टीव्हीवरची टीका (हाउस ऑफ कार्ड्स - बीबीसी - १९९०)

टीव्ही आणि अभिजातता या दोन गोष्टींची सांगड भारतीय मन घालू शकलेलं नाही, त्याला तितकीच सबळ कारणं आहेत. काही मोजके माहितीपर कार्यक्रम आणि दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळातले काही अपवाद सिद्ध करणारे हाताच्या बोटावर मोजून संपतील इतके कार्यक्रम सोडले, तर टेलिव्हिजननं कायमच एक सवंग आणि निर्लज्ज भूमिका बजावलेली आहे. मग त्या वृत्तवाहिन्या असोत, तथाकथित वास्तववादी कार्यक्रम असोत किंवा कथानकप्रधान मालिका. त्याबद्दलची आपली बोचरी टीकादृष्टी कशानं मवाळ होत असेल, तर ती स्मरणरंजनाच्या - अर्थात नॉस्टाल्जियाच्या - आधारानं. हेच पुरेसं बोलकं आहे. या पार्श्वभूमीवर परदेशी - विशेषकरून ब्रिटिश - टेलिव्हिजनकडे पाहिलं, की अवाक व्हायला होतं.

लेखन, चित्रीकरण आणि अभिनय - आशय आणि तंत्र - कोणत्याही निकषावर पाहिलं, तरी तिथे अतिशय दर्जेदार काम झालेलं दिसतं. टीव्ही ही मोठ्या पडद्याकडे जाण्याची एक पायरी न मानता अनेक मोठे नट टीव्हीवर चिरस्मरणीय असं काम करून जाताना दिसतात. प्रेक्षकप्रियतेला शरण न जाता मोजकंच पण चोख काम करण्याचा देखणा माज दिसतो. तंत्रज्ञानानं आजच्या प्रेक्षकाला कमालीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रसारणाची वेळ हे बंधन मुळी उरलेलंच नाही. आपल्याला हव्या त्या वेळी, हव्या तितक्या वेळा, मागे-पुढे करत, सलग वा खंडित, को-ण-त्या-ही प्रकारे टेलिव्हिजन पाहणं शक्य झालेलं असताना - प्रेक्षक कमालीचे सजग हुषार आणि मनमानी झालेले आहेत. याचं भान बाळगत, अशा प्रेक्षकाच्या एक पाऊल पुढे राहत, काम झालेलं दिसतं.

अशा कार्यक्रमांपैकी एक मालिका, म्हणजे ’हाउस ऑफ कार्ड्स’. (१९९०पासून सुरुवात करत पुढे पाच वर्षांत ‘हाउस ऑफ कार्ड्स’ (१९९०), ’टू प्ले द किंग’ (१९९३) आणि ’द फायनल कट’ (१९९५) अशा तीन पर्वांमध्ये प्रत्येकी ४ भागांत ती सादर करण्यात आली. मायकेल डॉब्सच्या कादंबर्‍यांवर त्याचं कथानक बेतलेलं असलं, तरी त्यात अनेक महत्त्वाचे बदलही करण्यात आलेले होते (त्यावरून लेखकाशी कोणतेही वाद झाल्याचं ऐकिवात नाही!) इयन रिचर्ड्सन या नटानं त्यात प्रमुख भूमिका केलेली होती आणि ती इतकी प्रचंड लोकप्रिय झाली की एखाद्या गोष्टीला मूक आणि सोयीस्कर दुजोरा देताना त्यानं म्हटलेल्या, ’यू मे से सो, बट आय कान्ट पॉसिब्ली कमेंट.’ या त्याच्या खास शैलीदार वाक्याचा वापर ब्रिटिश संसदेतही करण्यात आल्याची नोंद आहे!)

सत्तेसाठी चाललेली रस्सीखेच, त्यासाठी कोणतेही विधिनिषेध न बाळगता खेळले जाणारे सार्वत्रिक डावपेच आणि त्या विश्वावर अधिराज्य गाजवणारा फ्रान्सिस अर्कर्ट हा ’लंबी रेस का’ राजकारणपटू. हे एका ओळीतलं कथानक. पण त्या एका ओळीमागे निर्घृण आणि नाजूक निर्णयांचं काय जबरदस्त विश्व दडलेलं आहे!

प्रेक्षकांसाठी इशारा: ही मालिका प्रदर्शित होऊन २० वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. मालिकेच्या तिन्ही पर्वांबद्दल या लेखात चर्चा केलेली आहे. कथानकातला धक्कादायक भाग उघड करणं टाळलं असलं, तरी काही तपशील देणं अत्यावश्यक आहे. अशा तपशिलांचं तुम्हांला वावडं असेल, तर कृपया पुढे वाचू नका.

चीफ व्हिप या हुद्द्यावर काम करणारा प्रौढ फ्रान्सिस आपल्याला भेटतो, तेव्हा त्याचं पंतप्रधानपदाचं स्वप्न अश्यक्यप्राय वाटत असलेलं. पण तो निराश झालेला नाही. एकेका अडथळ्याला पद्धतशीरपणे नेस्तनाबूत करत, लोकांच्या कुलंगड्यांचा वापर करून घेत, माध्यमांना खेळवत, काहीही करायला मागेपुढे न पाहता - तो पंतप्रधानपदापर्यंत कसा पोचतो, हे पहिल्या पर्वाचं कथानक. त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी आपला परिचय होतो. त्याची थंड-सावध पत्नी एलिझाबेथ, त्याचा विश्वासू सहकारी टिम स्टॅम्पर आणि त्याचे अनेक प्रतिस्पर्धी. याच पर्वात फ्रान्सिसची मूल्यव्यवस्था आपल्याला कळत जाते. त्याला मन नाही असं नाही, पण त्याची महत्त्वाकांक्षी वृत्ती कायम त्यावर मात करते. फ्रान्सिसचं थंड रक्ताचं मानवी मन आणि ध्येयावरून कदापि न हटणारी नजर हे एक ’डेडली कॉम्बिनेशन’ आहे. या भागात मॅटी स्टोरिन नामक एक तरुण पत्रकार मुलगी त्याच्या दृष्टीनं कळीची भूमिका वठवते. तिला माहिती आणि मतं पुरवणं, त्यापासून नामानिराळंही राहणं, तिच्याकरवी आपल्याला हव्यात त्या गोष्टी, हव्या त्या कलानं, सार्वजनिक करवून घेणं… या सगळ्यात तो हळूहळू तिच्यातही गुंतत जातो. त्यांच्यातलं गुंतागुंतीचं, दुधारी नातं - हा या पर्वाचा ’हायलाईट’ आहे. हे नातं किती प्रामाणिक आणि किती संधीसाधू, उभयतांपैकी कोण अधिक स्वार्थी, कुणाची सदसद्विवेकबुद्धी किती निद्रिस्त, कुणाच्या हातातली साधनं अधिक धारदार असे प्रश्न आपल्याला स-त-त पडत राहतात.

दुसर्‍या पर्वात आपल्याला भेटतो पंतप्रधान झालेला फ्रान्सिस. नाही-रे गटाची तमा न बाळगणार्‍या त्याच्या निष्ठुर नेतृत्वाशी लढायची ताकद विरोधी पक्षात उरलेली नाही. त्यांच्याकडे तितकी दीर्घदृष्टी, तितकी महत्त्वाकांक्षा, तितकी जिद्द आणि क्षमता असलेलं कुणी नेतृत्वच उरलेलं नाही. सगळेच फ्रान्सिसनं नेस्तनाबूत केलेले आहेत. (परिचयाची वाटते ही परिस्थिती? असो. ’हाउस ऑफ कार्ड्स’ पाहताना हे निरनिराळ्या संदर्भांत आणि निरनिराळ्या कालखंडांची आठवण करून देत, अनेकवार अनुभवाला येतं इतकं नोंदून आपण पुढे जाऊ.) इथे फ्रान्सिसचा सामना आहे तो दस्तुरखुद्द राजाशी. ब्रिटनच्या राजघराण्यात नवा राजा गादीवर आलेला आहे. उच्चशिक्षित, स्वप्नाळू, काहीसा तत्त्वज्ञ मनोवृत्तीचा हा राजा. त्याला राजकारणातल्या डावपेचांंमध्ये रस नाही. तो मूर्ख नाही, त्याला खराच रस आहे तो लोककल्याणात. राजकारणामध्ये हस्तक्षेप न करण्याचा अलिखित करार धाब्यावर बसवून तो फ्रान्सिसच्या धोरणांविषयी जाहीर भूमिका घेत सडेतोड टीका करतो, तेव्हा या संघर्षाची चाहूल आपल्याला लागते. फ्रान्सिसच्या दृष्टीनं त्याच्या सर्वांगीण सार्वभौम सत्तेला दिलेलं हे एक आव्हान आहे. त्याला परिचित असतो तो सत्तेसाठी काहीही करायला असणारा मानवी स्वभाव. असल्या क्षुद्र डावपेचात रस नसलेला माणूस आणि त्याची आपल्याला आव्हान देण्याची हिंमत त्यानं पाहिलेली-अनुभवलेली नाही. सुरुवातीला राजाला पाहता पाहता गुंडाळण्याची भाषा करणारा फ्रान्सिस राजाच्या भूमिकेला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे हादरतो, यात नवल नाही. मग फ्रान्सिस, सॅरा नामक राजकीय विश्लेषणतज्ज्ञेला हाताशी धरतो. सॅरा कमालीची बुद्धिमान, फ्रान्सिसच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाच्या मोहात पडलेली स्त्री. आपण दोघं बरोबरीच्या नात्यानं एकमेकांना काही शिकवू-शिकू असं म्हणत ती फ्रान्सिसच्या तंबूत दाखल होते खरी, पण हे नातं अर्थातच अनपेक्षित वळणं घेत जातं. राजाचे कमालीचे विश्वासू सहकारी आणि मूल्याधिष्ठित राजकारण करत त्यांनी फ्रान्सिसला दिलेले शह पाहणं अतिशय आनंदाचं आहे.

एकीकडे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी बाळगून असलेला फ्रान्सिस. तो ’लोकांनी निवडून दिलेला लोकनेता’; तर दुसरीकडे पिढ्यानपिढ्यांच्या हुकूमशाहीचं बुजगावणी प्रतीक म्हणून उरलेला नामधारी राजा, तो मात्र लोककल्याणासाठी गादीवर पाणीही सोडायच्या तयारीत असलेला. हा विरोधाभास नोंदताना आपले सगळे आडाखे आणि हिशेब उलटेपालटे होतात.

या पर्वाच्या अखेरीस फ्रान्सिसला या सामन्याची फार मोठी मानसिक किंमत चुकवावी लागते. त्याच्या सहजी दबणार्‍या सदसद्विवेकबुद्धीचं भूत त्याच्या मानगुटीवर कायमचं बसलेलं आपल्याला दिसतं. लोकांसमोर आत्मविश्वासपूर्ण, शांत, विवेकी स्मित कायम राखणार्‍या या राजकारणी माणसाचे एकाकी क्षण कमालीचे विकल, भयभीत, संशयग्रस्त अवस्थेतले दिसतात. या दोन अवस्थांमध्ये लीलया वावरताना इयन रिचर्ड्सनने काय कमाल केलीय! झुकलेले खांदे, चेहर्‍यावरच्या पराभूत रेषा, नजरेतला संभ्रम - हे सगळं निमिषार्धात पालटत तो विजीगिषू नेता होतो - नजरेत कठोर जिद्द संचारते - प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबूत करणारं क्रौर्य त्याच्या अवघ्या देहबोलीतून प्रतीत होऊ लागतं.

इयन रिचर्डसन हा मूळचा रंगमंचीय नट. शेक्स्पिअरन भूमिका करणारा. ’रॉयल शेक्स्पिअर कंपनी’च्या संस्थापकांपैकी एक असलेला. शेक्स्पिअरच्या ’रिचर्ड द थर्ड’ या पात्राच्या छटांचा आधार घेत इयननं फ्रान्सिसची भूमिका जिवंत केली. हे तपशील कळल्यावर त्यानं फ्रान्सिसच्या पात्राला जी उंची दिली आहे, ती समजून घेणं काहीसं सोपं होतं, नाही?

तिसर्‍या पर्वात आपल्याला दिसतो तो अनभिषिक्त सम्राट असल्याच्या थाटातला फ्रान्सिस. त्याला पराभूत करणं अशक्यप्राय असल्याची दंतकथाच जणू त्याच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये पसरली असावी, असं एकूण वातावरण. त्याच्या आजूबाजूला अत्यंत खुजे, होयबा, संधीसाधू लोक आहेत. फ्रान्सिस त्यांना लीलया खेळवतो आहे. त्याच्या लढाऊ वृत्तीला आव्हानच उरलेलं नाही, त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय कर्तृत्व गाजवण्याची स्वप्नं पडू लागलेली दिसतात. आधीच्या दोन पर्वांमध्ये जे दाखवलं आहे, त्याहून निराळं या पर्वात काय असणार, असा प्रश्न पडतो सुरुवातीला. पण आपल्याला सुखद धक्का मिळतो. एकीकडे त्याच्या निवृत्तीचे ढग क्षितिजावर गोळा होत असलेले. भूतकाळात गाडलेल्या पापांची भुतावळ अधिकाधिक गडद, जिवंत होत असलेली. दिवसेंदिवस फ्रान्सिस वयोवृद्ध, निष्ठुर आणि माथेफिरूपणाच्या सीमारेषेवर असल्यासारखा हट्टी होत जाताना दिसतो.  मार्गारेट थॅचर यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम मोडणं हाही त्याच्या दृष्टीनं जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे.

अशा परिस्थितीत काय असू शकतो, त्याच्या तथाकथित देदीप्यमान कारकिर्दीचा यथार्थ शेवट? त्याला त्याच्या पापांची सजा मिळणं? ते फारच आदर्शवादी आणि भाबडं होईल. त्याच्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता करत त्याला विजयीपणे पायउतार होताना दाखवणं? ते अतिशय एकांगी आणि सपाट होईल. त्याच्यासारख्याच निर्घृण आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्वाचा उदय? पण इतिहास अशा प्रकारची व्यक्तिमत्त्वं इतक्या सहजासहजी जन्माला घालत नसतो. ते अतिशय अवास्तव होईल. आणि जीवनातल्या चांगुलपणाचं काय? त्याला कुठेच कधीच जागा नसते का? हे किती निराश करणारं, काळंकुट्ट आहे! आपल्याला आलटूनपालटून पडणार्‍या या परस्परविरोधी प्रश्नांना लेखक-निर्माता-दिग्दर्शकानं अतिशय समर्पक आणि चोख उत्तर दिलं आहे. ते मुळातूनच पाहायला हवं.

या गोष्टीत एक अतिशय मजेशीर तंत्र वापरण्यात आलं आहे. ’ब्रेकिंग द फोर्थ वॉल’ - अर्थात गोष्टीतून एक पाय बाहेर टाकत नटानं प्रेक्षकांशी संवाद साधणं.

एखाद्या प्रसंगात समोरच्या पात्राकडे पूर्ण दुर्लक्ष्य करत फ्रान्सिस थेट कॅमेर्‍याकडे नजर रोखतो आणि आपल्याला विश्वासात घेतो. “तुम्हांला काय वाटतं? खरं बोलतोय हा? छे हो! अजिबात नाही. मी पक्कं जाणून आहे.” असं काहीतरी बोलत तो प्रेक्षकांना बघता बघता विश्वासात घेतो. कधी आपलं क्रूर अंतरंग दाखवतो, कधी एखादी मिश्किल कोपरखळी मारतो. कधी निव्वळ एक भिवई उचलत औपरोधिक हसू हसतो. स्वगत या शैलीदार प्रकारापेक्षा अगदी अनौपचारिक अशी ही संवादाची शैली. ती प्रेक्षकांना जाणती नजर बहाल करते. याही संवादादरम्यान सरड्याला लाजवेल अशा गतीनं पालटणारे फ्रान्सिसच्या चेहर्‍यावरचे भाव पाहणं ही एक अस्सल मेजवानी आहे.

एफ. यू. ही फ्रान्सिस अर्कर्टच्या नावाची आद्याक्षरं. त्यांचा इतका चपखल वापर लेखकानं करून घेतलेला आहे, की बस! तसाच भाषेचा वापर. प्रतिस्पर्ध्यांना जाहीर उत्तरं देताना दीर्घ पल्लेदार वाक्यं आणि सूक्ष्म उपरोध वापरणारी; खाजगीतल्या संभाषणांत काहीशी अनौपचारिक-घरगुती आणि तुटक होणारी; जाहीरपणे सांगायच्या नसलेल्या अनेक गोष्टी दोन शब्दांमधल्या सूचक मौनासह सहजी सांगून जाणारी अस्खलित भाषा हे राजकारणपटूंचं हत्यारच. या गोष्टीत, हे हत्यार लखलखतं, कडाडतं, डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच आरपार जातं! हे श्रेय जितकं लेखकाचं, तितकंच अभिनेत्यांचं आणि दिग्दर्शकाचंही.

स्थलकालातीत संदर्भ जागे करणारे लागेबांधे हे या कथानकाचं अजून एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य. त्यात नावं आणि संदर्भ आहेत ते ब्रिटिश राजकारणाचे, स्थळांचे. पण पृथ्वीतलावर कुठेही पुन्हापुन्हा घडणारं हे कथानक. त्यात आपल्याला कधी इंदिरा गांधी - संजय गांधी संबंध दिसतात. कधी भारतातली सद्यकालीन परिस्थिती. कधी गुजरातच्या बंद करून ठेवलेल्या फाइल्स. कधी पडणारी मशीद, कधी अमृतसरच्या मंदिरातला रक्ताभिषेक. कधी भारतातले अनेक घोटाळे-उपघोटाळे-प्रतिघोटाळे दिसतात. कधी घाशीराम कोतवाल आणि नाना फडणीस यांच्यातलं सनातन नातं दर्शन घडवून जातं. जातीचं राजकारण मतपेटीसाठी करणं तर फायद्याचं असतंच. पण ’विश्वास कुणावर ठेवायचा’ या सनातन प्रश्नाभोवती फिरणार्‍या या जगात रक्ता-नात्या-जातीचा गोतावळा किती महत्त्वाचा असतो याचं एक निराळंच भान ही गोष्ट पुरवते. ’सिंहासन’ या अरुण साधूंच्या कादंबरीवर आधारित जब्बार पटेलांच्या चित्रपटातलं ’उषःकाल होता होता’ हे गाणं आठवतं. वेड लागलेला दिगू टिपणीस आणि पहिल्या पर्वातली मॅटी स्टोरीन समांतर वाट चालताना दिसतात. ब्रिटिश पार्लमेंटच्या भव्य पार्श्वभूमीला दिसणारे क्षुद्र उंदीर, फाटकी चिरगुटं सांभाळत थंडीपासून वाचू पाहणारे ’होमलेस’ लोकांचे तांडे - या गोष्टीला एक सार्वकालिक परिमाण देतात.

मालिकेत दोष नाहीत असं नव्हे. त्याबद्दल बोलता येईलच. पण तूर्तास मी ’आपल्याकडे या दर्जाचं काही टीव्हीवर पाहायला मिळणं, ही नवलाईची न राहता रोजमर्रा बाब कधी होईल?’ या प्रश्नात गुंग आहे. दोषबिष नंतर!

हाउस ऑफ कार्ड्स - चित्रपटाची /नाटकाची माहिती

हाउस ऑफ कार्ड्स
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: पॉल सीड
  • कलाकार: इयन रिचर्ड्सन, किटी अल्ड्रिज, डायना फ्लेचर, डेविड लिऑन, मायकेल किचन, सुझान हार्कर
  • चित्रपटाचा वेळ: १० तास / ६०० मिनिटे / ५० मिनिटे * ४ भाग * ३ पर्व
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: १९९० - १९९५
  • निर्माता देश: इंग्लंड