शुभ मंगल सावधान (२०१७): चावट पण मॅच्युअर्ड कॉमेडी
सुचनाः या लेखनात सिनेमाचे मुख्य कथासुत्र काही प्रमाणात उघड केलेले असू शकते.
तीः अर्रे यार शुभमंगल सावधान बघितलास का? तुफ्फान धमाले!
तोः ओह म्हंजे नक्की काय ए? आणि तू कधी बघितलास? आपण दोघे एकत्र जाणार होतो ना?
तीः हो पण ऑफिस कलीग म्हणाली नवऱ्यासोबत नको बघूस म्हणून तिच्या सोबत गेले होते.. पण तुझ्यासोबतही बघायला जायला हवं, जाऊ एकदा.
तोः ओके, काय थीम ए?
तीः थीम सिंपल ए. आयुष्मान खुराणा ने उभा केलेला 'मुदीत शर्मा' नावाचा एक टिपिकल 'पंजाबट्ट अग्रेसिव्ह पुरुषटाईप' हीरो असल्यासारखा वाटतो. पहिल्या वीस मिनिटात सिनेमा पकडच घेत नाही. त्याला जी मुलगी आवडत असते, तिला प्रपोज करायला त्याची फाटत असते. त्या 'सुगंधा'चं काम भूमी पेडणेकरने केलंय. काही गमतीशीर घडामोडींनंतर त्यांचं लग्न ठरतं. आणि तिथपासून सिनेमा खऱ्या अर्थाने पकड घेऊ लागतो. पुढे लग्न व्हायच्या आधीच ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. एके दिवशी ऐन भरात येऊन ती एकटी घरी असल्याचा फायदा घेण्याची दोघांना इच्छा होते. मात्र त्या वेळी त्या क्षणी त्याचं ग्लुको बिस्किट 'भिजल्यासारखं' होतं.
तोः म्हंजे?
तीः हा हा हा हा हा
तोः हसू नकोस. म्हंजे काय ते सांग?
तीः ती बघायची गंमत ए. पण अरे म्हंजे त्याचा अलीबाबा कळीचा मंत्र विसरतो
तोः काय बोलतेयस!
ती: शी बाबा! जवळजवळ प्रत्येक जोडप्याला फेस करावा लागणारा 'जेंटस प्रॉब्लेम' त्यांना लग्नाआधीच भेडसावतो (ती एक खूण करते)
तोः ओह! आयला! पण हे असले कमरेखालचे सिनेमे येऊन गेलेत की? त्यातली ऍडल्ट कॉमेडी झाली तुला ती नव्हती आवडली. मग हा कसा आवडला?
तीः तुला आठवत असेल तर मला कपलिंग सिरीज आवडली होती. मात्र आपल्याकडे नुसतेच नावाला ऍडल्ट सिनेमे बनलेत. प्रत्यक्षात केळं,चिकू, आंबे नि द्राक्षं वगैरेंचे डबल मिनिंग करत अगदीच शालेय विनोद करून त्याला ऍडल्ट कॉमेडी म्हणण्याच्या बॉलीवुडी 'ग्रँड' चाळ्यांसमोर हा प्रकार बराच उच्च आहे.
तोः इंटरेस्टिंग. म्हणजे ही 'चावट पण मॅच्युअर्ड कॉमेडी' असेल तर बघायलाच हवी. मला अशी कॉमेडी यापूर्वी आलेली आठवत नाहीये.
तीः हो यातले संवाद खूपच मजेदार आहेत. संवादांइतकेच अभिनेत्यांची संवादफेक कमाल झाली आहे. टायमिंग तर विचारूच नकोस! आयुष्मान आणि भूमी पेडणेकर दोघांची 'दम लगा के हैश्शा' मध्ये जमून आलेली केमेस्ट्री यातही तितकीच खुलली आहे. विनोदांमध्ये टायमिंग इतकेच संवादाचे 'गिव्ह अँड टेक' महत्त्वाचे असते. त्यात सगळ्या अभिनेत्यांचा समन्वय नाही झाला तर चांगला विनोदही फसू शकतो. मात्र या सिनेमातला फसलेला विनोद आठवत नाही.
तोः कधी जायचं बोल?
तीः तू म्हणशील तेव्हा. मला दुसऱ्यांदा बघताना त्यात दाखवलेले राहते हरिद्वार, क्वचित दिसणारी रोडावलेली नदी, निमशहरांत वाढतं जाणारं बिल्डिंग्जच प्रस्थ याचबरोबर टिपिकल मध्यमवर्गीय दुतोंडी नैतिकता, अस्सल वेषभूषा आणि भाषा, प्रत्यक्ष दिसणारी हाडामांसांची पात्रं हे सगळंच पुन्हा बघायला आवडेल. आणि हो आयुष्मान मला आवडायचाच, पण आता भुमी पेडणेकर 'वन टाईम वंडर' नसून 'लंबी रेस की घोडी' ठरेल असं मला वाटू लागलंय. बघ तुलाही पटेल!
तोः ओके डन. उद्या जाऊच या मग! आता मला राहवत नाहीये.
ती: येस सर! नक्की जाऊयाच!
शुभ मंगल सावधान (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
