निर्गेन्द्वो इन आफ्रिका (२००१): अंतर्मुख करणारा चित्रपट

चित्रपटाची भाषा समजणारी असेल आस्वादाला वेगळी मजा येते हे खरे असले, तरी काही चित्रपट भाषेपलिकडच्या निव्वळ भावनांचा आस्वाद देतात. त्यापैकीच एक २००२ चा ऑस्कर विजेता चित्रपट "निर्गेन्द्वो इन आफ्रिका". वंश, वर्ण, देश, संस्कृती यांच्या सीमा भेदणारा आणि स्वतःबरोबर प्रेक्षकाच्या मनातील कुंपणांनाही हलवून सोडणारा हा एक चित्रपट. यात तसं बघायला गेलं तर काळीज पिळवटणार्‍या दु:खाचा मारा नाही, सैनिकांची रणभूमी नाही, आईच्या वात्सल्याने ओथंबलेले डायलॉग्ज नाहीत, पत्नी एकपतीव्रता नाहि, ज्यूवरील अत्याचार नाहित, आफ्रिकन वास्तवाचा भडीमार नाहि. पण हे अस नाही नाही म्हणता म्हणता या सार्‍या गोष्टी आपल्याला आपसूकच कळतात. त्यातील बर्‍याचशा गोष्टी समोर घडत नाहित. पण झालेल्या जाणवतात. आपल्या नेहमीच्या आयुष्यातहि आपण किती गोष्टी प्रत्यक्ष झालेल्या बघतो? फार कमी! मात्र आपल्याला बरंच काहि जाणवतं. तसंच काहितरी या चित्रपटात होत असतं

टिपः यापुढील आस्वादात चित्रपटाचा कथाभाग उघड केला आहे.

चित्रपट सूरू होतो तो एका आफ्रिकन मुलाच्या सायकल स्वारीने. अन् मध्येच जगाच्या दुसर्‍या टोकावर जर्मनीमधील एका ज्यू घरात लोक जमले असतात. सायकलस्वार पोरगा एका डॉक्टरला घेऊन येतो कारण वाल्टर श्रेड्लिच आजारी असतो. आणि दुसरीकडे त्याच्या बायकोला जेटेलला जर्मनीमधे पत्र मिळते की वाल्टरला आफ्रिकेतील केनिया मधे शेतीकामाचा जॉब मिळाला आहे. जर्मनीमधल्या वाढत्या नाझी अत्याचाराला कंटाळून/घाबरून तो आफ्रिकेत गेला आहे आणि आता कुटुंबालाही बोलावून घेत आहे हे एकूण वातावरणावरूनच कळते. त्यावेळचे चाललेले अत्याचार/सापत्न वागणूक न दाखवताही जाणवते हे दिग्दर्शकाचे यश. स्वतःच्या मातृभूमीला सोडावे लागल्याचे व्रण मनावर घेऊन जेटेल आपल्या मुलीला रेजिनाला घेऊन एका संपूर्ण नवख्या-अनोळखी देशांत पाऊल ठेवते. ती नैरोबीला ट्रेनमधून उतरते आणि तीच्या नजरेतून दिसलेली ती काळ्या-तपकीरी रंगात न्हालेली ती दूनिया कॅमेराने अतिश्य बेमालूम पकडली आहे.

जेटेल आणि रेजिनाला नवर्‍याच्या पत्र्याच्या झोपडीजवळ सोडून एक इंग्रज अधिकारी निघून जातो. आणि छोट्या रेजिनाला "ओऽऽ मेमसाब रेजिना...." करत एक उंच काळा हसतमुख "ओवूर" कडेवर घेतो. हा ओवूर वाल्टरकडचा खानसामा - कूक. बघता बघता रेजिना या नव्या दूनियेत छान रूळून जाते मात्र जेटेलला जुळवून घेण्यास त्रास होत असतो. काहि दिवसांतच रेजिना स्थानिक "स्वाहिली" भाषा शिकते आणि तिच्या वयाचे छोटे मित्र जमवते देखील!

त्याच दरम्यान दुसरे महायुद्ध सूरू होते. आणि ब्रिटीश प्रत्येक जर्मन नागरीकाला (तो ज्यु असला तरी )अटक करतात व श्रेड्लिच कुटुंब अटकेत जाते (अर्थात अटक करून ठेवायला तुरुंगाची अनुपलब्धता असल्याने त्यांची रवानगी एका मोठ्या हॉटेलात केली जाते. आपल्या कुटुंबाच्या सुटकेसाठी जेटेल एका जर्मन जाणणार्‍या इंग्लिश अधिकार्‍याबरोबर 'रात्र काढते' आणि श्रेड्लिच कुटुंब पुन्हा स्वतंत्र होते व आपल्या शेतावर परतते. आता जेटेलही नव्या भूमीत रूजू लागली असते. वाल्टर ब्रिटिशांतर्फे लढायचे ठरवतो तेव्हा ती केनियातच रहाते. या दरम्यान ती आफ्रिकेतील विविध चालीरीती, प्रश्न, सांस्कृतिक बदलांना दिसामासाने सामोरी जात असते त्याचे चित्रण अत्यंत रोचक आहे. दरम्यान रेजिनाला इंग्रजी शाळेत घातले असते व ती तिथेहि हुशार विद्यार्थीनी म्हणून नाव कमावते. तिचे मन मात्र एका केनियन मुलातच गुंतले असते.

पुढे काय होते? तिने ब्रिटिश सैनिकाशी ठेवलेला संबंध वाल्टरला कळतो का? वाल्टर युद्धावरून परत आल्यावर / युद्ध संपल्यावर ते मायदेशी जातात का? याची उत्तरे चित्रपट देतोच पण चित्रपट हा या कथेपुरता किंवा पटकथेपुरता सिमीत नाहीये. त्याहुन अधिक मोठे विस्तृक आणि वैश्विक असे काहितरी तो मांडत असतो. आपल्या मातृभूमीपासून वेगळ्या झालेल्या ह्या कुटुंबाला एक नवं घर, नवी माणसे, नवा समाज नुसता आपलासा करत नाहि तर एक नवी मातृभूमी मिळते. आपण आयुष्यभर जो धर्म, जात, वंश, वर्ण, भाषा आदी कुंपणांना म्हणा किंवा जन्मजात चिकटलेल्या गोष्टिंना म्हणा जितक्या तीव्रतेने कवटाळून बसतो ते किती प्रमाणात उपयुक्त आहे आणि किती व्यर्थ आहेत हे कोणत्याही भल्या थोरल्या लेक्चरविना हा चित्रपट बराच बोलून जातो.

तांत्रिक अंगांनी बघायला गेलं तर हा चित्रपट अनेक हॉलिवूडपटांच्या तोंडात मारेल इतका निर्दोष आहे. ओवूरचं पहिल्यांदा कडेवर घेतानाचं स्लो मोशन, वाल्टर जेनेटला पहिल्यांदा बघतो तेव्हा ती उन्हात असते तेव्हाची प्रकाश योजना, एकदा रेजिना ओवूरबरोबर बळी देताना बघते तेव्हा निव्वळ तिच्या डोळ्यावरून आपल्याला कळते की समोर काय चाललंय! यात तिच्या छान अभिनयाबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शन, संपूर्ण चित्रपटात वापरलेले आफ्रिकी टोळ्यांमधे वाजणारे-किंवा नैसर्गिक आवाजांचे संगीत-ध्वनी हे आहेच. पाश्वभूमीला अस्सल आणि जीवघेणे सुंदर आफ्रिका, घेता किती घेशील दोन डोळ्यांनी हा सवाल पुढे करते. वेशभूषा, रंग, कॅमेरा इतका लोभस आहे की आफ्रिकेच्या तुम्हीदेखील नकळत प्रेमात पडत जाता. या सगळ्या प्रसंगांमध्ये जेनेटच्या शेतावर आलेली टोळधाड इतकी भन्नाट दाखवली आहे की अंगावर अक्षरश: काटा उभा रहातो.

चित्रपट संपल्यावर केवळ कुटुंबाची कथा किंवा त्यांचे जुळलेले आणि त्याच बरोबर आपलेही जुळलेले त्या अज्ञात दुनियेबरोबरचे ऋणानुबंध डोक्यात रहात नाहीत, तर त्याबरोबर माणूस म्हणून आपली असणारी ओळख आणि 'माणूसकी' या शब्दाचे नवे रंग चित्रपट जोखत जातो, आपल्याला अंतर्मुख करत जोखायला भाग पाडतो!

संधी मिळताच अजिबातच चुकवू नये असा हा चित्रपट. नक्की बघा!

निर्गेन्द्वो इन आफ्रिका (२००१) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

निर्गेन्द्वो इन आफ्रिका (२००१)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: कॅरलाइन लिंक
  • कलाकार: पीटर ओ’टूल, ज्युलिआन कोह्'लर, मेआ'ब निनित्झ
  • चित्रपटाचा वेळ: 141
  • भाषा: जर्मन
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 2001
  • निर्माता देश: जर्मनी