दि इन्क्रेडिबल्स २ (२०१८): खरोखरच इन्क्रेडिबल!

**पाहुणा लेखक: आनंद मोरे**

सुपरहिरोंच्या बाबतीत भारतीय चित्रपटसृष्टी चाचपडत असताना हॉलिवूड मात्र याबाबत फार पुढे निघून गेलं आहे हे आज 'इन्क्रेडिबल्स 2' बघताना जाणवलं. अॅनिमेशनपट म्हणजे लहान मुलांचा चित्रपट अश्या ठोकळेबाज समजुतीला 'डिस्ने' आणि 'पिक्सर'ने कित्येकदा जोरदार धक्के दिले आहेत. 'इन्क्रेडिबल्स 2' तर या समजुतीला हाणून पाडतो. चित्रपटगृहातील कच्च्या बच्च्यांकडून हशा वसूल करत असताना, बरोबर आलेल्या पालकांच्या हृदयाला हात घालणे आणि तरुणांना वैचारिक खाद्य पुरवणे अशी तिहेरी कसरत अगदी लीलया पार पाडतो.

किती मुद्दे आणि किती सहजगत्या मांडले आहेत हे पाहिलं आणि एक प्रेक्षक म्हणून मी थक्क झालो.

1) प्रत्येक मुलात भविष्यासाठी असंख्य संभावना दडलेल्या असतात आणि जसजसे मूल मोठे होते तसतश्या यातील एखाद दोन संभावना प्रत्यक्षात येतात बाकीच्या विरून जातात.

2) बाहेर सुपरहिरो म्हणून चमकायचं असेल तर घरच्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी एका जोडीदाराला घरी थांबणं आवश्यक आहे.

3) मुलांचं संगोपन ही सुपरहिरोने करायच्या कामगिरीपेक्षाही कठीण कामगिरी आहे.

4) सुपरहिरो आहेत म्हणून आपल्या आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकून आपण निवांत राहणे योग्य नव्हे. सुपरव्हिलनसाठी सुपरहिरोला हाक मारावी पण साध्या व्हिलनसमोर स्वतःच हिरो म्हणून उभे रहावे.

5) सुपरहिरो सगळं काही करेल आपण फक्त प्रेक्षक आहोत. यदा यदा हि धर्मस्यप्रमाणे ईश्वरशरणच्या धर्तीवर सुपरहिरोशरण होऊन निष्क्रिय बनणे अयोग्य आहे. आयुष्य ही बघायची गोष्ट नसून जगायची गोष्ट आहे हे कधीच विसरायचं नाही.

6) कायदा पटत नसेल तर कायदाभंग करण्याऐवजी कायदा बदलण्याचे वैधानिक मार्ग वापरायचे.

7) आपण सुपरहिरो असलो तरी कायदा हातात घेऊन गुन्हेगाराला शासन करायचं नाही. त्याला पकडून न्यायव्यवस्थेच्या ताब्यात द्यायचं.

8) कुणी चार स्तुतीचे शब्द उधळले म्हणून लगेच तो आपल्या बाजूचा आणि समविचारी आहे असा गैरसमज करून घ्यायचा नाही.

9) मोठ्या कामात आघाडीवर राहून चमकोगिरी करण्यापेक्षा आपल्या क्षमतेचा जास्त उपयोग पडद्यामागे होणार असेल तर तेही करावे.

10) घर व्यवस्थित सांभाळले जात असेल तर स्त्रियाही बाह्य जगात पुरुषांइतकंच उत्कृष्ट काम करू शकतात.

प्रत्येक सीन बद्दल बोलायचं म्हटलं तर अजून शंभर मुद्दे निघतील. पण सुपरहिरोंचे चित्रपट पाहून स्वप्नात रममाण होणाऱ्या छोट्या दोस्तांना, तुमच्या रोजच्या आयुष्यातील अडचणी स्वतःच सोडवायला विसरू नका हा मोलाचा संदेश सुपरहिरोंकडूनच देण्याचं धाडस दाखवणारा हा चित्रपट खरोखरच इन्क्रेडिबल आहे.

- पाहुणा लेखक: आनंद मोरे

दि इन्क्रेडिबल्स- २ (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

दि इन्क्रेडिबल्स- २ (२०१८)
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: ब्रॅड बर्ड
  • कलाकार: -
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१८
  • निर्माता देश: अमेरिका