इव्दू (२०१९): एक घ्यावाच असा अनुभव

इव्दु (Iewduh) हा यंदाच्या पिफच्या पहिल्याच दिवसाचा फाईंड आहे. खुप दिवसांनी एखादा सिनेमा बघून त्याबद्दल भरभरून लिहावं वाटलं. आजवर भारतातील स्थानिक भाषांमधील सिनेमावर मराठी, बंगाली आणि दक्षिणेकडील सिनेमांचा बोलबाला होता. मात्र गेल्या काही वर्षात ईशान्य भारतातून काही उत्तम सिनेमे आपल्याला मिळताना दिसतात. इव्दू (अर्थात मुळ उच्चार मला देवनागरीत लिहिता येत नाहीये, चुभुदेघे) .. तर इव्दूचे आंतरराष्ट्रीय शीर्षक आहे 'दी मार्केट'. शिलाँगमध्ये १०० वर्षांपासून सुरू असलेल्या इव्दू मार्केट हा या सिनेमाचा विषय.

कोणतंही मार्केट म्हटलं की विक्रेते, विकला जाणारा माल आणि गिऱ्हाईकं हे घटक प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात पण त्याही पलिकडे त्या बाजारालाच आपलं घर समजून तिथेच रहाणारे, तिथेच पोटाची खळगी भरणारे आणि आपापल्या कथानकांना घेऊन त्या बाजाराचा एक भागच असणारी आणखी काही लोकं असतात. या लोकांना आपण नेहमी बघतो - आणि बघून न बघितल्यासारखं करतो. पण तीही माणसं असल्याने त्यांच्याही काही कथा असतात. आपापल्या कथेत त्यांचीही एक भुमिका असते. आणि या भुमिकांच्या आंतरबंधाने मार्केट किंवा बाजाराचा मोठा पट पूर्ण होऊ शकत नाही.

हा सिनेमा आपल्या या आपण दुर्लक्ष केलेल्या लोकांच्या जगात सहज घेऊन जातो आणि मग एकेक पदर उलगडत जातात. आपल्याला मुख्य कथेचा नायक माईक (अल्बर्ट मॉरी) हा सार्वजनिक संडासाची देखभाल करून त्याच्या भाड्यावर पोट भरत असतो. आपल्याला भेटतो रीहॅब सेंटरमधून आईच्या शोधात पळून आलेला आणि माईकने आश्रयच नाही तर त्याच्या अभ्यासाची काळजी घेत आपलंसं केलेला 'हेप' (डेन्वर पॅट्रीॲट्). मुला-सुनेने बाजारात सोडून दिलेला स्मृतिभ्रंश झालेला बाप लामारे भेटतो, विक्रेत्यांना चहा पाजणारी एड्विना असते तर भाजीविक्रेता आणि जैंतिया लोकांमध्ये एड्विनाने लग्न करावे म्हणणारा पुन असतो. मुलीच्या सासरी होणाऱ्या छळाने चिंतित आणि हतबल आणि हेपला कामावर ठेवणारे मिश्राजी भेटतात. या सगळ्या कथानकांना जणू पार्श्वभुमि द्यायलाच बसला आहे असा एक निनावी गायक/वादक त्याच बाजारात बसतो. तर माईकची दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला वैतागलेली मैत्रीण प्रियाही असते.

यापैकी मिश्राजी आणि पुन सोडले तर विक्रेते कोणीही नाहीत. विक्रेते आणि गिऱ्हाईकं यांच्यापेक्षा वेगळे आणि बाजाराचा अविभाज्य घटक असणारी ही मुख्य पात्र आहेत. आणि मग सुरू होतो या सगळ्या धाग्यांचा स्वतंत्र आणि तरीही एकमेकांत गुंफलेला - गुंतलेला - प्रवास. प्रेक्षक या प्रत्येक धाग्याशी जोडला जातो. कधी दिसणाऱ्या , तर मिश्राजींच्या मुलीसारख्या न दिसणाऱ्या पात्राशी समरस होत जातो. या प्रवासात अनेक घटना घडतात. काही आनंदाच्या काही दु:खाच्या काही भांडणांच्या तर काही प्रेमाच्याही. यावेळी ही सगळी पात्र आपापल्या परीने आणि स्वभावधर्मानुसार त्या घटनांना प्रतिसाद देतात. मात्र बाजार चालूच रहातो, चालूच असतो आणि यांची आयुष्यं सुद्धा.

या सिनेमात जवळजवळ प्रत्येक पात्राचा अभिनय कमालीचा जिवंत आहे. वाचिक अभिनयच किंवा संवादफेक किंवा हावभावच नव्हेत तर कायिक अभिनयातून ही पात्र खणखणीत बोलतात. मार्केट हे आपलं घर असल्याप्रमाणे तिथलं सांडपाणी, कचरा यांच्याकडे कोणताही त्रास न बाळगता आणि सहज वाटाचाल करणारी ही पात्रे असोत, किंवा घरात बागडल्याप्रमाणे फिरणारा माईक असो, त्या बोळात मुटकुळे करून निबरपणे बसलेली प्रिया असो किंवा सतत आजारी लामारे असो. देहबोली हा या सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बाकी सर्वच तांत्रिक बाबींमध्ये सिनेमा चोख आहे.

या सगळ्यात सतत अवतीभवती दिसणारा बाजार हे आपोआपच एक महत्त्वाचे पात्र होत जाते - हे कितीही घासून गुळगुळीत झालेले वाक्य असले तरी इथे खूपच आवश्यक आहे. आपल्या विश्वात रसरसून जगणारी ही पात्रं आपल्याला एक नवीन दृष्टी देतात. त्यांच्यासोबत स्वतंत्रपणे आपण एकाच वेळी वेगवेगळ्या कथानकांच्या प्रवासाला निघतो. यात वेगवेगळ्या पात्रांच्या कहाण्या एकमेकांना छेद देत जातात. शेवटी जेव्हा सिनेमा संपतो तेव्हा आपल्यापुढे असते ते तलम वस्त्र, ज्याचा प्रत्येक पेड आपल्या समोर विणला गेल्याय, त्या प्रत्येक धाग्याशी आपण परिचित आहोत. पण या सगळ्या धाग्यांची गुंफण आपल्यापुढे एक अनुभव घेउन येते, एक आरसा घेउन येते.

हा आरसा एका बाजाराचा आहे, त्यातील पात्रांचा आहे आणि त्याहून मुख्य तो एका समाजाचा आरसा आहे. या बाजारात समाजातील वंचित, दुर्लक्षित माणसांना केंद्रस्थानी आणून दिग्दर्शक आपली सभोवतीच्या माणसांकडे बघायची नजर बदलण्यात यशस्वी झाला आहे हे आपल्याला सिनेमाघराच्या बाहेर पडताना जाणवू लागतं आणि आपण थरारतो. 

हा सिनेमा एक अनुभव आहे. तो अजिबात मिस करू नका अशी जोरदार शिफारस!

इव्दू - दी मार्केट (२०१९) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

इव्दू - दी मार्केट (२०१९)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: प्रदिप कुर्बाह
  • कलाकार: अल्बर्ट मॉरी, रिचर्ड खारपुरी
  • चित्रपटाचा वेळ: ९५ मिनिटे
  • भाषा: -
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१९
  • निर्माता देश: भारत