जन्माच्या रहस्यमय उगमाकडे… स्टोरीज वी टेल
थोडक्यात:
साराच्या सिनेमाला कोणतं लेबल लावावं कळत नाही.
गोष्ट म्हणावी, तर ती गोष्ट नव्हे. सत्यकथा आहे साराची. तिच्यात काम करणारे लोक नट तरी कसे म्हणावेत? ते तिचे आप्तमित्र-कुटुंबीय. तिच्याशी कॅमेर्यासमोर बोलणारे. डॉक्युमेंटरी म्हणावं? पण त्यात कोणतंही त्रयस्थ ठाम विधान नाही. लोकांनी गप्पा मारत उलगडलेल्या, मिश्र पोताच्या, परस्परविरुद्ध आठवणी तेवढ्या आहेत. नाट्यपूर्ण आहेत. सुखदु:ख व्यक्त करणार्या, अपेक्षाभंग करणार्या, क्वचित धक्के देणार्या, प्रश्न विचारणार्या, अंतर्मुख करणार्या आहेत. मुख्य म्हणजे आपल्यासमोर रेखलं जाणारं साराचं चित्र पुरेसं संदिग्ध – अस्फुट ठेवणार्या आहेत.
मग आत्मपर ललित म्हणावं हे – चित्रभाषेत लिहिलेलं?
कुणास ठाऊक. सारा पॉलीच्या ’स्टोरीज वी टेल’च्या बाबतीत भल्याभल्यांची अशीच पंचाईत झालेली दिसते. त्याला ’उत्कृष्ट चित्रपटा’चाही पुरस्कार आहे, आणि ’उत्कृष्ट माहितीपटा’चाही. अनेकांच्या मते तिनं या चित्रपटासह ’आत्मपर ललितपट’ अशी नवी विधाच जन्माला घातलेली आहे. त्यामुळे लेबलाचा हट्ट आपण सोडून देऊ आणि तिच्या या सिनेमाकडे बघू.
पुढे:
मायकेलच्या मुलाखतीसह सिनेमाला सुरुवात होते. तो घडलेल्या घटना एखादी गोष्ट सांगावी तशा, त्रयस्थाच्या दृष्टिकोनातून सांगतो आहे. पण त्यातलं त्रयस्थपण काही खरं नव्हे, हे आपल्याला लगेचच कळतं. तो जी गोष्ट सांगतो आहे, त्याची नायिका आहे डायान. त्याची काही वर्षांपूर्वी निवर्तलेली पत्नी. उत्साहानं रसरसलेली. याउलट मायकेल शांत-धीरगंभीर प्रकृतीचा. चित्रकर्ती सारा या दांपत्याची लेक. आपण डायानबद्दल बोलणार्या निरनिराळ्या लोकांच्या मुलाखती तेवढ्या पाहतो. डायान अशी होती की तशी? उथळ की उत्साही? सर्जनशील की अस्थिर? असे प्रश्न पडावेतशी परस्परविरोधी मतं तिच्याबद्दल व्यक्त केली जातात. ती कशी होती, याचं निश्चित उत्तर तर मिळत नाहीच. पण हे लोक कोण आहेत, तेही धड उलगडत नाही. हळूहळू कळतं की यांतले काही डायानचे आप्तमित्र. काही तिची मुलं. काही या लग्नातली, काही आधीच्या अयशस्वी लग्नातली. काही माहेर-सासरचे नातेवाईक. तिच्या स्वभावाचं वर्णन ऐकता ऐकता आपण सावकाश या चित्रपटाच्या मूळ उद्देशाकडे – साराच्या जन्मरहस्याकडे - जात राहतो.
साराचा जन्म हा तिच्या कुटुंबातला एक गंमतीचा विषय आहे. ’तू बाबांची खरी मुलगी नाहीचेस, आईच्या प्रियकराची मुलगी आहेस’ असं तिच्या भावानं तिला कधीतरी खेळकरपणे चिडवलं आहे, आणि त्यात तिच्या संभ्रमाची बीजं आहेत. पण ती साराच्या डोक्यात आणि तिच्या कुटुंबातही यथावकाश पक्केपणानं रुजत गेली आहेत. त्यात कुठेच कडवटपणा वा अवघडलेपणा नाही. डायान आणि मायकेलमध्येही अंतराय आलेला नाही. किंबहुना डायानच्या मृत्यूनंतर मायकेल आणि सारा हे बाप-लेक विलक्षण जवळिकीचं नातं जगले आहेत. आणि तरीही पृष्ठभागावरपासून आपण जसजसे खोलवर डोकावत जातो, तसतसं या बीजाची मुळं किती खोलवर गेली आहेत, ते जाणवायला लागतं आणि त्याचा एक ताण या खेळकर मुलाखतींमधून सतत डोकं वर काढत राहतो.
म्हटलं तर ही नात्यांची गोष्ट आहे, म्हटलं तर एक कौटुंबिक रहस्यकथा. साराचा जन्मदाता पिता कोण, या रहस्याची उकल एकीकडे, आणि या रहस्याच्या निमित्तानं आपली माणसं, आपलं वागणं, आपली नाती... एखादा लोलक फिरवत निरनिराळ्या कोनांतून तपासून पाहावा, तशी तपासून पाहणारी, मोकळी होत जाणारी माणसं एकीकडे.
त्यातला कॅमेर्याचा वापर विशेष म्हणावा असा. मुलाखतींचा भाग वगळता चित्रपटात कुठेही स्वच्छ-दर्जेदार चित्रण नाही.
घरगुती वेबकॅमनं किंवा मोबाईल फोननं करावं असं चित्रण. जुनेपाने घरगुती फोटो. पार्ट्या आणि जेवणं आणि मेळावे आणि समारंभप्रसंगी काढलेले, साठवणीतले फोटो. नवशिक्या-हौशी लोकांनी वापरावेत असे कॅमेर्याचे ऍंगल्स आणि दृश्यरचना. आठवणीतल्या गोष्टी सांगतानाही सांगणार्या माणसाच्या दृष्टिरेषेचा वापर करण्याची चतुराई. उदाहरणार्थ साराचा भाऊ आईचं फोनवरचं बोलणं ऐकल्याची आठवण सांगतो, त्या प्रसंगात त्याला आईचा पूर्ण चेहरा कधीही दिसत नाही. दाराच्या फटीतून दिसल्यासारखी डायान फोनवर अस्वस्थपणे बोलताना दिसते. तिच्या संभाषणाचे तुटक तुकडे तेवढे हाती लागत राहतात. ही गोष्ट म्हणजे अशा असंख्य तुकड्यांचा कोलाजच आहे. नजरेचे कोन बदलतील, तसे अर्थ बदलत जाणारा. रंगीबेरंगी. मनोज्ञ.
गोष्टीच्या अखेरीस रहस्य उलगडलेलं असतं खरं. पण एका डायानच्या एका मित्राच्या मुलाखतीतल्या एका लहानशा प्रश्नानं सारा बघता बघता रहस्य आणि उकलीचं वैय्यर्थ मनावर ठसवून जाते. या मिश्कील शेवटानं गोष्टीचं गांभीर्य फार सुरेख तोलून धरलं आहे. त्यानं ही गोष्ट निवळ तत्त्वचिंतनात्मक उरत नाही, गंमतीशीर - मानवी - ओपन-एण्डेड होते.
या गोष्टीचं निवेदन म्हणता येईल असा भाग मायकेलनं - साराच्या वडिलांनी - रेकॉर्ड केला आहे. त्या रेकॉर्डिंगचं चित्रणही आपल्याला गोष्टीचा भाग म्हणून दिसत राहतं. एखाद्या महत्त्वाच्या वाक्यापाशी, सारा मायकेलला सहजगत्या म्हणते, “तेवढी ती ओळ पुन्हा घेता का बाबा?” आणि अर्थपूर्ण कटाक्ष टाकत किंवा मिश्कील हसू हसत मायकेल ती ओळ पुन्हा ’घेतो’! कवीनं धृपद वापरावं, तशी सारानं ही ट्रिक वापरली आहे. तिची भूमिका म्हटलं तर त्रयस्थपणे मांडण्याची, आणि म्हटलं तर कथानकाच्या ओघात सहज दिसे-न-दिसेशी करणारी ही युक्ती फारच चपखल, लक्षात राहून गेलेली.
अशाच एका ओळीपाशी मायकेलच्या चिंतनातून या गोष्टीचं सार सहजपणे आपल्याला सामोरं येतं. “माझ्या मुलाबाळांतून मी जगत राहीन, वाहत राहीन...” हे ते वाक्य. ते या साध्याशा कौटुंबिक रहस्यकथेला निराळ्याच उंचीवर नेतं. महेश एलकुंचवारांच्या ’आत्मकथा’ची आणि इस्मत चुगतईंच्या ’दो हाथ’ या कथेची आठवण येते आणि बघता बघता साराची गोष्ट वैश्विक होऊन जाते.
कलमवाली बाई
(kalamwaali.baai@gmail.com)
स्टोरीज वी टेल - चित्रपटाची /नाटकाची माहिती
