लकीर के इस तरफ (२०१९): रेषेच्या पलिकडे बोलावणारा सकारात्मक माहितीपट

आपल्याच देशाचे काही नागरिक जेव्हा झेंडा फडकवून "भारत माता की जय" म्हणतात तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येतं का? माझ्या आज आलं. ते आनंदाश्रू नक्कीच नव्हते. त्यात दु:ख होतंच पण त्याहून जास्त होता खजील भाव. मी आजन्म एक शहरी व्यक्ती आहे - किंबहुना महानगरी व्यक्ती आहे. सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून सुस्थित वर्गातील. माझं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक (नि तांत्रिकही) वरचढ असणं टिकून असावं, मी ज्यांना मूलभूत गरजा मानतो त्याचा अविरत पुरवठा मला व्हावा म्हणून माझा जन्म होण्या आधीपासूनच माझ्याच देशातील अनेकांनी त्याग केले आहेत, आणि आजही अनेकांना त्याग करावे लागले आहेत याची मला जाणीव आहे (की आता होती म्हणूया?). आज मात्र शिल्पा भल्लाळ दिग्दर्शित 'लकीर के इस तरफ' हा माहितीपट बघितल्यावर त्या त्यागाची व्याप्ती, खोली आणि प्रमाण याबद्दल माझे जे समज होते त्याच्या ठिकऱ्या उडाल्या असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही.

राजकीय दृष्ट्या आखलेल्या एका सीमेच्या आतील भूभागावर एकाच वेळी जन्मतात/रहातात, केवळ म्हणून त्या सीमांच्या आत राहणाऱ्या सर्व व्यक्तींना त्या देशाचे नागरिक असं संबोधण्यात येतं. आपण ज्या देशात रहातो, तो देश आपल्या नागरिकांना घटनेअंतर्गत काही आश्वासने देतो आणि नागरिकांकडूनही काही कर्तव्यांची अपेक्षा करतो. यातील दिलेल्या आश्वासनांची पूर्तता काही (पक्षी काही एक राजकीय/आर्थिक सत्ता असलेल्या) नागरिकांपुरती करता यावी म्हणून वेगळ्याच काही नागरिकांना त्यांच्या कर्तव्याचा दाखला देत त्याग करायला भाग पाडलं जातं. अर्थात, हे देखील देशातील काही ठराविक भागात किंवा फक्त आपल्या देशांतच घडतं आहे किंवा फक्त आदिवासींच्या बाबतीत घडतं आहे असं नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या ज्या देशांनी जेत्यांच्या आर्थिक, राजकीय व्यवस्थेसोबतच नैतिक भूमिकेचं अंधानुकरण सुरू केलं त्या सगळ्याच देशांमध्ये अश्या प्रकारचा अजब न्याय सतत दिसत आला आहे मग तो लोकशाही स्वीकारलेला भारत असो वा कम्युनिस्ट चीन!

मग या माहितीपटात नक्की काय वेगळं आहे? वेगळं आहे ते या माहितीपटाचं समकालीनत्व. नर्मदा बचाव आंदोलनावर आजवर खूप काही लिहिलं, बोललं, वाचलं आणि पाहिलं आहे. परंतू त्यातील बरंच, स्मरणरंजनात्मक किंवा राजकीय भूमिकेतून होतं. हा लढा कसा उभारला, त्याचा इतिहास त्यात येणाऱ्या अडचणी, सरकारची निष्क्रियता - प्रसंगी नकारात्मक कृती याबद्दल माझ्या जन्मापासून अनेक लेखांतून काही लघुपटांतून, चर्चांतून ऐकलेलं आहे. पण हा माहितीपट 'आज'बद्दल बोलतो. काय घडून गेलं आहे याचे उल्लेख येतातही, पण ते संदर्भ म्हणून - सहज. त्या इतिहासातील घटनांच्या तपशिलात हा माहितीपट शिरत नाही. 

मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सर्व प्रकारचं ओरबाडणं हे सद्य काळातील जागतिक सत्य आहे. या सगळ्यात, 'नर्मदा बचाव'चं वेगळेपण आहे त्या प्रश्नाला भिडण्याच्या मार्गात. वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करून हक्कासाठी दिलेला लढा पूर्णतः अहिंसक असणं हे वेगळेपण जणू काही पुरेसं नव्हतं की काय म्हणून, आदिवासी समाजाकडे असणाऱ्या आदिम ज्ञानाचं, संस्कृतीचं रक्षण नि पुनरुज्जीवन करण्यापासून, त्यांना परिस्थितीने नागर जीवनाकडे वळणं भाग पाडलं असताना त्यांच्या जीवनशैलीचा आणि नागर व्यवस्थेचा साकव ठरणाऱ्या जीवनशाळांचं सकारात्मक काम ही या आंदोलनाने देशाला दिलेली भेट आहे. हा माहितीपट या सगळ्या कार्याचा धांडोळा घेत पुढे जातो.

माहितीपट संपल्यावर स्वत: दिग्दर्शिका 'शिल्पा भल्लाळ' थोडं बोलल्या. त्या सांगत होत्या की तिथल्या आदिवासींकडे कुरकूर अशी नाहीच. आहे त्या परिस्थितीतही सतत सकारात्मक आणि कृतिशील असण्याकडे त्यांचा असणारा कल थक्क करणारा आहे. या माहितीपटातही या आंदोलनापुढील प्रश्न नाहीत असं नाही. पण या भागातील प्रश्न मांडताना, चित्रीकरण करतानाच त्याच आंदोलनामुळे झालेले भले बदलही हा माहितीपट टिपत जातो आणि मग या प्रश्नांची व्याप्ती प्रेक्षकाच्या मनात केवळ तक्रार या स्वरूपात न रहाता आव्हान या रूपात येते आणि मग आपणही नकळत त्या आंदोलनाच्या अधिक जवळ सरकतो. सरकार असो, एकूण भारतीय समाज असो किंवा सद्य नागर व्यवस्था असो - त्यांच्याकडून इतकी सापत्न वागणूक - प्रसंगी दुष्टत्व झेलूनही, त्यांच्याचसाठी यांची शेकडो वर्षांची भूमी, घरं, परिसर त्यागूनही, ही मंडळी ना नक्षलवादाकडे झुकत ना काही कडवटपणा मनात बाळगत. उलट बाकी भारत कसाही वागो - त्यांना काहीही म्हणो- संपूर्ण भारताचं भलं चिंतून त्या भारतमातेला, त्या ध्वजाला आणि त्यांनी फारसं न पाहिलेल्या नागर नागरिकांना आपले बंधुभगिनी मानत जेव्हा या जीवनशाळांतील मुलं राष्ट्रगीत गातात तेव्हा त्या प्रेक्षागृहातील कोणाच्याही डोळ्यातील निर्धाराचा पारा फुटल्यावाचून रहात नाही. 

या फिल्ममध्ये दिसणाऱ्या मेधाताई हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यांची एकही मुलाखत यात नाही की त्यांच्याशी एकही थेट संवाद नाही पण त्या आहेत! फ्रेममध्ये त्या असो नसो, त्या फिल्ममध्ये बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून त्यांचेच विचार बाहेर येत आहेत हे पदोपदी जाणवतं. हा दिग्दर्शिकेचा चतुरपण म्हणा किंवा सुयोग्य निर्णय म्हणा आपलं काम चोख बजावतो.

पुण्यात "श्रावण मोडक" नावाची एक व्यक्ती माझ्या मैत्रात होती. नर्मदेच्या जीवनशाळांच्या कॅटलॉगचं डिजिटायझेशन करण्यासाठी धडपडणारा हा वयस्क तरुण असाच आंतरजालावर फिरताना परिचयाचा झाला आणि पुण्यात मी आल्यावर आमच्या भेटी वाढल्या. या आणि अशा अनेक विषयांवर रात्र रात्र चर्चा केल्या होत्या त्याची आज खूप प्रकर्षाने आठवण झाली. "आता यापुढे तुला समजण्यासाठी प्रत्यक्ष नर्मदेत यावं लागेल" असं सांगणारा श्रावण, तिथे जाण्याचं ठरवत असतानाच अकस्मात गेला. माझ्या आणि आंदोलनामधील हा एकमेव दुवा तुटल्यावर, माझ्यासारख्या शहरी, मितभाषी माणसाला पुन्हा नर्मदेत खेचून नेणारं कोणी आयुष्यात आलं नाही हे विधान आताआतापर्यंत खरं होतं. आज हा माहितीपट पाहिल्यावर आपणहून तिथे जावं - लकीरके इस तरफ- यावं असं मनापासून वाटू लागलं आहे.

लकीर के इस तरफ (२०१९) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

लकीर के इस तरफ (२०१९)
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: शिल्पा भल्लाळ
  • कलाकार: -
  • चित्रपटाचा वेळ: ९० मिनिटे
  • भाषा: मराठी, हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१९
  • निर्माता देश: भारत