राणी आणि तिचे राज्य
(विचक्याची सूचना: हे रसग्रहण असे समजून चालते की तुम्ही चित्रपट बघितलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर गोष्ट समजून तुमचा रसभंग होण्याची शक्यता.)
एक राणी परदेशातून भारतात येते, विमानतळावर तिचे आईवडील तिची वाट बघत असतात. आईला उगीच मुलगी याच रस्त्याने येणार ना अशी काळजी. राणी येते, स्ट्रेट केलेले केस पाठीवर मोकळे सोडलेले, ते वाऱ्याने उडताहेत, दिल्लीतल्या थंडीची पूर्ण जाणीव असूनही राणीने स्लीव्हलेस टॉप घातलेला आहे. स्वतःचे ओझे स्वतःच्या पाठीवर वाहात राणी दिमाखात पण पूर्ण आत्मविश्वासात विमानतळाच्या बाहेर येते. घरी जाताना ती गाडीत इतर फोटोसोबत आपल्या ऍमस्टरडॅम मधील मित्रांचे फोटोसुद्धा आईला दाखविते. मध्यमवर्गीय आई संकोचून विषय बदलते. राणी वडिलांना गाडी आपल्या उपवर नवऱ्याच्या घराकडून घ्यायला सांगते. पाच मिनिटात येते म्हणून होणाऱ्या नवऱ्याच्या घरी निघून जाते. आईला उगीचच काळजी, छोट्या भावाला घेऊन गेली असती तर बरे झाले असते. वडील तिला समजवतात ती एकटी जग फिरून आली आहे तू काळजी करू नकोस. राणीची होणारी सासू राणीला बघून अवाक होते हे राणीच बदललेले रूप बघून, की राणी परत आली म्हणून? कदाचित दोन्ही कारणाने. किटी-पार्टी वगैरेच्या वेळकाढू गप्पा करते आणि मग राजा येतो. राजा स्वतःहून राणीच्या आयुष्यात दाखल झालेला. राणीच्या मागे लागून लागून तिच्या आयुष्यात दाखल झालेला. एकदा दाखल झाल्यानंतर मात्र राणीच्या प्रत्येक बाबतीत दखल देणारा, राणीवर हक्क सांगणारा. तिने कसे वागायचे कसे वागू नये हे सांगणारा. राजा तिला स्वप्न दाखवितो, स्वप्नात तिला वेगळेच जग दाखवितो. लंडन, पॅरिस, आयफेल टॉवर, ऍमस्टरडॅम हे सारे त्यात येतं.
राणी राजाच्या या राज्यालाच आपले राज्य समजते त्यात हुरळून जाते, त्यात गुंतत जाते. लग्नानंतर लंडन, हनीमूनसाठी पॅरिस आणि ऍमस्टरडॅम याचे स्वप्न बघायला लागते. पासपोर्ट, व्हिसा, लग्नाची लगीनघाई, पहिली रात्र यात राणी हरवलेली असते. अचानक लग्नाच्या एक दिवस आधी राजा राणीला सांगतो तू आणि मी एका राज्यात नांदू शकत नाही. दोघांचे स्टेट्स एक नाही, मी जग बघितले खूप बदललो पण तू तशीच राहिली गावातली ‘रजोरीवाली’. काही क्षणात राणीचे आयुष्य उद्ध्वस्त करून राजा सहज तिच्या आयुष्यातून निघून जातो.ह्याच राजाला जेव्हा राणीचा मॉडर्न कपड्यातला फोटो दिसतो तेव्हा तो पाघळतो, परत राणीच्या मागे लागतो. माझे चुकले आणि माणसं चुकतातच असे तत्त्वज्ञान सांगून परत तिच्या आयुष्यात दाखल होण्याचा प्रयत्न करतो. अजूनही राजा आधी होता तसाच असतो त्यात फारसा काही बदल झालेला नसतो, तो अजूनही तिने काय करावे काय नाही हे सांगून बघतो. त्याचा पूर्ण विश्वास असतो की एकदा माफी मागितली की राणी आपले ऐकेल. तो एक विसरतो राणी आता बदललेली असते. राणी आता राणी असते. कोणत्याही राजाविना. ती तिच्या स्वतःच्या राज्यावर राज्य करीत असते.
या राजाराणीच्या गोष्टीचा शेवट म्हणजे चित्रपटाचा परमोच्च बिंदू. हिंदी चित्रपट वेगळी उंची गाठतोय हे ठसविणारा, शंभर करोडच्या मागे लागणाऱ्यांचा गर्दीत कुठेतरी संवेदनशीलतेचा वेगळाच आशावाद दाखविणारा. हिंदी चित्रपटाचा शेवट असा असावा असे नेहमीच वाटत असते पण तो असा असू शकतो हे प्रथमच बघितले. कुठलाही क्लायमॅक्सचा ड्रामा नाही, कुठलेही उपदेशाचे डोस नाही, माफीनाम्याचे लांबलचक सत्र नाही. चित्रपट संपतो तो फक्त दोन शब्दांनी ‘Thank You’. प्रवास हा असाच असतो तुम्ही स्टेशनवर जड बॅगा घेऊन सुरू करता आणि सारा प्रवास परत स्टेशनवरच जड बॅगा घेऊन संपविता. अगदी सहज जसे गेला तसेच परत येता जे काही घडायचे असते ते प्रवासात स्टेशनवर नाही.
स्टेशन हे थांबण्यासाठी नसते तर तेथे गाडी पकडून पुढे जाण्यासाठी असते, प्रवास मात्र मनमुराद अनुभवायचा असतो. गेली कित्येक वर्षे आपण प्रवासाचे हेच महत्त्व विसरलोय आणि प्रवासाच्या थांब्यांचेच महत्त्व वाढवत गेलो. हा चित्रपट परत एकदा प्रवासाचे महत्त्व पटवतो. हा प्रवास आहे एका राणीचा प्रवास. हा प्रवास फक्त या जागेवरून त्या जागेवर जाण्यापुरता मर्यादित न राहता तो बनतो राणीचा, राणीच्या शोधाचा प्रवास. प्रवासाच्या वळणावळणावर राणी स्वतःला नव्याने शोधत असते. गेल्या कित्येक वर्षात काय काय हरविले किंवा राहून गेले ते परत नव्याने शोधत असते. हे सारे करीत जेव्हा तिला राणी संपूर्ण सापडते तेव्हा ज्या व्यक्तीमुळे तिला राणीचा शोध घ्यावा लागला त्यामुळे राणी सापडली असते त्या राजाविषयी तिच्या तोंडून आभाराचे
फक्त दोनच शब्द निघतात ‘Thank You’.
स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे काय यासारखा जटिल विषय व्यावसायिक कुशलतेने कुठलाही मेलोड्रामा न करता हाताळणे म्हणजे गंमत नाही. ही तारेवरची कसरत विकास बहल यांनी मस्त सांभाळली आहे. त्यामुळेच चित्रपट जितका मनोरंजक होतो तितकाच तो विचार करायला लावतो. नव्वदीच्या दशकात छोट्या शहरात मुलीसोबत पिक्चरला किंवा हॉटेलला जाणे म्हणजे छोटा भाऊ किंवा छोटी बहीण ही आंदण असणारच ह्याची गमतीदार आठवण हा चित्रपट करून देतो. त्याचबरोबर स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, समाजाचा स्त्रीविषयी दृष्टिकोन, स्त्रीने स्वतःच स्वतःवर लादलेले पारतंत्र्याचे जोखड ह्या साऱ्या गोष्टी हा चित्रपट हाताळतो. हे करत असताना कुठेही स्त्रीमुक्ती आंदोलनाची बातमी बघत असल्याचा किंवा कुठल्यातरी रूढिवादी गुरुकुलाची जाहीरात बघत असल्याची जाणीव निर्माण होत नाही. जे घडतं, ते सहज घडत जातं, कुणीही आपल्या चांगल्या किंवा वाईट कृत्याचे समर्थन करीत नाही किंवा त्या कृत्याचा पश्चात्तापही करीत नाही. सहज घडणाऱ्या घटनांचा आलेख असला तरीही चित्रपटातली उत्कंठा कमी होत नाही. मध्ये मध्ये पेरलेले विनोदी प्रसंग चित्रपटाची रंजकता कायम ठेवतात.
चित्रपट स्त्रीची विविध रुपे दाखवितो. भारतातल्या कुठल्याही शहरात आढळणारी आदर्श मुलगी म्हणजे राणी. बॉयफ्रेंडला भेटायला जाताना आपल्या भावाला सोबत घेऊन जाणारी अगदी लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत ती तेच करते. आपले आईवडील, भाऊ आणि बॉयफ्रेंड यांच्याच भोवती तिचे आयुष्य गुंफलेले असते. लग्न व्हायच्या आधीपासूनच आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या म्हणण्याने ती वागत असते. तीच गोष्ट राणीच्या आईची, मुली इतकीच आदर्श तेच संस्कार आपल्या मुलीवर करणारी. सुनेसोबत किटी पार्टीच्या बाष्कळ गप्पा मारणारी राणीची होणारी सासू यांच्यापेक्षा फार काही वेगळी नाही. एकंदरीत घरातले पुरुष जो काही निर्णय घेतील तो मान्य करून त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी उचलणाऱ्या स्त्रिया. याविरुद्ध राणीची पॅरिसमधली मैत्रीण विजयालक्ष्मी. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्याच अटीवर जगणारी. नोकरी करून बॉयफ्रेंडपासून झालेला मुलगा सांभाळणारी. सिगरेट, पब, दारू कशाचेही वावडे नसणारी. गंमत म्हणून अनोळखी पुरुषासोबत एक रात्र काढणारी. तिलाच राणी सहज सांगते ‘Stop having sex with strangers’ पण विजयालक्ष्मी राणीचा सल्ला ऐकेल असे मात्र चुकूनही वाटत नाही. शेवटी ती तिचे आयुष्य तिच्याच अटीवर जगत आली असते. रुकसार किंवा रोसेट हे ही असेच एक पात्र. ती वेश्याव्यवसाय पण स्वेच्छेने पैसे मिळविण्यासाठी स्वीकारला हे सांगते. त्याच्यावरच भावाबहिणीचे शिक्षण आणि लग्न केले असे सांगते. आणखी एक पात्र म्हणजे राणीची मैत्रीण, कदाचित राणीच्या आईचे आधुनिक स्वरूप. कुठलाही चित्रपट किंवा कथानक हे जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन खुलत जाते तेव्हा त्यातली रंगत वाढत जाते. असले बारकावे टिपण्यात चित्रपट कुठेही मागे राहत नाही.
राणीची आई विजयालक्ष्मीचा फोटो बघत असताना राणीचे वडील कार चालवतानासुद्धा चोरून त्यावर नजर टाकतात किंवा ऍमस्टरडॅमच्या हॉटेलमध्ये वेटरने राणीला चक्क राणी असे संबोधताच राजाचा उडालेला गोंधळ किंवा चिंटूच्या वाह्यात जोक्सवर राणी आणि राजाची वेगवेगळी प्रतिक्रिया. रूममध्ये मुलगा आहेत तेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही आहे असे समजून राणी ब्रा घालते तो प्रसंग. एका प्रसंगात राणीचा फ्रेंच मित्र म्हणतो ‘I am from France, this is not French toast’ राणी त्याला उत्तर देते ‘ये सिर्फ इंडीयामेही मिलता है’. अशा बारकाव्यासहित प्रसंग खुलत जातात त्यामुळे ते अधिक रंजक होतात. चित्रपटातील काही प्रसंग हे त्याच्या वेगळ्या धाटणीमुळे मस्त जमून आले आहेत. वर चित्रपटाच्या शेवटाविषयी लिहिलेच आहेत. दुसरा म्हणजे पॅरिसमध्ये पबच्या बाहेर आल्यावरही राणी नाचण्याच्याच मूडमध्ये असते आणि रस्त्यावर येऊन नाचते. पबमध्ये नाचतानासुद्धा हा नाच नसून कुणावर तरी उगवलेला सूड आहे हे नाचण्याच्या स्टेप्समधून जाणवते. असाच रंगलेला प्रसंग म्हणजे इटालियन जेवणाचा. भारतीयाने इटालियन जेवण सुद्धा भारतीय पद्धतीने मिरची, मीठ आणि मसाले टाकून खाणे ते इटालियन जेवण बनविणाऱ्याला अजिबात आवडत नाही. हा संघर्ष ज्या पद्धतीने फुलतो ते बघताना मजा येते.
अभिनयात कुणीच कमी पडत नाही, कंगणा राणावतला तर आता राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला. साऱ्यांचाच अभिनय चित्रपटाचा विषय मांडण्यात मदत करतो. तीच गोष्ट छायाचित्रणाची! पॅरिस सुंदर आहे म्हणून छायाचित्रकार उगाचच पॅरिसची सुंदरता टिपत बसत नाही तर तुम्हाला कथानक आणि त्यातल्या पात्रात गुंतवून ठेवते. पॅरिस, ऍमस्टरडॅम यासारखे लोकेशन असूनही कथानक तुम्हाला पात्रातील नात्यांच्या सौंदर्यावर लक्ष द्यायला भाग पाडते. ‘लंडन का ठुमका’ हे गाणे लक्षात राहते. इतर गाणी फारशी लक्षात राहत नाही.
ऍमस्टरडॅम मधील पोल डान्स आणि ते गाणे का आलेय हे कळत नाही. ते चित्रपटात नसते तरीही काही फारसा फरक पडत नव्हता. चित्रपटात चुका नाही आहेत असे नाही. पॅरिसला हॉटेलमध्ये लिफ्ट असूनही सामान ओढत घेऊन जाणारी राणी पॅरिस सोडताना मात्र पाठीवरची बॅग घेऊन जाते. हनीमूनसाठी पॅरिसमध्ये हॉटेल बुकिंग केले होत तर मग ऍमस्टरडॅमला का नाही. परदेशात कुणीही भारतीय पहिल्यांदा गेला म्हणून तिची पर्स ओढली जाणारच का? पुरुष असेल तर त्याचे पॉकेट मारले जाते. आता काहीतरी वेगळे हवे खूप झाले हे. तीच गोष्ट पाल बघताच घाबरत पळण्याची. कित्येक वर्षे तीच क्लॄप्ती वापरली जात आहे. सर्वात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे स्वतंत्र स्त्रिया भारतात सुद्धा आहेत. त्यासाठी फक्त इंदिरा गांधी कडेच बघायची गरज नाही, आपल्या आसपास सुद्धा त्या सापडतात. असे एखादे पात्र चित्रपटात घालता आले असते. चित्रपटात जे चित्र निर्माण होते परदेशातील स्त्रिया स्वतंत्रपणे निर्णय घेतात आणि भारतात नवऱ्याच्या म्हणण्याने वागतात.
स्त्रीने दारू प्यावी किंवा नाही, गंमत म्हणून परपुरूषाशी एका रात्रीपुरते शरीरसंबंध ठेवावे की नाही हे योग्य की अयोग्य या भानगडीत चित्रपट पडत नाही. कारण शेवटी स्त्रीने काय किंवा पुरुषाने काय कसे वागावे हा निर्णय त्याचा किंवा तिचा आहे. चित्रपट हेच सांगतो हे स्वातंत्र्य जसे त्याला असते तसेच स्वातंत्र्य तिलाही असले पाहिजे. तिच्या आयुष्याचे निर्णय वडिलांनी किंवा नवऱ्याने नाहीतर तिनेच घेतले पाहिजे आणि तेही पूर्ण आत्मविश्वासाने. राणीचे राज्य जर कुठले असेल तर तेच आहे. चित्रपटातील राणी स्वतःचा शोध घेत तिला आजवर माहीत नसलेले स्वतःचे राज्य मिळवते. कदाचित इतर स्त्रियांनाही त्यांचे राज्य मिळेल. ही ‘My Choice’सांगताना हा चित्रपट कुठेही थिल्लर किंवा अतिउपदेशी होत नाही हेच या चित्रपटाचे यश.
पाहुणा लेखक- मित्रहो
क्वीन - चित्रपटाची /नाटकाची माहिती
