दृश्यम (२०१५): 'बेतास बात' दृश्यभाषा असलेली गोळीबंद पटकथा

काल अकल्पितपणे दृश्यम पाहायचा योग आला. 'डोंबिवली फास्ट', 'सातच्या आत घरात' आणि 'लय भारी' फेम 'निशिकांत कामत' यांच्या चित्रपटाला जायला, खरंतर मी फारसा उत्सुक नव्हतो. एकतर त्यांच्या बहुतांश चित्रपटांप्रमाणे बाळबोध संवाद-पटकथा-चित्रांकन बघावे लागेल किंवा मग 'लय भारी'सारखे माझ्या प्रकृतीला न साजणारे भडक चित्रीकरण बघत मनोरंजनाऐवजी मनोविकारग्रस्त होतो की काय अशी भिती वाटू लागेल - या कल्पनेनेच मी आपणहून हा चित्रपट बघायला एरवी धजावलो नसतो. पण आता आपलेही तिकीट परस्पर काढले आहे म्हटल्यावर फार विचार न करता थेटरमध्ये गेलो. चित्रपटात कोणते कलाकार आहेत याव्यतिरिक्त काहीही माहिती नव्हती आणि करून घ्यायचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला नाही. चित्रपट आणि त्यातही एक उत्तम पटकथा बघून चित्रपटाला आल्याचा आनंद झाला. चांगले कलाकार, बरे दिग्दर्शन, चांगली लोकेशन्स, एक ठिकठिक कथा, सुयोग्य संगीत, मोजके व प्रभावी संवाद याहून महत्त्वाची असलेली ही गोळीबंद पटकथा हा या चित्रपटाचा आत्मा आहे. 

हिंदी चित्रपटात पटकथेकडे लक्ष जाऊ लागले आहे, मेहनत घेणे सुरू झाले आहे हे अनेकदा जाणवते. 'ब्योमकेश बक्षी' असो वा हल्लीच आलेला 'मसान' असो, 'पिकू' असो वा 'बॉम्बे वेल्वेट'चा तुफान रंगलेला पूर्वार्ध असो बांधीव घाटदार पटकथा आपल्याही चित्रपटांना क्वचित का होईना अधिक प्रत्ययदर्शी करू लागल्या आहेत. तुलनेने भारतीय स्थानिक भाषांच्या चित्रपटांनी हिंदी इतकी पटकथेची कास सोडलेली नव्हती. परंतू हिंदीतील हा बदल सुखावह होता - आहे. मात्र चित्रपट बघून बाहेर आल्यावर हा आनंद फार काळ टिकला नाही. जरा जालावर जाताच समजले की याच कथेवर आधारीत 'पपनासम' हा कमल हसन अभिनित तमिळ चित्रपट महिनाभरापूर्वी रिलीज झाला आहे. तर हा तमिळ 'पपनासम' आणि हिंदी 'दृश्यम' हे दोन्ही चित्रपट 'दृश्यम' याच नावाच्या २०१३मधील मल्ल्याळम चित्रपटाचा रीमेक आहेत. तेव्हा या चित्रपटाच्या पटकथेचं श्रेय अर्थातच मूळ मल्ल्याळम (व आताच्या तमिळ रीमेकचाही) दिग्दर्शक व पटकथाकार 'जिनी जोसेफ'ला द्यायला हवे. त्यामुळे या चित्रपटाची पटकथा कितीही उत्तम असली तरी या परीक्षणात त्याचे श्रेय ताज्या चित्रपटाला पूर्णपणे देता येणार नाही. काही प्रमाणात हे श्रेय देता येईल मात्र ते नंतर.

चित्रपटाचे कथासूत्र अतिशय रोचक आहे. 'विजय साळगावकर' (अजय देवगण) हा गोव्यातील एका निसर्गसुंदर गावात एक केबल ऑपरेटर असतो नी व्हिडियो पार्लर चालवत असतो. त्याची बायको नंदनी (श्रिया सरण) व दोन मुली अंजु (इशिता दत्ता) आणि अनु (मृणाल जाधव) मिळून त्याचे छान चौकोनी कुटुंब असते. सुरवातीला तपशीलवार प्रसंगांचे चित्रीकरण करत साधा, सरळमार्गी, लोकांना मदत वगैरे करणारा टिपीकल हीरो म्हणून विजय व त्याच सोबत चिरीमिरी घेणारा, लोकांना लुबाडणारा पोलिस इन्स्पेक्टर गायतोंडे (कमलेश सावंत) ही दोन पात्रे रचली जातात. या दोघांमधील वैर पुढे मोठी भूमिका वठवणार असतं. त्याच वेळी विजयला असणारं चित्रपटांचं अतीव वेड, त्याचे बायको मुलांवरचे प्रेम, त्याचे व परिसरातील विविध लोकांशी असलेले त्याचे नातेसंबंध इत्यादीद्वारे विजयचा चतुरपणा, सहृदय बाप, चित्रपटाच्या वेडापायी त्याचे रात्र रात्र घराबाहेर राहणे इत्यादी सोबत इतर अनेक लहान बाबी प्रस्थापित होतात ज्या पुढे महत्त्वाच्या होऊन बसतात.

पुढे अंजु शाळेच्या फील्ड ट्रीपला जाते आणि तिथे आय.जी. चा मुलगा तिचे व इतर अनेक मुलींचे व्हिडियो काढत असतो. मात्र त्यानंतर अशा काही घटना घडतात की अंजु व नंदनी यांच्याकडून एक अपघात घडतो व त्या घाबरून त्याचे रूपांतर एका गुन्ह्यात करतात. त्यानंतर आय.जी. मीरा देशमुख (तब्बु) व तिचा बिझनेसमन नवरा (रजत कपूर) आणि  मोठा पोलिस फोर्स तिच्या हरवलेल्या मुलाच्या शोधाचे धागेदोरे काढत विजयपाशी येऊन पोचतात. मात्र दरम्यान विजय आणि समस्त साळगावकर कुटुंबीय कोणतीही नैतिक उच्चासनी भूमिका न घेता या प्रसंगाला एका अनोख्या पद्धतीने तोंड देतात. मग सुरू होते अतिशय कर्तव्यदक्ष, हुशार पोलिस ऑफिसर आणि एक हतबल आई असलेली आय.जी. मीरा देशमुख आणि अशिक्षित, सामान्य मात्र परिस्थितीमुळे आपले आयुष्यभर जमवलेले माहितीचे धागे वापरून तिच्यासमोर एक अभेद्य चक्रव्यूहासारखा कोश विणून उभा ठाकलेला विजय साळगावकर यांच्या बुद्धीचे अनोखे द्वंद्व! यात पुढे काय होते? तो कोश भेदण्याची संधी मीराला मिळते का? तो कोश भेदण्यासाठी ती काय काय करते?नि त्यामुळे तिच्यासमोर कोशाचे कोणकोणते पदर येतात? मीरा आपल्या मुलाला भेटू शकते का? विजय साळगावकरने या चक्रव्यूहात काही वाट मुद्दाम उघड्या ठेवल्या असतात त्या मीराला समजतात का? समजल्या तरी त्याव्यतिरिक्त अन्य वाटा शोधणे तिला जमते का? अश्या प्रश्नांची मेंदूला सतत कामाला लावणारी उत्तरे देत आणि एक अतिशय सुज्ञ शेवट करून उत्तरार्ध आणि प्रेक्षकाची चांगल्या पटकथेची तृष्णा संपवूनच चित्रपट संपतो.

चित्रपट रीमेक असला तरी त्याचे घडणे मूळ चित्रपटाप्रमाणे केरळमधील (वा अन्य रीमेकप्रमाणे पपनासम या ) गावात न घडता दिग्दर्शकाच्या परिचित गोव्यात घडते. त्याचा उपयोग दिग्दर्शक काही प्रमाणात करून घेतो. 'डोंबिवली फास्ट' प्रमाणेच तेथील भाषा, लोकांची बोलण्याची ढब, हावभाव, मोकळेपणा आदी गुणवैशिष्ट्ये टिपण्याचे कसब याही चित्रपटात दिसून येते. त्याचबरोबर काही गोष्टी जरा अधिकच 'उघड' करत सूचकता कमी करून प्रेक्षकांच्या डोक्याला आराम देण्याची त्यांची सवयही इथे डोकावते. तब्बुच्या (बऱ्यापैकी हास्यास्पद व बाळबोध) एंट्री सीनमध्ये तर मूळचा कर्कश दिग्दर्शकही डोकावून जातो. पण नंतरच्या पटकथेची वीणच इतकी तलम आहे की ही त्रुटी अन्य चित्रपटांइतकी इथे प्रकर्षाने जाणवत नाही - ती जाणवून घ्यायला प्रेक्षकाला वेळच मिळत नाही. 

दुसरी लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे चित्रपटाचे नेमके संकलन अर्थात एडिटिंग. 'आरीफ शेख' या संकलकाच्या 'हैदर', 'डी-डे' इत्यादी चित्रपटांसह चाळीस एक चित्रपटांचा जमलेला अनुभव इथे छान खुलून येतो. विशेषतः कित्येक प्रसंगांमध्ये क्यामेराचे वेगवेगळे अँगल्स वेगात बदलतात त्यावेळी प्रेक्षकाला तुटक फील न येता सलग दृश्यमानता राखण्यासाठी प्रत्येक फ्रेमचा आवश्यक तेवढाच भाग ठेवणे या चित्रपटाच्या दुसर्‍या भागात विशेष महत्त्वाचे होते. तसेच चित्रपट संपताना शेवटाच्या प्रश्नाची झालेली उकल होताना वापरलेले - आता बर्‍यापैकी परिचित असले तरी- तंत्र संकलनाच्या चांगल्या उपयोगाला अधोरेखीत करते. (तिथेही प्रेक्षकाला 'दृश्यम' नावाच्या चित्रपटातील दृश्यभाषा समजेल यावर दिग्दर्शकाचा विश्वास नसल्यासारखा विनाकारण एक बाळबोध स्वगत आहेच पण ते असो). चित्रपटाचे संगीत साजेसे असले तरी चित्रपटाच्या वेगात व आवेगात फार लक्षात राहिले नाही. ध्वनी, प्रकाशयोजना संवाद वगैरेही छान. 

कलाकारांपैकी सर्वात प्रेक्षणीय काही असेल तर तो तब्बुचा वावर! एकाच वेळी करारी उच्चभ्रू पोलिस ऑफिसर आणि हतबल आई यांच्यामधील भावभावनांची, प्रसंगी कठोर व ठाम रहाण्याची कसरत ती लीलया करते. 'कमलेश सावंत' यांचा गायतोंडे इतक्या सशक्तपणे उभा राहिल्याने अजय देवगणचा विजय साळगावकर जरा अधिक खरा वाटतो आणि तितक्या ताकदीने उभा राहतो. मात्र चित्रपटांतील अजय देवगणचा 'विजय' हा कधीच 'गोयंकार' वाटत नाही - उत्तर भारतीयच वाटतो. तर त्याची पत्नीही गोव्याची वाटत नाही. बाकी खाण्याची विविधता वगैरे सोडाच किमान गोव्यातील स्त्रियांचा फुलांचा भरघोस वापर, वेण्यांची हौस इथे औषधालाही दिसू नये? असो. अनेक मराठी कलाकार मात्र गोव्याच्या पार्श्वभूमीवर खरेही वाटतात आणि सराईतपणे आपापली कामे चोख करतात.

थोडक्यात काय कथा ओरिजिनल नसली, काहीसे बाळबोध दिग्दर्शन असले तरी  रीमेक प्रेक्षणीय आहे. खास थिएटरमध्ये एकदा जाऊन बघण्याइतका तर नक्कीच!

 

दृश्यम - चित्रपटाची /नाटकाची माहिती

दृश्यम
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: निशिकांत कामत
  • कलाकार: रजत कपूर, अजय देवगण, तब्बु, कमलेश सावंत
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१५
  • निर्माता देश: -