कुटुंबकरंजीच्या पलिकडले: दिल दोस्ती दुनियादारी
यंदा कधी नव्हे ते 'झी मराठी'च्या पुरस्कारांनंतर मला गुदगुल्या झाल्यात. अहो! खरंच, त्या ५६ इंची छातीवाल्याची शपथ! (अहो अहो अहो अहो, असे भक्तांसारखे धावून नका येऊ, मी 'जय मल्हार'मधील खंडोबाबद्दल बोलतोय) - हो पण गैरसमज नकोत म्हणून अजून एक स्पष्टीकरण असं की या ५६ इंचीवाल्यामुळे मात्र गुदगुल्या झालेल्या नाहीत हा!. त्याचं काये, थांबा सविस्तरच सांगतो..
ताज्या हिंदी काय मराठी काय, सीरियल्स म्हटलं की कपाळावर आपसूकच एक आठी उमटते. 'जगात स्त्री ही आई असते, सासू असते, मुलगी असते किंवा सून असते. तिचे निव्वळ एक सुटी व्यक्ती म्हणून कोणतेही अस्तित्व असू शकत नाही किंवा स्वभावही असू शकत नाही.' हा या यच्चयावत सीरियल्सचा मुख्य आधारस्तंभ! शिवाय प्रत्येक सख्खी आई ही मायेचा धबधबा असलीच पाहिजे, सासू ही एकतर कजाग वैट्ट किंवा मग अती गोग्गोड मधाची बरणी असली पाहिजे, नायिकाही सरळ वळणाची कुण्णाकुण्णाला उलटून न बोलणारी (आणि बोललीच तर स्वतःच दु:खी वगैरे होणारी) असली पाहिजे अशा काही अधिकच्या अटी आहेतच. त्यात नायिकाच सूनही असेल तर विचारूच नका. 'जगात-भारी' अशी "कुटुंब" नामक करंजी आहे आणि ती शक्य तिथे सगळीकडून उघडली आहे; आतलं माणसांचं सारण आता बाहेर सांडतंय की काय अशा बेताला आलंय. अशावेळी ही साटोपचंद्रिका सून येऊन, पदर खोचून, ते बाहेर पडू पाहणार्या कुटुंबतलं सारण येनकेनप्रकारेण करंजीत ढकलून ती कुटुंबकरंजी घट्टमुट्ट बांधून देणारी साक्षात देवीच! त्यात खोटेपणा, लबाडी, भडक पार्श्वसंगीत, अतिभडक संवाद, त्याहूनही भडक रंगांचे कपडे आणि भडकोत्तम नि ढोबळ प्रकाशयोजना या मसाल्यांशिवाय हल्ली मालिका हा पदार्थ तयारच होत नाही का? असे वाटायची परिस्थिती आली होती.
आणि काय सांगावं महाराजा, तिथे पहा..वेडात मराठे वीर दौडले 'सहा'! होय म्हणजे फार हुरळून जाऊ नका, पण सध्या मालिका या नावाखाली जो काही किळसवाणा प्रकार टीव्हीवर चालू असतो त्या पार्श्वभूमीवर, 'दिल दोस्ती दुनियादारी' हा म्हणजे अचानक ओअॅसिस वाटावा अशीच परिस्थिती आली आहे. खरंतर ही मालिकाही इतकीही उत्तम नाही की तिच्यावर अख्खा स्तुतिपर लेख लिहावा, पण सध्याच्या दुर्भिक्षात एक लहानसा झराही.. असो आवरतो स्वतःच्या भावनावेगाला, नि विषयाकडे वळतो. तर 'थ्री-डी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या दिल दोस्ती दुनियादारी नावाच्या सशाच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्याचं कारण, असं थेट सांगता येणार नाही म्हणून हा लेखप्रपंच!
'दिल दोस्ती दुनियादारी' बद्दल बोलायच्या आधी "सिटकॉम" या प्रकाराबद्दल बोलणं अगत्याचं आहे. काय आहे हे 'सिटकॉम'? सिटकॉम म्हणजे 'सिच्युएशनल कॉमेडी'. हा एकूणच टीव्ही मालिकांमधील एक महत्त्वाचा विधा आहे. साधारणतः अश्या प्रकारच्या सीरियल्स या 'कॉमेडी' या प्रकारात मोडणार्या असतात. मात्र ही कॉमेडी कथेपेक्षा किंवा संवादांपेक्षा विवक्षित परिस्थितीने जन्माला आलेली असते. यातील सर्व महत्त्वाची पात्रे एका समान अवकाशात (एका जागी) असतात. व त्या ठिकाणी उद्भवणार्या परिस्थितीमुळे जो विनोद उद्भवतो तो या मालिका एन्कॅश करू पाहतात. या प्रकारात नातेसंबंध, सलग कथा वगैरे महत्त्वाची नसते. शिवाय यात एक 'नायक/नायिका' नसते, तर प्रत्येक महत्त्वाचे पात्र तितक्याच ताकदीने उभे केलेले असते. किंबहुना सिटकॉममध्ये कोणतेही एक पात्र अधिक मोठे होऊ लागले तर सिटकॉम फसली असे समजावे. त्यामुळे प्रत्येक पात्राचा स्वभाव, त्याच्या स्वभावातील 'खोड्या', त्याच्या लकबी, सवयी, परिसर, परिसरातील काही पात्रं इत्यादी सगळ्यांचा एक मोठा रंजक विनोद या प्रकाराने दिलेला आहे.
जगात 'सिटकॉम'चा मोठा इतिहास आहे व तो पार मागे १९७०च्या 'मॅश' पर्यंत जातो. भारतापुरता विचार करायचा तर दूरदर्शनच्या सुरवातीच्याच काळात काही उत्तमोत्तम सिटकॉम्स येऊन गेल्या. अगदी सुरवातीच्या काळात आलेली "ये जो है जिंदगी" ही भारतातील (किमान हिंदीतील) पहिली सिटकॉम मालिका असावी. त्याशिवाय 'वागळे की दुनिया', 'जबान संभालके', 'देख भाई देख','श्रीमान श्रीमती' या सिटकॉम्सने यशस्वितेचे उच्चांक गाठले. पुढे आलेली मरगळ पुन्हा "ऑफिस ऑफिस", "साराभाई व्हर्सेस साराभाई", "खिचडी" या सिटकॉम्सने घालवली पण त्यानंतर पुन्हा सिटकॉम्सकडे भारतातील दिग्दर्शक/निर्मात्यांचे दुर्लक्षच झाले आहे. नाही म्हणायला "तारक मेहता का उल्टा चष्मा" आहे पण तिथे रात्र थोडी सोंगे फार अशी वेळ आली आहे व तारक मेहता व त्याची बायको ही पात्रे इतरांपेक्षा मोठी झाल्याने ती सिटकॉम बर्यापैकी फसली आहे. मराठीत मात्र बराच काळ सिटकॉम टीव्हीवरून गायबच होती. 'चाळ नावाची वाचाळ वस्ती" नंतर मराठी सिटकॉममध्ये अनेक प्रयत्न झाले पण त्यांना म्हणावे तसे यश लाभत नव्हते.
या सगळ्या सिटकॉम्समध्येच एक उपप्रकार आहे ज्यात 'नाते नसणार्या (परंतू अनेकदा/सतत भेटणार्या) व्यक्ती'मध्ये निर्माण होणारे परिस्थितिजन्य विनोद. "जबान संभालके", "ऑफिस ऑफिस" ही काही उदाहरणे देता येतील. दरम्यान या प्रकारात अमेरिकेत १९९४मध्ये "फ्रेन्ड्स" नावाची एक मालिका आली आणि तिने सिटकॉम्सच्या यशस्वितेचे सगळे मापदंड ओलांडले. सहा वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले ६ मित्र-मैत्रिणींच्या त्या कथेने एका अख्ख्या दशकाच्या मनाचा वेध घेतला. त्यानंतर अनेक तत्सम मालिका बनल्या पण फ्रेन्ड्सची लोकप्रियता गाठणे सर्वांनाच शक्य झाले नाही.
फ़्रेंड्सबद्दल लिहायचे कारण हेच की 'दिल दोस्ती दुनियादारी' (यापुढे थ्रीडीच म्हणेन) आणि या सीरियलच्या सूत्रापुरते असणारे साधर्म्य. थ्रीडीमध्येही एका घरात ६ मित्रमैत्रिणी एकत्र राहत आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून, वेगवेगळी स्वप्ने घेऊन मुंबईत पोचलेले हे सहा जण आणि त्यांच्या सहजीवनातून निर्माण होणारे प्रसंग असे या मालिकेचे स्वरूप आहे. फ्रेन्ड्स प्रमाणेच याही मालिकेत प्रत्येक मित्राचे वेगळे स्वभावविशेष आहेत आणि प्रत्येक पात्र ताकदीने उभे राहिलेले आहे हे विशेष. या मालिकेचे मोठे बलस्थान म्हणजे पारंपरिक मालिकांच्या विपरीत इथे नात्यांचा गुंता झालेला नाही. गोग्गोड तुपट्ट संवाद नाहीत, काहीतरी हास्यास्पद गुप्तता पाळायचा आटापिटा नाही, उग्गाच बसस्टॉप वरची रोम्यांटिक चाळवाचाळव नै की १ ते कितीही सासवा व सुना यांचा तोच तो सामनाही नाही. या सगळ्याशिवाय मराठीत पुन्हा एकदा एखादी मालिका सुरू होणे हीच एक प्रेक्षक म्हणून मोठी आनंदाची गोष्ट होती. त्यात दुधात साखर म्हणजे कोणत्याही नात्याशिवाय मित्र-मैत्रीणींना एकत्र रहाताना दाखवणे, त्यांच्यात (एकाला भाऊ-बहिण करणे सोडले) तर उगाच घाऊन नात्यांचा गुंता न करणे, बर्यापैकी वास्तववादी संवाद आणि प्रकाशयोजना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्यामेरा एका रुळावर लाऊन सर्वपात्रांना समोर अर्धगोलाकार उभे करून संवाद म्हणून न घेणे! (तुम्हाला खोटं वाटेल प्रत्येक वाक्यानंतर प्रत्येक उपस्थित पात्राच्या चेहर्यावरील भाव क्लोजअपमध्ये दाखवत (वेळ खात) नाहियेत हे बघुन मी टिव्हीचा हळूच एक चुम्माही घेतला ;) )
एक मान्य करायला हवे, की मालिका सुरू झाली तेव्हा "अरे बापरे मराठीतून फ्रेन्ड्स!" अशी भयचकित प्रतिक्रिया मनात आली होती. त्यात जेव्हा ही कथा सुरू झाली तेव्हा 'कैवल्य' या पात्राला सरळ सरळ इतर पात्रांपेक्षा अधिक वाव दिला जात होता. त्यामुळे ही मालिका फसून लवकरच त्याचं "कैवल्यची प्रेमकथा/स्ट्रगलकथा" वगैरे होते की काय अशी भिती वाटू लागली होती. पुढे तो कैवल्य सुजय रेश्मा असा ट्रँगल होईल की काय वाटू लागले. पण मराठीच्या सुदैवाने ही मालिका आता सावरलेली वाटतेय. यातील सर्वच पात्रांनाही आपली भूमिका अधिकाधिक आकळत गेल्याने आता याची खुमारी वाढली आहे. गंमत अशी की सर्वात अनुभवी कलाकार असुनही सुरवातीला फारच भडक (लाउड) अभिनय करणारा कैवल्यच होता आणि माझ्यामते त्यानेच आपल्या पात्रात रुळायला सर्वात अधिक वेळ लावला. शिवाय सुरूवातीला अॅनाला अगदीच कमी भुमिका होती, पण आता तिच्या भुमिकेचे महत्त्व लेखकाला जाणवलेले दिसतेय. त्यामुळे आता महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही एका पात्राला मोठे होऊ न देता सर्वच पात्रांची उत्तम भेळ बनते आहे.
या मालिकेचे अधिकच कौतुक मला गेल्या महिन्या-दोन महिन्यात वाटू लागले जेव्हा त्यांनी मराठीत कधीही शक्य न वाटणार्या विषयांना हात घालायला सुरुवात केली. उदा. एक एपिसोड चक्क 'मासिक पाळी' बद्दल बोलणारा होता. त्याभोवतीचे विनोद, त्याबद्दलच्या प्रथा, टॅबु इत्यादींच्यामधून वळसे घेत या विषयावर पूर्ण अर्धातास मराठी मालिकांमध्ये रंजनात्मक घडणे ही मोठीच (नी आवश्यक) घटना. दुसरे उदाहरण द्यायचे तर तीन मुलींच्या तावडीत सापडलेल्या सुजयला त्या रोम्यांटिक व्हायचे धडे देण्याचा एपिसोडही मराठीतील अनेकांच्या अदृश्य शेंडीला झुगारणारा होता. "माझा गं घना!..." "बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या", "मन मोठं असलं की सारं काही सामावता येतं" इत्यादी ओशट शिसारी आणणार्या तुपकटपणाच्या जमान्यात "बेब, हाऊ वॉज युअर लास्ट नाइट" असा थेट संवाद मराठी सीरियलमध्ये बघून भरपूर घामाने थबथबल्यानंतर एक छान शॉवर घेतल्यावर फिलिंग येतं ना तसं झालं!
अर्थात, अजून या मालिकेला मोठा पल्ला गाठायचा आहे. मोठे फॅन फोलोइंग असणे, एकेका पात्राचा खास फॅनवर्ग असणे वगैरे छानच आहे. मात्र या मालिकेत सगळंच छान आहे असं नव्हे. काही जणांच्या (विशेषतः: रेश्मा) अभिनयातले 'जुनेपण' अजूनही गेलेले नाही. (त्या पात्राचे विचार जुने असले तरी वावर, संवादफेक जुन्या ढंगाचीच आहे.) शिवाय काहीवेळा अनावश्यकरीत्या भावनिक ओथंबलेपणेसुद्धा टाळणे गरजेचे आहे. फ़्रेंड्स यशस्वी का झाली यात एक सर्वात मोठे कारण दिले जाते ते म्हणजे कोणताही एक नायक पूर्ण १० वर्षांत कधीही न घडणे. थ्री-डीमध्येही तसेच झाले आणि या सहा पात्रांनी समकालीन तरुणाईला विनोदी ढंगात सादर करणे चालू ठेवले तर ही मालिका एक मैलाचा दगड होईल हे निश्चित.
तर लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यावेळच्या पुरस्कारात मला गुदगुल्या का झाल्या माहितीये? तर लोकांनी थ्री-डीच्या या समूहाला "सर्वोत्तम कुटुंब" म्हणून निवडले! अतिशय जुनाट कंटाळवाण्या, पात्रांची चळत लावणार्या कुटुंबांचा व त्यांच्या त्याच त्या पढडीतल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन जर नवे काही देऊ केले तर लोक ते स्वीकारायला तयार आहेत असा संकेत लोकांनी च्यानेलांना दिला आहे. तो ते डोळसपणे स्वीकारतात की पुन्हा जुनेच दळण दळतात ते येत्या काळात कळेलच!
तोवर मराठीत नवे फ्रेश काही आणणार्या थ्रीडीच्या टीमचे अभिनंदन! नि कीप इट अप!
दिल दोस्ती दुनियादारी (2015) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
