संगीत देवबाभळी: रित्या मनाचा गाभारा शोधताना

गर्भवती असताना तुकोबांना शोधत आवली भटकत होती, तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसला आणि तिची शुद्ध हरपली. तेव्हा तिच्या पायातला काटा काढायला साक्षात्‌ विठ्ठल अवतरला अशी एक वदंता आहे. त्या काट्याच्याच नावाचं हे नाटक विठ्ठलाने आवलीच्या पायातला काटा काढल्यानंतर काय घडलं असेल याचा वेध घेतं. विठ्ठल काटा काढून थांबत नाही. या जखमेचं निमित्त करून विठ्ठलाने रखमाईला आवलीची काळजी घ्यायला पाठवलं आहे. दोन बायका एकत्र आल्या, तर त्या काय गोंधळ घालतात याचं एक चित्र टीव्ही चॅनल्सनी आपल्यासमोर उभं केलंच आहे. नाटकात सुदैवाने तसं काहीही नाही. ह्या दोघी एकमेकींचा आणि पर्यायाने तुकारामांचा, विठ्ठलाचा, भक्तिपरंपरेचा, आस्तिक्याचा वेध घेतात.

विठ्ठलाने गारूड केलेले तुकाराम हे पहिले गृहस्थ नव्हते आणि शेवटचेही नसतील. विठ्ठल-रखुमाई, राधा-कृष्ण, तुकाराम-आवली ह्या सगळ्यांच्याच बाबतीतल्या असंख्य दंतकथा, समजुती, चमत्कार आपल्याकडे रुजलेले आहेत. ह्याच सगळ्यांचे संदर्भ घेत पुढे जाताना नाटक भरकटण्याची शक्यता होती; पण तसं होत नाही. लखुबाई म्हणून अवतरलेली रखमाई आणि आवली ह्या दोघींच्या संवादातून आवलीचं बाईपण आणि लखुबाईचं देवीपण तपासलं जातं. हे नाटक विचाराने आस्तिक आहे. नाटकातली दोन्ही पात्रं अगदी देवभोळी, परंपरावादीही वाटतील. पोस्ट-ट्रुथ, मीम्स आणि सेल्फीज्‌मधे वावरणार्‍या अत्याधुनिक शहरी मानसिकतेतून बघितलं तर ते उगाच गळेकाढूही वाटेल. किंवा तुकाराम या विषयावर दोन सिनेमे येऊन गेलेले असताना, एक डेली सोप टीव्हीवर चालू असताना, पुन्हा तोच विठ्ठल आणि तोच तुकाराम यांच्यावर नाटक करण्यात काय हशील, असाही प्रश्न चुकीचा नाही.

पण नाटक विठ्ठल किंवा तुकारामांचं नाही. ते त्यासंबंधित शक्यता तपासण्याविषयीचं आहे. दंतकथेतून उगवलेलं हे नाटक 'तुकारामांचे अभंग बुडाले नाहीत' वगैरे चमत्कारांचाही उच्चार करतं, पण ते त्या चमत्कारांत अडकून पडत नाही. चमत्कारांचं होत नाही. गर्भवती आवलीचं आणि तिची काळजी घेणार्‍या लखुबाईचंच रहातं. आवलीचं बाईपण अधोरेखित करतं. आवली विठ्ठलाला चिघळलेली जखम म्हणते. देवाच्या नादी लागण्याचा, नामस्मरणाचा काय उपयोग, असाही प्रश्न आपल्या मनात डोकावून जाईल. नाटक असेच प्रश्न उभारतं; तुकाराम-विठ्ठलाच्या बाबतीतही आणि आस्तिक्या-नास्तिक्याबाबतही. लखुबाई आस्तिक आणि आवली नास्तिक मूर्तिभंजक असे ढोबळ तुकडे नाटक पाडत नाही. नाटक शेवटाकडे येताना रित्या मनाच्या गाभार्‍याचा उल्लेख करतं. लखुबाई काय किंवा तुकाराम काय, सगळ्यांची धडपड मन विकारमुक्त, रितं करायचीच होती असं लखुबाई म्हणून जाते. वारकरी भक्तिमार्गाचं हे इंटरप्रिटेशन कुणाला चक्क नास्तिक्याच्या जवळ जाणारंही वाटेल.

हे संगीत नाटक आहे. रसिका नातू आणि शुभांगी सदावर्ते दोघीही गायन आणि अभिनयात योग्य तो तोल राखून काम करतात. ह्या दोन्ही गायक अभिनेत्रींनी हे नाटक आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलून धरलं आहे. जात्यावरच्या ओव्या, अंगाई, अभंग असा वेगवेगळ्या प्रकारचा संगीताविष्कार वेळोवेळी होत राहतो. त्या गाण्यांतूनच नाटक पुढे सरकत जातं. नाटकाच्या मूळ प्रकृतीला साजेसं, पारंपरिक तरी ताजं असं, संगीत आनंद ओक यांनी दिलंय. नाटकाचं नेपथ्य फार विचारपूर्वक केलं गेलंय. इंद्रायणी नदी, पाण्याबद्दल आवलीला वाटणारी अनाठायी भीती, तिला पडणारं स्वप्न हे सारं दाखवायला तितकीच गूढ वाटणारी जागा समर्थपणे तयार केल्याबद्दल नेपथ्यकार प्रणव प्रभाकर यांचं अभिनंदन. प्रफुल्ल दीक्षित यांची प्रकाशयोजना वास्तवदर्शी आहे. लखुबाई भाकर्‍या थापताना चुलीतल्या निखार्‍यांनी तिचा चेहरा उजळलेला दिसतो. आणि मागे तीनेच आणलेली विठ्ठलमूर्ती लखुबाईच्या सावलीच्या आतबाहेर करत रहाते हा भाग रंगमंचीय प्रकाशयोजनेवर केलेला विचार दाखवून देते.  लखुबाईचं रखमाई असणं हे इतक्या सुंदररित्या प्रकाशयोजनेतूनच निर्देशित होतं. रंगमंचीय अवकाशातच वास्तव व स्वप्न दृष्यांतील नाजूक फरकही प्रकाशयोजनेतूनच अधोरेखित होतो. प्राजक्त देशमुख ह्यांचं दिग्दर्शन त्यांच्या शब्दांना न्याय देतं.

छायाचित्रे व लेखन - आल्हाद महाबळ

 

संगीत देवबाभळी (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

संगीत देवबाभळी (२०१६)
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: प्राजक्त देशमुख
  • कलाकार: रसिका नातू, शुभांगी सदावर्ते
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: -
  • निर्माता देश: भारत