प्रजासत्ताकदिन २०१६ परेडच्या निमित्ताने: चित्रीकरणातील तांत्रिक प्रगती

भारतात टीव्ही आला, बैजवार दूरदर्शन सुरू झाले. अजूनही तो काळ अनेकांच्या स्मरणात असेल. तेव्हा लागलेल्या काही सवयी -जसे रंगोली, संध्याकाळच्या सातच्या बातम्या वगैरे -अजूनही कित्येकांच्या सुटलेल्या दिसत नाहीत. काही कार्यक्रम गेले अनेक वर्षे दूरदर्शनवर दिसत आले आहेत. तरी ते आपली एक खास जागा टिकवून आहेत. भारताच्या प्रजासत्ताकदिनाची दिल्लीत राजपथावर निघणारी परेड हा त्यापैकीच एक सोहळा. १९५०साली भारताने राज्यघटना स्वीकारली आणि प्रजासत्ताक स्थापन झाले. त्यानंतर १९५५पासून ही परेड 'राजपथ'ला होऊ लागली. सुरुवातीला दिल्लीतील ही परेड बाकी देशातील लोकांना दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी पेपरात छायाचित्ररूपात बघता येत असे. भारतात टीव्ही आला आणि त्याच वर्षापासून या परेडची क्षणचित्रे लोकांना त्याच दिवशी बघता येऊ लागली. "संध्याकाळच्या बातम्या" हा जेव्हा लोकांच्या मोजक्या 'करमणुकीच्या कार्यक्रमां'पैकी एक होता तेव्हा २६ जानेवारीला संध्याकाळी भारताची परेड, त्यात दिसणारी आपली सैन्याची तयारी, आपल्या देशातील सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता आणि एकुणातच विविध क्षेत्रात आपण केलेली प्रगती व आपली स्थिती भारतीय समाजात 'एकत्वाची' भावना अधिक बळकट करू लागली असं मला वाटतं

तुम्ही म्हणाल या सगळ्याचा नि "पाहावे"चा संबंध काय? सांगतो. जरा दमानं घ्या! तर आज मी सालाबादप्रमाणे सवयीने प्रजासत्ताकदिनाची परेड बघत होतो. तसं बघायला गेलं तर या परेडमध्ये नावीन्य काही नाही. नेहमीप्रमाणे पंतप्रधानांनी 'अमर जवान' ज्योतीवर पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर पाहुण्यांचं (यंदा फ्रान्सचे अध्यक्ष ओलँद) राष्ट्रपतींसमवेत आगमन, स्वागत, मग ध्वजारोहण आणि २१ तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीताची धून, मग शौर्यपदकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, नंतर विविध सैन्यदलांचे संचलन, लष्कराप्रमाणेच तांत्रिक दले (जसे कम्युनिकेशन, रडार, नॅविगेशन आदी विभाग), घोडदळ, उंटदळ आदींचे संचलन, मग वीर बालकांचा हत्तीवरून ताफा, मग काही सांस्कृतिक कार्यक्रम, नंतर विविध राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ, मग विमानांच्या कसरती, शेवटी आकाशात फुगे आणि कार्यक्रम समाप्त.

माझ्या आठवणीत गेले अनेक वर्षे या दिवशी हा कार्यक्रम असाच संपन्न होतोय. वरवर सारख्या वाटणार्‍या या कार्यक्रमाचा एक पापुद्रा वर केला तर दरवर्षी त्यातील तपशिलात काही बदल असतात. जसे यावर्षी पहिल्यांदाच परदेशी सैन्याने संचलनात सामील होऊन (फ्रेंच) आपल्या राष्ट्रपतींना मानवंदना दिली किंवा १९९० नंतर पहिल्यांदाच कुत्र्यांच्या दलाने संचलन केले. त्याचवरोबर भारताने नवी विकत घेतली विमाने, नवी बनवलेली क्षेपणास्त्रे, तंत्रज्ञान, इतर प्रगती दाखवणारे देखावे याचाही समावेश महत्त्वाचा असतो. 

माझा इंटरेस्ट मात्र आणखी एका वेगळ्या गोष्टीत आहे - तो म्हणजे चित्रीकरण, समालोचन आणि प्रसारण. या लेखात प्रजासत्ताकदिनाच्या परेडचा अंगाने उहापोह करणे अगत्याचे ठरेल. १९९०वगैरेच्या आधी बातम्यांमध्ये काही क्षणचित्रे दाखवली जात, त्यामुळे त्यांचा विचार या लेखत करत नाहीयोत. त्यानंतर जेव्हा संपूर्ण लांबीचे चित्रण प्रकाशित केले जाऊ लागले तेव्हा अगदी सुरुवातीचे (साधारणतः १९९२-९३ ते २०००) चित्रीकरण पाहिलेत एक एक गोष्ट सहज लक्षात येते ती म्हणजे मोजक्या क्यामेरातून आणि मोजक्या कोनांतून केलेलं चित्रण. साधारणतः राष्ट्रपतींच्या मंडपाच्या बाजूला "प्रेस" वाल्यांसाठी जो तंबू असे तेथून बहुतांश चित्रण होत असे. आणखी एक कॅमेरा प्रेक्षकांमध्ये टेहळणी बुरुजावर, एक राष्ट्रपतींच्या पंडालाच्या विरुद्ध बाजूस (हाच कॅमेरा कित्येकदा पंडालाचा क्लोज अप दाखवण्यासाठी वापरला जाई). या सगळ्यामुळे प्रेक्षकाला स्वतः तेथील 'स्थायी' प्रेक्षक असल्याप्रमाणे चित्रीकरण दिसे. अर्थातच पंडालातील व्यक्तींचे चित्रण "झूम" करून झाल्याने अनेकदा एखादी प्रेक्षकातील व्यक्ती मध्येच येणे, किंवा पुरस्कार घेणारी व्यक्ती काही पाहुण्यांना झाकणे आदी प्रकार सहज होत. पण तोवर "घरबसल्या हे बघायला मिळते" याचेच प्रेक्षकांचा अप्रूप असल्याने हे चालून जात असे.

माझ्या आठवणीनुसार वाजपेयी सरकारच्या काळात - टु बी स्पेसिफिक, साधारणतः एपीजे कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर- यात एक मोठा बदल झाला. एक ट्रॉलीवर माउंट केलेला गतिशील कॅमेरा अ‍ॅड झाला. (बहुदा प्रमोद महाजनांच्या प्रभावामुळे) या सोहळ्याचे चित्रीकरण आणि प्रसारण यांच्या तंत्रात, क्यामेरामनना मिळणार्‍या "मोक्याच्या" जागेत बरीच वाढ झाली.  त्यानंतर अनेकदा या परेडचे चित्रीकरण क्यामेराची ट्रॉली उंचावर व पुढे नेऊन (म्हणजे परेडच्या थेट डोक्यावरून) केले जाऊ लागले आणि दूरदर्शनच्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष राजपथावर जाऊनही ज्या कोनातून ही परेड दिसणार नाही त्या कोनातून त्याचे चित्रीकरण बघायला मिळू लागले. तोवर हे प्रक्षेपण थेट दिसायलाही लागले होते. यात आणखी एक फरक झाला तो म्हणजे बहुभाषिक समालोचन. तोपर्यंत काहीसे शासकीय भाषेतले एकसुरी आणि हिंदीतील समालोचन ऐकणे प्रेक्षकांना भाग होते. वाजपेयी सरकार येईपर्यंत दूरदर्शनचेही अनेक भाषिक चॅनेल सुरू झाले होते आणि त्यात या सरकारने अनेक भारतीय भाषांना अधिकृत प्रशासकीय भाषेचा दर्जा दिल्यावर हे समालोचन स्थानिक भाषांमध्ये सुरू झाले. त्याची भाषाही काटेकोरपणाकडून क्वचित एखादा शेर, एखादी गाण्यातील ओळ, एखादी ओवी वगैरे समाविष्ट करत अधिक ललित होऊ लागले. कार्यक्रमाच्या दरम्यान किंवा सुरूवातीला पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनसदृश का होईना माहिती, दिल्लीतील स्थळांचे तपशीलही दाखवले जाऊ लागले.

त्यानंतर २००५-६ पर्यंत लहानसहान बदल होतच होते. त्यानंतरचा मोठा बदल म्हणजे कॅमेरांच्या प्रतीत आणि तंत्रज्ञानात बदल. डिजीटल तंत्रज्ञान जसजसे सुधारू लागले या चित्रीकरणाची क्वालिटी अधिकाधिक स्पष्ट होऊ लागली. २०१०वगैरेपासून दाट धुक्यातही दुरून शूटिंग होत असले तरीही स्पष्ट दिसणारी दृश्ये. वक्त्याचे बोलणे (स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे) पाऊस असूनही सुस्पष्ट ऐकू येणे, अनावश्यक भाग लाइव्ह प्रक्षेपण करतानाही संकलित करणे, विविध कॅमेरांच्या दृश्यांचा आणि समालोचकाच्या बोलण्याचा वाढता ताळमेळ आदी गोष्टी सहज लक्षात येतील.

हे सगळे आताच का आठवावे? तर यंदाच्या म्हणजे २०१६ च्या परेडमध्ये लक्षात घेण्याजोगा बदल म्हणजे "स्पायडर" क्यामेरातून केलेले चित्रण. यंदाचे चित्रीकरण नीट बघितलेत तर याप्रकारचे चित्रीकरण नजरेत भरेल: समोरून अतिशय शिस्तबद्ध आणि एका तालात संचलन करत सैनिकांचा अतिशय डौलदार गट येतो आहे. अशावेळी अगदी पुढार्‍यापासून काही अंतरावरून त्याच्या पायांकडील कोनातून त्या एका तालात कवायत करणार्‍यांचे चित्रण सुरू होते. या कोन या परेडसाठी पूर्णत: नवा आहे. जसजशी कवायत जवळ येते तस तसा कोन वेगात बदलू लागलो आणि आता परेड कॅमेराला थडकणार की काय असे वाटत असतानाच झपकन कॅमेरा या सौनिकांच्या डोक्यावरून चित्रीकरण करू लागतो आणि तो गट पुढे गेल्यावर पुन्हा हळूहळू रस्त्यावर उतरतो.  गेले काही वर्षे क्रिकेटमध्ये दिसणारे हे तंत्रज्ञान यंदाच्या परेडमध्ये अतिशय चतुराईने वापरले गेलेले दिसले. 

त्याच बरोबर हेलिकॉप्टरच्या चित्रीकरणासाठी उंचावरून (हेलिकॉप्टर परेडमध्ये केवळ ६० मीटर उंचीवरून उडत असतात) केलेल्या चित्रीकरणामुळेही राजपथावरून उडत्या हेलिकॉप्टर्सचे आजवर कधी न घडलेले चित्रीकरण बघायला मिळाले. अर्थात समालोचन मात्र अजूनही काहीश्या जुनाट हिंदीत चालू होते. दरम्यानच्या काळात अधिकाधिक लोकाभिमुख झालेले समालोचन पुन्हा उलट प्रवास करून शासकीय भाषेत अडकल्यासारखे वाटले. त्यावेळी अद्ययावत एच्डी कॅमेरांमुळे यंदाच्या चित्रीकरणातील स्पष्टता आजवरच्या चित्रीकरणातील सर्वोत्तम वाटली. शिवाय दूरदर्शनवरील समालोचन चालु असताना दिल्लीतील समालोचनाचा आवाज कमी ठेवणे ते विसरले होते का माहित नाही.

आशा आहे येत्या वर्षात तंत्रज्ञानातील प्रगतीसोबत या परेडच्या चित्रीकरणाच्या पद्धतीत होणारा बदल आपल्याला सुखावणारा ठरेल. प्रजासत्ताक दिन आणि त्याची परेड आपल्या देशात प्रजेचेच राज्य आहे याची ग्वाही फिरवण्याचा दिवस. या दिवसाच्या परेडचे अवलोकन जमेल तसे करत "पाहावे मनाचे"च्या वाचकांना शुभेच्छा देत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

प्रजासत्ताकदिन २०१६ च्या सोहळ्याचे प्रक्षेपण - चित्रपटाची /नाटकाची माहिती

प्रजासत्ताकदिन २०१६ च्या सोहळ्याचे प्रक्षेपण
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: .
  • कलाकार: -
  • चित्रपटाचा वेळ: 90
  • भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत