रॉयः लेखकांच्या आंतरीक द्वंद्वाचे नाविन्यपूर्ण सादरीकरण

गेले काही वर्ष बॉलीवूडमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. आपल्याकडचे चित्रीकरण, संकलन इत्यादी तांत्रिक बाबी सुधारत आहेत. पटकथा, सादरीकरण याचबरोबर कथासूत्र व विषयाची विविधताही आपल्या चित्रपटांत दिसू लागली आहे. "रॉय" या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला या नावीन्यपूर्ण चित्रपटांच्या रांगेत बसवावे लागेल. प्रत्येक कथेचा एक बाज असतो, वेग असतो, आशय असतो आणि तो पोचवायला लागणारा संवाद हा पात्रांमध्येच नाही तर पात्रे आणि प्रेक्षकांतही होणे गरजेचे असते. भारतीय प्रेक्षक हा चटपटीत चित्रपट, वेगवान हाताळणी, रंजक कथासूत्र आणि भडक सादरीकरण आणि संगीत यांना सरावलेला आहे - सरावाने त्याची आवडही एका ठरावीक वर्णपट्टीत बांधली गेल्यासारखी झाली आहे. अशावेळी तुलनेने संथ, सौम्य चित्रीकरण असलेला आणि बाह्यकथेपेक्षा लेखकाच्या आंतरिक द्वंद्वाला दृश्यपटावर मांडायचा हा प्रयत्न सामान्य भारतीय प्रेक्षकांपर्यंत किती पोचेल, पोचलाच तर बहुसंख्यांना किती रुचेल याबद्दल मात्र मी साशंक आहे.

टिपः यापुढे कथासूत्र व प्रसंगी मुख्य कथांश सांगितलेला आहे

चित्रपटाला सुरुवात होते ती कबीर ग्रेवाल (अर्जुन रामपाल) ह्या एक अत्यंत यशस्वी दिग्दर्शक-लेखकाच्या मुलाखतीतून. त्याच्या "गन्स" या 'चोरपटां'च्या मालिकेतील तिसर्‍या चित्रपटाची घोषणा झालेली आहे. आधीच्या चित्रपटांतून अतिशय अद्भुत, नाट्यपूर्ण आणि थरारक कथेचे मिश्रण प्रेक्षकांपुढे सादर करून अमाप यश मिळवल्यानंतर सगळ्यांनाच त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. त्याच बरोबर कबीरची अजून एक प्रतिमा जनमानसात प्रसिद्ध आहे - त्याची अनेकानेक प्रेमप्रकरणे. याआधी २२ मुलींबरोबर प्रकरणे रंगवून आता यावेळी त्याच्या आयुष्यात कोण येणार याचीही चर्चा माध्यमांत आहे.

प्रत्यक्षात कबीरची कथालेखनाची, पटकथालेखनाची पद्धत अगदी वेगळी आहे. त्याला जसजशी कथा स्फुरत जाते तसतसा तो ती चितारत जातो - लिहीत जातो. त्याच्या कथेचा हीरो आहे "रॉय" (रणबीर कपूर). जसजशी ही कथा कबीरच्या डोक्यात आकार घेऊ लागते प्रेक्षकाला ती पडद्यावर दिसू लागते. रॉय हा स्वतःशी आपण चोर आहोत व चोरी आपला व्यवसाय आहे हे मान्य करणारा, मात्र आपले खरे नाव एखाद व्यक्तीपलिकडे कोणालाही माहीत नसणारा चोर असतो. कथेत एक डिटेक्टिव्ह (रणजित कपूर) गेले साडेतीन वर्षे रॉयच्या मागावर आहे आणि या दरम्यान एक मास्क घातलेला चेहरा (फक्त डोळे दिसताहेत) वगळता त्याच्या हाती काहीही लागलेले नाही. यावेळी रॉयची पुढील चोरी आहे एका प्रसिद्ध चित्राच्या अर्ध्या भागाची, जी मलेशियात आहे. यानंतर कबीर मलेशियात जातो आणि तिथे त्याची भेट होते आयेशा आमिर (जॅक्लीन फर्नांडिस) या प्रायोगिक चित्रपटांच्या दिग्दर्शिकेशी. काही मग रॉय आणि कबीर यांचा प्रवास समांतर होऊ लागतो. आयेशा आमिर सारख्याच दिसणार्‍या एका हिरॉईनला कबीर रॉयची हिरॉईन टिया (जॅक्लीन) म्हणून कास्ट करतो. मग उलगडतं की रॉयला हवे असणारे ते चित्र टियाकडेच आहे तर दुसरीकडे रॉय टियात गुंततही चाललाय. इथे कबीरही आयेशा आमिरमध्ये पुरता गुंतला असतो. अशावेळी रॉय हा कबीरच्या कथेतील निव्वळ एक पात्र न राहता, त्याच्या विचारांचा - खरंतर त्याचाच - एक भाग म्हणून वाटू लागतो. मग पुढे काय होते रॉय त्या चित्राची चोरी कशी करतो? कबीर आणि आयेशाचे काय होते? वगैरे गोष्टींची उकल या चित्रपटात पुढे होते.

हा चित्रपट खरंतर एक चोरीची कथा अथवा एक प्रेमकथा इतकाच सीमित  नाही.  एकूणच लेखकाचा स्वभाव, त्याची विचारसरणी, त्याच्या मेंदूतील गुंतागुंत कथेत कितपत उतरते? प्रत्यक्ष आयुष्य आणि लेखन यांत परस्परसंबंध जोडला जातो तेव्हा लेखकाच्या मनातील द्वंद्व यावर टिपणी आहेच, त्याहून अधिक म्हणजे आपल्याच मनातील आपली असलेली प्रतिमा, आपल्याला लोकांनी कसे बघावे अशी असलेली अपेक्षा आणि प्रत्यक्षात या प्रतिमांच्या जंजाळात खोलवर दडलेले प्रत्यक्ष आपण यांच्या पैकी आपल्याला कोण कसं व किती नियंत्रित करत असतं याच मोठा रंजक वेध या चित्रपटात आहे.

या चित्रपटाची बलस्थानं सांगायची तर मी सुरुवात छायालेखनापासून करेन. हा भारतीय चित्रपटात छायालेखनावर घेतलेली मेहनत क्वचितच दिसते. मंद प्रकाशातील जेवण, पब/बार मधील प्रकाशयोजना, रात्री आडवाटेवरील पायर्‍या ते उघडे बीचेस अश्या विविध ठिकाणी एरवी चुकूनच दिसणारा प्रकाश व छाया यांच्या खेळाचा विचार इथे दिसतो. भगभगीत ढोबळ प्रकाशयोजना टाळण्यासोबत ध्वनी, संवाद यांचाही हवा तितका व योग्य वापर चित्रपटात आहे. रायटर्स ब्लॉक सूचीत करण्यासाठी वरवर कंटाळवाणे भासणारे सीन्स चित्रपटाची लांबी वाढवत असतीलही पण त्यातून प्रेक्षकापर्यंत तो "व्हॉइड" पुरता पोचतो.

शिवाय या चित्रपटाचे चित्रीकरण खरोखरच छान आहे. छान म्हणजे तांत्रिकदृष्ट्या छान आहेच शिवाय चाकोरी मोडणारे आहे. समुद्रकिनारा म्हटला की निळाशार समुद्र वगैरे न दाखवता कबीर/रॉयच्या मूडप्रमाणे योग्य त्या प्रकाशयोजनेसह तो कधी ढगाळलेल्या वातावरणात, कधी रौद्र, कधी शांत तर कधी अंगावर हळुवार बरसणारा म्हणून समोर येतो. मलेशियाच्या लहान गावांतील चित्रीकरण, तिथे वेळीअवेळी पडणारा पाऊस दरवेळी चकचकाटात बुडलेल्या मलेशियाच्या चित्रणापेक्षा कितीतरी आश्वासक आहे. या व्यतिरिक्त जॅक्लीन फर्नांडिसचे सुंदर दिसणे, काही छान गाणी (जरी ती मध्येच उगवतात) हा बोनस आहेच. अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूर दोघेही आपापल्या भूमिका छान व चोख करतातच. पण हिंदीचा अ‍ॅक्सेंट ब्रिटिश असूनही जॅक्लीन आपल्या दुहेरी भूमिकेत सर्वाधिक भाव खाऊन जाते.

राहता राहिला प्रश्न हा चित्रपट भारतात किती चालेल. तर माझ्या मते अजिबात चालणार नाही. मुळात एका विशिष्ट कारणाने या चित्रपटाचा वेग संथ आहे, प्रसंगी प्रेक्षकाला आणवलेला कंटाळासुद्धा विचारपूर्वक आणलेला आहे याचा विचार करण्याइतका प्रेक्षक सरावलेला नाही. दुसरे असे की सतत काहीतरी घडणारी चोरीची कथा मध्यांतराला संपते आणि मग उर्वरित प्रवास हा लेखकाच्या आंतरिक द्वंद्वाचा आहे. हे जर पोचले नाही (आणि पोचले तरीही) चतुर-नी-चकचकीत चोर्‍या बघायला आलेला प्रेक्षक स्वमग्न चित्रपटाला कंटाळणारच.

यात एक ठाम हीरो म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही, हिरॉईनचेही तेच. मलेशियाची फारशी हेलिकॉप्टरीय दृश्ये नाहीत. जॅक्लीन मादक वगैरे दिसली असली तरी एकही धड प्रणयदृश्य नाही, चोरी वगैरे असली तरी ती दुय्यम आहे, मारधाडही नाही की झाडाभोवतीचा पिंगा नाही, फॅमिली ड्रामा नाही की काहीतरी सस्पेन्स असल्याचा फील असला तरी तो लेखकाच्या आंतरिक द्वंद्वाचा भाग आहे हे नीटसे पोचत नाही. काही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोचतील असे अध्याहृत सोडले आहे. उत्तरार्धात पटकथा/संवाद कदाचित अधिक "स्पष्ट" केले असते तर भारतीय प्रेक्षकांपैकी काहींना हा चित्रपट अधिक आवडला असता, मात्र सध्या जे आहे ते वेगळे आहे आणि रोचक आहे इतके खरे.

थोडक्यात संथ, किंवा रटाळ परंतु एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट पाहायचा असेल तर रॉय चुकवू नका. अन्यथा टीव्हीवर रिलीज झाला तर बघा.

 

रॉय - चित्रपटाची /नाटकाची माहिती

रॉय
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: विक्रमजीत सिंग
  • कलाकार: रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, जॅक्लीन फर्नांडिस
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: -
  • निर्माता देश: -