अ‍ॅव्हलान्च(२०१५): एका इराणी वादळाची गोष्ट

पुण्यातल्या 'एन.एफ.ए.आय.'ला 'इराणी फिल्म फेस्टिवल' झाला. त्यातील काही सिनेमे पाहायचा योग आला. त्यापैकी 'अ‍ॅव्हेलान्च' या इराणी सिनेमाबद्दल लिहिणे अगत्याचं आहे. खरंतर हा सिनेमा बघितला तेव्हा बरंच काही डोक्यात तरळत होतं, पण नेमकं पकडीत येत नव्हतं. त्या वेळी 'वेगळा सिनेमा' अशी नोंद मनात करून पुढल्या सिनेमाकडे वळलो होतो. पण नंतर सतत विविध कारणांनी तो सिनेमा आठवत राहिला. त्यातले अनेक प्रसंग डोक्यात येऊन, डोक्यातली काही जुनी नवी माहिती ढवळली जाऊन एक नवंच चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. अजूनही यातून मला जो बोध झालाय, तोच दिग्दर्शकाला अभिप्रेत आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. मात्र तो मांडण्यावाचून मला गत्यंतर दिसत नाही. या सिनेमावर लिहायच्या आधी इराणचा थोडा इतिहास, काही घटना आणि इराणचा वर्तमान यांविषयी माहिती देणं अगत्याचं आहेच. मात्र त्याचबरोबर इराणी सिनेमांचे वळसे, त्यात वापरली जाणारी प्रतीकं, प्रतिमा, त्यामागची कारणं यांचा अल्पसा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. ही कथा एक सामाजिक-राजकीय स्थिती प्रतिकात्मकतेने मांडत आहेच, त्याचबरोबर एक स्वतंत्र कथा म्हणूनही उल्लेखनीय व लालित्यपूर्ण आहे, त्यामुळे तिच्याकडे व एकूणच सिनेमाकडे एक लक्ष्यवेधी कलाविष्कार या दृष्टीने बघणं गरजेचं आहे.

इराणी सिनेमांना मोठा इतिहास आहे. तसाच तो इराणलाही आहे. १९७९मध्ये इराणमध्ये जी क्रांती झाली आणि देशातली सत्ता उजव्या मूलतत्त्ववादी विचारांच्या 'खोमेनी'कडे गेली. त्याचबरोबर देशातल्या अनेक कलांवर विविध बंधनं आली. त्यात इराणी सिनेमाही आलाच. सिनेमामध्ये काय असावं, काय असू नये यावर त्या वेळी अनेक बंधनं घातली गेली. ही बंधनं इतकी व इतक्या टोकाची होती की बहुतांश विषयांवर चित्रपट काढणं कठिण होऊन बसलं. मात्र त्यापूर्वी इराणी सिनेमा हा जगभर नावाजलेला होता. 'न्यू वेव्ह' कालखंडात - म्हणजे ६०-७०च्या दशकात - या देशात अनेक उत्तमोत्तम चित्रपटांच्या लाटा येत होत्या. पण ७९च्या सत्ताबदलाने सगळं ठप्प झालं होतं. पुढे ८०च्या दशकात नव्या दमाचे, नव्या विचारांचे काही दिग्दर्शक पुढे सरसावले व त्यांनी अश्या सेन्सॉरशिपमध्येही वेगवेगळ्या विषयांवर उत्तमोत्तम सिनेमे काढायला सुरुवात केली. स्त्री बुरख्यातच दाखवायच्या सक्तीपायी अनेक चित्रपट   बालकलाकारांना प्रमुख भूमिकेत घेऊन व बालकेंद्री विषयांवर निघू लागले. त्याच कारणाने इराणी सिनेमा आणि मुलं यांचं अतूट नातं जडलेलं आपल्याला दिसतं. (पुढे पुढे हे प्रमाण इतकं वाढलं, की मला तरी त्या मुलांच्या गोग्गोड चित्रपटांचा कंटाळा आला होता, पण ते असो.)

गेल्या काही वर्षात हे निर्बंध थोडे सैल झाले असले, तरी अजूनही इराणमध्ये बहुतांश गोष्टी चित्रपटातून दाखवायला बंदी आहे. मात्र काही सिनेमांना देशांत प्रदर्शन करायला बंदी असली, तरी किमान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्सना हे सिनेमे दाखवायची परवानगी सरकार देऊ लागलं आहे. अर्थात तेही हुकमी नाहीच, बर्‍यापैकी सरकारी मर्जीवर अवलंबून आहे. पण ८०-९०च्या दशकांपेक्षा परिस्थिती बरीच निवळली आहे. गेल्या दोन वर्षांत अहमदिनेजाद पायउतार झाल्यानंतर नवं सरकार तुलनेनं बरंच मोकळं आहे. त्यात अमेरिकेसोबतचे संबंध ठीक होऊ लागल्याने इराणवरचे निर्बंधही शिथिल होऊ लागले आहेत. मात्र सिनेमांवरचे निर्बंध अजूनही तसेच आहेत - मात्र ते कमी होतील अशी आशा जागृत झाली आहे.

या सगळ्याचा नि या सिनेमाचा संबंध आहे का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. आता मी सिनेमाची कथा सांगणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा संबंध तिच्याशी कसा लावायचा हे तुम्हीच ठरवा.

या सिनेमाची नायिका होमा (फतिमा आरिया - ही न्यू वेव्ह काळातली महत्त्वाची अभिनेत्री) ही एक अतिशय निष्णात परिचारिका - नर्स - असून तिला तिच्या हॉस्पिटलमधली सर्वोत्तम परिचारिका समजलं जातं. आपल्या पेशंट्सची सेवा करणे हेच तिचं काम. तिच्या नि तिच्या नवर्‍याच्या (अहमद हमीद) संवादातून समजू लागतं, की तिचा नवरा गेले अनेक वर्ष जे गोडाऊनमधील ऑलिव्ह ऑइल विकायचा प्रयत्न करत होता; नि नुकतंच त्यांचं सगळंच्या सगळं ऑलिव्ह ऑइल विकलं गेलं आहे व त्यांच्या हाती पुन्हा पैसा येऊ लागला आहे. (इराणवरच्या निर्बंधांमुळे कित्येक गोष्टी विकल्या जाणं दुरापास्त होऊन बसलं होतं. नुकत्याच उठलेल्या निर्बंधानंतर परिस्थिती बदलते आहे). त्या वेळी असंही समजतं की बाहेर हिमवर्षाव सुरू झाला आहे. "तो नक्की कधी सुरू होतो, तो क्षण आपल्याला कधीही कळत नाही." असा सूचक निर्देश करणारा नेमका संवाद या जोडप्याच्या तोंडी येतो. तर हा हिमसेक कित्येक दिवस चालू राहिला आहे. त्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. होमाने हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांच्या, झोपूनच असलेल्या आईची देखभाल करण्यासाठी १० रात्री रात्रपाळी करण्याचं होमाने मंजूर केलं आहे. मात्र हा हिमसेक पूर्ण वेळ चालूच आहे. या बर्फवृष्टीमुळे केवळ प्रवासच नाही, तर दूरवरचं दिसणंही दुरापास्त होऊ लागलं आहे. या बर्फाबद्दल सगळे जण तक्रार करत आहेत, काम संथ झालं आहे; मात्र ठप्प झालेलं नाही.

डॉक्टरची आई ही एक कटकटी बाई आहे. सतत नर्सेसवर डाफरण्याव्यतिरिक्त ती फार काही करायला तयार नाही. ती अशी बिछान्याला खिळून - एक प्रकारे जायबंदी होऊन पडलेली आहे. तर दुसरीकडे होमा धडधाकट असूनही या हिमवृष्टीमुळे अडकल्याने दुसऱ्या प्रकारे जायबंदीच आहे. त्यात अचानक तिचा नवरा तिला सांगतो, की आता त्याला पुन्हा लिहायला सुचू लागलं आहे. एकूणच आतापर्यंत नेहमीच्या (तेल विकले जात नाही, नवरा काहीच करत नाही) वगैरे परिस्थितीला सरावलेल्या होमाला अचानक होणारे चांगले बदलही स्वीकारायला जड जात आहेत. त्यात हिमसेक बंद होईल अशा बातम्या येताहेत, पण तो बंद काही होत नाहीये. तिच्या रात्रपाळीमुळे तिला रात्री झोप नाहीच आहे. त्यांच्या सोसायटीतील एक बिर्‍हाड एका पियानो शिक्षिकेला भाड्याने दिले आहे. दिवसा तिचे वर्ग चालू असतात. त्यामुळे होमाला दिवसाही झोपणं कठीण जातंय.

एकीकडे नवरा उत्साहात येऊ लागलाय. त्याला लेखन सुचू लागलंय. होमाची मैत्रीण विचारते, की त्याने ते बंद का केलं होतं? त्यावर होमा म्हणते, "मला आता नक्की कारण आठवत नाही, पण ते अचानकच बंद झालं." एकूणच चित्रपट अशाच प्रसंगांनी भरलेला आहे. म्हटलं तर कथेशी संबंधित, म्हटलं तर सूचक किंवा प्रतीकात्मक!

इराणी सेन्सॉरच्या दृष्टीनं पाहता ही वादळामुळे अडकलेल्या महिलेची कथा आहे. मात्र माझं मन तेवढ्याच अर्थाला धरून राहायला तयार नाही. आता हा हिमसेक म्हणा, वादळ म्हणा किंवा अ‍ॅव्हलान्च म्हणा, हे इराणला जवळजवळ स्थानबद्ध करणार्‍या निर्बंधाचं प्रतीक मानलं; तर अनेक पात्रयोजना, प्रसंग इत्यादी सगळंच निराळ्या अर्थाचं होत जातं. होमाचा बॉस, होमाचा मुलगा, होमाच्या गतकाळाच्या आठवणी आपल्याला कधीच दिसत नाहीत. दिसतो तो होमाचा वर्तमान. गेले कित्येक दिवस असलेल्या बाह्य परिस्थितीमुळे ओढगस्तीला आलेला तिचा संसार जाणवतो आणि त्यातलं नि इराणमधल्या दरम्यानच्या काळातलं साधर्म्य लगेच दिसू लागतं. आजारी असलेली नि आधीच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी म्हातारी बाई आपल्याला भेटते. तिला सोडून तिचा मुलगा (होमाचा बॉस) 'बाहेर' आहे. त्याची मुलगी (या म्हातारीची नात) मेली आहे - भविष्य खुंटल्यासारखं वाटतंय नि हे म्हातारीला कळू द्यायचं नाहीये. पण हे म्हातारी पक्कं जाणून आहे. आता मरेल की मग अशा बेताला आलेली असूनही जगण्याची दुर्दम्य इच्छा बाळगलेली, आणि अजून पुन्हा बाहेरच्या जगात येऊ पाहणारी, म्हातारी बाई एकीकडे तग धरून आहे. चिडचिडी झालीये, पण संपलेली नाही. हिच्यात आणि दरम्यानच्या अतिरेकाने आजारी पडलेल्या इराणी संस्कृतीत मला साधर्म्य दिसू लागलं. हा मी लावलेला चश्मा कसा बरं मानावा? तेल विकलं गेल्यावर, पर्यायाने निर्बंध सैल होऊ लागल्याची चुणूक दिसू लागल्यावर, होमाच्या नवर्‍याला पुन्हा लेखन सुचू लागतं, त्याचे वेळी त्याच्या शेजारी पियानो शिकवणारी शेजारीण येऊन राहते हा इराणी कलेला मिळू लागलेला नवा श्वास नाही असं मी कसं समजावं? आणि सर्वांत शेवटी - या सगळ्यांचा वादळी काळात सांभाळ केल्यावर नव्या दिवसांना सामोरी जाताना संमिश्र मनोवस्थेत पोचलेली होमा हीच आजच्या इराणचं प्रतीक नाही हे एकवेळ तिथल्या सेन्सॉरला सांगायला ठीक, पण मला पटायला मात्र जड जातं! आणि त्यात ही होमाचं काम केलेली अभिनेत्री ’न्यू वेव्ह’मध्ये मैदान मारणारी आघाडीची अभिनेत्री आहे हा योगायोग की ठरवून केलेली पात्रयोजना?

काही असो. दिग्दर्शकाचं श्रेय असं की एरवी सहज एक प्रतीकात्मक सिनेमा होऊ शकणाऱ्या या प्लॉटमध्ये डोळ्यात बोट घालून ’बघा बघा, प्रतीकं बघा,’ असला (’ऱ्हायनो  सिझनी’य ) डोक्यात जाणारा प्रकार न करता अतिशय हळुवारपणे व कथेच्या अनुषंगाने गोष्टी समोर आणल्या आहेत. या लेखनावरून असं वाटू शकतं की हा फारच प्रतिकात्म सिनेमा आहे आणि सामान्य प्रेक्षकाला कंटाळा येईल. पण प्रत्यक्षात मात्र जरी ही पार्श्वभूमी माहित नसली तरी एक 'नाट्य'पुर्ण चित्रपट, त्या नायिकेच्या मनाची स्थित्यंतरं, इताणमधील बदलते नातेसंबंध, बदलता इराण अश्या इतर चष्म्यांतून बघितला किंवा चष्मा न लावता एक नाट्यपुर्ण सिनेमा म्हणून पाहिला तरीही तो बर्यापैकी ताकदीचा आहे. ही पार्श्वभुमी माहित नसली तर दोन चार प्रसंग असे का आहेत किंवा शेवट असा का आहे याची संगती लावणं कठीण जाऊ शकतं मात्र त्याशिवायही सिनेमा पुर्णपणे रंजन करतो. प्रतिकांनी सिनेमा भरला की साधारणतः रंजकतेकडे दुर्लक्ष होते किंवा मग रंजकतेचा दर्जा राखला तर अशा प्रकारचा मथितार्थ दाखवण्याची कसरत जमत नाही. हा सिनेमा त्याला सुखद अपवाद आहे. शेवटी या अनोख्या चित्रपटाने काहीही न बोलता एक छान आशावाद जागवत चित्रपटाचा शेवट केला आणि माझ्यासारख्याच्या विचाराला खाद्य दिलं. शक्य झालं, तर हा चित्रपट चुकवू नका आणि बघताना हे संदर्भ लक्षात ठेवून बघा. इतकंच!

अ‍ॅव्हलान्च (२०१५) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

अ‍ॅव्हलान्च (२०१५)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: मोर्तझा बार्शबाफ
  • कलाकार: अहमद हमीद, फतिमा आरिया
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: इराणी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: ९० मिनिटे
  • निर्माता देश: इराण