एक होता विदूषक - सादरीकरणाचा एक उत्तम नमुना!!
जब्बार पटेलांचा एक अतिशय नावाजलेला आणि लक्ष्मीकांत बेर्डेच्या उत्कृष्ट अभिनयाचा मासला म्हणून ’एक होता विदूषक’ प्रसिद्ध आहे. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या दोन टोकाच्या भूमिका दिसतात, एकतर त्यांना खूप आवडलाय किंवा खूपच आवडला नाहीय. एका प्रतिकूल परिस्थितीतून वरती आलेल्या हरहुन्नरी कलाकाराचा उदय आणि परमोच्च (!) ठिकाणी पोचल्यावर ओघाने होणारं अधःपतन हा या सिनेमाचा विषय आहे.
मूळची तमासगीर मंजुळा (मधु कांबीकर) एका मनुष्याच्या प्रेमात पडून तमाशाचा फड सोडते आणि एका इनामदाराच्या (डॉ. मोहन आगाशे) आश्रयाला राहात असते. तिच्या मुलाला-आबुरावला (असीम देशपांडे, लक्ष्मीकांत बेर्डे)ला सगळेजण विनाबापाचा म्हणून हिणवतात. इनामदारच्या मृत्यूनंतर ती पुन्हा तिच्या बहिणीच्या-कौसल्याच्या(उषा नाईक) फडात परत जाते. आबुराव मोठा होतो, त्याचे वग लोकप्रिय होतात आणि होताहोता तो सिनेमात जाऊन घरच्यांना विसरतो, पुढे राजकारणात जातो इत्यादी इत्यादी.
मराठीला तमाशापटांची मोठी परंपरा आहे. 'सांगत्ये ऐका', 'एक गांव बारा भानगडी', 'सवाल माझा ऐका', 'केला इशारा जाता जाता', 'पिंजरा' आणि अलिकडचा 'नटरंग' ही काही उदाहरणं. यांतल्या काही चित्रपटांत तमासगीरांचं स्वतःचं राहणीमन कसं असेल याचं थोडंफार चित्रण दिसतं. तमाशांचे फड, तंबूतलं राहाणं, स्टेजवर असताना होणार्या फर्माईशी, उत्स्फूर्तपणे मिळणारी दाद, सोंगाडयांचं हजरजबाबी कसब.. एक ना दोन. या सगळ्यांचं वास्तववादी आणि तितकंच बारकाव्यांनी चित्रण झालेल्या चित्रपटांची यादी करायची म्हटलं तर 'एक होता..' चं नांव वरच्या क्रमांकावर असेल.
बारकावे आणि साटल्य (subtlety) हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. प्रत्येक फ्रेम ही वेगळी न जाणवता त्या-त्या वातावरणाचा भाग वाटावा हे दिग्दर्शकाचं यश आहे. मराठी शाळा दाखवताना खास जिल्हा परिषदांच्या शाळेचे गणवेश, तिथे तक्ते लावण्यासाठी केलेली-थोड्याशा उंचीवर असलेली विना गिलाव्याची (थोडी फुटलेली देखील) सिमेंटची रूंद पट्टी, इन्स्पेक्शनच्या दिवसासाठी केलेली आणि नंतर अर्धवट तुटलेली पताकांची माळ, “अ-सानुनासिक” मास्तर. तमासगीर स्त्रियांचा रंगमंचावरील नटवा अवतार आणि प्रत्यक्ष जीवनात राजशेखरच्या शब्दांत म्हणायचं तर 'रंग उडालेल्या भिंतीचा' अवतार, मधु कांबीकरचं सहज भांडी घासणं (हे सहजपण दाखवणंच आजकाल अधिक अवघड आहे), उषा नाईक-मधु कांबीकरच्या हातांतील कासारकडची कांकणं आणि नव्या पिढीच्या काढ-घालण्यास सोयीस्कर अशा कचकड्याच्या बांगड्या, स्टेज दाखवतानाच विंगेत आंत काय चालू आहे हे दाखवणं. वर्षा उसगांवकर-बेर्डेच्या घरात समोरच ठेवलेली परंतु तिच्यावर खास कॅमेरा न गेलेली महाराष्ट्र शासन सिनेपुरस्काराची बाहुली... यादी खरंच अनंत आहे. पण या सार्या बारकाव्यांमुळेच सिनेमा उपरा न वाटता त्या मातीतला, त्या मुशीतला वाटतो.
अकृत्रिम ग्रामीण बोली आणि लहेजा साधणं हे सोपं काम नाही. 'हाळी घालणं" तर त्याहून अवघड. लक्ष्या आणि त्याची मुलगी सोडली तर इतरांनी हा बाज भलताच भारी सांभाळला आहे. मधु कांबीकरांची 'आब्या, आब्या हेय्य्य्य्य्य..' म्हणत घातलेली साद तर अगदी दृष्ट लागण्याजोगी. खेड्यांत राहिलेली माणसं थोडीशी मोठ्यानं बोलतात. आपसूक होतं ते. एकाच संवादात दोन व्यक्तींमधील आवाजाच्या या दोन पातळ्या सहज लक्षात येण्यासारख्या आणि प्रेक्षकाला खरोखरी त्या वातावरणात नेणार्या. चित्रपटात लक्ष्या सिनेमात जाण्यासाठी निघतो तेव्हाच्या अँबॅसिडरचा नंबर ’एम ए आर- क्ष क्ष क्ष ' असा असतो तोच नंतरचा काळ दाखवताना मारूती एस्टीम छापाच्या गाडीचा व 'एम एच ०१ -क्ष क्ष क्ष ' असा दाखवला आहे.
लहान मूल फडात वाढतं तेव्हा त्याची जडणघडण कशी होते याचं उत्तम चित्रण चित्रपटाच्या पूर्वार्धात येतं. पाहून वग आणि बतावण्या पाठ होणं, त्यांचा अर्थही न कळण्याच्या वयात समवयस्क मित्रांबरोबर त्या सादर करणं, सुरूवात करताना मोठ्यांसारखंच 'ग्वाड मानून घ्या मंडळी' असं म्हणून नमस्कार करणं, एखाद्या सोंगाड्यामुळे प्रभावित होणं आणि त्यांचं अनुकरण करणं हे तर अगदी साहजिकच. आईचं लावणी म्हणणं, स्टेजवरती थोडंसं शृंगारिक बोलणं हे आयुष्याचा भाग असल्यासारखं त्याबद्दल काही बरं-वाईट न वाटणं हे सगळं पाहताना जराही नाटकी वाटत नाही. तृप्ती भोईरच्या 'टुरिंग टॉकीज' मध्ये असा थोडातरी अस्सल भाग यायला हवा होता असं मला सतत जाणवत राहिलं.
या सिनेमात सुरूवातीलाच मधु कांबीकरांचा उल्लेख 'लावणीची अनभिषिक्त सम्राज्ञी' असा केला आहे. आणि एक सुखद धक्का म्हणजे त्यांचा नाच आणि अदाकारी या किताबाला सार्थ अशीच आहे. तमासगीरांच्या आयुष्यावरील चित्रपट असल्याने लावण्यांची रेलचेल(तरी बावीस लावण्या म्हणजे चित्रहारच झाला), थोड्या वेगळ्या बाजाच्या लावण्या आणि सिनेमाच्या वेळेस कांबीकरांचं जे काही वय असेल त्याला लाजवणारी सुंदर लावणी नृत्यं!! सर्वसाधारण सिनेमातल्या लावणीनृत्यामध्ये काही विशेष प्रयोग झालेले सहसा आढळत नाहीत. इथे मात्र जवळजवळ प्रत्येक लावणीचं वेगळेपण उठून दिसतं. नितिन देसाईंच्या भव्यदिव्य 'राजा शिवछत्रपती' मधलीभली मोठी फौज म्हणून आठ-दहा लोकांचा घोळका किंवा खूप अवघड गेम म्हणून तीन लेव्हल्सचा चिंधी 'रा-वन' प्रोग्राम असे तत्सम प्रकार पाह्यल्यानंतर सार्थ अनभिषिक्त सम्राज्ञी पाहाणं हा सुंदर अनुभव होता. या नृत्यांसाठी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
असं सगळं चांगलं असतानाही या चित्रपटाचे काही टोकाचे प्रशंसक आहेत तर काहींना तो जराही आवडला नाही. ना. धो. महानोरांच्या लावण्या वेगळ्या आहेत. ’गडद जांभळं.. भरलं आभाळ’ किंवा ’भर तारूण्याचा मळा..’ ही गाणी मनात रूंजी घालतात हे मान्य. तरी पट्कन आठवणार्या किंवा ओठांवर रेंगाळणार्या गाण्या-लावण्यांमध्ये या गीतांचा समावेश नाहीय. चित्रपटाच्या कथेनेही उत्तरार्धात माती खाल्ली आहे. आईने किती खस्ता खाऊन आणि मानहानी सहन करून आपल्याला वाढवलंय याची पुरेपूर कल्पना असणारा गुणी मुलगा 'दोन महिन्यांत परत येतो' म्हणून जातो आणि आईला लग्न केले म्हणून पत्राने कळवतो. जो मुलगा आईने परवानगी दिल्याशिवाय जात नाही तो असं वागतो हे पटत नाही. निळू फुले त्याला त्याची मुलगी आणून भेटवतात. तिचं वय आठ-नऊ वर्षांचं सहज वाटतं. इतक्या वर्षांत तो स्वत:च्या फडाकडे फिरकला नसेल असंही वाटत नाही, ज्या कारणामुळे वर्षा उसगांवकर त्याच्याशी लग्न करते ती पाहता आणि ते लक्ष्याला माहितही असताना त्यांचं लग्न इतकी वर्षं टिकलं असेल हे ही पटत नाही. त्यामुळं उत्तरार्धातल्या पायालाच धक्का लागतो. मुळात तिला खोटे पाडायला तो जे काही करतो त्यामागची भूमिका समजून घेतली तरी ते करंण्यासाठी तो आठ-नऊ वर्षे वाट पाहातो हेही गळी उतरत नाही. त्याचं अधःपतनही अचानकपणे चालू होतं, नाही म्हणायला आधी थोड्याशा त्याच्या खाणाखुणा दिसतात पण प्रत्येकजण थोडाफार स्वार्थी असतोच तेव्हा आधीच्या घटना या काही अधःपतनाची सुरूवातच म्हणून घ्याव्यातच असंही नाही. आणि चित्रपटाचा शेवट त्याहून पटत नाही. त्याची मुलगी जन्मापासून हसली नाही असं तो स्वतःच म्हणतो आणि ज्या परिकथेमुळे ती मुलगी हसते तिच्यात एखाद्या मुलाला हसवायचा दम आहे असं मला व्यक्तिशः वाटत नाही. त्याच्या घरवापसीचा मुद्दा मान्य आहे परंतु तिची प्रक्रिया पचनी पडत नाही. मुळात तो इतका पुढे गेलेला वाटतो की निळू फुलेंच्या एकाच कानपिचकीने त्याचा सदसदविवेक जागा होणे हे फक्त परिकथेत होऊ शकतं. बेसिकली, खूप छान रितीने सुरूवात केलेली गोष्ट नंतर अगदी उरकल्यासारखी वाटते.
कलाकारांमध्ये लहान आबूराव - असीम देशपांडेने उत्तम भूमिका वठवली आहे. संवाद आणि कधी-कधी डोळ्यांनी बोलून जाणं हे त्याला चांगलंच साधलं आहे. मधु कांबीकर- उषा नाईक या दोघीही नृत्यांगना म्हणून आणि स्टेजबाहेरचं जीवन या दोहोंतही सरस आहेत. मोहन आगाशेंनी हसून हसून मरण्याच्या सीनमध्ये ते खरंच इतके हसले का असं वाटावं असा त्यांच्या नांवलौकिकाला न शोभणारा अभिनय एके ठिकाणी केला आहे. वर्षा उसगांवकरसाठी यशस्वी तारकेचं बेअरिंग नेहमीचंच. जेव्हा जेव्हा ती लक्ष्याला भेटते तेव्हा तिची अस्वस्थता जाते असं ती म्हणते तेव्हा ती अस्वस्थ होती हे फक्त तिला सांगावं लागतं. तिच्या प्रियकराच्या भूमिकेत तुषार दळवी हायवेस्ट जीन्समध्ये आता थोडा गंमतीदार वाटतो. लक्ष्याच्या मुलगीची भूमिका करणार्या मुलीला अभिनय आणि संवादफेक दोन्हीही जमली नाहीय, बहुतेक नंतर डबिंगमध्ये वेळ मारून नेली असावी. दस्तुरखुद्द लक्ष्याने या चित्रपटांत खूपच ठोकळेबाज अभिनय केलाय. त्याचा महेश कोठारेच्या सिनेमांतला वावर, ग्रामीण बोलणं आणि या सिनेमांतलं बोलणं यांत काही फरक जाणवत नाही. मुद्दलात आबूराव मोठा होऊन त्याचा लक्ष्या होतो तोच 'मीच काय तो शहाणा' अशा अविर्भावात. एका बाजूला निळू फुले, मधु कांबीकर इत्यादी मंडळी जितकी अकृत्रिम वाटतात, तितकाच लक्ष्या कृत्रिम वाटत राहातो. या सिनेमात सयाजी शिंदे डान्समास्तर म्हणून मिनिटभर आणि सतीश तारे एक दोन प्रसंगांत चमकून जातात.
सिनेमा पाहावा का? तर पाहावा. पुढे जाऊन माध्यमं आपल्या किती कच्छपी लागणार आहेत याची काळाच्या आधी जाणीव झालेल्या दिग्दर्शकाच्या द्रष्टेपणासाठी पाहावा. विषयाचा अभ्यास , वातावरण निर्मिती, सादरीकरणातले बारकावे आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी नक्की पाहावा. एखादी गोष्ट सादर करताना काय नक्की काय करावं याचं भान
एक होता विदूषक - चित्रपटाची /नाटकाची माहिती
