पिफ २०१८ः व्हिडियो पार्लर (२०१८): मनोरंजक पुर्वार्ध पण उत्तरार्धात हुकला
'व्हिडियो पार्लर' 'पिफ्-२०१८'मध्ये पहिला. तोच त्यांचा 'वर्ल्ड प्रीमियर' असल्याने अख्खी टीम आली होती. 'रंगा पतंगा'च्या दमदार पदार्पणानंतर वाढलेल्या अपेक्षांसह दिग्दर्शक 'प्रसाद नामजोशी' काय घेऊन येताहेत याची उत्सुकता होती. सुरुवातीलाच हा सिनेमा गेले १२ वर्षे घडतोय हे त्यांनी सांगितल्यावर उत्सुकता नि अपेक्षा दोन्ही शीगेला पोचल्या. इतकी वर्षे त्यात गेल्याने की काय माहीत नाही, पण थोडक्यात सांगायचं तर सिनेमा वाट भरकटलेला वाटला.
हा सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शित व्हायचाय. त्यामुळे कथेच्या फार तपशिलात शिरणं रसभंग ठरेल नि औचित्याला धरून राहणार नाही पण थोडक्यात सांगायचं तर विक्रम (संदीप पाठक) हा एक प्रथितयश व बऱ्यापैकी 'सुलझा हुवा' दिग्दर्शक एका स्वामींच्या मठात जातोय. त्या स्वामींचं नुकतंच निधन झालंय. त्या प्रवासात फ्लॅशबॅकमध्ये सिनेमा आपल्याला ऐंशीच्या दशकातल्या मध्यमवर्गीय घरात एकट्या आईने वाढवलेल्या विक्रमचं बालपण (पौगंडावस्थेपासून) दाखवतो. विशेषतः त्यावर असणारा सिनेमाचा प्रभाव, त्यातही व्हिडियो पार्लरमध्ये उत्तान सिनेमे चोरून बघणं, आणि एकूणच त्याचं त्याच्या नि त्याच्या मित्रांच्या आयुष्याच्या घडणीतील त्या पार्लरचं स्थान अश्या अंगाने हा सिनेमा पुढे सरकतो आणि शेवटी तो स्वामी (ओंकार गोवर्धन) नि विक्रम यांच्या या घटनांतून अनेकदा निर्देशित केलेल्या त्याच तत्त्वज्ञानाबद्दल कंटाळा येईस्तोवर बोलतो. हा स्वामी कोण असतो? त्याचं पुर्वाधाशी नातं काय वगैरे सिनेमा बघुनच समजेल.
कथा असो, पटकथा असो वा संवाद असोत वा ध्वनी/प्रकाशलेखन असो - सिनेमाचं लेखन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र पटकथा लेखनात हा सिनेमा गडबडला आहे. सुरुवातीला विक्रमच्या एकुणच घडणीतील त्याच्या बालपणाच्या घटनांचे, एका मित्राचे नि व्हिडीयो पार्लरचे स्थान दाखवत सिनेमा चांगला घडत जातो. पुर्वार्धातील लेखन, संवाद, मांडणी सगळेच नेमके आणि नेमक्या तारा छेडणारे झाले आहे. तोवर ही सगळी कथा विक्रमच्या दृष्टिकोनातून नि त्याच्याबद्दलच चाललेली असते. पुढे ही कथा या सगळ्या प्रसंगांचा विक्रमाच्या दिग्दर्शक होण्यात असलेला वाटा अश्या मार्गाने जाणे अपेक्षित होते. पण तसे न होता विक्रम घोषित करून टाकतो की त्याचे दिग्दर्शक होणं हे निव्वळ तो प्रवाहपतित असल्याने झालेय आणि कथा अचानक स्वामी, त्याचे तत्त्वज्ञान वगैरे कडे झुकते ती झुकते. खरंतर सिनेमाने प्रेक्षकांच्या अपेक्षांच्यापेक्षा वेगळं वळण घेणं हे नावीन्यपूर्ण असलं तरी ते वळण धक्कादायक नाही तर किमान नाट्यपूर्ण तरी हवं. सिनेमाचा पूर्वार्ध नि हा तत्त्वज्ञानात्मक उत्तरार्ध याचा सांधा सिनेमात अगदीच घाईत नि नावापुरता जोडला जातो आणि सिनेमा हे वेगळं वळण "आता हे काय आणि किती वेळ सांगणार" म्हणायला लावतं.
या सिनेमाचं बलस्थानं असेल तर त्याचं संवाद लेखन. अतिशय खुसखुशीत आणि नेमक्या पट्टीत मेसेज पोचवणारे चुरचुरीत संवाद धमाल आणतात. त्याच सोबत संदीप पाठक, ओंकार गोवर्धन आणि कल्याणी मुळे यांचे अभिनयही चांगले आहेत. त्यातही कल्याणी मुळे यांच्या अप्रतिम संवादफेकीमुळे कित्येक संवादांची खुमारी वाढलीच आहे. मात्र या कलाकारांना तोडीस तोड (खरंतर वरचढ ;)) अभिनय सगळे कुमार-कलाकार विशेषतः पार्थ भालेराव, रितेश तिवारी यांचा झाला आहे.
संगीत, ध्वनी, संकलन आदी तांत्रिक अंगे त्रास होणार नाहीत इतपत चांगली आहेत. या सिनेमाचा काही भाग ८०च्या दशकात घडतो. तो काळही एखाद-दुसरा अपवादात्मक प्रसंग (जसे दुकानांवरच्या लेटरिंगची पद्धत, चोरून सिनेमा बघताना घेतलेल्या प्लास्टिक पिशवीवरील प्रिंटिंग वगैरे) सोडले तर चांगला उभा केला आहे. इतकीही काळजी अनेकदा एतद्देशीय सिनेमांत नसते त्यामानाने हे काम फर्मास आहे. मात्र 'गावाकडे' वगैरे शब्दप्रयोग संवादात असताना प्रत्यक्षात निमशहरी भाग का दाखवला जातो हे काही समजत नाही. चित्रीकरण फारच देखणं असलं तरी सूचक गोष्टी तितक्याशा सटल नाहीत.
असो. थोडक्यात सिनेमाचा पूर्वार्ध खूप आवडला आणि उत्तरार्धात खूप काही ऐकून-पाहूनही "दादा, तुला नक्की म्हणायचंय काय?" असं म्हणावंसं वाटलं. एकुणात रंगा पतंगा नंतर त्याच दिग्दर्शकाकडून असलेल्या माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत हेच खरं. कदाचित फेस्टिव्हली सिनेमांसोबत हा सिनेमा बघितला गेल्याने माझी याबाबतीत फूटपट्टी वेगळी झाली असण्याचीही शक्यता आहेच. पण त्याला इलाज नाही.
व्हिडियो पार्लर (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
 
                        - Official Sites:
- दिग्दर्शक: प्रसाद नामजोशी
- कलाकार: ओंकार गोवर्धन, पार्थ भालेराव, संदीप पाठक
- चित्रपटाचा वेळ: १३० मिनिटे
- भाषा: मराठी
- बॉक्स ऑफिसचे आकडे: -
- प्रदर्शन वर्ष: २०१८
- निर्माता देश: भारत



