जाऊंद्याना बाळासाहेब(२०१६): मुळांना मातीत रुजवू पाहणारा सिनेमा

प्रत्येकाचा जन्म कुठे व्हावा हे काही त्या-त्या व्यक्तीच्या हाती नसतं. जिथे जन्म होतो; त्या जागेचं आपलं असं स्थान असतं, फायदे-तोटे असतात, आपलं असं एक 'बॅगेज' असतं. माझा जन्म झाला एका बामणाच्या घरात - मात्र ते घर होतं मुंबईतील एका गावठाणात. आमच्या आख्ख्या गल्लीत (बहुधा आख्ख्या गावठणात) आमचं एकमेव ब्राह्मण कुटुंब. बाकी सगळा शेजार आगरी, कोळी, ख्रिश्चन हे प्रामुख्याने आणि त्यांच्यासोबत यूपीच्या भैय्यांपासून ते साऊथचे 'मद्राशी' अशा अनेकांचा! आमच्यासकट अनेकांची खोल्या-दीड खोल्यांची खोपटी. पण लख्ख आठवतं की त्यातही मी माझ्या मैत्रांबरोबर खेळायला गेलो की मला वेगळा दर्जा दिला जायचा. मी विचारणा केली की सहसा मुलांना खेळायला पाठवायला नकार मिळत नसे किंवा मला आवडते म्हणून हौसेने ताजी मासळी बनवून खिलवणं, प्रसंगी मासेमारीसाठी पार भायंदरच्या खाडीपत्तर मला नावेतून घेऊन जाणं वगैरेही चालायचं. आख्खी नाव - अगदी माझ्याहून लहान पोरांसकट- माशांना जाळ्यातून सुटं करताना व्यग्र असतानाही मी नुसता बसून असायचो. मला कोणी विचारायचं नाही, की तू कामाला का हात लावत नाहीस आणि मलाही ते न करणं अगदीच नॉर्मल वाटायचं. सुरुवातीला - जवळजवळ शाळा होईस्तोवर- हे सगळं असंच असतं हे गृहीतच होतं. पण जसजसं वाचन वाढलं आणि आमच्या उपनगराबाहेर जाणं सुरू झालं - नेहमीची वहिवाट बदलली- तेव्हा जाणवलं, की यात माझी जात हा निकषही आपली एक भूमिका वठवत होता. पण जातीबरोबरच माझ्या आजीच्या जगतमैत्रीण असण्याचा किंवा आईच्या तिथल्या लोकल शाळेत शिक्षिका असण्याचाही मोठा वाटा होता. त्यात त्या दोन्ही चतुर बायकांनी मला अनेकदा इतरांच्या माझ्यापेक्षा हलाखीच्या जगण्याचा चांगलाच परिचय घडवला होता. स्वतःच्या मुलांना सतत हडत्‌-हुडूत करणार्‍या, डोळ्यात फूल पडलेल्या एका आजींना हात धरून एका मंदिरात नेऊन बसवल्याशिवाय मला खेळायला जायला मिळत नसे. तो रस्ता आमच्याहून गरीब लोकांचा - म्हणजे अगदीच एका खोलीची खोपटी किंवा बर्‍यापैकी उघड्यावर संसार करणार्‍या - होता. माझी आई शाळेतल्या कित्येक मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना समजावून प्रसंगी त्या मुलांसाठी डबे तयार करून त्यांना शाळेत यायला राजी करी आणि मला तिच्यासोबत घेऊन जाई. या सगळ्यातून माझ्यात नक्कीच काही रुजलं असावं.

तुम्ही म्हणाल, हा हे सगळं का सांगतोय? साईट चुकली की काय? पण नाही. कालच ‘जाऊंद्याना बाळासाहेब!’ बघितला आणि अनेक दिवस खोलवर रुतलेल्या बर्‍याच गोष्टी उचंबळून वर आल्या. जगात अनेक प्रकारची दु:खं आहेत, व्यथा आहेत आणि आमच्यासारखे अनेक त्यांच्यासोबतच मोठे झालेत. मात्र आत्मभान आल्यावर आपल्या जन्मदत्त 'वरच्या' स्थानाबद्दल आधी अचंबा, मग प्रश्न, मग राग, मग घृणा आणि मग पाणी खवळून स्थिरावल्यावर एकूणच आपल्या स्थानाचं येणारं भान, मग त्या बॅगेजमधल्या निरुपयोगी 'स्व'ला धुडकावणं; हा प्रवास मोठा खळबळजनक, नाट्यपूर्ण असतो. आजवर पिचलेल्या अडल्या-नडल्याची व्यथा अनेकदा मांडून झालीये, मात्र आर्थिक उदारीकरणासकट तरुण झालेल्या आमच्या पिढीतल्या अनेकांच्या डोळ्यादेखत होत चाललेल्या - आणि ते होतंय हे भान असणार्‍यांच्या समोरच्या - आत्मसंतुष्ट समाजाचं निबरीकरण जाणवणार्‍या व्यक्तींची कथा तितक्याच संवेदनशीलतेने टिपणार्‍या या सिनेमाचं स्थान मोठं आहे!

हा बाळासाहेब प्रातिनिधिक आहे. नव्वदोत्तरी उदारीकरणाच्या काळात आर्थिक आघाडीवरचे बदल शहरांत लगेच प्रत्ययाला येत असल्याने तिथे बदल अधिक वेगवान आणि अधिक गुंतागुंतीचे आहेत. गावांत मात्र यांतले ठरावीकच बदल पोचतात आणि तिथल्या जीवनमानात शहरापेक्षा वेगळेच बदल घडतात. हे बदल आधी टीव्ही, भाषा यांच्यामार्फत आले आणि ते आतापावेस्तो चांगलेच रुजले आहेत - इतके की त्या बदलांनी इंग्रजीमिश्रित मराठीची खास ग्रामीण बोली घडवली आहे. हा सिनेमा हीच बोली वापरतो आणि त्यामुळे तो थेट भिडतो. दुसरा बदल मोबाइलसोबत गावात पोचला आहे आणि त्यामुळे विचार करण्याच्या पद्धतीपेक्षा विचार न करण्याच्या सवयीलाच बळ मिळालं आहे. लोकांचा बहुतांश वेळ हा पैसे कमावण्यात आणि उरलेला वेळ या नव्या खेळण्यामागे जाऊ लागलेला आहे. चित्रपटातलं एक पात्र "तरुणाई आहेच कुठे? अर्धी तर फेसबुकात आहे." असं म्हणतं ते त्याच पार्श्वभूमीवर. या सगळ्यात मग हरवतंय काय? तर स्वतःपलीकडे जाऊन केलेला विचार आणि स्वतःच्या वाढीसाठी दिलेला वेळ.

हा सिनेमा या सद्यकालीन वास्तवाचा तुकडा अशा काही थंडपणे समोर ठेवतो, की मन कातर होतं.


नाटक हा माझा वीकपॉइंट. त्याचा अंतर्भाव या सिनेमात जसा आणि ज्यासाठी झाला आहे, ते बघता तर माझ्यासाठी हा सिनेमा थेटच वसूल झाला. सुदर्शन, भरत नाट्यमंदिर, प्रायोगिक रंगभूमी, आंतरमहाविद्यालयीन करंडक आणि एकूणच ती सगळी दुनिया मला प्रचंड नॉस्टॅल्जिक करून गेली. एकूणच नाटकांच्या तालमी आणि त्या तालमींतून पात्रासोबत घडत-बिघडत जाणं ज्याने अनुभवलं आहे; पडद्याआडची उत्सुकता, भीती, उत्साह यांचा संमिश्र अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांच्यासाठी तर हा सिनेमा डबल बोनस घेऊन येतो. 

परीक्षण म्हणून लिहायला बसलो खरा, पण हे स्वैर स्वगतच झालं आहे. आता स्वगत झालंच आहे,  नि ते स्वैरही झालं आहे; तर या सिनेमाने ढवळून वर आणलेल्या इतर अनेक गोष्टींप्रमाणे सुनीता देशपांडेंच्या 'आहे मनोहर तरी'मधला एक परिच्छेदही देतो. त्यामुळे या लेखनाचा घाट बदलत असेलही, पण तो देणं आणि इथेच देणं अगत्याचं आहे. सुनीताबाई म्हणतातः

पुढे वय वाढल्यावर आणि शिक्षणाने आईच्या सोवळ्या-ओवळ्याचा मला फार राग येऊ लागला. आज मात्र हा प्रसंग आठवला, की आईचा कर्मठपणा आणि सहृदयता दोन्ही हातात हात घालून उभी असल्यासारखी दिसतात. या नेहमीच्या ओळखीच्या सर्व संबंधित गोरगरिबांबद्दल तिच्या पोटात अमाप माया होती. या बाबतीतले तिचे रागलोभ वैयक्तिक होते. आमचे सार्वजनिक असतात. वाटते, मी आईच्या जागी असते, तर त्या महारणीकडचा माल घेताना तिला अस्पृश्य मानून त्यावर पाणी नक्कीच टाकले नसते; पण त्याचबरोबर तिच्या (सुजलेल्या, गळू झालेल्या) पायाकडेही दुर्लक्ष केले असते कदाचित. फार तर "एखाद्या डॉक्टरला दाखव. वेळेवर औषधपाणी केलं नाहीस तर पाय तोडावा लागेल." असा कोरडा सल्ला दिला असता. कुणी सांगावे!

या वास्तवाला हा सिनेमा पुन्हा एकदा थेट समोरासमोर भिडतो. ‘परदु:खाकडे वळा’ हा आशय फारच मिश्किलीने पण ठशठशीतपणे अधोरेखित करतो. या सिनेमातला खणखणीत अभिनय, भाषा व संगीत, संकलन आणि इतर अनेक तांत्रिक घटक मिळून तो सिनेमा छान बनलाय की नाही यावर रकानेच्या रकाने लिहून आलेत. मला हा सिनेमा आवडायला त्याचे तंत्र, भाषा, अभिनय, मांडणी वगैरेंपेक्षा त्याचा आशय पुरेसा आहे. त्यातही सिनेमाच्या बरे-वाईटपणाबद्दल मत द्यायचंच, तर एखादं गाणं वगळता बाकी सगळ्या आघाड्यांवर हा सिनेमा अत्यंत जमून आलाय. मलातरी बेहद्द आवडला!

जाऊ द्या ना बाळासाहेब (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

जाऊ द्या ना बाळासाहेब (२०१६)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: गिरीश पांडुरंग कुलकर्णी
  • कलाकार: गिरीश कुलकर्णी, भालचंद्र कदम, मोहन जोशी, रीमा, सई ताम्हणकर
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत