पीटर ऍण्ड वॅण्डी (2009): अशा प्रेमकथा हिंदीत कधी बरं येतील?
सगळ्याच प्रेमकथा भव्यदिव्य, उदात्त, उत्कट असतात असं नाही. त्या बघताना आपल्याच चुकत्या-माकत्या डेट्स आणि भांडणं आणि ब्रेकप्स पडद्यावर बघितल्यासारख्या वाटून मजा वाटते. 'यात काय मोठंसं?' असा प्रश्नही पडतो, पण आपण त्या संपेस्तोवर बघत मात्र राहतो. त्या संपताना आपल्या चेहर्यावर छानसं हसू सोडून जातात आणि आपण खांदे उडवून आपल्या कामाला लागतो. पण म्हणून त्या गोष्टी विसरल्या जातात असं नव्हे. बघताना साधेसेच वाटलेले त्यातले संवाद, भांडणातला एखादा जळजळीत टोमणा, एखादी गोंधळलेली ओळ आपल्यापाशी राहून गेलेली असते. एखाद्या मोक्याच्या क्षणी तळ ढवळला जावा तशी अचूक वर येते. आपण दचकतो आणि मग पुन्हा एक हलकंसं हसू त्या गोष्टीच्या रोखानं सोडून देतो....
पीटर अॅण्ड वॅण्डी ही अशातली प्रेमकथा आहे.
प्रेमकथांचे कुठलेच ठरीव नियम पाळून ती दाखवलेली नाही. तिला सुरुवात-मध्य-शेवट नाही. खलनायक नाहीत, वा प्रेमकथांना टोक काढून देणारी 'तिसरी' पात्रंही नाहीत. ती आपली पीटर आणि वॅण्डीची गोष्ट आहे, बस. ते, त्यांची साधीशी आयुष्य, त्यांचे गोंधळ, त्यांचे कंटाळे, त्यांचे गंड, त्यांना एकमेकांबद्दल वाटलेली आणि वाटत राहिलेली ओढ हीच त्यांच्या गोष्टीतली पात्र. एकमेकांपाशी रत झालेले पीटर नि वॅण्डी, प्रेमाची कबुली देणारे आणि दुसर्याच्या कबुलीनं मात्र हबकून जाणारे पीटर नि वॅण्डी, आपापले हट्ट नि गंड एकमेकांवर बिनदिक्कत सोडणारे आणि कुत्र्यामांजरांसारखे भांडून एकमेकांना मनसोक्त दुखावणारे पीटर नि वॅण्डी... अनेक रूपं. अधली-मधली, नंतरची, आधीची.... गुलजारची आठवण टाळताच येऊ नये अशा प्रकारे त्यांच्या गोष्टीचं कोलाज हळूहळू आकार घेत राहतं. मात्र त्या गोष्टीला आपली अशी एक अंगभूत लय आहे. बघता बघता ती आपल्याला या दोघांच्या विश्वात ओढून नेते.
इतरही पात्रं आहेत खरी. पण एखाद्या निष्णात चित्रकारानं फार तपशीलकाम न करता एखाद्याच जोरकस फटकार्यानिशी कुणाचं जिवंत चित्र रेखाटून जावं तशी ती आहेत. पीटर नि वॅण्डीचं फटाटल्यानंतर आपण बघतो तो क्रिस्मस डिनरचा प्रसंग त्यातलाच. त्यात वॅण्डीची बहीण, तिचा नवरा, वॅण्डीची पाच-सहा वर्षांची भाची, वॅण्डीचे आई-बाबा.. इतकी मंडळी दिसतात. पण त्यांची ओळख पटते ती त्यांच्या एखाद-दुसर्या संवादाच्या ओळीतून. वॅण्डीच्या भाचीला पीटरनं गेल्या वर्षी बनवलेल्या सारणाची आठवण येतेय नि तिला पीटर या विषयापासून यथाशक्ती दूर ठेवण्यात बाकीची मंंडळी तारेवरची कसरत करताहेत. बहिणीची लेकीला वळण लावायची धडपड, तिच्यापासून सत्य का बुवा लपवायचं, हा तिच्या बापाचा रास्त सवाल, वॅण्डीच्या आईची पीटरबद्दलची नापसंती... असं सगळं एकेका संवादातून लख्ख दिसत राहतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पीटरबद्दल आपल्याला अजुनी आपलेपणा वाटतोच आहे, हा वॅण्डीला झालेला साक्षात्कार जेस वाइक्स्लरनं आपल्या बदलत्या चेहर्यातून जो काही दाखवला आहे, त्याला तोड नाही.
पीटरचं काम करणार्या जेसन रिटरची कामगिरी जराही कमी नाही. त्यानं रंगवलेला पीटर गोंधळलेला आहे. पण त्याचं स्वत्वाचं भान जागं आहे. त्याचं वॅण्डीमध्ये गुंतत जाणं आणि त्या प्रक्रियेत आपलं वेगळेपण आपण हरवत चाललो आहोत या जाणिवेनं हबकून जाणं अगदी जवळचं वाटणारं, नात्यांमध्ये तुम्हा-आम्हांला पडणार्या प्रश्नांची आठवण करून देणारं आहे. इंटरव्यूच्या टेन्शनमुळे कचाकचा भांडणारा, पोरकटपणे वॅण्डीला दुखावण्यासाठी मुद्दामहून पीनट बटर आणि जेलीच्या बाटल्यांमध्ये एकच सुरी खुपसणारा, तिच्या प्रेमात पडल्याची कबुली देताना सगळ्या असुरक्षिततांना सामोरा जाणारा, नि रस्त्यात अवचित भेटलेल्या वॅण्डीला पाहिल्यावर हलून गेलेला पीटर लोभसवाणा आहे.
ही गोष्ट घडते मॅनहॅटनमध्ये. कोणत्याही महानगरासारखं हेही महानगर आपलं व्यक्तिमत्त्व सांभाळून असलेलं आहे नि ते या गोष्टीत आपली लहानशी पण न पुसता येणारी छाप सोडून जातं. कुटुंबांपासून एका अपरिहार्यपणे वेगळ्या होणार्या, एकेकट्या जगू पाहणार्या, स्वतंत्र, गोंधळलेल्या नि न गोंधळलेल्या, गुंतणार्या नि न गुंतणार्या तरुण लोकांचे अपरिहार्य महानगरी रंग या गोष्टीचा भाग होऊन येतात ते मॅनहॅटनच्या पार्श्वभूमीमुळेच. ते वजा केलं, तर पीटर नि वॅण्डीची ही गोष्ट अपुरी वाटेल, अशा प्रकारे ते या गोष्टीतलं एक पात्र झालं आहे.
घासून गुळगुळीत झालेल्या प्रेमकथांच्या भाऊगर्दीत आपल्या गुंतागुंतीच्या, पण अभिनिवेशरहित साधेपणानं उठून दिसणारी ही गोष्ट पाहिली आणि कमालीचं ताजंतवानं वाटलं. अशा प्रेमकथा हिंदीत कधी बरं येतील?
-कलमवाली बाई (kalamwaali.baai@gmail.com)
पीटर ऍण्ड वॅण्डी - चित्रपटाची /नाटकाची माहिती
