अलिगढ (२०१६): शब्दोंके अंतराल में...
एखाद्या विशिष्ट बातमीभोवती केल्या जाणार्या चित्रपटांना वा सांगितल्या जाणार्या गोष्टींना एक अंगभूत मर्यादा पडते बरेचदा. त्यांचा एखादा ‘केस स्टडी’ कधी होऊन जातो कळत नाही. दिग्दर्शक आपला तिसरा डोळा विसरून पाहता पाहता समर्थकाच्या वा विरोधकाच्या भूमिकेत शिरतो आणि हेतू कितीही प्रामाणिक असला, तरी सगळा सिनेमा म्हणजे ‘आवाज दो... हम एक हैं’छापाची एखादी घोषणा होऊन बसतो. साहजिकच त्या गोष्टीतून सत्यासत्याच्या सीमेवरचे, तळ्यामळ्याच्या काठावरचे काही मोजके, खरे, ओलसर, जिवंत क्षण अलगद निसटून जातात.
(बादवे, अशाच क्षणांना कविता म्हणतात ना प्राध्यापक सिरस? “कविता तो शब्दों के अंतराल में मिलती हैं, पॉजेस् में रहती हैं बाबा...” मजाय.)
‘अलिगढ’ अशी घोषणा होऊन जाणारा सिनेमा नाही. ऐन थंडीत अपरात्री धुक्यानं हलके झालेले रस्ते; सोडियम व्हेपरच्या दिव्यांचा धुक्यात मिसळलेला पिवळसर प्रकाश; जुन्या क्वार्टर्समधल्या जीर्ण, एकसाची खोल्या आणि त्यांना मिळालेली मध्यमवर्गीय, घरगुती व्यक्तिमत्त्वं; त्या शहरामधले गरीब रिक्षावाले आणि त्यांच्यासारखाच शहराचा संथ वेग… या सगळ्यासकट आपल्यासमोर प्राध्यापक सिरस यांचं चित्र उभं राहतं. त्या चित्राला काय जिवंतपणा आहे! त्यांचं ते ‘बॅचलर’ घर. पुस्तकं. ठायी ठायी साठत गेलेल्या गृहस्थी पिशव्या. छत्र्या. टेपरेकॉर्डर. आरामखुर्ची. बिछाना. उशीवर कायम अंथरलेला एक लहानसा टॉवेल… आणि हातात व्हिस्कीचा ग्लास घेऊन लता मंगेशकरच्या गाण्यात हरवून जाणारे, गाण्याला दाद देताना हळवे होणारे, साठीपलीकडचे प्राध्यापक सिरस - कवी सिरस.
त्यांच्या बेडरुममध्ये घडलेला एक प्रसंग आपल्याला निरनिराळ्या टप्प्यांवर आणि निरनिराळ्या कोनांतून दिसत राहतो आणि त्याच्या मधल्या अवकाशात आपल्याला त्यांची गोष्ट दिसत राहते. अलिगढ विद्यापीठातल्या या प्राध्यापकाच्या घरात काही टीव्ही पत्रकार घुसले आणि प्राध्यापकांना मारहाण करून त्यांचं नि त्यांच्या मित्राचं नको त्या अवस्थेत चित्रीकरणही करण्यात आलं. त्या चित्रीकरणाधारे, विद्यापीठाचे नीतिनियम मोडल्याच्या आरोपावरून, प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलं. दीपू सेबास्टियन नामक तरुण पत्रकारानं त्यांची बाजू लावून धरली. पुढे दोन्ही बाजूंनी निदर्शनं झाली, कोर्टात खटला झाला, त्याचा निकाल शेवटी प्रा. सिरस यांच्या बाजूनं लागला. पण मधल्या अवकाशात काय काय झालं? त्याची ही गोष्ट आहे. सत्यकथेवर आधारित असलेली.
गोष्टीला अनेक पैलू आहेत. पण सर्वाधिक महत्त्वाचा पैलू कुठला असेल, तर तो मनोज वाजपेयीनं साकारलेल्या प्राध्यापक सिरस यांच्या व्यक्तिरेखेचा. चित्रपटातलं सर्वांत महत्त्वाचं नाट्य या अभिनेत्याच्या देहबोलीत, त्याच्या चेहर्यात, त्याच्या सुरात - त्याच्या अवघ्या असण्यात आहे. या अन्यायानं, बदनामीनं व्यथित झालेली ती विद्ध नजर. काय नजर पकडली आहे यार त्या माणसानं! किती वेळा म्हणून ती नजर ठाव घेते आपला... तो विद्यापीठाच्या क्वॉर्टर्समधून चंबूगबाळं आवरून बाहेर पडतो नि टीव्ही चॅनलच्या पत्रकाराला “जाने दो बाबा!” म्हणून निघून जातो, तेव्हा त्याच्या चेहर्यावर कडवट स्मित आहे. नजर काहिशी चकित. तीच त्याची नजर पुढे दीपूशी बोलताना किती मायाळू, वडीलधारी, कौतुकाची होते! “तुम मेरा इंटरव्यू तो नही ले रहे हो ना, दीऽऽऽपू?” हे दटावणारा त्याचा सूर. माय गॉड! मग त्याच्या कवितेला सहजी दाद देणार्या आणि त्याला आपलेपणानं स्वीकारणार्या माणसांच्या गोतावळ्यात सैलावून ‘मी मज हरपून बसले गं’ हे गाणं गाणं नि प्रशस्तीनं संकोचून जाऊन लाजणं. त्याचं हे गोड लाजणं किती वेळा दिसतं! अगदी सुरुवातीला दीपूला ‘त्या’ रात्रीच्या प्रसंगाबद्दल सांगताना तो हतबल होतो, मोडून जातो. पण मग सावरून विचारतो दीपूला, “Am I drunk?” “Not yet.” हे प्रामाणिक उत्तर मिळाल्यावर लहानसं संकोची हसू हसत, “Then I will have one more.” तेव्हा वास्तविक तो किती अवघड गोष्टी बोलतो आहे… पण आपल्या डिग्निटीचं भान तेव्हाही सुटत नाही त्याचं. आपण भानावर आहोत ना, हे तपासून मगच तो त्याचा ग्लास पुन्हा भरतो. त्याच्या त्या सभ्यपणानं, ऋजुतेनं एकदम पोटात कालवतं. नि मग पुन्हा पुन्हा त्याची ती ऋजुता दिसत राहते. “You are a good looking man!” अशी दाद दीपूनं दिल्यावरचं त्याचं लाजणं; “It is very difficult to get.” असं स्वत:च्या कवितासंग्रहाबद्दल संकोचून पण प्रांजळपणे सांगणं; “गरीब आदमी को क्यों परेशान कर रहे हैं ये लोग…” असं म्हणत आपल्या मित्राला त्याही परिस्थितीत जपू पाहणं… किती हृद्य छटा…
चित्रपटाच्या अनेक चित्रचौकटींमध्ये मनोज वाजपेयी हीच एक जिवंत घटना आहे. दीपूचं काम करणार्या राजकुमार रावची त्याला अफलातून साथ आहे. केवळ अभिनय हा एकच पैलू न्याहाळायचा असता, तरीही ‘अलिगढ’ जिंकून जाता, अशी कामगिरी त्यांनी केली आहे. पण या चित्रपटाला जिंकण्या-हरण्यासारख्या क्षुद्र गोष्टींशी मतलब नाहीय. त्याला त्यापलीकडे जायचं आहे.
आपल्याला ऍक्टिविझममध्ये रस नसल्याचं अगदी सुरुवातीलाच प्राध्यापक स्पष्ट करतात. आपल्या सेक्शुऍलिटीबद्दल जाहीर बोलायचा त्यांना संकोच आहे. त्यांच्या दृष्टीनं हे असं काळं-पांढरं, लेबलात बसणारं कुठे आहे जग? शब्दांना हे असं सोलून, फटकावून, एका रांगेत उभं करून त्यांची एक चिरेबंदी व्याख्या केली की त्यांच्यातला कवी भांबावतो, दुखावतो. शब्दांत न पकडता येणार्या तरल उत्कट भावनांना अशी लेबलं लावणं त्यांना कळूच शकत नाही. पण हा असा अबोल-संकोची स्वभाव एकीकडे आणि अन्यायापुढे मान तुकवणं एकीकडे. “अच्छा हुआ नही कूदा, अभी मैं ये (व्हिस्की) पी रहा हूं...” असं आपल्याच न केलेल्या आत्महत्येबद्दल बोलावं, असं त्यांचं जगण्यावर प्रेम आहे. त्यातूनच हा साधासरळ-भाबडा माणूस अन्यायाशी लढायला उभा राहतो.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधली ही लोभसवाणी विसंगती ज्या प्रसंगात अधोरेखित होते, तिथे चित्रपट निराळीच उंची गाठतो. त्यांच्याच बाजूनं घणाघाती भाषण करून त्यांचा खटला जिंकू पाहणारा त्यांचा वकील एका विजयी क्षणी त्यांच्याकडे वळून बघतो, तर काय? प्राध्यापक अनावर कंटाळ्यानं हलकं घोरताहेत! संघर्ष, लढाई, न्यायान्याय… आणि अशाच अनेक थोरथोर बेगडी शब्दांना आयुष्याचं जिवंत परिमाण देणारा तो प्रसंग आहे.
लहानसा नि मोठ्ठा.
त्यांच्या कोर्टातल्या साक्षीबद्दलही किती काय काय लिहिता येईल. पण ते फक्त पांढर्यावर काळं करणं. खरं लक्षात राहतं ते त्यांचं एक अखेरचं वाक्य, “उन्होंने मुझे मेरे कपडे भी नही लौटाये…” असं कसं वागू शकतं कुणी कुणाशी? त्यांच्या दृष्टीनं ही अजिबात समजून न घेता येणारी, हतबुद्ध करून टाकणारी, अमानुष बाब आहे. तिनं व्यथित होऊन नि:शब्दपणे जाब विचारणार्या सिरसांची गोष्ट मग फक्त गे माणसांवर होणार्या अन्यायाची उरत नाही. ती तुमची-आमची-सगळ्यांची होते. माणसासारखं, आब राखून जगू पाहणार्या, आपापला पैस मागणार्या प्रत्येकाची होते...
आणि तरी या सिनेमातल्या सुरेख, संथ नि सर्रिअल चित्रचौकटींबद्दल; मोजक्या ठिकाणी येणार्या पार्श्वसंगीताबद्दल नि एरवी्च्या त्याच्या आकर्षक अभावाबद्दल; माध्यमांची आणि आपली गोची पुन्हा-पुन्हा अधोरेखित करणार्या बोचर्या प्रसंगांबद्दल; आपल्या आयुष्यावर माध्यमांनी केलेल्या आक्रमणांबद्दल नि आपल्या संपत चाललेल्या डिग्निटीबद्दल… किती लिहायचं?
चित्रभाषेत केलेली गोष्ट चित्रभाषेत पाहावी, हे खरं.
अलिगढ - चित्रपटाची /नाटकाची माहिती
