धनक(२०१६): खास 'कुकनूर' स्टाइल धनक
आपल्याकडे लहान मुलांचे आणि तार्किक या दोन्ही निकषांवर चोख उतरतील असे सिनेमे खूप कमी आहेत. चांगली उदाहरणं द्यायची झाली तर अमोल गुप्तेचा स्टॅनली का डब्बा, बोक्या सातबंडे, मैं हूँ कलाम, तहान, ब्ल्यू अंब्रेला अशी काही नावं सापडतीलही, पण त्यासाठीही थोडं डोकं खाजवावं लागेल. हे सर्व सिनेमे चांगले असले तरी व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत तितकेसे चालले नाहीत आणि लोकांपर्यंत पोहोचलेही नाहीत. अशा सिनेमांची वारंवारता कमी असते हादेखील एक मुद्दा आहेच. या यादीत गेल्यावर्षी एक भर पडलीय- नागेश कुकनूर लिखित आणि दिग्दर्शित 'धनक' सिनेमाची.
’धनक’ घडतो राजस्थानातल्या मारवाडमध्ये. धनक म्हणजे इंद्रधनुष्य. जे खरंतर सहज दिसायला हवं, पण काही कारणानं दृष्टी गेल्यानं छोटूला ते दिसू शकत नाहीय. त्याला दृष्टी मिळावी आणि धनक दिसावं म्हणून आपल्यापरीनं प्रयत्न करणार्या परीची आणि तिच्या भावाची गोष्ट म्हणजे ’धनक’. याला जोड आहे त्यांच्या सिनेमांच्या वेडाची. छोटूला सलमान आवडतो तर परीला शाहरूख. आणि दोघेही आपापल्या हिरोंचे जबरे फॅन्स आहेत. एकदा परीला शाहरूखचं नेत्रदानावरचं पोस्टर दिसतं आणि योगायोगानं तो जेसमलेरला शूटिंगसाठी येतोय म्हटल्यावर त्याच्या मदतीनं छोटूची दृष्टी परत मिळवायची या उद्देशानं या दोघांचा झालेला प्रवास हे सिनेमाचं थोडक्यातलं कथाबीज.
आठ वर्षांचा छोटू आणि त्याच्याहून दोन वर्षांनी मोठी परी. दोघेही एका खेड्यात राहतात. छोटू चार वर्षांचा असताना पूर्ण कुटुंब पुष्करला गेलेलं असतं, तिथं दुर्घटना घडते आणि आईबाप दोघेही मरतात. सध्या काका-काकू त्यांना जगवतायत. पुष्करहून आल्यावरही काही दिवस त्याला दिसत असतं पण नंतर मात्र कालांतरानं त्याची दृष्टी जाते. त्यानं पाहिलेला शेवटचा सिनेमा आहे ’दबंग’. वाळवंटाकडचा भाग असल्यानं रेती नेहमी पायाखालची. शाळाही दूर आहे. दोघे बहिणभाऊ शाळेत जायला निघताना छापा-काटा करतात, जो जिंकेल त्यानं शाळेत पोचेतो त्याच्या आवडत्या हिरोची गोष्ट सांगायची हा दोघांचा शिरस्ता आहे. कजाग काकूपासून लपवून काका त्यांना मधून-मधून सिनेमाला नेतो. तिला कजाग तरी कसं म्हणावं? कारण ती दिवसभर राबते आणि नवरा नुसता दिवसभर बसून हुक्का पिणारा. ती मुलांना पोटभर खायला देत नाही आणि खरंतर कुपोषणानं छोटूचे डोळे गेलेयत हे मात्र आहे. . त्यामुळं शाळेत, खेळताना, रस्त्यावर, सिनेमा पाहाताना,सगळीकडं आता परीच छोटूचे डोळे आहेत.
हे सगळं वाचून आश्रित म्हणून वाढणारी पोरकी, त्यात एक अंध, मग काका-काकूच्या उपकारांखाली दबलेली, दर दोन प्रसंगांनंतर आईबाबाच्या आठवणींनी गळे काढणारी मुलं असं चित्र तुमच्या डोळ्यांसमोर आलं असेल ना? अहं.. इथंच हा सिनेमा वेगळा आहे. छोटू बिन्धास्त काकूच्या चुका दाखवतो, प्रसंगी तिच्याशी भांडतो, तिचं खोटं उघडं पाडतो, इतकंच काय, शाळेतल्या धटिंगणाला चुकवून न जाता त्याचा सामनाही करतो. तो धटिंगण रोज याला भारी पडून त्याचे सगळे कपडे काढून घेतो तरीही. परी त्याच्यामानानं थोडी शहाणीसुरती आहे आणि तिला छोटू जे काही करतो त्यातलं बरंच काही आवडत नाही. तरीही ती त्याची साथ सोडत नाही. उलट त्याला अभ्यासात मदत व्हावी म्हणून मुद्दाम दोन वर्षं नापास होते.
सिनेमाची कथा तरी साधी-सरळ आहे आणि तिला खुलवलंय दोघा बहीणभावाच्या संवादांनी. रस्त्यात भेटणार्या लोकांना खरं का सांगायचं नाही आणि मग खोटं कसं सांगायचं, हे छोटूचं अनुभवातून शिकणं, ट्रकड्रायव्हर आणि परी शाहरूखची स्तुती करताना छोटूचं कानावर हात ठेऊन ’सलमानभाई माफ करना’ म्हणत राहाणं किंवा दारूड्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बांगड्यांचा आवाज येतोय म्हणजे भीती मानण्यासारखं नाहीय असे छोटेछोटे प्रसंग सिनेमात छान आलेयत. एके ठिकाणच्या मुक्कामात छोटू परीशिवाय जगणं अवघड आहे हे त्याच्याच वयाच्या मुलासमोर मान्य करतो पण तो ते परीसमोर कधीच कबूल करत नाही. पण मग तिचं लग्न झाल्यावर छोटूचं कसं होईल या विचारानं एका रात्रीपुरती भेटलेली ही आठ वर्षांची दोन मुलं ’दोस्ती को रिश्तेदारी’मध्ये बदलण्याच्या गप्पाही करतात. सहसा सिनेमात वापरली जाणारी नॅरेशन पद्धत न वापरता, ही मुलं कशी अनाथ झाली किंवा त्याचे डोळे कसे गेले हे ही सिनेमाभरातल्या संवादातल्या तुकड्यांनी येतं. ते ही अगदी इमोशनल ग्लिसरीनभरल्या डोळ्यांनी न येता अगदी थेट-सरळधोपटपणे येतं. ते खटकत नाही, उलट अधिक सहज आणि आपसूक यावं तसं वाटतं.
रोड मूव्ही असल्यानं या दोघा भावंडांना रस्त्यात भेटणारी पात्रंही खूप आहेत आणि त्यातली बरीचशी पात्रं नीट उभं राहिलीत हे दिग्दर्शकाचं कसब. अतिशय खादाड, ’मैंने दस सालसे घेवर नहीं खाया’ म्हणत सतत अतिशयोक्ती करणारा आणि त्या खादाडपणापायी बरेचदा अडचणीत येणारा आठ वर्षांचा छोटू, त्याच्यावर वैतागणारी आणि लगेच तो वैताग किती फोल आहे हे जाणवणारी परी या दोघांचाही अभिनय वाखाणण्यासारखा आहे. सिनेमात दोन-चार ओळखीचे चेहरे सोडले तर सगळेच अनोळखी आहेत. परीची भूमिका हेतल गडा आणि छोटूची कृष छाब्रियाने केलीय. दोघं अगदी खरेखुरे बहीणभाऊ वाटावेत इतक्या सहजपणे एकमेकांसोबत भांडतात , खेळतात आणि खूषही होतात. बरेचदा तिचा वैताग इतका खरा वाटतो की ती आता त्याच्या कानाखाली एक ठेऊन देईल असंही वाटतं.
राजस्थान म्हटलं की गाणी यायला हवीतच. तशीही ती कुठल्याही भारतीय सिनेमात असतातच. ’धनक’चं मोनाली ठाकूरनं गायलेलं टायटल सॉंग सुंदरच आहे. त्यात मध्येच येणारा पॉज गाणं नकळत गुणगुणायला लावतो. मुख्यत: गिटारच्या पार्श्वभूमीवर पॅपॉन , विभा सराफ आणि शिवम पाठकने गायलेलं ’चल चलें’ ही सुंदर. पण या दोन्ही गाण्यांत राजस्थानी बाज नाही. तो आहे शिवम पाठकच्या ’जीने से भी ज्यादा जियें’ आणि ’मेहंदी रो रंग लागो पिया’ या दोन्ही गाण्यांत. ’मेहंदी’ तर खास राजस्थानी पारंपारिक लोकगीत आहे. त्याचा ठसका काही वेगळाच आहे. तरीही सर्व गाण्यांचा कळस आहे ’दमा दम मस्त कलंदर’ आणि “All I am saying, let’s give love a chance” या गाण्यांचं फ्युजन. कृष छाब्रियाचं अमेरिकन ऍक्सेंटमध्ये आधी गाण्याचा प्रयत्न करणं आणि ते जमत नाही म्हटल्यावर खड्या आवाजात ’मस्त कलंदर’ गाणं हा सीनच भारी जमून आलाय. परीच्या चेहर्यावरचे कौतुकाचे भावही पाहण्यासारखेच.
नाही म्हणायला उत्तरार्धात सिनेमा थोडा रेंगाळल्यासारखा वाटतो. शिरा माता किंवा शाहरूखने वापरलेल्या मगसोबत लोकांना सेल्फी काढून पैसे मिळवणार्या निनाद कामत सारख्या प्रवासातल्या काही व्यक्ती नसत्या भेटल्या तरी चालून गेलं असतं असं वाटून जातं. परी, छोटू, काका आणि काकी या मूळ व्यक्तीरेखा सोडल्या तर बर्याच लोकांचे, विशेषत: स्त्रियांचे पोषाख खूप नवीन आणि फिल्मीस्टाईल राजस्थानी वाटतात. पण ते असो. सिनेमाभर मुलं शाहरूख शोधत फिरतात आणि तरीही तो शेवटाला सिनेमात न येऊन आतापर्यंत चांगल्या चालेला सिनेमाला गालबोट लावत नाही या एका गोष्टीसाठी वरच्या गोष्टी नागेशला माफ आहेत. नागेश कुकूनूरनं यापूर्वी ’इकबाल’मधूनही भावाबहिणीचं नातं सुंदर चितारलं होतं आणि ’डोर’मधलं राजस्थानही. दोन्हीही गोष्टी इथं पुन्हा एकदा वेगळ्या मितीत त्यानं पेश केल्या आहेत. त्याच्या सिनेमांची यादी आठवली की हा माणूस इतके कमी सिनेमे का करतो हा प्रश्न पडतो.
धनक पाहायला सुरूवात केल्यावर, “हां, भारतीय ’चिल्ड्रेन ऑफ हेवन’ असू शकतो” असं वाटलं. पण नंतर लक्षात आलं की या सिनेमाची जातकुळीच वेगळी आहे. दोन्ही सिनेमांची तुलना होऊ शकत नाही पण दोन्हीही आपल्या ठिकाणी तितकेच महान सिनेमे आहेत. लहान मुलांची निरागसता आणि उत्सफूर्तता जपणारा, उगीच डोळ्यांत बोटं घालून न रडवणारा हा सुंदर सिनेमा कधी थेटरात लागला की नाही हे ही दुर्दैवानं कळालंही नाही. पण हा सिनेमा युट्यूब आणि नेटफ्लिक्स इंडियावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. पाहिलात तर सिनेमा पाहण्याचा पश्चात्ताप होणार नाही ही आपली गॅरंटी!!
धनक (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
