेशी ओळख असलेल्या लोकांना माहिती असेल की हॅरीच्या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासायला असलेल्या अनेक सुरस आणि चमत्कारिक पुस्तकांमध्ये एक न्यूट स्कमँडर नामक प्राणीशास्त्रज्ञाने लिहिलेलं फंटास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाईंड देम हे एक पुस्तक होतं. रोलिंगने नंतर गंमत म्हणून हे पुस्तक खरच लिहून प्रकाशित केलं. याच न्यूट स्कमँडरच्या साहसाची एक गोष्ट आहे हा सिनेमा.

सिनेमाची गोष्ट तशी साधी आहे. प्राण्यांनी भरलेली एक जादुई सुटकेस घेऊन न्यूट अमेरिकेत, न्यू यॉर्कमध्ये येतो. आणि त्यातले प्राणी बाहेर पडतात. त्यात भर म्हणून न्युयॉर्क शहरात आधीच काहीतरी गूढ घटना घडत असतात. त्या घटनांमागे ग्रिंडेलवाल्ड(तोच तो, डंबलडोरचा आद्य शत्रू.) नामक वाइट्टं माणूस आहे अशी कुजबुज असते. आपल्या प्राण्यांना पकडता पकडता न्यूट या सगळ्या गोंधळात अडकतो. या साहसात त्याला अनेक रोचक लोक भेटतात. आपल्या ऑरर ('त्या' लोकांचे पोलीस) पदावरून पदच्युत झालेली टिना गोल्डस्टीन, तिची, मन वाचणारी (लेजिलिमेंस हो!) बहीण क्वीनी आणि एक नो-मॅज कोवाल्स्की (होय, अमेरिकेत मगल लोकांना नो-मॅज म्हणतात! )

मूळ फंटास्टिक बीस्ट्स पुस्तक हे नुसतंच माहितीपर आहे. ते तसंच असणं अपेक्षित आहे कारण ते एक पाठ्यपुस्तक आहे. हॅरीचं जग हे केवळ वाँड्स, स्पेल्स, ब्रूम्स्टीक्स अशांने बनलेलं नाही. त्यातल्या पात्रांनी ते जग बनलेलं आहे. त्या पुस्तकांच्या एका विशिष्ट टोनमुळे ते जग बनलं आहे. पुस्तक लिहिताना रोलिंग पाठ्यपुस्तकाला मजेशीर बनवते ते पुस्तकावरच्या हॅरी, रॉन आणि हर्मायोनीने लिहिलेल्या कॉमेंट्सने. या कॉमेंट्स पुस्तकाच्या हायलाईट्स आहेत. आणि यामुळेच पाठ्यपुस्तक वाचत असून हॅरी कायम वाचकाच्या बरोबर असतो. अशाच प्रकारे हे प्राणी सिनेमामध्ये घेताना, हॅरी आपल्याबरोबर नसताना देखील, आपण हॅरीच्याच जगात आहोत हे पहाणार्‍याला कसं वाटत राहील याची काळजी रोलिंगने अत्यंत समर्थपणे आणि सटली पेलली आहे.

रोलिंगने लिहिलेली पटकथा आहे म्हणजे त्यात एखादं टीनएज पात्र असायलाच हवं. त्याचं डिस्टर्ब असणं देखील असायला हवं. इथेही असं पात्र आहे. क्रिडन्स नावाचं. मगल लोकांप्रती द्वेष असणारा व्हिलन देखील नोमॅज लोकांबद्दल आपुलकी ठेवा, त्यांना त्रास देऊ नका या प्रकारचा, वंशवाद विरोधी म्हणता येईल असा, टोन मूळ हॅरी पॉटर पुस्तकांमध्ये आहे. इथेही तो आहे. त्यात जोडीला प्राणी प्रेम आहे. मला खूप आवडलेला(!) एक कपटी गॉब्लिन देखील आहे. अमेरिकेतली मिनिस्ट्री आणि मिनिस्टर आहेत. या सर्व प्रकारे रोलिंग एका माहिती पुस्तकाला धमाल गोष्टीमध्ये लीलया बदलते आणि पाहणार्‍याला आपण पॉटर विश्वातच आहोत हे वाटत रहातं.

असो, अजून नाही सांगत गोष्टीबद्द्ल. आपल्याकडे ओब्लिव्हिएट करण्याची ताकद थोडीच आहे?

फँटसी सिनेमा आहे म्हटल्यावर स्पेशल इफेक्ट्सबद्दल बोलणं भाग आहे. उत्तम एफेक्ट्स शिवाय सिनेमा अगदी कंटाळवाणा होईल. त्यातच या सिनेमात जादूचे प्राणी आणि शंभर वर्षापूर्वीचं न्यू-यॉर्क शहर हे दोन्ही आहेत. स्पेशल इफेक्ट्सबद्दल बोलायला मी फार क्वालिफाईड नाही. पण शंभर वर्षापूर्वीचं शहर बघतना अ‍ॅनाक्रोनिझम असं काहीच वाटलं नाही ही जुना काळ उभा करण्यात आलेल्या यशाची पावती म्हणता यावी. प्राणी मला थोडे घिसेपिटे वाटले. हिप्पोग्रिफचेच भाऊ म्हणता येतील असे दोन प्राणी आहेत सिनेमात. मुंगुसासारखा दिसणारा आणि कांगारूसारखी पोट-पिशवी असलेला निफ्लर मात्र आवडला. हॅरी जगातले मातबर प्राणी, ड्रॅगन, फिनिक्स, बॅसिलिस्क हे या सिनेमात नाहीत. पुढच्या भागात येतील अशी अपेक्षा आहे!

-पाहुणा लेखकः अनुप ढेरे

फँटास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाइंड देम (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

फँटास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाइंड देम (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: डेव्हिड येट्स
  • कलाकार: एडी रेड्मेयन, कॅथरीन वॉटरस्टन
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत